“कुठाय देव? सगळं झूठ!! एवढी तीर्थक्षेत्रं पालथी घातली मी, रोज तास तास पूजाअर्चा केली, ऐंशी वर्षाचा झालो देव काही दिसलाच नाही, खोटं आहे सारं……..”
आराम खुर्चीवर डोळे मिटून बसलेल्या अक्षयाच्या डोळ्यासमोर आजोबा आले. नुकताच महिना झाला होता त्यांना जाऊन. तेव्हापासून रोजच सगळ्या त्यांच्या आठवणी ती जरा शांत बसली की मनात फेरा घालायला लागायच्या.
आताही निवांतक्षणी तिच्या लहानपणापासूनचं सारं तिला एकेक करून नजरेसमोर यायला लागलं होतं. देवासाठी फुलं तोंडणारे आजोबा. छोटीशी परडी घेऊन त्यांच्यामागे पुढे मागे करणारी इवलीशी ती.
मग पूजा करताना मी हळद कुंकू लावणार, मी फुलं वाहणार, मी घंटी वाजवणार म्हणून पूजेत मग्न असलेल्या आजोबांच्या मागे भुणभुण करणारी ती!!
आजोबा देवासमोर ध्यान लावून बसले की त्यांचं बघून अगदी त्यांच्यासारखीच ध्यानस्थ होऊन बसलेली ती. अन् हळूच मिचमिचे डोळे करून संपलं का म्हणून त्यांच्याकडे बघणारी ती. आजोबांनी श्लोक म्हणायला सुरुवात कळल्यावर त्यांच्यामागे त्यांच्याहून मोठा आवाज काढत म्हणणारी ती.
देवाची अन् अक्षयाची ओळखच झाली होती ती आजोबांमुळेच!! सकाळी डोळे उघडले की तिला आजोबा दिसायचे ते देवापुढेच.
त्यांनीच गीतेचे कितीतरी श्लोक पाठ करून घेतलेले तिच्याकडून, त्यांनीच अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलेलं. त्यांनीच सगळी स्तोत्रं मुखोद्गत करून घेतलेली. त्यांनीच तर कितीतरी गोष्टी सांगितल्या देवांच्या तिला. देऊळं किती फिरली होती ती आजोबांबरोबर याची तर गिनतीच नव्हती. वयाच्या आठव्या वर्षीच पार अगदी काशीयात्राही घडली होती तिची आजी आजोबांबरोबर. जे जे जसं जसं आजोबांनी केलं तसंतसं तिने अगदी डोळे मिटून फॉलो केलं. आजोबांमुळेच देवावर अगदी गाढ श्रद्धा बसली होती आपोआपच तिची. पुढे मोठी होता होता जीवनात अनेक चढउतार आले तरी जरासुद्धा डगमगली नाही अक्षयाची ती श्रद्धा!!
लग्न झालं लांब दुसऱ्या शहरात, त्यामुळे आजोबांचा सहवास पहिल्यासारखा राहिला नाही. सुट्टीत आल्यावर मिळायचा तेवढाच.
अशीच एका सुट्टीत ती गेली असता, तिला तिचे आजोबा नेहमीसारखे वाटलेच नाहीत. ऐंशीला टेकले होते. पूजा अर्चा सगळी सोडून दिलेली, हातात माळ असायची सारखी ती देखील कुठेतरी कोनाड्यात गपचूप पडलेली होती. मिनिटामिनिटाला देवाचं नाव यायचं तोंडात, तेही सगळं सुटलं होतं.
व्याधींनी बेजार होऊन सोडून दिलं म्हणता, हिंडते फिरतेही होते चांगल्यापैकी.
थोडी वयानुसार स्मरणशक्ती कमी होत चालली होती इतकंच. आजीनेही सांगितलं, तसे बरेच आहेत ते. कुणाला काही करावं लागतं नाही अजूनतरी.
मग आजोबांनी एवढ्या वर्षांनी आपल्या सख्याशी फारकत कशी घेतली हे काही अक्षयाला कळेचना.
एक दिवस त्यांच्याजवळ जाऊन बाकीच्या गप्पागोष्टी करत करत तिने मनातला विषय काढलाच………
“आजोबा, देवाचं काही करताना दिसत नाही हो हल्ली तुम्ही?”
