जगणारी सगळीच माणसं ध्येयवादी, महत्वाकांक्षी असतातच असं नाही. तो किडा प्रत्येकालाच चावतो असंही नाही. किंबहुना बरीच जणं जसं जगणं समोर आलंय तसं जास्त काथ्याकुट न करता अगदी आनंदात जगत असतात.
चाळीशी पार केलेला अरविंददेखील तोपर्यंत आला दिवस साधारणपणे जाईल तसा घालवत जगत होता. आई- वडील, बायको, दोन मुलं असं भरलेलं कुटुंब होतं त्याचं. खाऊन पिऊन सुखी होते सगळे.
अरविंद खाजगी बँकेत कारकून होता. पगारात घरखर्च भागायचा. सणासुदीला हौसमौजही व्हायची.
घरी कुणाची तशी काही किरकिर नव्हती. आहे त्यात सर्व सुखी समाधानी होते. त्यांना बघून आणखी काही असावं, अशी इच्छा अरविंदच्या मनात डोकावतही नव्हती.
हा, आता त्याचं स्वतःचं घर मात्र नव्हतं. संसारवेल बहरलेली भाड्याच्या घरातच. दर चार पाच वर्षांनी घरं बदलायला लागायचीच. एवढी ती काय सल होती मनाला. पण घर घेणं आपल्या आवाक्यातलंच नाही, हे त्याच्या डोक्यात त्याने फिट्ट रोवलेलं. त्यामुळे ती सल त्याला तशी जास्त टोचायची नाही.
अरविंदची चाळीशी पार झाली होती तर त्याच्या वडिलांनी नुकतीच सत्तरी पार केली होती.
असंच घरी एकदा निवांतपणी गप्पा टप्पा चालल्या असताना अचानक ते म्हणाले, अरविंद तुझा चांगला फुललेला संसार बघितला भरून पावलो. शिवाय काशीयात्रा पण घडली. इतरही फिरणं बरच झालं. तसं आयुष्य समाधानात गेलं बघ.
पण एकंदरीत मला घर घेणं काही जमलं नाही. अगोदर वाटायचं मला नाही जमलं, तर काय झालं, माझा मुलगा घेईल!!
पण आता वाटतं, आमच्या हयातीत काही घराचं सुख नाही मिळणार आम्हाला.
ते असं बोलले आणि कधी नव्हे ते मनाच्या पार आत काहीतरी खूप खूप टोचलं अरविंदला. डोळे डबडबले, काही बोलता आलंच नाही आणि त्या रात्री झोपताही आलं नाही.
सारखा तोच एक विचार मनात पिंगा घालत होता. म्हणजे आपल्या वडिलांची इच्छा होती तर स्वतःच्या मालकीचं घर असावं!!
मग त्याला मागचं आठवलं……..
तो आठवीत असताना त्याला आणि त्याच्या दोन बहिणींना, वडील एक घर बघायला घेऊन गेले होते.
दोनच पण चांगल्या ऐसपैस खोल्या असलेलं घर होतं ते. पुढे मागे अंगणही होतं.
आपल्या मुलांना घर आवडल्यावर त्यांनी आनंदाने सांगितलेलं, थोड्याच दिवसात हे घर आपलं स्वतःच होणार आहे म्हणून!!
त्यानंतर अरविंद रोज विचारायचा आपल्या वडिलांना कधी जायचं त्या घरात म्हणून. पण ते थोडे दिवस मारुतीच्या शेपटीसारखे वाढत वाढतच जाऊ लागले. आणि एकदा मात्र थकून वडील त्याला म्हणाले, नाही जमणार आपल्याला तिथे जायला. आपण नंतर बघू दुसरं. पण तेही जमलं नाहीच. साठवलेले पैसे, पोरांच्या शिक्षणात, कुणाकुणाच्या आजारपणात, दोन मुलींच्या लग्नात कधी संपून गेले ते कळलही नाही.
नंतर अरविंद ते विसरूनही गेला. सरळ साधं आयुष्य जगताना त्याला कधी स्वतःचं घर नाही याचं फारसं दुःखही झालं नाही. ती कळ वडील जेव्हा एकदम तसं बोलले तेव्हाच हृदयात जाणवली.
बस्, अरविंदने ठरवलंच!! वडिलांच्या हयातीत घर घ्यायचं म्हणजे घ्यायचच. चाळीशी झाल्यावर त्याला महत्वाकांक्षेने झपाटलं.
