रोज अगदी झकपक आवरून अनुपमा बाई संध्याकाळच्या घराबाहेर पडत. जायचं कुठे असायचं तर घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिरातच. पण बाई अगदी मनापासून तयार होत. रूपही तसच होतं त्याचं, गोऱ्या गोऱ्या रंगावर गुलाबी रंगाची हलकीशी झाक होती. नाजूक चेहरा, डोळे, नाक ओठ सगळं अगदी चेहऱ्याला उठाव आणणारं!! नुसता चेहराच नाही तर एकूण शरीराचा बांधाच आकर्षक!!
त्यातून त्यांना सजण्याची आवड!! सगळं अगदी परफेक्ट मॅचिंग करूनच त्या बाहेर पडत.
एकदा बघणारा पुन्हा वळून न बघेल तर नवलच!!
पन्नाशी तर दोन वर्षांपूर्वीच पार केलेली, पण तरीही त्यांचं सौंदर्य बघणाऱ्याच्या मनात ठसत होतच.
मंदिरात येणाऱ्या, बसणाऱ्या बायकांनाही उत्सुकता असायची त्यांच्याशी बोलायची. अनुपमा बाई आपल्याशी बोलतायत याचं त्यांना खूप कौतुक वाटायचं. बोलायच्या कमी पण अनुपमा बाईंना निरखणं जास्त चालायचं त्याचं. त्यांची साडी, त्यावरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, कानात चमकणारा हिरा, हातातल्या बांगड्या, त्यांच्या बोलण्याची ढब, सगळं सगळं निरखत बसायच्या त्या. हेवाही वाटायचा मनातल्या मनात त्यांचा.
देवळात येणाऱ्या कुठल्याही पुरुषाची नजर तर हमखास जायचीच अनुपमा बाईंवर. काही तर देवाच्या कमी त्याच्याच दर्शनाला यायचे. एखाद्याच्या मनात यायचंही, या वयात इतकी सुंदर दिसते ही बाई, तरुणपणी तर अप्सराच दिसत असणार!!
दुसऱ्या कुणाच्या मनात यायचं, मी हिचा नवरा असतो तर रोज फिरायला घेऊन गेलो असतो हिला. देवळात का येऊन बसते ही?
खरंच, अनुपमा बाईंना सुद्धा फार फार आवड होती फिरण्याची. लग्न झाल्यावर अगदी रोज म्हणजे रोज त्याचे श्रीमान घेऊन जायचेच फिरायला त्यांना. आणि याही सगळा साजश्रुंगार करून जायच्या. ते ऑफिसवरून यायच्या वेळेला ह्या आवरून बसायच्या, आणि ठरल्याप्रमाणे चहापाणी घेऊन दोघं बाई म्हणतील तिथे भटकायला जायचे. सासू- सासरे दुसऱ्या गावी असल्याने तसं मोकळच होतं सर्व काही.
लाडक्या बायकोची हौस म्हणून तिला हवं तिथे हवं त्या शहरी फिरवलं श्रीमानांनी.
दोन-अडीच वर्ष फिरण्याचा पुरेपूर आनंद घेतला अनुपमा बाईंनी.
मग पुढच्या पाच वर्षात दोन मुलं झाली. आणि पोरांच्यात फिरणं थोडं मागे पडलं. श्रीमानांनीही त्या कालावधीत नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू केला,आणि त्यात स्वतःला झोकून टाकलं.
मग कधी म्हणाल्याच अनुपमा बाई तर ते करायचे मॅनेज, पण पूर्वी एवढ्या उत्साहाने नाही. त्यांचा जीव व्यवसायतच गुंतलेला असायचा.
पुढे पुढे तर ते म्हणायला लागले, अगं तुझ्याकडे पैसे असतात सर्व असतं. तू जात जा की हवं तिथे पोरांना घेऊन फिरायला.
पण मुलांना आणि त्यांनाही सगळ्या परिवाराने एकत्र फिरावं वाटायचं. त्यांच्याशिवाय मजा यायची नाही.
आणि श्रीमानांना मात्र व्यवसायापुढे हे छोटे छोटे आनंद आपण गमावतोय याचं काही वाटायचं नाही.
मुलं हळूहळू मोठी झाली, शिक्षणासाठी बाहेरच्या देशात निघूनही गेली.
तेव्हा नवीन लग्नानंतर आजूबाजूची शहरं फिरवताना अनुपमा बाईंचे श्रीमान नेहमी म्हणायचे, पैसे येऊ दे तुला भारतभर नाही जगभर फिरवून आणेन. तुझी फिरण्याची सगळी हौस फिटेपर्यंत तुला फिरवत राहीन.
