“मने, काकीला फोन कर ग. एवढा तुझ्यासाठी म्हणून गरमागरम इडली सांबार पाठवला तिने. चाटून पुसून सगळं फस्त केलंस, फोन करायचा तेवढा कशाला बाकी ठेवलास तो?,” मनीच्या आईनं आठवण करून दिली तशी मनीनं मनाचा हिय्या करून देवाचं नाव घेऊन काकीचा नंबर लावला.
मनी म्हणजे काकीची लाडकी होती अगदी. तिने काही मागावं आणि तिने लग्गेच हजर करावं!! पोरगी हवी म्हणता म्हणता तीन पोरांची लाईन लावली होती तिनं घरी. चौथा ही चान्स घ्यावा असं तिला अगदी मनोमन वाटत होतं, तेवढ्यात मनीची आई, तिची धाकटी जाऊ बाळंत झाली, अन् पहिल्या फटक्यात तिला मुलगीच झाली. मनीच्या काकीला धाकट्या जावेच नशीब थोर वाटलं अगदी. मनी झाली तेव्हा सिझेरियन झाल्याने तिची आई काही शुद्धीवर आलीच नव्हती लगेच. नर्सबाईंनी एवढुशी पिटुकली तिच्या काकीच्या हातात दिली, अन् काकीनं तेव्हापासून जो तिच्यावर जीव ओवाळून टाकायला सुरुवात केली ती आता मनी चौदा वर्षाची झाली तरी अजून ते प्रेम जरा म्हणून कमी झालं नव्हतं.
दोघी जावा पहिले तर एकत्रच राहत होत्या, पण नंतर जरा खाटखुट व्हायला लागली, तशा दोघी समजुतीनं वेगळ्या झाल्या. दोघींच्या घरामध्ये चार चौकाचं अंतर होतं.
पोरं सारखी येऊन जाऊन असायची दोन्ही घरी. मनीची काकी तिला सारखं काय काय करून पाठवायची. तिच्या डोक्यात स्वतःच्या तीन पोरांऐवजी मनीच असायची जास्त.
काकीचं म्हणायला गेलं तर सगळं चांगलं होतं, मनीलाही ती खूप खूप आवडायची. पण तिची एक गोष्ट सोडून……..ती लांबड भारी लावायची!! बोलायला सुरू झाली की थांबायचीच नाही. त्यातून फोनवर तर सर्वात जास्त.
म्हणूनच आता आईने जेव्हा फोन करायला सांगितला तेव्हा, तिने दोन मिनिटं शांत राहून मनाची पूर्ण तयारी केली. घड्याळ बघितलं, एक वाजलेला. “अजून जेवण नसेल झालं तिचं, उपाशीपोटी नाही बसणार लांबड लावत,” म्हणत नंबर लावलाच एकदाचा.
फोन नुसता वाजताच राहिला, जाऊ दे जेवणाच्या घाईत असेल म्हणून तेवढ्यापुरतं सुटल्यासारखं झालं मनीला. तिने विचार केला, “राहूदे फोन, संध्याकाळी घरीच जाऊन सांगावं.”
पण तेवढ्यात काकीचाच फोन आला, मनीला उचलू का नको असं झालं खरं, पण उचल़़लाच तिने आणि म्हणाली, “काकी मस्त झाला होता हं इडली सांबार!!”
“आवडला का? तरी किती दिवसांनी केला मी. पण इडल्या अगं तेवढ्या हलक्या नव्हत्या झाल्या नाही तरी? बघ ना, सांबाराला भोपळाच नाही मिळाला ग यावेळी.
हवा तसा नाही झाला.”
“काकी अगं खरंच छान झालेला ग. तुझ्या हातचं मला सगळं आवडतं,” मनीने आश्वासक आवाजात सांगितलं.
तरी काकीला पटलच नाही ते.
“मागच्या वेळी केला होता ना तेव्हा इडल्या पण चांगल्या झालेल्या अन् सांबार पण. त्या बाजूवाल्या शिंदेवहिनी गावाहून आल्या होत्या ना त्यांच्या मळ्यातला भोपळा, वांगं अन् शेंगा घातल्या होत्या ना त्यात, चव भारी सुटलेली त्याला. तू ओळखतीस ना शिंदेवहिनींना?