“कुठाय देव? सगळं झूठ!! अवधी तीर्थक्षेत्रं पालथी घातली मी, रोज तास तास पूजा अर्चा केली, ऐंशी वर्षाचा झालो देव काही दिसलाच नाही, खोटं आहे सारं……..”
“आजोबा देव कुणाला दिसलाय होय कधी? नसता हट्ट कसला हा?”
“हट्ट कसला हट्ट? देव मला भेटायला हवा होता. जन्मभर नुसती वणवण नशिबी. दिली असती एखादी ओझरती भेट, सार्थक वाटलं असतं ना जरा!! आयुष्यभर देव देव करून काय मिळालं मला? शून्य……..”
“ज्यांनी आपल्याला आपला पाठीराखा भेटवला, ज्याच्यावर सगळं सोडून मी एवढी निर्धास्त राहतेय, त्याच आजोबांनी हे बोलावं,” डोळे पाण्याने डबडबले, अक्षयाच्या तोंडातून पुढे शब्दच फुटले नाहीत काही.
ते बोलणं तेव्हा खुंटलं ते खुंटलच. तिला अगदी दुसऱ्या दिवशीच निघावं लागलं तिथून अचानकच, सासूबाई आजारी पडल्या म्हणून…….
आजोबांचं ते तसं वेगळं वागणं मात्र सतत रेंगाळत राहीलं तिच्या मनात.
पुढे दोन महिन्यांनी गेलेच ते. त्यांना घरात बसायला आवडायचं नाही. फिरायला सतत फिरायला आवडायचं, अगदी तसेच गेले फिरता फिरताच.
आता महिना झाला होता जाऊन, आणि अक्षयाचे डोळे जरा बंद झाले, की तिला आजोबा सारखे ‘काय दिलं मला देवाने?’ म्हणतानाच दिसत होते फक्त.
आज मात्र खोलातच शिरली ती सगळ्याच्या अन् त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समोर आलं तिच्या आपोआपच………
आता तर आजोबा नव्हते. मनापासून काही बोललेलं अगदी कुणापर्यंतही पोचतं, याच्यावर अक्षयाचा ठाम विश्वास होता; म्हणूनच तिने शांत मनाने आजोबांना डोळ्यासमोर आणलं आणि ती त्यांना म्हणाली, “आजोबा, आज तुमचं उत्तर शोधलय हं मी!!”
साठीला नाही पोचत होता तुम्ही तर तुम्हाला डायबेटीसने गाठलं होतं. आठवतंय ना?
तुम्हाला गोड खायची हौस फारच. आजीने तर कपाळालाच हात लावला, आता कसं होणार यांचं?पण पुढच्या काही दिवसात नेहमीसारखं कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जायचं म्हणून तुम्ही अक्कलकोटला जायचं काय ठरवलं, अन् तिथे तुम्हाला देवाबरोबर रामबाण औषधही मिळालं. जन्मभर तुम्ही हवं ते खाऊ शकलात, हे दिलेलं देवानं तुम्हाला…..!!
पुढे पाच वर्षांनी ट्युमर निघाला डोक्यात, तुमच्यापेक्षा आजीनेच हात पाय गाळले. सहज हवापालट म्हणून मुंबईला काय गेलात. अन् तिथेच निदान झालं. जराही वेळ दवडला गेलाच नाही, निष्णात डॉक्टरही मिळाला, आणि चुटकीसरशी त्याने तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढलं. सगळं जुळवून कुणी आणलं होतं हो आजोबा, इतकं सहज होत का नेहमी सगळं? तुमचं सगळं बघणाऱ्या आजीच्या मागेही पोटाचा रोग लागला. या वयात ऑपरेशनची काही शाश्वती नाही, जीवाला धोका होऊ शकतो, त्यापेक्षा आहे असच राहू दे, जगेल तेवढी जगेल, म्हणत सगळ्या डॉक्टरांनी हात टेकवले होते. आजीलाही वाटलं, आता काय दोन तीन वर्षच मी जास्तीत जास्त. आजोबा, तिच आजी अजूनही तुम्ही गेल्यावरही स्वतःला टिकवून आहे हो!! तुमच्यापेक्षा तब्बेतीनं नाजूक असूनही, सांगा कोणी धरून ठेवलं होतं तिला? पंधरा वर्ष झाली डॉक्टरांनी नाही सांगून, तरी जोमाने स्वतःबरोबर तुमच्याकडेही खंबीरपणे बघितलं इतके वर्ष तिनं. कुणी एवढा जोर भरला होता तिच्या अंगात? तेव्हाच तिला काही झालं असतं तर तुम्ही ऐंशी वर्षापर्यंत जगू तरी शकला असतात का सांगा बरं? देवाने काय दिलं हे कसं बरं कळलं नाही कधी तुम्हाला?
