तुम्ही मनावर घेत नाही हो!! ते घेतलंत ना की बघा तुम्हाला पाहिजे तशी जागा मिळवून देतो. आणि तुमच्या राहत्या जागेला पण चांगलं गिऱ्हाईक आणतो!! बोला करू का सुरुवात कामाला? आजच्या आज दोन गिऱ्हाईकं नाही पाठवली, तर नाव बदलून टाकीन माझं, आपल्या नेहमीच्या अविर्भावात विकास राजाभाऊंना म्हणाला.
काय लेका घरं दाखवतो तू? चार महिन्यांपूर्वी काय कमी हिंडलो का तुझ्याबरोबर? एक धड नव्हतं, त्याच्या बोलण्याला न जुमानता राजाभाऊंनी मात्र कुत्सितपणे शेरा मारला.
पण विकास काहीही ऐकून घेणाऱ्यातला नव्हताच. काय बोलता भाऊ तुम्ही? तुमची पसंती वेगळीच आहे. एवढ्या बारीक बारीक गोष्टी पाहता. एवढा विचार करता, सगळे एजंट थकले तुमच्यापुढं. किती वर्षं गेली शोधण्यातच मोजली का कधी तुम्ही? मला माहिती नाही समजू नका. खबर देतात सगळे आपल्याला. मला तर सांगितलंय कितीजणांनी, नादी लागू नको ह्यांच्या फुकट टाईमपास करतात. पण मी चिकाटीचा म्हणून सोडत नाही तुम्हाला, कळलं?
एवढा विचार करत राहीलात तर पुढची आणखी दहा वर्ष हवं तसं घर मिळणार नाही तुम्हाला. आवडीनिवडीला पण काहीतरी लिमिट असतं की नाही? बघायचं की नाही बोला एकदाच, नाहीतर सोडून द्या एकदाचं ते……
विकासच्या बोलण्यावर बघू, तुला दोन दिवसाने कळवतो म्हणत राजाभाऊ निघून गेले.
मोठ्या टॉवरमधे राहायला जायचं ही राजाभाऊंच्या बायकोची, लताताईंची इच्छा होती. अगदी त्या तिशी-पस्तिशीच्या होत्या तेव्हापासूनची. आणि आता साठीच्या पुढे पोचल्या तरी ती पूर्ण झाली नव्हती.
काही कमी नव्हतं त्यांना. दोघही सरकारी नोकरीत होते, पैसापाणी चांगलाच होता. सहजशक्य होतं त्यांना मोठ्या पॉश टॉवरमधे राहायला जाणं. तसं इतके वर्ष रहात होते ते घरही वाईट नव्हतं. पण म्हणावं तसं प्रशस्त नव्हतं, आणि लताताईंच्या मनाजोगं तर मुळीच नव्हतं.
पण त्यांची कितीही इच्छा असली तरी राजाभाऊंची पसंती सदैव आड येत होती. ते बघितलेल्या सगळ्या घरात काही न काहीतरी खुसपट काढतच रहायचे. अनेक वेळा वाद घालून लताताई आणि मुलंही थकली आणि त्यांनी टॉवरमधल्या घरातून मनच काढून घेतलं.
कित्येकदा तर असं झालं, डिल पक्की करून, आम्ही टॉवरमधील घर बुक केलं, असं नातेवाईकांना शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगून ऐन वेळेला राजाभाऊंनी ‘खो’ घातला होता.
त्यामुळे नातेवाईकांत आणि परिचितांत राजाभाऊंच्या कुटुंबाचं मोठ्या टॉवरमधे राहायला जाणं, चेष्टचा विषय बनला होता. आणि खोटं काय होतं त्यात? दहा दहा आणि वीस वीस वर्षे कोणी काय घर शोधत बसतं नुसतं?
लताताईंनी तर स्वप्नच सोडलं, ऐन उमेदीच्या काळात किती वाटायचं त्यांना, टॉवरमधल्या दहाव्या बाराव्या मजल्यावरच्या मोठ्या घरातल्या मोठया बाल्कनीत खूप सारी झाडं लावावीत. आपल्या आवडीचा झोपाळा लावून घ्यावा. कामावरून थकून आलं की त्यावर बसून फुलापानांकडे बघत गरम गरम चहाचे घोट घ्यावेत. कित्येक वर्ष डोळ्यासमोर हे स्वप्न बघत होत्या त्या. पण ते कधी प्रत्यक्षात झालंच नाही. आणि आता आपण असेपर्यंत होईल ही अशाही त्यांनी सोडून दिली.
मुलंही मोठी होऊन लग्नाला आली. लग्न ठरवताना देखील अगदी ठसक्यात सांगायचे राजाभाऊ या घराकडे बघू नका हं तुम्ही. मोठ्या टॉवरमधे घर घेणार आहोत आम्ही. डिल पक्की होतच आली आहे, लवकरच शिफ्ट होऊ.
पुढे दोन्ही मुलांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, तरी यांच्या टॉवरचा पत्ता नाही. शेवटी राहती जागा खूपच कमी पडायला लागली, म्हणून मुलांनीच स्वतःला आवडतील अशी त्यांची त्यांची घरं घेतली.
मागून येऊन त्यांची घरं झाली, पण लताबाईंचं टॉवरमधल्या घरात जाणं काही झालं नाही.
अमाप पैसा असूनही त्याचं तरुपणापासूनचं स्वप्न म्हातारपण आलं तरी पूर्ण होऊच शकलं नाही. निव्वळ राजाभाऊंच्या अतिचिकित्सक स्वभावामुळेच!!
