ऐन मोक्याच्या ठिकाणी तुकारामाचं रसाचं गुऱ्हाळ होतं. अगदी बाजारातच गर्दीच्या ठिकाणी. बाजारहाट करता करता थकलेला माणूस क्षणभर विश्रांतीसाठी त्याच्या गुऱ्हाळात शिरायचाच. अन् थंडगार रसाचा ग्लास घशाखाली उतरवल्यावर तृप्तीने तिथून हालायचा. कधी गिऱ्हाईक कमी असल्यावर रस पिणाऱ्या माणसाच्या तोंडाकडे तुकाराम उगीच पहात रहायचा. त्याला वाटायचं एकदाचा तो रस पिऊन टाकावा आणि मला समोरच्याने शाबासकी द्यावी. लय भारी बघ काम तुझं गड्या, असा रस जिंदगानीत तोंडाला लावला नाही कधी!!, फार वाटायचं त्याला कोणीतरी हे म्हणावं. त्याच्या तोंडावर तसं स्पष्ट दिसायचं. पण कुणाकडे एवढा वेळ, चेहरे वाचत बसायला?
तसा दिवसातून एखाद दुसरा म्हणायचा त्याला, रस गोडीला होता बरं का!!
तेव्हढ्यानेही तुकारामाला अत्यानंद व्हायचा.
कारण दिवसभर त्याला येणारं गिऱ्हाईक, बर्फ कमी टाक रे, पांचट नको देऊ रे, शेळपट नको, ताजा काढ रे करत उगाच व्हसकत रहायचं. खरंतर, असं करणार गिऱ्हाईक नवं असायचं. जूनं गिऱ्हाईक काही बोलायचं नाही, त्यांना माहीत असायचं, तुकाराम बर्फ घालून उगीच पांचट रस करणार नाहीच. आपण सागितलं तर टाकेल, पण समोर ग्लास येणार तो बिन बर्फाचा अवीट गोडीच्या रसाचाच!!
कधी लहर आली तर जुन्याला तो समोरूनच विचारायचा, काय बरा हाय का?, मग ते गिऱ्हाईकही रंगात असेल तर तुकारामाच्या पाठीवर हात थोपटून ‘झक्कास’ म्हणत निघून जायचं.
ह्या तुकारामाच्या रसवंती गृहात पहिल्यांदा मी गेले ते माझ्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन. मी रोज तिला संध्याकाळी फिरवायला न्यायचे. आणि ऊसाचा रस माझा सर्वात आवडता असल्याने, ह्या बाजारातल्या गुऱ्हाळावर माझी नजर गेली, तशी पोरीला घेऊन मी तिथे गेलेच. त्यातून ही गुऱ्हाळवाली जास्त करून सातारा कोल्हापूर साईडची असल्याने मला त्यांच्याविषयी अगदी सहजच आपलेपणा वाटतो. तो एका भेटीतही हमखास बाहेर येतोच. अन् सगळ्या गुऱ्हाळवाल्यांशी, त्यांच्या बायकांशी गट्टी जमते.
तसच याचंही झालं. पहिल्यांदा गेले तेव्हा, काटकुळा, मळकट पांढरा सदरा, पांढरा लेंगा, आणि त्यावर गांधी टोपी घातलेला तुकाराम, बोला ताई? किती गिलास देऊ, म्हणत समोर आला. मी मनात म्हटलं, एकच दिसतेय ना? विचारतो कशाला तोंड वर करून? पण ते मनातच ठेऊन गावाकडचा म्हणून त्याला माफ करून टाकलं. अन् मला कसा पाहिजे रस ते सविस्तर सांगितलं. बर्फ नको, लिंबू कमी, आलं थोडंसं, मसाला कमी आणि एकदम ताजा काढूनच हवा वगैरे. त्याने दिलेला प्यायल्यावर तर एका मागोमाग दोन ग्लास रिचवले. पोरीच्या तोंडाला लावला तर तिलाही खूप आवडला. मग काय, तिथे जाणं माझ्यासाठी रोजचंच झालं. माझ्या मुलीलाही तो घुंगरांचा आवाज खूप आवडायचा. चार- पाच दिवस संध्याकाळी सलग गेल्यावर एके दिवशी त्याने माझ्या पोरीसाठी आणलेला छोटा ग्लास आणि चमचा पुढे केला. मला तर ते इतकं भारी वाटलं की बस्स!!
