रचनाच्या सासूबाई आजारपणामुळे दहा बारा दिवस बेडवरच होत्या. बघितलं तर तापच होता, पण अशक्तपणाने अंग गाळून टाकलं होतं त्यांंचं. रचनाने ताप आल्या दिवसापासून अगदी सर्वकाही केलं त्यांचं. पेज देण्यापासून, मऊमऊ खिचडी भरवण्यापासून ते वेळेवर औषध देण्यापासून ते हाताला धरून संडास बाथरूमला नेण्यापर्यंत अगदी सगळं सगळं केलं. चढलेला ताप उतरेपर्यंत त्यांच्याजवळ काळजीने बसूनही राहिली बरेचदा……
त्या बऱ्या झाल्या, आणि जीवात जीव आला तिच्या.
ते सगळं बघून तिचा नवरा न राहवून म्हटलाच तिला, मला वाटलं नव्हतं तू आईबद्दल एवढी हळवीही असशील. किती कचकच करायचीस तू माझ्याकडे तिची, तुम्हाला तर मी भांडतानाच पाहिलं फक्त!! हे नातं कधी तयार झालं तुमच्यात?
तो बोलला आणि रचनालाही जाणवलं, हे कसं काय झालं आपल्या हातून? एकही गोष्ट आवडायची नाही मला त्यांची, ना त्यांना माझी. साध्या साध्या गोंंष्टीवरून घर डोक्यावर घेणाऱ्या बायका आम्ही!!
नजरेसमोर सुद्धा आवडायचो नाही एकमेकींना. राग राग व्हायचं नुसतं मनात. मग हे कधी झालं?
त्या आजारी काय पडल्या अन् मी त्यांना आईप्रमाणे जपलंही??
त्या दहा बारा दिवसात एकदाही मनामध्ये धुसपुस झाली नाही, एकदाही त्यांच्या कुठल्या कामाची कटकट वाटली नाही, मनात होतं काय तर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या हिच सदिच्छा!!
हे सर्व तिच्या मनात चाललं असतानाच, तिची मुलगी एवढसं तोंड करून आली आणि तिच्या कुशीत शिरून म्हणाली; आई, तनूला आज टिचर खूप ओरडली.
रचना म्हणाली, मग तुला काय तिचं? तुला तर ती आवडत नाही ना? तुझं कुठे जमतं तिच्याशी?
पण आई का कुणास ठाऊक, मला खूप वाईट वाटलं ते पाहून. ती रडायला लागली तर माझेही डोळे भरून आले, असं का ग?
रचना तिला समजावत म्हणाली, ती लहानपणापासून तुझ्या बरोबर आहे. तुझ्या लाडक्या मावशीची ती मुलगी. दोघी लहानपणापासून एकमेकींच्या सोबत वाढलात. आता थोड्या मोठया झालात पटत नसलं म्हणून काय झालं, अंतरी ओलावा असतोच बाळा. तो अशा प्रसंगी दाटून येतोच!!
मग तुझं सुद्धा आजीबरोबर हेच झालं ना आई?
आजीच्या नावाने सतत किरकिर करणारी तू आजी आजारी पडल्यावर किती ग बेचैन झाली होतीस……
हो ग खरंच माझंही तेच झालं अगदी!! पंधरा वर्ष काढली एकमेकींसोबत आम्ही. सर्वांंना भांडण दिसत होतं, अगदी आम्हालाही, पण त्याबरोबरच तो अंतरीचा ओलावा कधी तयार झाला हे आम्हालाही कळलं नाही. अंथरूण कधी धरलं नव्हतंच ना याअगोदर त्यांनी……..
ते धरल्यावर मात्र त्यांची स्थिती बघून इतके वर्ष सोबत राहिल्याने तयार झालेल्या, मनातल्या ओढीने आपसूकच त्यांच्याकडे धाव घेतली, अन् राग जाऊन फक्त माया दाटून आली.
आई, आजीचं पण तेच झालंय बहुतेक!! फोनवर चौकशी करणाऱ्या सर्वांना सांगताना डोळ्यात पाणी येतंय तिच्या, म्हणते सूनबाईला नावं ठेऊन ठेऊन बेजार केलेलं मी नुसतं, पण तिनंच केलं हो माझं सगळं.
इतकी वर्ष कैदाशिणींंसारख्या भांडलो आम्ही दोघी, एवढं प्रेम कधी तयार झालं, कोणास ठाऊक?
ते ऐकून रचनाच्या डोळ्यालाही धार लागली, ती मुलीला घेऊन सासूबाईंकडे आली आणि म्हणाली, प्रेम होतच हो, आपण रागाकडेच फोकस केला जास्त. मला आठवतं ना, एकदा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांनी माझ्या जेवणाला नावं ठेवली होती, तर तुम्हाला अजिबात आवडलं नव्हतं ते, सासरेबुवांनी सागितलं होतं ना मला. अन् त्या पाहुण्यांना तुम्ही कधी बोलावलंही नाहीत परत.
त्यावर सासूबाईंंनाही काही आठवलं आणि त्या म्हणाल्या, तू ही तुझ्या घरी आपल्या भांडणाचं कधी बोलली नाहीस ना आजपर्यंत? तुझी आई मला नेहमी म्हणायची, तुम्ही छान सांभाळून घेतलंय हो माझ्या मुलीला. मी विचार करायचे, आमचं तर पटतही नाही, मग या अशा का बोलतात?
पण मीही त्याकडे दुर्लक्षच केलं. आणि तुझा राग राग करत राहिले.
राग वाढत होता तसं एकीकडे प्रेमही वाढत होतं, पण ते आपल्याला कळलंच नाही हो कधी सासूबाई!!
हो ना त्यासाठी मला आडवं पडावं लागलं…….
त्यावर रचना, तिची मुलगी आणि सासूबाई मनभरून हसल्या, तेव्हाही अंतरीचा ओलावा परत एकदा दाटून आला अन् तिघींच्याही डोळ्यातून अलगद पाणी खाली आलंच.
नेमकं कशाने ते कळलच नाही त्यांना तेव्हाही……..!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.