तो “रब ने बना दि जोडी” जेव्हापासून पाहिलाय ना तेव्हापासून बाय गॉड माझ्या स्वप्नातल्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड खळबळ माजलीये. प्रत्यक्षात चांगलं आहे सगळं, एकुलत्या एका नवऱ्याबरोबर माझा सुखाने संसार चालू आहे.
तो पिक्चर पहायच्या अगोदर स्वप्नातही सुरळीत असायचं सगळं.
परंतु रब ने नेमकी कैसी बना दि जोडी? बघूया तरी, असा विचार केला, अन् त्याचा फिवर एवढा डोक्यात गेला की तेव्हापासून अगदी आजतागायत बारा तेरा वर्ष झाली, स्वप्नात माझा नवरा एकटा कधी आलाच नाही मुळी!!
येतो तो त्याचा एक डुप्लिकेट घेऊनच!!
बरं आपले दोन दोन हिरो असावेत, दोघांनाही आपल्यावर जीव तोडून प्रेम करावं, अशी काही फॅन्टसी माझ्या डोक्यात कधीच नव्हती. मी नवऱ्यावर अन् नवरा माझ्यावरच भांडणातून वेळ मिळेल तसं इलू इलू करत घरातल्या घरात टवके टाकत असतो. प्यार की कमी वगैरेचा प्रश्न नावालाही उदभवला नाही अजूनतरी.
मग माझ्या इतक्या सुरळीत चाललेल्या सांसारिक जीवनाला एकाच तोंडाच्या दोन दोन नवऱ्यांनी स्वप्नात वरचेवर येऊन धक्का का पोचवावा बरे?
स्वप्नात माझा एक नवरा सुरींदर टाईप मिशीवाला असतो, अन् एक राजटाईप बिन मिशीचा.
मी कधी मीच असते, तर कधी ती तानी माझ्यात घुसलेली असते. मी ‘तानी कम मी’ असताना स्वप्नात सुद्धा तेवढं तारतम्य बाळगून चांगली ताडमाड उंचाड असते तिच्यासारखी. म्हणजे बरेचदा तोंड माझं अन् हाईट तिची असं विचित्र चित्र असतं. कधी माझ्या अंगावर तानीचे डिझायनर सूट असतात. तर कधी माझ्या घरातलेच गाऊन असतात. मी स्वप्नातच एकीकडे विचार करत असते, अय्या हा गाऊन इतका लांडा कसा झाला बाई? काल तर बरोबर येत होता.
एखाद्या स्वप्नात सुरींदरच्या पाठीमागे बसून होsले होsले फिरत असताना माझ्या डोक्यात चाललेलं असतं, अरे आपली चांगली बाईक देऊन ही काय ओल्ड स्टाईल स्कुटर घेतली याने. कोणाला विचारून? घर येऊ दे खुर्दाच करते याचा.
अन् राजच्या पाठीमागे बसते तेव्हा विचार चालू असतो, एवढी स्टाइलिश बाईक आणखी कोणाला फिरवायला घेतली याने? होती ती जुनी काय वाईट होती? उगाच पैशाची उधळण!!
टिपिकल बायकोपणा स्वप्नातही जागा असतो नाही का बायकांचा?
तशी मी त्या तानीपेक्षा चतुर चाणाक्ष असल्याने दोघे मला माझेच नवरे आहेत हे कळत असतं. फक्त दुसऱ्यावाल्याशी मी कधी टाका भिडवला हे स्मरत नसतं.
त्यातल्या सुरींदर टाईपवाल्याला तर स्वप्नात सुद्धा मी झापत असते, तुला किती वेळा सांगितलं मला मिशी ठेवलेली आवडत नाही म्हणून. अन् तो ही प्रत्यक्षातल्या नवऱ्याप्रमाणे कॅज्युअली मला म्हणतो, कापेन ग दोन तीन दिवसात.
माझा प्रत्यक्षातला नवरा मी त्याच्याशी कट्टी फू केली की मला चिडवायला माझी आवडती गाणी नेहमी रेकत बसतो. त्यात ‘तुझमे रब दिखता है’ बरेचदा असतं.
मग असं ते गाणं रेकायला लागला की उगाच तो पिक्चर पुन्हा डोळ्यासमोरून सरकून जातो.
