पराग एक अठ्ठावीशीतला तरुण. शिक्षण चांगले त्यामुळे नोकरीही चांगली मोठ्या कंपनीत!!
घरी आई आणि लहान बहीण. वडील तो कॉलेजला असतानाच देवाघरी गेलेले.
दोन वर्षांपासून याच्यासाठी वधू संशोधन सुरू झालेलं.
दिसायला चांगला होता, पण स्वभावाने एकदम घुम्या. आपण शंभर शब्द बोलू तेव्हा याच्या तोंडातून एक शब्द निघणार!!
घरात आवाज फक्त आईचा आणि बहिणीचाच. हा आहे की नाही याची खबरबात सुद्धा लागणार नाही कोणाला असा.
लग्न ठरण्यात पण याचा घुमा स्वभाव आड येत होता. स्थळ घरी आलं की जे काय बोलायचं ते आई आणि बहिणच बोलत, तो अगदी एखाद दुसरा शब्द तोंडातून काढणार. आजकालच्या मुली किती स्मार्ट, त्या लगेच ताडायच्या हा मुलगा आई आणि बहिणीच्या तालावर नाचणार!! त्या सरळ त्याला नाकारायच्या.
आईला तर खूपच काळजी वाटत होती. कसं होणार या मुलाचं. एवढी चांगली नोकरी, चांगला पगार असूनही लग्न जमवताना नाकात दम आणलाय नुसता!!
पराग तर स्वतःहून कशातच फारसा इंटरेस्टही दाखवत नव्हता.
जसं की आई म्हणतीये एवढी तर करूया लग्न. त्याला स्वतःला उत्साह नव्हताच कसला. एखादा वैरागी जणू!!
एके दिवशी त्यांच्याच दूरच्या नात्यातल्या कुणी परागसाठी स्थळ सुचवलं. मुलीचा फोटो व्हाट्सपवर पाठवून दिला.
फोटो बघून आई तर खूपच खूष झाली. तिने त्याला दाखवला, तो फक्त ठिक आहे म्हणाला.
बघण्याचा कार्यक्रम मध्यस्थांच्या घरी ठरला. मुलगी दिसायला सुंदर होती, त्याला साजेशी होती. आई आणि बहीण जेमतेम बोलून गप्प बसत होत्या, परागला बोलायला वाव मिळावा म्हणून. पण पराग बोलेल तर ना!!
तिच्या घरच्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं काम तेवढं करत होता.
कसा कोण जाणे पण त्यांच्याकडचा होकार आला.
आईचा आनंद गगनात मावेना. लाडक्या मुलाचे हात एकदाचे पिवळे होणार होते.
लग्न ठरल्यानंतर जे दोघांत नातं सुरू होतं, त्यासाठी पुढाकार मुलीलाच म्हणजे प्राचीलाच घ्यावा लागला. तिला वाटलं, हा स्वतःहून फोन करेल, जसे सर्वच करतात. पण ह्याने तसं काही केलंच नाही. तिला वाटलं, जाऊ दे; असतो एकेकाचा स्वभाव.
वाट पाहून तिनेच फोन केला आणि भेटण्यासाठी उत्सुकता दाखवली. त्यानेही मान्य केले. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर दोघे भेटले.
हा इथेही नेहमीप्रमाणे घुमाच!! आणि तिच्या स्वभावात खळखळणारा उत्साह!!
त्याने अवघडून का होईना पहिली भेट निभावून नेली.
नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा हिनेच बोलावण्याचा पुढाकार घेतलेला असायचा.
तिने त्याला विचारलं देखील, तुला स्वतःहून नाही का वाटत मला भेटावंस??
तो म्हणाला, मला व्यक्त नाही होता येत!!
तिने जास्त मनावर घेतलं नाही. ती बोलत राहायची तो ऐकत राहायचा. त्यावेळी तिला ते भारी वाटायचं!!
पुढच्या दोन महिन्यात लग्न पार पडलं. फिरायला काश्मिरला गेलं जोडपं. प्राची तर खूपच खुश होती. पिक्चरमध्ये बघितलं तसं छान रोमँटिक वातावरण!!
तिला वाटलेलं आता तरी खुलेलं पराग. पण तो इथेही तो निरुत्साहीच होता.
एकटीच नाचून बागडून, प्राची कंटाळली. तो कशातच इंटरेस्ट दाखवत नव्हता. आजूबाजूला बरीच जोडपी होती, त्यांची साऱ्यांची धमाल चालू होती. प्राचीलाही फार वाटत होतं, परागने तिच्याबरोबर असं सर्व करावं. खूप कंटाळा आला तिला त्याच्याबरोबर असण्याचा…….
हनिमूनला आल्यावर सुद्धा त्याचं असं निरस वागणं बघून, तिला पहिल्यांदा प्रश्न पडला, आपण बरोबर केलं ना?
कुठली झापडं लावून घेतलेली आपण डोळ्यावर याला निवडताना??
तिने त्याला विचारलं देखील तुला मी आवडत नव्हते तर कशाला केलंस माझ्याशी लग्न??