त्यांचे श्रीमान जेव्हा जेव्हा हे बोलायचे, तेव्हा अनुपमा बाई आतून बाहेरून फुलायच्या. आणि कुठं कुठं जायचं त्याची स्वप्नं बघत बसायच्या.
पैसे आले, चिक्कार आले. पण कितीही आले तरी ते श्रीमानांना कमीच वाटून ते आणखी आणखी आणायच्या मागे लागले.
बंगला, गाड्या, नोकर सगळं सगळं समोर उभं केलं कुटुंबासाठी त्यांनी. आपल्यामुळे काही अडू नये, बायकोला मनात वाटलं की कुठेही जायला मिळावं, म्हणून खास गाडी आणि ड्रायव्हरही तैनात ठेवला होता त्यांनी. पण अनुपमा बाईंनी कधी त्याचा वापरच केला नाही. शेवटी तो काही कामच नाही म्हणून, कंटाळून निघून गेला. अनुपमाबाईंना फिरताना जोडीदाराची सोबत हवी होती, ड्रायव्हरची नाही. जोडीदार मात्र इतकं काम काम करत बसला होता की तो त्यापुढे सगळं विसरला होता. आल्यावर त्याच्यात कसलाही त्राणच नसायचा.
!– Snehal 1 –>
त्यांच्या सुंदर, देखण्या बायकोला बघून सर्वांना त्यांचा हेवा वाटायचा, पण प्रत्यक्षात त्यांना त्याचं काही नव्हतं. पैसा खूप खूप मोठा झाला होता, कुटुंबप्रेमापेक्षा.
बाहेरची लोकं वळून पहायची पण स्वतःच्या घरात मात्र त्या दुर्लक्षित होत्या.
घरी बोलायला सुद्धा कुणी नसायचं. काही मैत्रिणी होत्या तशा, त्या म्हणायच्याही आम्ही तुझ्या जागी असतो ना तर म्हटलो असतो गेला नवरा उडत. मजा मारली असती त्याच्या पैशांवर. आमचं वेगळं विश्व बनवलं असतं. तू का अशी?
एवढी सुंदर दिसतेस अजूनही, सगळ्याची आवड आहे तुला, एक आवाज दिलास तुला कंपनी द्यायला कोणीही येईल. का एकटी कुढतेस?
त्यावर त्यांचं उत्तर असायचं, मला कोणीही नकोय म्हणून तर ना?
मी नेहमी कुठेही जायची स्वप्न बघितली ती माझ्या नवऱ्याबरोबरच!!
मला स्वप्न दाखवणारा तोच होता. ती पूर्ण व्हावीत म्हणून जीवाचा रान करणारा तोच होता. त्याला माझी नसली तरी मला त्याची जाण आहे.
पैसा कमवून कमवून थकला की त्याला माझी आठवण नक्की होईल, आणि तो मला त्याच्याबरोबर आनंदाने फिरायला नेईल.
त्या क्षणाची वाट बघत शेवटी त्यांनी रोज संध्याकाळी जवळच्या मंदिरात जायची सवय लावून घेतली स्वतःला.
शांत चित्ताने देवाकडे बघत बसायच्या. बायका स्वतःहून बोलायला आल्या तर बोलायच्या, नाहीतर नुसतं देवाकडे बघत बसायच्या.
मनात हिशोब चालायचे, आता बावन्न, अजून काही वेळ गेली नाही, जोम आहे अंगात. नवरा म्हणाला जगभ्रमणाला चल, तर अजूनही एका पायावर तयार होऊन जाईन मी!!
पण अशी अनेक वर्ष मोजण्यातच गेली फक्त, मुलांची लग्न झाली, साठी पार झाली. आता तरी नवरा थांबेल असं वाटलं अनुपमा बाईंना, पण नवरा थांबला नाहीच. तो काम करता करताच कामातून आणि जगातून एकाचवेळी निघून गेला.
आणि एकदाची नवऱ्याबरोबर फिरण्याची अनुपमा बाईंची सगळी स्वप्नं कायमची चक्काचुर झाली. जी आशा होती ती कायमची मिटली.
मग मात्र अगदी खंबीरपणे एकटं जगभ्रमण करण्यासाठी त्यांनी तसंच झकपक आवरून घराबाहेर पाऊल टाकलं………
मरायच्या आधी स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करायचं त्यांनी उशिराने का होईना फार म्हणजे फारच मनावर घेतलं ………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
असच होत स्त्रीची, मन नवरा नाहीतर मुलांमध्ये अडकून राहत आणि मनातल्या इच्छा मनातच राहून जातात.
कुणीही असो स्त्री -पुरुष त्यांनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्या कोणत्याही मोह मायेत न अडकता.