श्या!! नेमकं याच महिन्यात असं व्हायला हवं होतं का? दर महिन्याच्या सात तारखेला बरोब्बर होणारा पगार याच महिन्यात दहा तारीख आली तरी होऊ नये?
‘सॅलरी क्रेडीटेड’ या मेसेजची विशाल गेले चार दिवस अक्षरशः चातकासारखी वाट पहात होता. गेली आठ वर्षे तो या कंपनीत काम करत होता, पण सात म्हणजे सात तारखेला त्याचा पगार व्हायचाच.
रविवार असेल तर एक दिवस अगोदर व्हायचा,पण सात तारखेच्या पुढे कधी गेलाच नव्हता. आणि याच कारणासाठी तो बाकी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या नोकरीला चिकटून होता. पगार वेळेवर मिळणं, त्याच्यासाठी फार महत्त्वाचं होतं.
इथं शहरात तीन जणांचं कुटुंंब होतं त्याचं. आईवडील गावाला होते, मात्र त्यांचा खर्च चालवण्यासाठी दर महिन्याला पैसे पाठवायला लागायचे. महिना अखेरीस फार ओढाताण व्हायची. पंचवीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत दिवस अगदी एकेक करून मोजले जायचे. सात तारखेला सॅलरी क्रेडीटेडचा मेसेज पहिला की जीवात जीव यायचा त्याचा.
तसा तो दर महिन्याला त्या तारखेला यायचाच. पण नेमका या महिन्यात नको तेव्हा चुकला होता. आणि याच महिन्यात अकरा तारखेला त्याच्या मुलीचा, बेलाचा पाचवा वाढदिवस होता.
पाच वर्षांच्या बेलाला आता सगळं कळत होतं. तिला सगळी खेळणी हवीशी वाटायची. बाजूच्या चिनूकडे असणारी दुचाकी छोटी सायकल तिला हवी होती. सहा महिन्यांपासून ती तुणतुणं वाजवत होती. मला दोन पायांवर चालणारी सायकल हवी म्हणून!!
तुझ्या वाढदिवसाला नक्की घेऊ, असं म्हणत विशालने सहा महिने ढकलले होते. वाढदिवस जवळ यायला लागल्यावर बेला रोज विचारायची त्याला, पप्पा सायकल घ्यायचीये माहीत आहे ना? येईल जाईल त्या सगळ्यांना सांगत बसायची ती आता मला नवी सायकल मिळणार!!
सात तारखेला पगार झाला की नक्की घ्यायची हं सायकल, असं म्हणत एक तारखेपासून बेलाबरोबर तोही दिवस मोजत होता. मनात वाटायचं, छे काय हे? येतो तो पगार खर्चात जातो. आज बचत असती तर लगेच घेऊन दिली असती पोरीला सायकल, सात तारखेची वाट पहावीच लागली नसती!!
सात तारखेला तर कामात लक्षच नव्हतं त्याचं, सारखा मोबाईल चेक करत होता. ऑफिसमध्ये असताना नाहीच आला मेसेज, त्याला वाटलं घरी गेल्यावर नक्की येईल. बेलाने आल्या आल्या विचारलंच त्याला, झाला पगार? जायचं का आणायला सायकल? त्यानेच तर सांगून ठेवलेलं ना सकाळी, आज सात तारीख, आज पगार येणार!! तो आला की आपण संध्याकाळी जाऊन पहिले सायकल आणणार!!
सात गेली,आठ गेली, नऊ गेली अन् दहाही गेली. वाढदिवस तोंडावर आला. पहिल्यांदा असं झालं होतं. वाढदिवस नसता पोरीचा, तर एवढं काही वाटलही नसतं. दर महिन्याला न चुकता सात तारखेला मिळणारा पगार अजून कसा नाही, हे विचारणही त्याला योग्य वाटत नव्हतं, कारण कंपनीकडून इतक्या वर्षात हे पहिल्यांदाच झालं होतं.
उद्या वाढदिवस पोरीचा, ना ड्रेस घेतला ना सायकल, काय सांगू तिला? एवढ्या लहानपणापासून मन मारायला शिकवू का तिला?
नेमकं याच महिन्यात व्हायचं होतं का? आपलं असून आपल्याला वेळेवर नाही……
ऑफिसमध्ये बसून विशालचं मन नुसतं खात होतं त्याला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला, बायकोचाच होता तो. पगाराचं काही कळलं का, ते विचारायला केलेला तिनं. त्याने हिरमुसून नाही म्हटल्यावर, तिने त्याला त्याच्या जवळच्या मित्राकडे पगार येईपर्यंत थोडे पैसे मागण्याचा उपाय सुचवला. त्याने नुसतं ‘हूं’ केलं आणि फोन ठेवला.
त्याला कुणापुढे हात पसरण्याच्या विचारानेच कसंतरी झालं. आतापर्यंत जे असेल त्यात त्याने निभावलं होतं, पण कुणाकडे पैशाची मागणी मात्र कधीच केली नव्हती. अतिशय भिडस्त स्वभाव होता विशालचा. खरंतर राहुल त्याचा अगदी जीवलग मित्र होता. काही मागितलं तर जराही विचार न करता पुढे करणारा होता.
