त्यावेळी मी नुकतीच साताऱ्याहून ठाण्यात आले होते. इतर सगळ्याबरोबर अर्थातच पिक्चरचं वेड पण मागोमाग आलं होतच.
साताऱ्यात असताना एक दोन तीनवाल्या माधुरीने डिंग डाँग डिंग करत जबरदस्त मोहिनी अस्त्र टाकलेलं, त्याने कुठंही गेलं तरी तिच्यासाठी दिलाचं धडकणं सुरू होतच!!
तिचा सगळा बायोडाटा तोंडपाठ होता.
हिट, सुपरहिट, सेमी हिट, फ्लॉप, सुपरफ्लॉप, सगळेच्या सगळे सिनेमे तिच्याखातर पाहिले जात होते. ती एकवेळ गडबडली असती, पण तिच्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या सिनेमांची लिस्ट मुखोदगत होती माझ्या!!
पुस्तकातल्या कविता म्हणताना किती वेळा जीभ अडखळली असेल, पण माधुरीची गाणी गाताना कधी म्हणून जडत्व आलं नाही तिला!!
मी फिदा होते तिच्यावर आणि तिच्या थिरकण्यावर!!
तिच्यासारखं दिसायचा प्रयत्न व्हायचा अन् नाचायचाही!! पहिलं काही आणि कितीही केलं तरी शक्यच नव्हतं, मात्र दुसरं किंचितसं जमवलेलं खरं……..
त्यावेळी हे तारे खरोखरच तारे असल्यासारखेच वाटायचे, दूर कुठेतरी आपल्यापासून लांबच लांब!!
कुणी म्हटलं याला बघितलं त्याला बघितलं तर फार अप्रूप वाटायचं त्या गोष्टीचं!!
आमच्यासारख्या मुंबई बाहेरच्यांना तर जरा जास्तच!!
तो वरचा एखादा तारा जमिनीवर, अगदी आपल्या पुढ्यात चमचम करेल, हे चुकूनही मनात आलं नसताना साक्षात तसं घडलं खरं……..
“माधुरी दीक्षित मिली रस्तेमे !!”
सांगते काय!! खरंच, अगदी रस्त्यातच भेटली ती. हमकोs आजकल है, इंतजाssर करत मोहक अदांनी घायाळ करणारी……..
आता कशी मिली बघा हं, सॉरी वाचा हं.
तेव्हा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो, आणि मस्तपैकी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पावसात मनसोक्त नाचून-बागडून झाल्यावर, दमून भागून माघारी परतत होतो. हवेत कुंद गारवा होता, पाऊस पडून पडून भागला होता. मी पेंगावस्थेत होते, तर आईबाबा कंटाळलेल्या………
तशातच वाटेत एका बंगल्याबाहेर बरीच गर्दी दिसली. मनात बाय डिफॉल्ट वाईटच आलं. पण तसं काही दिसत तर नव्हतं.
गाडीचा स्पीड कमी करून, काहीही लेना का देना नसतानाही आमच्याकडून अधिक माहितीच्या हेतूने विचारणा झाली.
तर कळलं, शूटिंग चालू होतं तिथं चक्क शूटिंग!!
माझ्या डोळ्यावरची झापड खाडकन् उतरली आणि मी आनंदाने टाळी पिटुन ओरडले, “शूटिंग? खरंच!!”
आम्ही गाडी पार्क केली. आता गाडी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर चार चाकी आली असेल तर तिला ताबडतोब हटवा बघू. तेव्हा आत्तासारखा चारचाक्यांचा सुळसुळाट थोडाच होता?
बुलंद भाsरत की बुलंद तसवीरsss
बजाजची चेतक होती आमच्याकडे. त्यावरूनच दुनिया फिरायचो आम्ही!!
तर तिलाच कुठंतरी बरी जागा बघून स्टँडला लावली आपली.
मग आम्ही घोळक्यात शिरलो. शिरताना माझं मी स्वतःहूनच कोणाला तरी विचारलं, “हिरॉईनी कोणती आहे हिरॉईनी ओ?”
“माधुरी है माधुरी”
“अय्या माधुरी?” मी उडालेच.
बाबा रे बाबा ये क्या हो गया……
मला जिवाच्या पलीकडे आनंद झाला.
एकतर जन्मात पहिले शूटिंग नावाचा प्रकार बघायला मिळणार म्हणून अन् दुसरं म्हणजे माझ्या तम्मा तम्मावालीचं म्हणून!!
धक धक गर्ल ती तो ‘बेटा’ आल्यावर झाली. तेव्हा माझ्यासाठी ती ‘डिंग डाँगवाली’, ‘तम्मा तम्मावालीच’ होती.
आईचा हात धरून मी गर्दीतून पुढे येऊन माधुरी अगदी डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण दिसेल अशा ठिकाणी उभी राहिले. पाच मिनिटात ती समोर आली, अगदी समोर. मी तिच्यावर मनातूनच पाच- सहा फ्लाईंग किस उडवले. गुलाबी पंजाबी ड्रेस, दोन मोठ्या वेण्या अगदी सोज्वळ रूप धारण केलं होतं तिने.