त्यावर तो म्हणाला, असं काही नाही ग, माझा स्वभावच असा आहे.
काश्मीरवरून परत आल्यावर ती नाराजीतच होती. त्याच्या बहिणीने तिला विचारलं देखील, काही झालंय का तुला??
त्यावर तिने सांगितलंही, तुझा भाऊ, अगदीच अरसिक आहे ग.
त्यावर बहीण म्हणाली, हो आम्ही तर त्याला वैरागीच म्हणतो. म्हणून तर लग्न करून दिल त्याचं, आता तूच काय ते बदल त्याला!!
प्राची मनात म्हणाली, असल्या लोकांनी खरं तर लग्नच नको करायला. खुश्शाल एकटं राहावं.
बाकी घरात सर्व नॉर्मल होतं, हा एकटा सोडला तर. नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं यांचं काहीच नव्हतं.
तो तिला खुलवायचा नाही, रिझवायचा नाही, इतकंच काय तर दिवसभरात ऑफिसमधून साधा एक फोन सुद्धा तिला करायचा नाही.
ती वाट बघून कंटाळून जायची. कुठे बाहेर जायचं तर हिच त्याला सांगायची. तेव्हा तो यायचा.
हळूहळू तिच्या मनात अनेक संशय यायला लागले. तिला वाटलं ह्याचं लग्नाअगोदर कुठेतरी प्रेमप्रकरण असणार, म्हणून हा असा वागतो. तिने विचारलेही.
त्याने नाही असेच सांगितले. पण तिला ते खरं वाटेना. तिने इतका निर्विकार माणूस कोणी पाहयला नव्हता.
तिने सासुलाही सांगितले, फक्त शरीरसुखासाठी याने माझ्याशी लग्न केले काय?? ते मिळालं असतं की बाहेर कुठेही पैसे देऊन!!
तुमचा मुलगा इतका निरस होता, तर का लावून दिले याचे लग्न??
माझीही काही स्वप्न होती; माझ्या नवऱ्याबद्दल, याच्या स्वभावाने सगळ्यावर पाणी फेरलं.
तिला तिथे राहून आता घुसमटायला लागलं, ज्याच्यासाठी आले, तो सोडून बाकी सगळे चांगले, पण काय उपयोग त्याचा??
काही दिवस माहेरी जायला म्हणून ती तिथून निघाली. माहेरच्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनाही धक्का बसला. घर बघितलं, नोकरी बघितली, मुलाचं वरचं वागणं बघितलं, अन् मुलगी देऊन टाकली. असंही काही असू शकतं याचा विचारच आला नाही कोणाच्या मनात.
त्यानाही वाटलं ह्याचं लग्नाअगोदर काहीतरी असावं, म्हणून मग त्यांनी त्याच्या ऑफिसमध्येही चौकशी केली.
तिथेही कोणी त्याच्याबद्दल वाईट बोलले नाही, फक्त तो स्वभावाने खूपच घुम्या आहे, त्याचं काही दुसरीकडे असलेलं आमच्यातरी कानावर नाही, अशीच माहिती कळली.
प्राची काही पुन्हा त्या घरात पाय ठेवायला तयार नव्हती. तिच्या घरच्यांनी समजावले, थोडे दिवस राहून बघ आणखीन कदाचित सारं सुरळीत होईल. त्यावर ती म्हणाली, कोणासाठी राहु मी तिथे, नवऱ्याला माझं जराही काही पडलं नाही, तो भावनिक ओलावा त्याच्याजवळ नाही. त्याच्या रात्रीची सोय म्हणून तिथे राहण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही.
या सगळ्यात दोन्ही कुटुंबाना अतिशय मनस्ताप झाला. कसाबसा दोन महिन्यांचा एकतर्फी संसार. मोडला तो पुन्हा सुरू झालाच नाही. परागच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी त्याला खूप समजावले, पण त्याने तिची मनधरणी केली नाही.
खरंतर काहीही प्रकरण नव्हतं परागचं, पण एकंदरीत तो तसाच होता, निर्विकार. त्याच्यात साधारण माणसासारखा उत्साहच नव्हता. माझा मी बरा, अशा टाईपचा होता तो. आणि आहे तसंच राहायचं होतं त्याला, कोणासाठीही बदलायची मनातूनच तयारी नव्हती त्याची.
त्याच्या आईला हे सारं चांगलंच माहिती असूनही तिने त्याला लग्न करण्यासाठी माझी इच्छा, माझी इच्छा करत धारेवर धरलं. आणि या सगळ्यात प्राचीचं आयुष्य होरपळलं गेलं.
प्राचीनेही लग्नाअगोदर दोघे भेटले तेव्हाच, जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करायला नको होतं. वागणं खटकलं तेव्हाच थोडा वेळ घेऊन आणखीन पारखलं असतं, तर आज ही वेळ आली नसती. काय मिळालं तिला असलं लग्न करून??
एवढा मोठा आयुष्य बदलणारा लग्नाचा निर्णय दहा वेळा काय शंभर वेळा विचार करून घेतला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला??
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा.
Nice