बाजूच्या दारसमोरील रांगोळी बघून तेजस्वीला आज काय खास आहे ते कळलच नाही!! तेवढ्यात तिला वरती राहणाऱ्या आजी बाहेरून येताना दिसल्या, तसं तिने विचारलं, आज काय आहे हो विशेष?
अगं देव दिवाळी नाही का आज? तुम्हा आजकालच्या पोरींना काही माहीतच नसतं!!
आता गोडाधोडाचं कर काहीतरी. आणि संध्याकाळी दिवाही लाव दारासमोर.
त्या आजी जाताच तेजस्वीने दरवाजा बंद केला, मनात आलं, आता काय देव दिवाळी येते कधी अन् जाते कधी काहीच कळत नाही. घरी जूनं माणूस नाही ना. जुन्या माणसांना सगळं माहीत असतं बरोबर. स्वतःही विसरत नाहीत आणि कोणाला विसरूही देत नाहीत. सगळे सणवार कसे अगदी हौसेने साजरे करतात.
तेजस्वीच्या डोळ्यासमोर तिचे लहानपणीचे दिवस आले, त्याबरोबर तिची आजीही!! आजीला कसं सगळं माहीत असायचं. तिचं सगळं साग्रसंगीत असायचं. आजीला किती कौतुक होतं सगळ्या सणांचं. दिवाळीचे फटाके वाजवायला घेताना अगदी आवर्जून सांगायची ती, तुळशीच्या लग्नासाठी आणि देव दिवाळीसाठी फटाके ठेवा बरं का बाजूला.
तेजस्वीही मग दिवाळीचे चार दिवस संपल्यावर आजीच्या मागे लागायची, आजी कधी येणार ग तुझी देव दिवाळी?
आजी म्हणायची, आता मार्गशीर्ष लागला की येईल हं देव दिवाळी.
ती होती तोपर्यंतच कौतुक होत देव दिवाळीचं!!
अगदी मुलांनाही आज देव दिवाळी रे ,चला लवकर आवरा बघू सगळं!!, म्हणत उठवायची.
उठतानाच उत्साह यायचा अंगात आजीच्या बोलण्याने. सणांबरोबर मुलांचही कौतुक व्हायचं.
आजीकडून गोष्ट ऐकण्यासाठी प्रत्येक देव दिवाळीला विचारायचीच तेजस्वी, आजी देव दिवाळी म्हणजे काय ग? त्यांची दिवाळी नंतर का ग?
आजीही उत्साहाने सांगायची, खरंतर तिलाही अशा देवाधिकांच्या गोष्टी सांगायला खूप आवडायचं. बोलताना ते समाधान तिच्या चेहऱ्यावर यायचं.
वेळ असेल तसा तिची गोष्ट छोटी- मोठी व्हायची. कधी अगदी इत्थंबूत सगळं वर्णन असायचं त्या गोष्टीत, कधी थोडक्यात सारांश मांडायची.
देवांना खूप खूप त्रास देणाऱ्या राक्षसाला भगवान शंकरानी मारलं ना, तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला, मग तो आनंद देवांनी दिवाळीसारखा साजरा केला, म्हणून ती ठरली देव दिवाळी!!
त्या दिवशी तेजस्वीची आजी सर्वांना सुगंधी तेल, उटणं लावूनच अंघोळ करायला सांगायची. अंघोळीहून आलं की देवाला लोटांगण घालून नमस्कार घालायला लावायची. देव तर बघतच राहावेत असे सजवलेले असायचे तिनं. देवासमोर रांगोळी, दारासमोर रांगोळी, सगळं वातावरण प्रसन्न करून टाकायची ती!!
तेजस्वीला आकर्षण असायचं ते गोडाधोडाच्या जेवणाचं. तिच्या आजीच्या हातच्या सणावाराच्या स्वैपाकाची लज्जत काही औरच होती.
आठवणी सुरू झाल्या की येताना चांगल्या अन् कटू सगळ्या एकाच वेळी येतात, तसंच झालं तेजस्वीचं……
सहसा तिची आजी कुठल्याही सणाला मुलांना विचारूनच त्यांंच्या आवडीचं गोडधोड करायची.