आपको देख के, देख देख के राज गयी ये जान, जान, जान……….
मनात चुटकन् तिचंच गाणं वाजू लागलं.
आमच्यासमोर शूटिंग होत होतं तो सीन होता, गेटमधून आत जायचा. ती कितीतरी वेळा नीssट आत जात होती बिचारी. पण त्या डायरेक्टरला काही ते पसंत पडतच नव्हतं.
आमच्यासमोर किमान दहा वेळा तरी तिने आतबाहेर केलं, मला तर प्रत्येकवेळी भाssरी आवडलं. पण त्या डायरेक्टरला काही आम्ही तिथे असेपर्यंत ते पटलं नाहीच बुवा!!
माझं मन भरलं तिला बघून आणि आत जाण्याशिवाय बया दुसरं काही करेना हे बघून कंटाळलंही. शूटिंग म्हणजे भारी, जबरदस्त असं काहीतरी वाटलेलं मला. पण समोर चाललेल्या त्या शूटिंगमध्ये एक्सायटिंग असं काहीच घडत नव्हतं!!
आम्ही तिथून निघालो. गाडी नेहमीप्रमाणे चार- पाच किका मारून, थोडी आडवी करूनच सुरू झाली. झट्कन एका दमात सुरू झाल्याची नोंद नाहीच आहे माझ्या स्मृतिपटलावर तिची!!
“तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके………”
“मुझे ऐसा लगता है, तुझे कैसा लागता हैsssssss”
गाडीवर माझं तोंड अखंड माधुरीगाणी गात होतं!!
तिच्या तोपर्यंत आलेल्या सर्व पिक्चरमधली गाणी तोंडातून बाहेर येण्यासाठी धडपडत होती. मी एकेक करत सगळ्यांवर रेकत होते.
माझ्या डोळ्यांसमोरून ती हलतच नव्हती.
मला इतकं छान वाटत होतं की, जी हिरॉईनी मला आवडते तीच मला पहिल्यांदा दिसावी!!
मी देवाला कित्येकदा “शुक्रिया मेहेरबानीss” केलं.
त्या रात्री तर मुझे नींद आयीच नहीं…….!!
तो शुटिंगवाला पिक्चर होता ‘संगीत’. आला तसा चार दिवसात केबलला पण लागला. मी चाळीतल्या माझ्या मैत्रिणींना ओढून आणलेलं घरी. तो मी बघितलेला सीन पाहण्याकरता!! तो बंगला दिसला, तो गुलाबी ड्रेस दिसला, दोन वेण्या पण दिसल्या, मात्र तो मेरावाला सीन कुठं ‘छूs’ झाला काय कळलंच नाही बाबा!!
असंच होतं तर कशाला आतबाहेर करून दमवायचं त्या बिचारीला. वरून माझा पोपट झाला तो वेगळाच!!
मन फार उदास झालेलं तेव्हाही……
हो रब्बाssssssss कोई तो बताये………
सूर लावून मी सोडून दिलं…….
मला हे गाणं अजूनही फार आवडतं!!
पुढचे कित्येक महिने जे दिसेल त्याला मी सांगत सुटलेले, मी माधुरीला खरोखरचं पाहिलं.
त्याच्याबरोबर तोंडी लावायला एक स्टोरीपण तयार करून ठेवलेली.
खरी मजा आली, सुट्टीत साताऱ्याला गेल्यावर. माधुरीला बघितलं म्हणजे कायच्या काय वाटलेलं माझ्या मैत्रिणींना!!
“बोलली का ग ती तुझ्याशी? हसली का तरी?”
“सही बीही घेतली की नाही? पिक्चरात दिसती तशीच दिसती का कशी ग?”
“लांब केस खरे होते की खोटे ग?”
“किती नी कितीतरी प्रश्न होते त्यांच्याकडे!!”
खरंतर माधुरीने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. हसणं तर दूरच!! तिची साधी नजरही नव्हती गेली माझ्यावर. ती तिच्यात होती, आणि खरंतर मी पण तिच्यातच होते तेव्हा.
बघूनच मन भरलं होतं, सही घेणंबीणं सुचलच नाही काही!! अन् घेतली जरी असती तरी इतकी वर्षे टिकली असती की नाही देव जाणे!!
पण ही आवडत्या हिरॉईनीला पाहण्याची आठवण मात्र आजपर्यंत इतके वर्ष अगदी जश्शीच्या तशी टिकली, फोटो बिटो न काढता सुद्धा!!
पहिल्या- वहिल्या गोष्टी सहज विसरल्या जातच नाहीत तसंही, होन्ना?
©️ स्नेहल अखिला अन्वित
वाचकहो, तुम्हाला अशा वैविध्यपूर्ण मराठी कथा, मजेदार ललित लेख वाचायचे असतील तर हल्ला गुल्ला या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.