मी या अगोदर ‘बोबडे बोबडे बोल’ नावाचा लहान मुलांवर लेख लिहिला होता. पण फक्त लहान बाळांचे बोलच मजेशीर असतात असं नाही तर मोठ्या मोठ्या बाळांचे बोल सुद्धा तितकेच किंवा कधी त्याहून अधिक मजेशीर असतात बरं का!! असे एकेक नमुनेदार शब्द या मोठ्या बाळांच्या मुखकमलातून बाहेर पडतात, की घरभर हास्याचे फटाके फुटून जातात.
अगदी परवाचीच गोष्ट. आम्ही गावाहून येताना माझ्या मामाला सोबत आणलं. घरी पोचल्याबरोबर चहा पाणी घेऊन फ्रेश झाल्यावर साधारण पुढच्या सेकंदाला मामाला वाटलं, आपण घरी सुखरूप पोचलोय, ही वार्ता आपल्या नात्यातल्या सर्वदूर पसरलेल्या प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोचली नाही, तर जगबुडी होण्याचा संभव आहे.
तो झपाट्याने सुरु झाला……
होss हो ss आत्ताच पोचलो. प्रवास चांगला झाला. ओबर का ओल्याने आलो, गाड्यांना गर्दी होती ना!!
मी हसू आवरत, मामाला थांबवत म्हटलं, मामा, ओला होती ओsलाs
हा तेच ते…….मुंडी हलवत मामाने पुढचा फोन लावला.
हॅलो, पोचलो बरं का, आम्ही सुखरूप. फास्ट आलो. गोला का टोला बुक केली होती ना! चांगला झाला प्रवास!!
मी पुन्हा दात विचकत मधेच म्हणाले, मामा ओsला रे ओssला.
तरी पुढच्या फोनला आमचा ग्रेट मामा म्हणतो कसा, हा पोचलो पोचलो. ओलाव्यानेच आलो ना सगळे!!
नंतरच्या साऱ्या फोनमध्ये मामाने ‘ओला’ या अत्यंत साध्या शब्दाचे असे काही धिंडवडे काढले, की ते ओलावाल्यांनी ऐकले असते तर तडकाफडकी जीव सोडावा वाटला असता त्यांना!!
पण आम्ही मात्र ठरवलंय आता कधी कुठे जायचं म्हटलं तर बुक करायची तर ती फक्त ‘ओलावा’च!!
माझ्या मावशीच्या स्वीडनवारीत तिच्या मुलीने ‘फ्लॅपजॅक’ नावाचा एक ब्रिटीश पदार्थ भरपूर प्रमाणात करून मावशीला दिला. येताना मावशीचा मुक्काम माझ्याकडे होता. मला तो देताना मावशीने सांगितलं, हे ‘फॅपकॅप’ की काय ते आहे. माझ्या मुलीला खाऊ घालताना म्हणाली, ‘चॅटकॅप’ खाऊन बघ की जरा. मग माझ्या नवऱ्याला द्यायला सांगताना म्हणाली, अगं तो ‘टॅपकॅप’ दे की त्याला. प्रत्येकवेळी त्या पदार्थचं नवीन बारसं होत होतं. नक्की त्या पदार्थचं नाव काय आहे हे कळायला आम्हाला माझ्या बहिणीला फोन लावायला लागला. मग मावशीने तो नीट उच्चारला जावा यासाठी पाठ करून घेतला. तिला तिच्या गावी जाऊन मैत्रिणींना खायला घालायचा होता ना!! पण फ्लिपकार्टला स्लीपकार्ट म्हणणाऱ्या माझ्या मावशीने माझ्याकडे असेपर्यंत तरी काही तो शब्द धड उच्चारला नाही आणि तिच्या गावी प्रत्येक मैत्रिणींच्या डोक्यात तिने त्याचं नक्कीच वेगवेगळं नाव घुसडलं असणार याची तर खात्रीच आहे मला!!
पुढचा किस्सा तर माझ्या जीवलगीणीचा……
एकदा आम्ही दोघी एका भांड्याच्या दुकानात गेलो. तर ती दुकानदाराला म्हणाली, धुपाटणं द्या हो जरा धुपाटणं.
मी चकित होऊन म्हटलं, काय ग अजूनही तुम्ही धुपाटण्याने कपडे बडवून धुता?