मग रोज रस पिता पिता आमच्या गप्पा होऊ लागल्या. त्याची बायकोही असायची बरेचदा. तीही मी आले की कौतुकाने पहायची. पोरगी आवडीने रस पिते बघून आनंदून जायची. दोघही घरादाराच्या गोष्टी आपलेपणाने सांगत बसायचे. कधी हसत हसत एकमेकांच्या कुरबुरीही. मलाही खूप आवडायचं ते. आणि त्यांंची भाषा माझ्या गावचीच असल्याने ऐकावसंही वाटायचं. त्याचा पोशाख मात्र नेहमी तोच असायचा. मी आपली विचार करायचे, याच्याकडे एकच आहे की अशाच जोड्या शिवून ठेवल्यात त्याने फक्त.
माझा नवरा कधी नेहमीपेक्षा लवकर आला की मला तिथेच शोधायला यायचा. मलाच काय नवऱ्यालाही आवडाचा त्याच्याकडचा रस खूपच!!
जवळपास दोन अडीच वर्ष मी जात होते तिथे. नंतर मात्र एक दिवस त्याने तिथून बोजा बिस्तरा गुंडाळून गावाला निघून जात असल्याचं सागितलं. मी म्हटलं, का काय झालं? तर म्हणाला, नाही परवडत इथं. गाळ्याच्या भाड्यात बरीच कमाई जाते. आपला गाव बरा, बघू तिथं काहीतरी करू आता.
मला तर कोणीतरी आपलंच सोडून जात असल्यासारखं वाटलं. जीव हळहळला. त्यानंतर महिनाभरातच त्याने गाशा गुंडाळला.
माझी नजर मात्र तिथून जाताना त्याच्या दुकानाला शोधत असायचीच. पुढे तिथे दुसरं कुठलं दुकानही, आलं, पण मला मात्र दिसायचं त्याचंच गुऱ्हाळ. आणि सारखा ताई ताई करणारा तुकाराम आणि त्याची बायको. त्या बाजारात पुढे बरीच गुऱ्हाळं आली, पण आम्हाला तिथल्या एकाही गुऱ्हाळात जावं वाटलं नाहीच कधी.
गुऱ्हाळ बघितलं की माझ्या पोरीसाठी वाटी चमचा नंतर छोटं भांडं वेगळं काढून ठेवणारा तुकाराम आठवायचा. वाटायचं आता काही भेट होणं शक्य नाही त्याची.
आम्हीही नंतर दुसऱ्या जागी रहायला गेलो.
मध्ये दहा वर्ष गेली. आणि एक दिवस मागच्या वर्षाच्या अगदी सुरवातीला मी माझ्या मुलांबरोबर आमच्याच एरियात बाजारहाट करत होते, तेव्हा समोर एक नवीन गुऱ्हाळ उघडलेल दिसलं. तोपर्यंत आमच्या इथे रसाचं गुऱ्हाळच नव्हतं.
ते दिसलं अन् मला कोण आनंद झाला!! मलाच नाही मुलांनाही !! ऊसाचा रस हे आमच्या परिवाराचं सर्वात आवडतं पेय!!
‘कनिफनाथ रसवंती गृह’ नेहमीच्या ठरलेल्या नावाची पाटी आपल्या एरियात बघून मन उगीच हरखलं.
मग काय गेलोच तिथे आणि रस मागवला. बेंचवर बसले, तेवढ्यात ओळखीचा आवाज वाटला म्हणून पाहिलं तर तोच!! तुकाराम…..
तेवढा काटकुळा नव्हता राहिला पूर्वीसारखा, आणि पोशाखही बदलला होता एकदाचा. चक्क टि शर्ट आणि ढगळ पॅन्ट होती अंगात!! मी ओळखलं ते आवाजावरूनच. मग चेहरा बघितल्यावर खूण पटली.
त्याने आणि मी दोघांनी एकदमच म्हटलं, इथं?
