सातवीत असताना नाक्यावरच्या निबंध स्पर्धेत माझा पहिला नंबर आला, आणि आमच्या चाळीतल्या चाळीत मी थोडीशी प्रकाशझोतात आले.
एका रविवारच्या सकाळी दोन माणसं माझं घर शोधत आली, आणि त्या दोन माणसांनी चाळीत दोन ठिकाणी माझ्या नावाने चौकशी केली, मग त्यांच्या मागे त्या दोन्ही घरातून ‘काय भानगड आहे बघा जावा’, म्हणून चिल्ली पिल्ली पाठवली गेली. त्या चिल्ल्यपिल्लांना नाचत कोणाच्यातरी मागे जाताना पाहून आणखी चार त्यांना उगीचच जॉईन झाली.
आमचा दरवाजा वाजवला उत्साही पोरांनीच. तो उघडल्यावर ती दोन माणसं त्या पोरांचा गोलाकार वेढा कसाबसा सोडवून पुढे आली. निबंध स्पर्धेत मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय, असं त्यांनी सांगितलं, बक्षिस समारंभाचं आमंत्रण दिलं आणि निघून गेली.
आम्ही घरातले खूष झालो, आणि थोड्या वेळाने नेहमीची कामं करायला घेतली. फोन घरी नव्हताच, त्यामुळे कुणाला काही आवर्जून सांगण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. असता तरी खास यासाठी लावला गेला असताच, असंही नाही.
मी सुद्धा कुणाला काही ओरडून सागितलं नाहीच!!
पण तरीही चाळीला कळलंच!!
नक्की काय ती भानगड कळण्यासाठी त्या दोन माणसांच्या मागे लागलेल्या पोरांनी सगळीकडे डमडमपुरी करून टाकली होती.
आणि अगदी दहाच मिनिटानंतर आमच्या घरी चाळीतल्या एकेकाचं डोकावणं सुरू झालं, पहिला नंबर का? छान, आमच्या पोरीला पण शिकव की निबंध लिहायला, कधी होती स्पर्धा? आम्हाला का नाही सागितलं, काय लिहलं होतस निबंधात? प्रत्येकजण सुचेल तसं काहीबाही विचारून, सहजी स्फुरले तर कौतुकाचे दोन शब्द बोलून जात होतं.
मात्र अगदी त्या दिवसापासूनच चाळीतल्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या मुलांना निबंध,भाषणं लिहून द्यायच्या कामावर चाळकऱ्यांनी, मला ढुंकूनही न विचारता माझी नियुक्ती करून टाकली.
मी जमेल तसं जमवू लागले. मी जे काय लिहून द्यायचे त्यांची पोरं बिचारी गोड मानून घ्यायची, आणि शाळेत मात्र स्वतः लिहिलं सांगायची. पण अशा गोष्टींनी जराही वाईट वाटत नव्हतं त्यावेळी…….
पुढे सहामाही परीक्षा संपल्यावर एके दिवशी त्याच चाळीतल्या माझ्या आठवीतल्या मैत्रिणीचं आमिर खान प्रेम अतिजोराने उफाळून वर आलं. त्याला एक छानसं पत्र लिहावं आणि त्याची सही असलेला फोटो त्वरित मागवून घ्यावा, असं तिच्या मनानं पक्क करून टाकलं.
मनानं पक्क केल्यावर ती, वहीचा कागद टरsर्कन फाडून लिहायलाही बसली, पण आपल्या प्रिय चॉकलेट हिरोकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दच सापडेना झाले तिला, आणि तिने व्याकुळतेने माझ्याकडे धाव घेतली.
ए, मला आमिर खानला पत्र लिहायचय ग!!
अय्या हो? मग लिही की.
मला नाही लिहिता येत, तू दे ना लिहून!!
नक्को ग बाई!! घरी कळलं तर चोपतील.
कोण नाही चोपत, मी माझ्या घरी सांगितलंय सगळं, माझ्या घरी चल. तिथं लिहून दे.
नको, नको मी नाही लिहिलं असलं कधी…….
आता जास्त भाव खाऊ नको हा, चल मुकाट्याने करत तिने ओढतच मला तिच्या घरी नेलं.
आम्ही दोघी एका कोपऱ्यात बसलो. तिने कागद दिला. मी लिहायला घेतलं……..
प्रिय आमिर खान यांस, साष्टांग नमस्कार.
त्यावेळी प्रत्येक पत्राची सुरुवात ज्याला पत्र लिहायचे त्याला साष्टांग नमस्कार घालूनच व्हायची ना माझी!! आमिर खान कसा अपवाद ठरावा त्याला?
एवढं लिहिलं, आणि लक्षात आलं. अय्या, पण आमिर खानला मराठी कसं कळणार?
कपाळावर हात मारला आणि साष्टांग नमस्कारवाला कागद चुरगाळा मुरगाळा करून फेकून दिला.
मग मैत्रीण म्हणाली, हिंदीत लिही आता. पण माझ्या अंगात आलं. मला वाटलं, हिंदीपेक्षा इंग्रजीत लिहिलं तर इम्प्रेशन चांगलं पडू शकतं आमिर खानवर!!
