सांगू का?….. माझी आई सिनेमाच्या थेटरातूनच डायरेक्ट ऑपरेशन थेटरात गेली होती.
लागोपाठ दोन सिनेमे बघायची हौस नडली अन् दुसऱ्या सिनेमाच्या अर्ध्यातच आईला त्रास सुरू झाला, तडक हॉस्पिटल मध्ये भरती केली अन् “मुबारक हो!! आपको लडकी हुई है”, असा कुठलाही डायलॉग न मारता डॉक्टरांनी मला माझ्या आजीच्या हातात सुपूर्त केली.
त्यावर आजीने, ‘हाय रे! मेरे कलेजे का टुकडा” करत मला उराशी कवटाळलं असणार आणि ते बघून आईने पडल्या पडल्याच भरल्या डोळ्याने पापण्या फडफडवल्या असणार नक्कीच!!
कारण माझ्या आईकडची संपूर्ण फॅमिलीच फिल्मी होती. पिक्चरप्रेमी होती. त्यावर मी #सिनेमा_टॉकीज या माझ्या लेखात लिहलं आहेच.
थेटरात जाऊन पिक्चर बघायची आमच्या फॅमिलीला भलतीच हौस!! थेटरात जायचं म्हणजे हाss उत्साह संचारायचा सगळ्यांच्या अंगात. ‘थिएटर’ हा शब्द मला आत्ता आत्ता कळाला.
घरातल्या तरण्याताठ्यांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत ते पाळण्यातला पोरासकट लटांबर निघायचं थेटरात जायला. आम्ही पोरं पण पहाण्यासारखं काही असलं तर पहायचो, नसलं तरी गप गुमान झोपून जायचो, पण फॅमिलीला कधी पिक्चर पहाण्यात डिस्टर्बन्स दिला असेल तर शपथ!!
मला तर वाटतं, मी सिनेमे बघत बघतच मोठी झाले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचे सिनेमे आठवतात मला.
आमच्या घरात पिक्चरला बहुतेकदा लवाजमाच जायचा, पण नाही गेला तर मी मात्र प्रत्येकाबरोबर असायचे म्हणजे असायचेच.
आजी-आजोबांच्या जोडीबरोबर (जायचे हो ते ही), मामा- मामी बरोबर, अन् मावशी काकांच्या बरोबर, कुठल्या कपलला कधी म्हणून एकटं सोडलेलं आठवत नाही मला.
अजूनही मला पिक्चर मोठ्या पडद्यावर अगदी एकाग्रतेने पाहायलाच आवडतो. टिव्हीवरचे पिक्चर मला पाहिल्यासारखेच वाटत नाहीत. तो माहौलच वेगळा!!
तर सांगायची गोष्ट अशी की, खानदानी परंपरा चालवत मी देखील माझ्या आईसारखाच, प्रेग्नन्ट असताना पिक्चर पाहायचा सपाटा लावलेला.
मुन्नाभाई MBBS नंतर तब्बल तीन वर्षांनी, अपुनके मामु लोग का पिक्चर आयेला था, ‘लगे रहो मुन्नाभाई’. २००६ च्या सप्टेंबर महिन्यात.
तो येणार अशी घोषणा झाल्यापासूनच मी तो बघण्यासाठी अतिउत्सुक होते. पण तो आल्यावर काही न काही कारणाने तो बघणं जमूनच येत नव्हतं.
एके दिवशी मात्र सूर्यग्रहण आलं, आणि ग्रहणात गर्भार स्त्रीने अजिबात न हलता डुलता, न खाता पिता देवासारखं शांत बसून राहायचं असतं, अशी अगदी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. ती मी पाळलीच पाहिजे, अशी तंबी देण्यात आली.
माहेर तसं फारसं लांब नसल्याने, माझी रवानगी दहा सूचना देऊन त्या दिवसासाठी माहेरी करण्यात आली. ऑफिसलाही सुट्टी मिळाली.
तासभर मी ग्रहण पाळण्याचं बेअरिंग धरलं, पण नंतर मात्र वाटायला लागलं, दिवस उगीच वाया जातोय. बुद्धीला तर पटत नव्हतंच काही. ‘लगे रहो’ ची गाणी डोक्यात वाजायला लागली. मुन्ना सर्किट, डोळ्यासमोर नाचायला लागले. जीव वरखाली व्हायला लागला.