त्यांच्या मुलीचा पोरगा यावर्षीपासून नर्सरीत जाणार बघ. चुणचुणीत आहे चांगला.”
“काकी मला काय करायचंय त्याचं, काळा का गोरा बघितलं नाही मी त्याला कधी,” मनीच्या ओठावर आलेलं तिनं आत ढकललं. अन् ‘हो का’ बोलून गप्प बसली.
“ए परवा तुझ्यासाठी एवढं चिकन पाठवलं, सांगितलं नाही तू कसं झालं ते? मी म्हटलं आता करशील नंतर करशील, तू काय फोन केलाच नाही आपल्या काकीला. आली पण नाहीस दोन दिवसात. फारच सप्पक होतं का ग? तिखट थोडं कमीच पडलं माझ्याहातून. काकांना नाही आवडलं तुझ्या.” काकी इडली सांबारवरून चिकनवर अगदी सराईतासारखी पोचली.
“काकी करेन करेन म्हटलं आणि विसरूनच गेले बघ. अभ्यास नेमका जास्त होता ग त्या दिवशी. सॉरी ग. भारी झालेलं चिकन हं.” मनी सगळी उत्तर शॉर्टकट मध्ये देत होती. न जाणो कुठून कुठं वाट फुटायची, आणि काकीची गाडी नॉनस्टॉप सुटायची!!
“नेहमीचा चिकनवाला नव्हताच अगं नेमका त्या दिवशी. “
“झाली सुरू,” मनीनं डोक्यावर हात मारला. घड्याळात बघितलं, पंधरा मिनिटं ऑलरेडी होऊन गेली होती.
“हो का?.” काहीतरी बोलायचं म्हणून मनी म्हणाली.
“बरं, जेवणं झाली का तुमची?”
“हो केव्हाच. इडली सांबारवरच भागवलं आज सर्वाना. भरपूर केलं होतं सगळं, म्हटलं हेच जेवण अन् हाच नाष्टा.
तर तुला ते चिकनच सांगत होते नाही का?,” मनीचा विषयांतराचा प्रयत्न तिच्या लाडक्या काकीनं हाणून पाडला.
“बघ ना मला कोंबडी खायची हुक्की यावी अन् नेमका नेहमीचा विश्वासातला चिकनवाला नसावा. पण मी देखील जिद्द सोडली नाही. पार अगदी नाक्यावर गेले, तिथं होतं बरं, पण लेकाचा काय च्या काय भाव सांगत होता. माझं डोकच फिरलं, त्याच्या नाकावर टिच्चून मी रिक्षा पकडली आणि तिकडं मोठ्या मार्केटमध्ये घ्यायला लावली. येऊन जाऊन एकशे पन्नास झाले रिक्षाचे, पण चिकन चवीचं मिळालं अगदी. तुला नाही का ग लागली वेगळी चव?”
मनी उसन्या उत्साहाने म्हणाली, “हो ना मस्त होती चव काकी.” पण तिला आता बोलून बोलून कंटाळा आला होता. हात कान दोन्ही दुखायला लागलेले. काकी कधी एकदा फोन ठेवते असं झालेलं, तिची आई याच कारणाने कधी तिला फोन करत नव्हती. कशासाठीही फोन करा, काकी कमीतकमी पंधरा मिनिटं फोनवर आपल्याला पकडून ठेवणार याची गॅरेटीच असायची.
मनी तिचं मेन गिऱ्हाईक होती. मनी मूड असला की तिच्या गप्पा ऐकत बसायची नाहीतर काहीतरी फटकन् चातुर्याने बहाणा शोधायची. तिला ते चांगलं जमायचं.
चिकनपुराण आटोपल्यावर “काकी ठेवू का फोन आता,” असं तिनं धारिष्ट्यानं विचारलं. काकी म्हणालीही बरं ठेव. मनी चल बाय असं म्हणताच काकीला आणखी काहीतरी डोक्यात लकाकलं तशी ती म्हणाली, “तू येशील का उद्या माझ्याबरोबर? ती माझी चुलती राहते ना तिला भेटले नाही मी बरेच दिवसात. तिची बघ ना पोरं सुना तिला अजिबात विचारत नाहीत ग.”