तरीही विशालला हे मागणंच नको वाटत होतं. पण बायकोने सांगितल्यावर एक मन मागायला काय हरकत आहे असा विचार करायला लागलच. स्वतःसाठी नाही निदान मुलीसाठी तरी. ठेवायचे कुठे आहेत आपल्याला? पगार आल्यावर द्यायचे तर आहेत!! अगदी दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे.
पाच वाजले तरी पगाराचा मेसेज नाही आला, म्हटल्यावर मुलीसाठी मनावर दगड ठेऊन त्याने मित्राला फोन लावला, आणि न घुमवता फिरवता एका दमात म्हणाला, राहुल एक काम होतं रे. उद्या बेलाचा वाढदिवस. आणि सात तारखेला पगारच नाही आला यावेळी. फक्त दोन तीन दिवसांसाठी दहा हजार पाहिजे होते.
तिकडनं राहुल म्हणाला, हsत् तिच्या…. एवढंच होय!! कसलं गंभीर होऊन सांगतोस रे? घाबरलो ना मी?
अरे मी काय परका आहे का? पंचवीस वर्ष ओळखतोय एकमेकांना आपण. एवढ्या वर्षात पहिल्यांदा पैसे मागतोयस तू!! हक्काने बोलायचं की रे!! आत्ता करतो ट्रान्सफर.
राहुलचं एवढं हलकं बोलणं ऐकून मन आणि डोळे भरून आलेल्या विशालने पुढे काही न बोलताच फोन ठेऊन दिला. आणि अगदी पाचव्या मिनिटातच मेसेज आला, वीस हजार ट्रान्सफर झाल्याचा.
मागोमाग दुसरा मेसेज आला राहुलचा, मुद्दाम जास्त केलेत, असु दे. वाढदिवस आहे पोरीचा. हातात असावेत. तुझा स्वभाव माहितीये मला.
आता मात्र विशाल डोळ्यातून येणारं पाणी अडवूच शकला नाही………
काही वेळाने थोडं सावरून त्याने बायकोला फोन करून बेलाला द्यायला सांगितला, आणि तिला म्हणाला, आवरून तयार रहा हं. आपल्याला सायकल घ्यायला जायचंय.
बेला तर, हेs हेs सायकल येणार!! आता माझी मज्जा करत उडयाच मारायला लागली.
संध्याकाळी तिघांनी जाऊन पहिले सायकल घेतली, मग बेलासाठी सुंदरसा ड्रेस घेतला. वाढदिवस घरातल्या घरातच होता. बाजूची दोन चार लहान मुलं फक्त येणार होती. छोट्याश्या केकची ऑर्डरही दिली.
दुसऱ्या दिवशी वाढदिवस मस्तच पार पडला. सायकल मिळाली म्हणून प्रचंड खूष असणाऱ्या बेलाकडे बघून विशालला वाटलं, याचसाठी केला होता अट्टाहास. फक्त याचसाठी पहिल्यांदा मागितलं काही कोणाकडून. जाऊ दे पोरगी तर खूष झाली. राहुलही आला होताच आपल्या बायको आणि मुलाला घेऊन. त्यालाही आनंदाने नाचणाऱ्या बेलाला बघून समाधान वाटलं.
पण नाही म्हटलं तरी विशालच्या जीवाला रुखरुख लागलीच. आपलं कष्टाचं असून वेळेला नाही मिळालं……..
दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल ऑफिसमध्ये पोचला, आणि खुर्चीवर टेकतोय तोच मेसेजची बीप वाजली. त्याने लक्षच दिलं नाही, असे बरेच मेसेज येत असतात म्हणून. मग दुपारी जेवताना जरा निवांतपणे बघितलं तर सात तारखेपासून डोळ्यात प्राण आणून वाट बघितलेला ‘सॅलरी क्रेडीटेड’ मेसेज सकाळी दहा वाजताच येऊन बसलेला.
विशालला वाटलं, आता काय मोल याचं? माझं स्वतःच असून कधी नव्हे ते ओशाळवाणं होऊन हात पसरायला लागले. गरज होती तेव्हा हुलकावणी मिळाली. नशीब पण काय एकेक खेळ खेळतं!!
पहिल्या मिनिटाला त्याने राहुलचे पैसे ट्रान्सफर करून टाकले. आणि त्याला सुंदरसा मेसेज पाठवला, तुझ्यासारखा मित्र मिळाला, आणखी काही मागणं नाही देवाकडून!!
दुसऱ्या मिनिटाला त्याने बँकेच्या ऍपमधे जाऊन महिन्याला पंधराशे रुपयांचं रिकरिंग सुरू केलं.
आता सॅलरी कधीही होवो, माझ्या पोरीच्या वाढदिवसाला पैसे असणारच माझ्याकडे, असं मनाशी म्हणत त्याने मोठ्ठा सुस्कारा सोडला अन् सात तारखेपासून मनावर आलेल्या दडपणातून एकदाचा मोकळा मोकळा झाला…………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.