आणि दोघेही मोठ्याने हसलो. त्याला लहानपणी आवडीने रस पिणारी आता ताडमाड वाढलेली मुलगी दाखवली, त्याला एकदम भरून आलं.
बरोबर छोट्या चिंट्या बघून आणखी खूष झाला.
अरे तू गावाला गेलेला ना? आला कसा?, मी आनंदाने विचारलं.
रस काढायला, द्यायला आता पोरगा ठेवला होता, म्हणून तो आमच्याशी गप्पा मारू शकत होता.
गावाला जमीन होती, त्याचे चांगले पैसे मिळाले ना ताई. हा धंदा लय आवडतो आपल्याला. किती लोकं येतात नी जातात, जीवाला बरं वाटतं. तिकडं जाऊन माघारी वळायचं तसं होतच डोक्यात बघा. गाळा मात्र सोताचा पायजे इथं. पण झालं की ते बी स्वप्न पुरं!! हा घेतला सोताचा, हाय छोटा, पण आपला हाय आपला!!
खरंच, हे गुऱ्हाळही त्याने छान मोक्याच्या जागीच थाटलं होतं. समोर शाळा होती, बाजूला बरीच दुकानं. शिवाय माणसाचा रहदारीचा रस्ता होता. गिऱ्हाईक सारखं येत जात होतं.
मग काय पुढे माझंही सारखं जाणं होत राहीलं. बायकोचीही भेट झाली आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांचीही.
सगळं छान चाललेलं. मलाही वाटलं, आता तुकारामाचा मस्त जम बसला इथे. बघावं तेव्हा गर्दी असायची त्याच्या दुकानात.
पण त्यानंतर बरोब्बर तीनच महिन्यांनी कोरोना आला, आणि हा हा म्हणता म्हणता गर्दी आटली सगळी. नंतर तर गुऱ्हाळही बंद झालं.
आमचंही घराबाहेर पडणं बंद झालं. कधी पडलेच तर त्याचंही गुऱ्हाळ बंदच दिसायचं.
पाटी होती तशीच, तोच दिलासा होता.
विचारायचं तरी कोणाला, सर्वच दुकानं बंद. मनात आलं, आता कुठे मनात उत्साह भरून तुकारामाने नवीन सुरुवात केलेली, आत्ता कुठे चांगला जमही बसत होता, आणि लगेच असं व्हावं. रुखरुख लागलीच मनाला.
नंतर थोड्या महिन्यांनी दिवाळीआधी मात्र हळुहळु सारे घराबाहेर पडायला लागले, तशी आमचीही सुरुवात झाली.
त्याचं रसवंती गृहही एक दिवस उघडलेलं दिसलं. फार बरं वाटलं. पटकन जाऊन विचारलं, कुठे होतास बाबा?
तो म्हणाला, गावी जाऊन बसलेलो ताई. कसला जोरात चालत होता हो धंदा. बघितलेलं ना तुम्ही. आणि असं व्हावं. पण मी हिंमत नाही हरलो. देवाच्या कृपेने होतं मिळालेलं पुरवून पुरवून वापरलं. काही कमी नाही पडलं. आता आलो परत.
तशी गर्दी कमीच होती. तुरळकच. पण त्याच्याकडे आशा मात्र भरपूर होती.
त्याच आशेवर तो तरला आणि आता परवाच पाहिलं तर पुन्हा त्याचं गुऱ्हाळ भरलेलं दिसलं. लोकं अगदी बाहेर थांबलेली, जागा नाही म्हणून. पोऱ्या आणि तुकाराम दोघंही गडबडीत होते.
मी गेले नाही तेव्हा, पण त्याच्या चेहऱ्यावर गिऱ्हाईक वाढल्याचं समाधान मला अगदी लांबूनही दिसलं……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
किती छान ग…. इतक्या वर्षानंतर पुन्हा भेट झाली आणि तेही नवीन ठिकाणी मस्तच 💞.
हो ना😄
Hi
I visited your blog you have shared amazing information, i really like the information provided by you, You have done a great work. I hope you will share some more information regarding full movies online. I appreciate your work.
Thanks
Have a Great Day
Bollywood old Movies