छे ग, कपडे कुठले बडवतीस? देवासाठी पाहिजे ते?
केवढा कॉन्फिडन्स होता तिच्या शब्दात!!
देवासाठी धुपाटणं, माझे ठोके वाढले. एका क्षणी वाटलं, कोणाबरोबर फिरतेय मी? चक्रम बिक्रम झाली की काय ही बया?
दुकानदाराने ओठाचा चंबू करून एक दणकट धुपाटनं बाहेर काढलं.
ते बघून ती म्हणाली, ह्याचं काय करू मी? अहो देवाला ओवाळायला हवंय?
त्या महान स्त्रीला ‘धुपारती’ पाहिजे होती!!
कुणाच्या डोक्यात धुपारतीला ‘धुपाटणं’ हा शब्द कसा काय बसू शकतो हे त्या ओवाळून घेणाऱ्या देवालाच माहिती फक्त!!
आमच्याकडे एक मावशी होत्या. त्या एकदा मला म्हणाल्या, त्या मनुच्या आईने घरी भारी बडगड केली होती.
मला ऐकायला आलं, गडबड केली होती. मला वाटलं आता मस्त चटकफटक मसालेदार गॉसिप ऐकायला मिळेल.
मी उत्सुकतेने विचारलं, कसली गडबड केली हो तिने?
गडबड नाही हो! बsडsगsड…….मावशी आवाज वाढवून म्हणाल्या.
ते काय असतं? मी आणि माझी मुलगी एकमेकांचं तोंड बघत बसलो, आणि सुमारे दहा मिनिटांनी डोक्याला दीर्घ ताप दिल्यावर आमच्या लक्षात आलं आणि आम्ही एकत्रच ओरडलो, बर्गर!!
तेव्हापासून आम्ही बर्गरला ‘बडगड’ असंच म्हणतो.
माझ्या मुलीच्या मैत्रिणीचं नाव गार्गी आहे, त्यांनी ते ‘गाडगी’ असंच करून ठेवलय!!
या शब्दांच्या हेराफेरीत अधेमधे माझा पण नंबर लागतो हं!! टंग तर हजारदा स्लिपच होत असते माझी!!
मावशीने जसं फ्लिपकार्टला स्लीपकार्ट केलं तसच माझ्या तोंडात नेहमी फ्लिपपार्ट किंवा फ्लिककार्ट असच येतं. एक सेकंद दम घेऊनच मला उच्चारावं लागतं, फ्लिपकार्ट….
त्यातून नेमका पचका होतो, पार्सल नवऱ्याचं असेल तर त्याच्या मोबाईलवर otp येतो तेव्हा.
ते फ्लिपपार्टचं पार्सल आलंय रे, हेच तोंडातून निघतं. एकदा त्या पार्सल देणाऱ्यानेच मला दात दाखवत समजावून सांगितलं,
ताई, फ्लिsपsकाssर्ट असा उच्चार आहे बरं का!!
तो आंटी, काकी सोडून ताई म्हटला याचा मला कोण आनंद झाला होता सांगू!! माझ्या चुकीच्या उच्चाराला त्याने माझ्यासमोरच दात काढून करेक्ट करावं याचं जराही काही वाटलं नाही तेव्हा मला!!
अगदी अजूनही लॉलीपॉपला मी दुकानात मागताना ‘लॉलीपॉक’ असच मागते. कितीही काहीही केलं तरी ते तसच तोंडात येतं. आतापर्यत तेच बरोबर वाटायचं. पोरीने खूप प्रयत्न केला सुधारण्याचा, शेवटी हात टेकले आणि सोडून दिलं.
माझ्या आई आणि मावशीसाठी ते लालीपाक असंच आहे कायमसाठी!
पोरगा तर सगळ्या मोठ्यांना ‘पोकेमॉन’ या शब्दाचा नीट उच्चार करायला सांगून सांगून दमलाय आता.
कुणी पोकेमाल करतं, कुणी पॉकेमॉल करतं तर कुणी पोकोमॉन, एकाने तर पोकेलाल करून टाकलं होतं.
गंमतच आहे ना सगळी!! बोबडे बोबडे बोल लहानग्यांचे तर अडखळणारे अवखळ बोल मोठ्यांचे!! दोन्हीही जीवनात रंगत आणतात, हो की नाही?
तुमच्याकडचं पण सांगितलं तर चालेल की असं काही……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित