आई, तू आली ना की माझं घर कसं टापटीप दिसायला लागतं, ऑफिसवरून आलेली मोहना घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या मोठ्या आनंदाने म्हणाली.
हो मी हातासरशी काम निपटून टाकते एकेक. तुमच्यासारखी आता नको नंतर, करत बसत नाही.
आपली आई लेक्चर देण्याच्या मूडमध्ये येतीये बघताच मोहनाने पटकन येऊन तिला मिठी मारली आणि म्हणाली, आई आता पुढे आणखी बोलू नको बाई. मस्तपैकी चहा दे, तुझ्या हातचा. त्याचे भुरके घेत घेत आपण गप्पा मारू. एरवी कुठे ग हे सुख मला? आपणच यायचं आणि चहा करून प्यायचा. आणि नंतर कितीही जीवावर आलं तरी लगेच उठून, ऑफीसला जाताना केलेला पसारा आवरत बसायचा.
पण तू आल्यावर मात्र सगळं काही हातात, वर घरही चकाचक!! नो पेंडिंग वर्क ऍट ऑल…….
लावा मस्का. आणि घ्या आईकडून कामं करून, म्हणत मोहनाची आई उठली, आणि अगदी पाच सात मिनिटातच गरमागरम चहाचा कप तिच्या हातात दिला.
हं कर आता तुझ्या हातासरशीचं कौतुक!! किती वेळा ऐकलं तरी तुझ्याकडून ऐकत राहावंसं वाटतं, मोहना कsडsक चहाचा कप रिचवून उत्साहाने म्हणाली.
अगं नुसतं ऐकतेस. पण प्रत्येक वेळी ये रे माझ्या मागल्याच होतं. सुधारणा ती नाहीच. एवढा तो भांड्याचा ढिगारा लावतेस. जेवण झाल्यावर ताटं तशीच ठेवण्यापेक्षा त्याबरोबरच हातासरशी बाकीची चार भांडीही घासून घेतली तर चुटकन् संपेल सगळं. आता कपबशी ठेवशील तर हातासरशी चहाचं भांडं, गाळणंही घासून होऊ शकतं. पण नाही, तुम्ही पोरी जाऊ दे नंतर बघू म्हणून तसच पाडून ठेवणार. अन् मग मोठा ढिगारा दिसायला लागला की तोंडं वाकडी करत कामं करणार.
आई, एरवी बाई असते ग माझ्याकडे, आता सोडून गेलीये म्हणून, मोहना तत्परतेने म्हणाली.
कुठली टिकते सांग पाहू? ढिगभर भांडी टाकतेस त्यांना, मी आले की सांगतात तुझ्या बायका मला. हातासरशी वरवरची भांडी घासून घेतलीस तर त्यांच्यावर भार पडणार नाही. आनंदाने करतील काम त्या पण.
आई, आयता चहा पिऊन मस्त वाटलेलं ग मला. आता तू मस्ती उतरवतेयस असं वाटतय!!, मोहना डोळा मारत म्हणाली.
जाताना एवढा पसारा करून जातेस, हातासरशी उचलायची सवय ठेवलीस, तर आल्यावर पसाऱ्याकडे बघत प्रेशर वाढवत चहा प्यायची वेळ नाही येणार कधी.
तुझं म्हणजे ना, कुठली गोष्ट हातासरशी करायची नाही, रेंगाळत ठेवायचं सगळं…..
इतरवेळी ऑफिस म्हणून घाई, निदान रविवारी कपडे ठेवताना तरी हातासरशी निटनेटके करून ठेवलेस ना, तर पूर्ण आठवडा पाहिजे ते पाहिजे तिथे मिळेल.
जा बघ जाऊन कपाट कसं लावलय तुझं!! सकाळी उघडलं तेव्हा तर माझ्या अंगावर इकडून तिकडून पडून आम्हाला कुठेतरी नीट सेटल कराss असा टाहो फोडला त्यांनी!!