मैत्रीण जास्तच खूष झाली. तिने माझी स्तुती करून मला झाडावर चढवलं. मीही भरभर चढले आणि लिहायला घेतलं.
To,
My dearest Aamir khan,
I like you, very very much and I like your acting also.
हे एवढंच आठवतंय आता. अजून ह्याच्या पुढे मी काय काय आणि कसं लिहिलं असेल ते देवच जाणे फक्त!!
कारण माझं इंग्रजी त्यावेळी अगदी जेमतेमच होतं. पण तरी मी इंग्रजीतूनच त्याला पत्राचं उत्तर आणि त्याच्या सहीचा एक फोटो ताबडतोब पाठवून देण्याची ऑर्डर सोडली होती. बाकी तोंडी लावायला त्याच्या आवडत्या पिक्चरांची लिस्ट, कोणत्या हिरॉईनीसोबत त्याची जोडी छान वाटते, मला ( म्हणजे माझ्या मैत्रिणीला) तो कित्ती कित्ती आवडतो, वगैरे मालमसाला भरला होताच. मी लिहिलं आणि माझ्या मैत्रिणीने त्यावर स्वतःच्या नावाखाली सही ठोकून दिली. आणि आम्ही दोघीही पहिल्या फुरसतीत जाऊन ते पाकीट टाकूनही आलो.
जणू काय आमिर खान सगळं सोडून वाटच बघत बसला होता त्या पत्राची!!
मी ते लिहिलं आणि विसरून गेले. माझा आवडता हिरो दुसराच कोणीतरी होता.
आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी मी त्याच मैत्रिणीच्या घरात चकाट्या पिटत बसले असताना, पोस्टमन पाकीट घेऊन आला. माझ्या मैत्रिणीनेच ते पुढे होऊन घेतलं. आणि फोडलं तर ती हर्षवायू होऊन कर्णकर्कश्श् ओरडली. मी तर बसल्या बसल्या दचकलेच अगदी!!
तिला आमिर खानने उलट टपाली उत्तर पाठवलं होतं, आणि सोबत सहीसकट त्याचा फोटोही होता!! एका डायहार्ट फॅनसाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
तिचा आनंद बघून तिच्या घरी सर्वजण प्रचंड खूष झाले होते. कुणीतरी पळत जाऊन पेढ्यांंचा बॉक्सही आणला. त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला इतकुसा का होईना तुकडा मिळालाच त्या दिवशी!!
चाळीत कुणाकडेतरी चॉकलेट बॉय आमिर खानचा पत्रासहीत फोटो यावा, हेच औत्सुक्याचं होतं सर्वांसाठी!!
मला हळद कुंकू लावून देव्हाऱ्यात बसवावं की पाटावर बसवून नुसतीच आरती करावी यावर त्यांच्या घरातल्या कुणाचं एकमत झालं नाही, म्हणून मला नुसत्या कौतुकाच्या वर्षावानेच न्हाऊ घातलं गेलं.
मैत्रिणीने मला मिठी मारली, आणि म्हणाली बोल तुला काय पाहिजे? मी लाजून काही नको म्हटलं. तरीही एक अख्खा पेढा माझ्या हातावर ठेवून कृतज्ञता व्यक्त केलीच तिने.
आणि चाळीत सर्वांकडे वार्ता पोचली!!
मग तिच्या पत्राला उत्तर आलं, म्हणून बाकीचे फॅन्सही आले आपले आवडते हिरो हिरॉईनी घेऊन माझ्याकडे!!
सगळ्यांना मला मध्ये टाकून त्यांच्या भावना तिथपर्यंत पोचवायच्या होत्या. पण या नसत्या उदयोगाची वार्ता माझ्या घरी पोचली आणि त्यांनी असली भलती सलती लेटरं लिहायला कडकडून विरोध केला.
मी त्यातून सुटले……….
पण निबंध, कल्पनाविस्तार, भाषणं ह्यांनी काही सोडलं नाही मला!!
माझं मराठी लेखन बरं होते. इंग्रजीच्या नावाने खरंतर त्यावेळी बोंबच होती. मी काय लिहिलं असेल मोडक्या तोडक्या इंग्रजीत असा विचार जरी मी आता केला, तरी मला खूप हसायला येतं!!
आणि वाटतं, आमिर खान किंवा त्याचा सेक्रेटरी, ज्याने कुणी ते पत्र वाचलं असेल तोही नक्कीच त्या धेडगुजरी इंग्रजीतल्या पत्राचा मजकूर वाचून पोट धरून हसला असेल. म्हणूनच त्याला त्यावर उत्तर देऊन अगदी वेळात वेळ काढून आपला फोटो पाठवावासा वाटला असणार नक्कीच!!
आता वाटतं, त्यावेळी जर मराठीतून लिहिलं असतं तर अस्स् काही काही लिहलं असतं की, फोटो बिटो पाठवण्याचा उपद्व्याप न करता, माझे चरण शोधण्यासाठी तो स्वतःच माझा शोध घेत आला असता!!
तुम्हाला म्हणून सांगते, त्या बक्षिसवाल्या निबंधातही मी तसंच काय काय लिहलं होतं, विषय होता मला लॉटरी लागली तर……..🙆
ते आले तर हा नसता का आला, सांगा बरं?
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.