अन् मग त्याच रात्री स्वप्नात तो सुरींदर टाईप बनून आमच्याच टेरेसवर भर उन्हात ‘तू ही तो मन्नत मेरी’ करत येतो आणि बॅकग्राऊंडला ‘वसदी का तसदी तसदी तसदी’ करत ठुमकत असतात माझ्या शेजारणी.
किती गोंधळ उडतो माझा!
मी स्वप्नातच विचार करत राहते, अरे ही गुड्डूची आई माझ्याशी कालच भांडली,आणि आज लगेच कंबर हलवायला कशी आली इकडे? डॉलीच्या आईने आज कामाला चक्क दांडी मारली, टेरेसवर मिठ्ठूच्या आईमागे नाचण्यासाठी? (मिठ्ठूची आई म्हणजे ‘तानी कम मी’ हा)
हे पार पडतंय ना पडतंय तोच दुसरावाला नवरा लगेच राज बनून येतो. ‘तानी कम मी’ त्याला लेफ्ट लेग आगे आगे, राईट लेग पिछे पिछे करत स्वप्नातसुद्धा माझ्या तालावर नाचवत असते!!
नाच माझी आणि तानी मधली कॉमन आवडणारी गोष्ट.
स्वप्नात मी दोघांवरही प्रेम करत असते. आणि तरीही प्रत्येक वेळी स्वप्नाच्या एन्डिंगला तो “तुम्हे किसीं एक को चुनना होगा” वाला सीन येतोच. माझे एकाच फेसिंगचे दोन्ही नवरे माझ्याकडे कैक टन प्रेमाळू ( शाहरुखी) नजरेने बघत सांगत असतात, मला चुन, मला चुन.
मी तानीसारखी इकडं जाऊ का? तिकडं जाऊ? करत पेचात पडलेली असते.
तसा मला बिनमिशिवाला किंचित जास्त आवडत असतो, मिशा नाहीत एवढंच एक प्लस पॉईंट असतो त्याच्याकडे.
मात्र तरी मी स्वप्नातसुद्धा फैसला करू शकत नाही, अश्रूभरल्या नैनांसकट मी सगळं तिथेच सोडते. हे सगळं खरं की खोटं हे बघायला खडबडून जागी होते, आणि एकच नवरा बाजूला दिल्यावर हुश्य करून परत झोपी जाते.
एकदा तर या दोन सेम सेम दिसणाऱ्या नवऱ्यांबरोबर माझी पोरं देखील आली होती स्वप्नात. म्हणजे इतर वेळी सारखी येतातच. पण मी ‘तानी कम मी’ झाले असताना आणि या दोन नवरेवाल्या सिच्युएशन मध्ये अडकली असताना तीही दोघं मधेच कुठूनतरी अवतीर्ण झाली, आणि एकाच तोंडाच्या दोन पप्पांना बघून ‘मेरे दो दो बाप, मेरे दो दो बाप’ करत बोंबलत सुटली. त्यांच्या मागे पळता पळता जो दम लागला, तो खातच घपकन् जाग आली. दोन पोरांसकट त्यांचा एकच बाप सुखाने पडलेला बघितला, अन् सुटकेचा मोठा श्वास सोडून मी परत झोपी गेले.
काय मेली ती स्वप्न पण!! एक तर एक पिक्चर चालवावा ना!!
रब ने मध्ये गोपी किशनला घुसायची काही गरज होती का?
ती पण काही बिनडोक सिनेमांसारखीच!! कायच्या काय होत असतं त्यात!!
असो……..
रबने बघितला तेव्हा मला तसा तो सपकच वाटला. म्हणजे आवडला पण खूssप आवडला असं नाही.
आदित्य चोप्राने ddlj नंतर खूप वर्षांनी डायरेक्ट केला होता, त्यामुळे खूपच अपेक्षा होत्या म्हणून असेल कदाचित……….
हे मी फेसबुकवरच्या एका ग्रुपसाठी लिहिलेलं, रोस्टिंगमध्ये मोडतं का नाही माहीत नाही, पण त्या पिक्चरशी रिलेटेड माझ्याकडे माझं स्वतःचं काहीतरी होतं, म्हणून मांडलं इतकंच!!
©️ स्नेहल अखिला अन्वित