तो घर शोधायला लागला. ओळखीच्या पाळखीच्या सर्वांना सांगून ठेवलं त्यानं. पण घर मिळणं एवढं सोप्पं थोडंच असतं!!
त्याच्या पगारात खरं तर घराचा हप्ता बसवणं जडच होतं तसं. पण ज्याने मनावर घेतलं होतं त्याने आता कशानेच अडायच नाही हे ही ठरवलं होतं.
रोज बँकेतून सुटल्यावर दोन तीन घरं बघून यायचा तो. कुठली जागा चांगली नसायची, तर कुठे किंमत आवाक्याबाहेर असायची.
शेवटी अनेक घरं बघितल्यावर त्याला त्यातल्या त्यात आपल्या बजेटमध्ये बसणारं घर मिळालं.
शहरापासून थोडं लांब असणाऱ्या नवीनच बांधल्या जाणाऱ्या संकुलात तीन खोल्यांचा ब्लॉक त्याने घरच्यांना दाखवून पसंत केला. वडीलांच्या मनात पुन्हा नव्याने आशा जागी झाली. मुलाने मनावर घेतलंय तर आपलाही हातभार लागावा म्हणून त्यांनी स्वतःजवळची साठवलेली रक्कम त्याला स्वखुशीने देऊन टाकली. बहिणींना कळल्यावर त्याही स्वतःहून पुढे आल्या. त्यांनीही जमेल तसा हातभार लावला. परत घेण्याचा अटीवर अरविंदने त्यांच्या पैशाला हात लावला.
बायको चांगली शिकलेली होती. पण मुलांसाठी म्हणून घरी होती. तिनेही आपलं घर होईल म्हणून हातभार लावायला पुन्हा नोकरी सुरू केली.
अरविंदने थोडं धाडस करून स्वतःच्याच बँकेतून जरा जास्तच कर्ज मिळवलं. हप्ताची रक्कम तशी मोठी होती. पण अरविंदचा ध्यास त्याहून मोठा होता. त्याला काहीही करून वडिलांच्या हयातीत स्वतःच्या घरात जायचंच होतं. अरविंदने कधी नव्हे ती मोठी झेप घेतली होती. घराची हौस पूर्ण झाल्यावर बाकी साऱ्या हौशीमौजी सोडव्या लागणार होत्या. तशी साऱ्यांनी तयारीच केली होती.
सुदैवाने सारं काही ठरलं तस पार पडलं. शुभ दिवस पाहून मोठी वास्तुशांत करून अरविंदचं कुटुंब नव्या घरी रहायला गेलं. तीन छोट्याच खोल्या होत्या. पण त्या छोट्या खोल्यांनी अरविंदच्या वडिलांच्या डोळ्यात मोठच्या मोठं समाधान भरलं होतं. ज्याला त्याला सांगायचे ते माझ्या पोराने घर घेतलं. मला नाही जमलं पण त्या बहाद्दराने जमवलं. आणि हे असं ऐकलं की अरविंदची छाती आनंदाने फुलून यायची. त्याला आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं.
पुढे घर झालं तसं, त्या घराच्या गुणाने म्हणा किंवा अरविंदच्या आता हप्ते फेडायला जास्त कष्ट घेतले पाहिजेत या विचाराने जास्तच समरसून काम केल्याने म्हणा, पगारात त्याला बढती मिळाली. हळूहळू सर्वांनी पुढे केलेले पैसे अरविंदने चुकते केले. आई-वडील समाधानाने वयाच्या नव्वदीपर्यंत जगले. त्यांनी स्वतःच्या घराचा पुरेपूर आनंद उपभोगला.
आता अरविंद स्वतः सत्तरीच्या जवळ पोचला आहे.
मागे वळून पाहताना त्याच्या मनात विचार येतोच, जीवनात फारसं काही विशेष झालं नाही. पण वयाच्या सत्तरीपर्यंत भाड्याच्या घरात राहणाऱ्या आमच्या आई- वडिलांना त्यांच्या हयातीत स्वतःच्या घरात राहायला मिळालं, हे हातून झालं अन् तेवढ्या एका गोष्टीने जे समाधान मी मिळवलं त्याला कशा-कशाची तोड नाही……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.