एका देव दिवाळीला मात्र आजीने तेजस्वीला आवडतात म्हणून पुरणाच्या पोळ्या करायचा घाट घातला, तेजस्वी उठण्यागोदरच तिचं पुरण तयार करून झालं होतं. ती उठली तशी तिला आजी लाडाने म्हणाली, तेजस्वी आज तुझ्या आवडीचा नैवेद्य हा बाप्पाला.
पुरणाच्या पोळ्या करणार आहे मी. सगळी तयारी झाली सुद्धा माझी!!
अगं आजी पण मी तुला गुळाच्या पोळ्या करायला सांगितल्या होत्या देव दिवाळीला!! तू हो सुद्धा म्हणालेलीस. ह्या तर तू दसऱ्यालाही केल्या होत्यास. मी नाही खाणार जा. तू सारखी विसरतेस आता सगळं……..
ते ऐकलं आणि आजीच्या डोळ्यातून पाणीच आलं एकदम,अन् ती म्हणाली, खरंच विसरले ग मी. माझ्या डोक्यात तुला पुरणपोळ्याच आवडतात हेच राहील़. गुळपोळ्याचं मी पार विसरूनच गेले. आता संक्रातीला करेन ना मी तुझ्यासाठी गुळपोळ्या. अगदी नक्की करेन.
काही नको मला आज हव्या होत्या. मी तुला सांगितलेलं कधीपासून. तू का विसरते ग हल्ली सारखं सारखं. मी नाहीच खाणार जा, तेजस्वी अगदी हट्टूनचं बसलेली.
माझं वय झालं, विसरायला होतं खरं मला. पण तू खाल्लं नाहीस तर मला नाही बरं वाटणार ग. माझी सगळी तयारी झालीये आता. तू म्हणशील तर चार दिवसांनी परत करेन तुझ्यासाठी गुळपोळया. पण आज खा ग तू.
तेजस्वीने ऐकलं नाही म्हणजे नाहीच, देवाला नैवैद्य मिळाला, पण घरची पोरगी रुसून बसली याचं आजीच्या फार मनाला लागलं.
आजी आणि तेजस्वी सोडून पुरणपोळ्या सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या.
तेजस्वी हट्टाने फक्त वरणभात खाऊन उठली, आणि तिच्यावर जीव टाकणारी आजी मात्र तरी तिला जवळ घेऊन म्हणाली, मला झेपलं असतं तर विसरले तरीही गुळपोळ्या बनवल्या असत्या तुझ्यासाठी मी. पण पहिल्यासारखं नाही राहील ग आता. तिला कुशीत घेऊन आजी पुन्हा रडली. तेजस्वीलाही भरून आलं, पण त्यावेळी आजी काय आपलीच, तिच्यावर रागावणं तर हक्कच आहे आपला, म्हणून रुसणचं जास्त महत्वाचं वाटलं तिला!!
म्हटल्याप्रमाणे चार दिवसांनी तिने आजीकडून गुळपोळ्या करून घेतल्या. तेव्हाच तिची कळी खुलली.
पुढच्या देव दिवाळीला तसा काही प्रश्नच उदभवला नाही. कारण काही करायला आजी राहिलीच नाही. अन् त्यावेळी मात्र तेजस्वीला मागच्या वर्षी आपलं खूप खूप चुकलं असं वाटून रडणं अगदी अनावर झालं ……..
आजीची माफी मागायची राहून गेली असं फार फार वाटलं.
पण……..
खरंतर इतक्या वर्षात सगळ्या आठवणीबरोबर ही आठवण देखील अंधूक झाली होती. देव दिवाळी आली काय अन् गेली काय, कळतही नव्हती. आजी एवढं अप्रूप पुढे कोणी दाखवलच नाही. आतातर तेवढं जूनं कोणी उरलही नव्हतं. मात्र वरच्या आजी म्हणाल्या गोडाधोडाचं कर, तसं तेजस्वीला पुरणपोळीच करावी वाटली एकदम.
खास आजीच्या वेळची सणावारांची नवलाई पुन्हा घेऊन येण्यासाठी आपल्या आजीला स्मरून तिच्याच उत्साहाने ती मनापासून देव दिवाळीच्या तयारीला लागली………..!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.