Lalit lekhan – ललित लेखन
मी किनई ‘रोज नवा नाष्टा हवा’ या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा चाळीस पदार्थांची नुकतीच यादी बनवून ठेवलीये. तीस दिवसात एकही पदार्थ रिपीट करायचा नाही, म्हणून जास्तीचे दहा राखून ठेवलेत.
गेला आठवडाभर मी यादीप्रमाणे रोज एक पदार्थ बनवला देखील. त्यामुळे अंगात जास्तीचा हुरूप संचारला.
आज मुलाला शाळेत जाताना सांगितलं, तुला घरी आल्यावर शेवपुरी बरं का!
बघ हं, आता मला काही झालं तरी शेवपुरी हवीच, असं ठणकावून मुलगा शाळेत गेला.
कुठलंही कारण न देता मुलांना आज शेवपुरी बनवून खायला द्यायचीच असा सुगरणीचा अविर्भाव आपोआपच माझ्या चेहऱ्यावर आला. तसाही फार क्वचित वेळीच तो येतो.
मात्र तितक्यातच ”तू?, आणि शेवपुरी करणार?”
असा प्रश्न विचारून मुलीने तो भाव झटक्यात ठेचून काढला.
“अगं फारसं काही अवघड नाही त्याच्यात. केली होती मी एकदा तू लहान होतीस तेव्हा!! मस्त झाली होती!,” माझ्या शब्दाशब्दात आत्मविश्वास पाझरत मी तिला प्रत्युत्तर केलं.
मुलीने बेस्ट लकचा अंगठा दाखवला.
साधारण साडेचारच्या सुमारास मी युट्युबवर परफेक्ट मुंबई स्टाईल शेवपुरीची कृती बघून घ्यावी म्हणून फेरफटका मारायला घेतला.
आणि थोड्याच अवधीत लक्षात आलं की ते जे जे जिन्नस वापरत होते, त्यातले फारच कमी जिन्नस आत्ता या क्षणी आपल्या घरात आहेत.
त्यांनी चपट्या पुऱ्या स्वतः बनवल्या होत्या. मी त्या आमच्या पाणीपुरीवाल्या भैयाकडून चटदिशी आणणार होते. त्याबरोबर अफकोर्स बारीक शेव पण!
चटणीसाठी लागणारा पुदिना त्यांच्या घरात तर माझा, चौकातल्या भाजीवाल्याच्या टोपलीत होता. त्यांची कोथिंबीर हिरवीगार टवटवीत तर माझ्या फ्रिजमधली पिवळसर रंग धारण करून जीव टाकण्याच्या बेतात होती. चटणीला एकसंघता आणण्यासाठी डाळं हवं होतं, ते तर दिवाळीतल्या चिवड्यातलं सुद्धा आम्ही चिवडून बाहेर काढतो. ते घरी असणं शक्यच नव्हतं.
आंबट गोड चटणीसाठी लागणारी चिंच, आम्ही नेहमीच आमसूल वापरत असल्याने किराणावाल्याकडेच होती.
तर थंडीत डबाभर असणारा खजूर थंडी गेल्यावर डब्यात फक्त चिकटपणाच सोडून होता.
नाही म्हणायला दोन बटाटे होते परडीत. बघितलं तर त्यांनाही कोंब फुटले होते.
माझ्या शेवपुरीसाठी कुस्करून जाण्यापेक्षा एखाद्या कुंडीत जाऊन स्वतःचा वंशविस्तार करण्याचं त्यांना जास्त पडलं होतं.
चाट मसाला होता, पण आणखी जीवित राहायची मर्यादा त्याने सोडून दिली होती.
बटाटा, पुदिना, कोथिंबीर, चपट्या पुऱ्या, डाळं, खजूर, चिंच, चाट मसाला, बारीक शेव हे सगळं आणण्यासाठी लिस्ट मुलीच्या हातात थोपवली तर ती डोक्याला हात लावून म्हणाली, अगं इतकं सगळं बाहेरून आणण्यापेक्षा मी रेडिमेड शेवपुरीच आणते ना!
खरं सांगू? मला देखील लिस्ट बनवताना अगदी हेच्च् वाटलं होतं! सगळं तर बाहेरच आहे, मग बाहेरची शेवपुरीच मागवलेली काय वाईट!
तसही आमच्या इथला भैया फाssर चटकदार शेवपुरी बनवतो.
मुलगा शाळेतून आला, तसा दरवाज्यातच ‘मम्मी शेवपुरी केलीयेस ना?’ म्हणत मोठ्याने ओरडला.
त्याच्यापाठोपाठ आलेल्या मुलीने ‘शेवपुरी हाजीर है’ ची घोषणा केली.
मिटक्या मारत मारत पोरांना भैयाच्या हातची शेवपुरी खाताना पाहून, माझ्या हातची देखील अशीच खाल्ली असती का असा प्रश्न उगाच मनात डोकावून गेला त्याला ‘नाहीच’ असं उत्तर देऊन मी माझं माझंच मानसिक समाधान मिळवून घेतलं!!
मी पदार्थांची लिस्ट केली खरी, पण ते स्वहस्तेच बनवेन अशी कुठलीही अट मी स्वतःला लावून घेतली नव्हती. प्राधान्य घरी बनवण्याला असेल, पण प्रसंग पाहून, वेळेकाळेचं भान ठेऊन ते बाहेरूनही आणले जातील असं मनातल्या मनात म्हटलंही होतं.
हे किनई नेमकं सुरुवातीला सांगायचं राहिलं, म्हणून आता सांगतीये इतकंच😀
©️ स्नेहल अखिला अन्वित