मनीचं हु का चू आलं नाही म्हणून काकीनं तपासणी केली.
“ऐकतेयस ना ग मने?”
मनी तिकडं जांभायावर जांभाया देत होती. मनीचं घेणं ना देणं असलेल्या काकीच्या चुलतीच्या घरातलं रामायण महाभारत कसं टाळावं याचा विचार तिच्या डोक्यात घोळत होता.
काकीची गाडी सुरू होती. चुलतीचं तोंड एवढसं झालय ग अगदी. शरीर पण वाळलय नुसतं. म्हणून मी आपली जाते कधी मधी भेटायला. तेवढाच तिला आधार. तरुणपणी काय होती तुला सांगू!! आता खचली ग पण.
बघ ना एवढी दोन पोरं, एक बघत नाही. मला तीन, एकतरी बघेल ना ग माझ्याकडे?, काकीचा कंठ दाटून आला.
“काकी त्यांनी नाही बघितलं तर मी बघेन, तू काळजी नको करू,” मनीने तिला धीर दिला.
तशी काकी पुन्हा सुरू झाली, “म्हणून पोरगी हवी होती मला. देवानं ऐकलं अन् तुला पाठवली. जावेच्या पोटी का असेना!!”
“काकी माझा क्लास आहे, ठेवते मी फोन असं म्हणून पुन्हा बाय बाय झालं, फोन ठेवता ठेवता काकी पुन्हा म्हणाली, तुला एक सांगायचं राहीलं , मनी अगदी काकुळतीने म्हणाली, काकी उद्या येतेय ना मी तुझ्याबरोबर तेव्हा सांग. आता माझा क्लास सुरू होईल ग. मला ओरडा बसेल.”
“बरं ठेव.”
मनीनं फोन संपला तसा, फोनवर बोलण्याचा टाईम बघितला, ५५ मिनिटं १५ सेकंद. “साधा इडली सांबार छान झाला सांगायला केलेला फोन हिला. थांबतच नाही अजिबात!!”
“तासभर झाला की मने,” तिची आई आतून ओरडली. तशी मनी म्हणाली, “तूच सांगितलंस ना मला.”
“हो ग काय करतेस. जीव आहे तिचा तुझ्यावर. ऐकून घेत जा आपलं कधी. कोणी ऐकायला नाही म्हणून भडाभडा बोलते आपलं तुझ्याशी.
तिची पोरं कुठलं एवढं ऐकत बसलीयेत. त्यातून हिचं बोलणं म्हणजे फुलस्टॉप नाहीच. कितीवेळा सांगितलं कमी बोलत जा, माणसं कंटाळतात. पण तिची सवय काही जातच नाही.”
आई म्हणूनच ऐकते ग. मलाही आवडते ती, थोडी कमी बोलली तर मात्र खूपच जास्त आवडेल, हे ही तितकंच खरं!!
मनी बोलायला बोलली खरी पण तिला आणि तिच्या आईला दोघींनाही चांगलं ठावूक होतं, एकवेळ इकडचं जग तिकडं होईल, पण काकीची लांबड लावायची सवय सुटू म्हणता सुटणार नाही………!!
तुमच्या पाहण्यात आहेत का अशी माणसं? एकदा सुरू झाली की थांबता न थांबणारी.
गंमत सांगू का, माझ्या माहेरी बरीच माणसं अश्शीच आहेत अगदी!! मला फार आवडतात पण तरीही……..
मला लख्ख आठवतात ते माझे आजोबा, मला पकडून पकडून किती काय काय सांगत बसायचे, आणि योगायोग म्हणजे माझ्या मुलीचेही आजोबा तसेच आहेत अगदी!!
माझ्याकडेही पास झालीये थोडी हवा नाही म्हणायला!!
बोलायला बरच आहे त्याबद्दल हो, पण पुन्हा म्हणाल आता हिनेच लांबड लावली😜
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
😂😂मस्तच 👌👌👌खूप आवडलं हे लांबड लावणं 💞💞
Mast khup chan