तुमच्या मुलांनी सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत छान सांभाळलं तुम्हाला, तुमच्या हरएक इच्छा पूर्ण केल्या. काय कुठे अडकून राहीलं होतं का काही तुमचं? अगदी निश्चिंत गेलात. तुम्हाला जे करायला भयंकर आवडायचं, ते करता करताच गेलात. कोणी ठरवलं हे सांगा पाहू?
आजोबा तसे भोग तर सर्वांच्याच वाट्याला येतात हो, तुमच्याही आले, पण त्याचा आशीर्वाद होता कायम तुमच्या पाठीवर, अन् तुमची कर्मही चांगली होती!!
तो तुमच्या मागेच होता हो, तुम्ही उगाच त्याने पुढे यायची आस धरून बसलात. तो काय माणूस आहे, केलेलं ओरडून ओरडून सांगायला??
प्रत्यक्ष भेटला नाही जरी, तो सगळीकडे होता तुमच्याबरोबर, अगदी तुमच्या आसपासच्या माणसातही होता. रामबाण औषध सुचवलं कुणी त्याच्यात होता, ते बनवून दिलं त्याच्यात होता, मुंबईच्या डॉक्टरात होता, तुमच्या बायकोत आणि तुमच्या मुलांबाळांतही होता, खर सांगायचं तर अगदी तुमच्यातही होता. तरी तुम्ही तळमळत होता, देव दिसला नाही म्हणून!!
‘तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी ॥’
तुकाराम महाराज म्हणतात, सगळं तुझ्यापाशीच आहे. मनुष्या, तुला मात्र त्याची जाणीवच नाही. परमेश्वर माणसाच्या देहातच आहे, माणूस ते सोडून उगाच शोधत फिरतो त्याला पन्नास ठिकाणी!!
सगळ्या संतांच्या गोष्टी तुम्हीच तर रंगवून रंगवून सांगितलेल्या नाही का मला? एवढी प्रत्येकवेळी अनुभूती देऊनही, म्हातारपणी त्याला आणखी जवळ करायचं सोडून त्याच्यावर रुसून त्याला दूर लोटलं तुम्ही. कधीकधी अगदी जवळच्या माणसांनाच आपण समजू शकत नाही, तसच झालं हो तुमचं!!
मनात घोळणारं सगळं बोलून झाल्यावर काही वेळ ती तशीच शांत बसली मुद्दामच!!काही नव्हतं आता उरलं, पोचवायचं ते सगळं पोचवून झालं होतं. आता उरली होती फक्त शांतता……
त्या शांततेत पुन्हा आजोबा येतात काय ते बघायचं होतं तिला!!
आलेच तेही, शरीराने नव्हते जरी तरी तिच्यातच होते तेही, अगदी मुरले होते, ती त्यांच्यासारखी अनभिज्ञ नव्हती मात्र!! तिला जाणीव होती सगळी!!
आले, अगदी तिला हवे तसेच आले. सात्विक, शांतस्वरूप देहबोली घेऊन, मुखी अखंड हरिनाम जपत, पूर्वीसारखे!!
अन् पुढेही अनेकदा येत राहिले, अगदी तसेच पूर्वीसारखेच……….!!
आजोबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून वाढलेल्या अक्षयानेच त्यांचा देवाबरोबर कायमचा समेट घडवून दिला.
तिला खाली, अन् आजोबांना वर कायमची शांती मिळाली………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.