विकासला काय त्यांच्या एरियातल्या सर्वच इस्टेट एजंटना त्यांची ही हिस्ट्री तोंडपाठ होती. विकास सोडून त्यांना घर दाखवण्यात कुणालाही इंटरेस्ट नव्हता. आता राजाभाऊ दोन दिवसांत सांगतो म्हणाले म्हणून विकासाने त्यांच्यासाठी एका मोठ्या टॉवरमधलं घर बघून ठेवलं. पंधराव्या मजल्यावर पाच खोल्याचं मोठं प्रशस्त घर होतं ते. प्रत्येक खोलीला बाल्कनी होती. आणि हॉलला लागून असणारी बाल्कनी तर एका खोलीएवढी मोठी होती.
दोन दिवसांनी राजाभाऊंचा फोन आल्यावर विकासाने त्यांना त्या घराबद्दल सागितलं आणि इच्छा असेल तर ताबडतोब बघायला बोलावलं.
राजाभाऊ बघायला काय हरकत आहे म्हणून गेले आणि चक्क त्यांना ते घर पहिल्या नजरेत पसंत पडलं. पैशाचा तर प्रश्नच नव्हता. विकासाला त्यांनी पाठीवर थोपटून सागितलं, वा!!आवडलं बाकी घर आपल्याला. मी हे घेतलच समज आता!! विकासही मोठ्ठ कमिशन मिळणार म्हणून अगदी हुरळून गेला.
कधी एकदा घरी जाऊन बायकोला सांगतोय असं राजाभाऊंना झालं होतं. अन् मधेच विचार आला, कशाला? आपण सरप्राईजच देऊ की तिला!!
केवढी खूष होईल ती!!
पुढच्या आठवड्याभरात त्यांनी सर्व बोलून ऍडव्हान्स रक्कम भरूनही टाकली. बाहेर फिरायला जायचं म्हणून त्यांनी बायकोला सागितलं आणि हे नवीन टॉवरमधलं घर दाखवायला नेलं.
विकासलाही अगोदरच बोलवून ठेवलेलं तिथं.
त्याने घर उघडून दिलं. आणि आत पाय ठेवताच राजाभाऊ लताताईंना म्हणाले, ये तुझं स्वागत आहे आपल्या घरात.
ये, बघ जेवढी मोठी आहे ही बाहेरची खोली. आणि जरा इकडे येऊन तर बघ, तुला आवडते तशी केवढी मोठी बाल्कनी आहे. पाहिजे तेवढी झाडं लाव इथे. झोपाळाही बांधुन घेऊ आपण.
स्वयंपाकघर तर बघ, कसं आधुनिकतेने सजलय.
आणि या बघ तीन बेडरूम्स. एक आपल्या दोघांची. आणि बाकीच्या दोन आपल्या पोरांच्या.
मग सगळं दाखवून झाल्यावर राजाभाऊंनी उत्साहाने विचारलं, कसं वाटलं घर तुला? आहे की नाही मस्त, अगदी तुझ्या स्वप्नातलं?
इतक्या वेळ गप्प असणाऱ्या लताताई आता मात्र मोठ्याने हसू लागल्या. विकास आणि राजाभाऊ दोघेही त्यांच्याकडे आ वासून बघतच राहिले.
दोन एक मिनिट खूप हसल्यावर मात्र जितक्या हसल्या त्याहून जास्त रडायला आलं लताताईंना. विकासाने पटकन त्यांना बसायला खुर्ची आणून दिली. राजाभाऊंना वाटलं, खूपच आनंद झाला म्हणून तिला नेमकं काय करावं सुचत नाही बहुतेक!!
रडून मन भरल्यावर मात्र त्या राजाभाऊंना म्हणाल्या, स्वप्नातलं घर मिळालं कधी? डोळे कायमचे मिटायची वेळ जवळ आल्यावर? मनातला सगळा उल्हास निघून गेल्यावर?
ह्या एवढया मोठ्या हॉलमध्ये आपण दोघं पळायचं का आता?
ह्या मोठ्या बाल्कनीत उभं राहायला त्राण नाही हो माझ्या पायात आता. माझीच निगा राखणं नीट जमेना आता मला, झाडांची कसलं जमतंय? झोपाळ्यावर बसून चहा प्यायची तर इच्छाच मरून गेली हो माझी!!
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मोठं टॉवरमधलं घर घेतलं म्हणून त्यात राहण्यासाठी एकदा स्वतंत्र होऊन बाहेर पडलेली मुलं परत येतील?
खूप खूप वर्ष वाट बघितली हो त्यांनी आणि मी देखील!!
पण ती वाट बघण्याचं लिमिट क्रॉस झालं अन् आता मात्र मन विटून गेलं……
ना माझी मुलं-सुना असणार, ना माझी नातवंडं इकडे तिकडे दुडुदुडू पळणार, एवढ्या मोठ्या घरात आता काय भुतासारखं एकटं रहायचं आपण? एवढ्या मोठया घरातली स्मशानशांतता जीवच घेऊन टाकेल हो माझी……..
म्हणतात ना, एखादी गोष्ट सतत टाळली की ती पुढे टळूनच जाते एकदाची!!
इतके वर्ष तुम्ही आडकाठी घेतलीत, पण आता मीच मोडता घालतीये, मला हे घर पसंत नाही, मी इथे राहणार नाही. इतकं बोलल्या आणि टॉवरमधल्या त्या पॉश घराकडे पाठ फिरवून लताताई तिथून चालू पडल्या आणि त्यांच्या मागे खाली मान घालून राजाभाऊही. जाताना मात्र विकासाच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि म्हणाले, हे ही डिल फिस्कटलं रे…….
विकासने खिशातला रुमाल काढला अन् स्वतःचे डोळे टिपले. झटकन् बायकोला फोन लावला आणि म्हणाला, आज लवकर येतोय. तुझी काश्मीरला जायची इच्छा होती ना? चल, आज बुकिंग करायला जाऊच आपण……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.