दूध ठेवायला गेले, तर तुझ्या फ्रिजमध्ये झुरळं दिसली पकडापकडी खेळताना!!
ईss शिरशिरी आली अगदी अंगावर!!
सगळा चकाsचक करून टाकला हातासरशी!!
अय्या आई, तू एका दिवसात एवढं सगळं केलं!! पंधरा दिवस आहेस की अजून. एवढा कसला ग उरका तुला?, मोहना प्रेमाने रागवत बडबड बडबड करणाऱ्या आईच्या जवळ जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली.
मला नाही बघवत असं. आणि हातासरशी सगळं निपटून टाकल्याशिवाय शांततेने बसवत पण नाही. पण तुम्हा आजकालच्या मुलींना हातासरशी काही करायची सवयच नाही. तो कंटाळा अगदी पिसवेसारखा चिकटलाय तुमच्या अंगाला.
आई अगं तुमची स्टाईल वेगळी आमची स्टाईल वेगळी!!, आम्ही कामाला येऊन जाऊनच थकतो बाई, मोहना डोक्यावरून फिरणाऱ्या आईचा हात खाली ओढून त्याची हलकीशी पप्पी घेत म्हणाली.
बाळा, कामाला तर मी पण जात होते की ग!! पण माझ्या आईने हातासरशीचा मंत्र इतका अंगात भिनवला होता ना की त्याची मदत घरात, ऑफिसमध्ये पुरेपूर झाली. अगदी नावाजली गेले मी सगळीकडे. तुम्हाला तर आम्ही प्रेमाने सांगतो, आमच्या वेळी एकदा प्रेमाने बाकी फटकवूनच, होतं सगळं.
आता पोरं बाळं नाहीत अजून तोवर सवय लावून घे हातासरशी कामं निपटवण्याची. ती एकदा लागली, की सोप्पं मग सारं. ना किटकीट ना झिगझिग, हातासरशी होई सगळं चुटकीत!!
वा वा आई, भारी ऍड करते ग तू!!, आता पंधरा दिवस आहेस ना तर तूच डोक्यात फिट्ट करून जा तुझा मंत्र…….
बरं, मग चल उठ चटदिशी. कुकर लाव. पोळ्या आहेत सकाळच्या. हातासरशी भाजी टाकून घे, कोशिंबीर पण कर. तेवढ्यात कुकर होईलच. तो झाला की वरणाला फोडणीही देवून टाक पाहू हातासरशी पटकन्.
आई थांब, ऐकूनच दम लागला मला!! असं एका दिवसात नाही ग पंधरा दिवसात हळूहळू स्क्रू टाईट करायला सांगितलाय मी तुला, मोहना आईकडे बघून खिदळत म्हणाली.
कसल्या ग पोरी तुम्ही, असं म्हणत तिची आई उठली आणि कोथिंबीरीची पेंढी पडलीये फ्रीजमध्ये तर पोरीला वड्या करून खायला घालाव्यात हातासरशी, म्हणत कामाला लागली………
हे लिहिताना माझी आजी, आई, मावशी डोळ्यासमोर फिरत होत्या नुसत्या. आजीचं तर कुठलं काम पेंडिंग राहिलेलं बघितलंच नाही कधी. आम्हा तीन नातवंडांना संभाळत हातासरशी कित्ती कित्ती कामं करायची ती!!
आई, मावशी आल्या की सहज सगळं घर नीटनेटकं होतं. बाई असेल तरी हातासरशी समोर दिसणारी भांडी घासून टाकतात, जे काम दिसेल त्याला हातासरशी संपवून टाकतात. नुसतं ते बघूनच तोंडात बोटं जातात माझी………
त्यांचा मंत्र डोक्यात भिनला होता, पण अंगात भिनवायला मात्र त्या लॉकडाऊनची फार फार मदत झाली…..…
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.