पल पल पल पल हर पल, हर पल
कैसे कटेगा पल हर पल हर पल
अशीच अवस्था झाली होती, ग्रहणाचे नियम पाळून………
नहीं sss अब और नहींsss सह सकती मैं ये जुर्म…….. करत मी ताडकन उठले. नवऱ्याला फोन लावला आणि म्हटलं, हाफ डे घे की, जाऊया पिक्चरला. नवराही पिक्चरप्रेमी असल्याने एका पायावर तयार होऊन म्हणाला, ‘समझो हो ही गया!!’
उद्या पोराला काही झालं तर तुमचे तुम्ही जबाबदार वगैरे म्हणत, दोन- चार आणखी गुळमुळीत डायलॉग चिपकवत, आईही एकदाची मला पाठवायला तयार झाली.
ऐन ग्रहणात मी बाहेर पडले, मामु लोकांना भेटायला………
पिक्चर सुरू झाला अन् त्यातल्या जानवीचं Gooood Mooorning Muuuuuumbaaaai ऐकून असलं भन्नाट फिलिंग आलं की बस्स्!
पुढे मग माझ्या हसण्याच्या लाटेवर लाटा आणि आतून बाळाच्या लाथेवर लाथा पडत होत्या.
बोले तो, हम खूश थे, बहोत ही खूश थे|
याहून मोठं काय असू शकतं?
दुसऱ्या दिवशी सासरी गेल्यावर कसं कोण जाणे बिंग फुटलच, आणि आम्हा उभयंतांचा बऱ्यापैकी उध्दार झाला.
“आता तुमचं बाळ आणि तुम्ही……बसा नंतर ठो ठो करत!!”
आम्ही फुल्ल कॉन्फिडन्सने विनम्रतापूर्वक, बाळाला काहीही होणार नाही, असं सांगण्याचा कैकदा प्रयत्न केला. आमच्या विनम्रतेची ऐशी की तैशी करून आणखी दहा गोष्टी उखडून काढायला लागल्यावर मात्र यांचं लवकर Get well soon होऊ दे एकदाचं, अशी प्रार्थना करून मौन व्रत धारण करून टाकलं.
पण माहितीये का, ग्रहणाच्या कहरात हिंडून फिरूनही, खाऊन पिऊनही आमच्या बाळात किंचितसाही ‘ग्रहण लोचा’ झाला नाही. बाळ चांगलं तर झालंच वरून आमच्यासारखं पिक्चरप्रेमीही झालं !!
आता तर लगे रहो….. माझ्या मुलीलाही प्रचंड आवडतो, आम्ही दोघींनी मिळून तो अनेकवेळा पाहिलाय. अजूनही पाहतो.
प्रत्येकवेळी पाहून झाल्यावर गांधीगिरी आमच्या रोमारोमातून दुथडी भरून वाहू लागते. त्या दिवसात तिचं लहान भावाशी आणि माझं नवऱ्याशी भांडण झालंच तर आम्ही कधी नव्हे ते, ‘ए उठ रे तेरे को सॉरी बोलनेका है’ करत स्वतःहून पुढाकार घेतो.
एरवी आपल्या कोणत्याही वस्तूला हात न लावून देणारी बहीण, ‘अरे रख ले ना मामु, तेरे लिये फ्रि है’ करत भावाला आपल्या कप्प्यातलं हवं ते घेऊ देते.
हा जोर साधारण चार दिवसातच ओसरतो, आणि आमची गांधीगिरी मुन्ना सर्किटने टिव्हीवर येऊन पुढचा डोस पाजेपर्यंत आमच्या मनाच्या अतिशय खोल खोल खोssल कप्प्यात गुडूप्प होऊन जाते.
बोले तो गांधीगिरी जिंदाबाद का नारा लगाना आसान है, पर आचरण करने के लिए भारी भक्कम संयम भी चाहीये ना मामु!!
© स्नेहल अखिला अन्वित
माझ्या आवडत्या हिन्दी सिनेमावर लिहिलेला हा लेख आवडला असेल तर हल्ला गुल्ला पेजला नक्की फॉलो करा.