कसली होती ग तिची माळ?, मी नीट पहिली पण नाही.
अगं नवीन केली होती म्हणे तिने, आपण आलो काल. कुठे दाखवायला वेळ होता तिला.
म्हणून ना मला हिच्याकडं यावं वाटत नाही. हे दुसऱ्यांदा झालं आता.
बकुळाताईंच्या दोन्ही बहिणी वैतागून आपापसात कुजबुजत होत्या.
बकुळाताईंच्या नातवाचा पहिला वाढदिवस म्हणून सगळे जवळचे नातेवाईक जमले होते. समारंभ तर छान पार पडला. जवळ राहणारे आपापल्या घरी गेले, गावाहून आलेले मात्र आल्यासारखे चार दिवस राहून जाणार होते.
तो दिवस गेला, अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र बकुळाताई चिंताग्रस्त चेहरा करून काहीतरी शोधत फिरत असताना सगळ्यांना दिसल्या.
त्यांच्या धाकट्या बहिणीने त्यांना काय झालं म्हणून विचारलं असतां, माझी सोन्याची माळ गेली ग करून रडायलाच लागल्या लगेच!!
त्या सोडून घरात असलेल्या त्यांच्या दोन्ही बहिणींना, आणि सूनेच्या आईला मनात एकदम धस्स झालं. चेहरा एकदम कावरा बावरा झाला त्यांचा.
बकुळाताईंची सून त्यांना समजावत म्हणाली, अहो, नीट बघा. घरातच असेल कुठेतरी. घरातून कसं जाईल काही?
सगळं सगळं बघितलं ग, मी काय वेडी आहे का उगीच रडायला, कुठे मिळाली नाही म्हणून तर जीव चाललाय ना माझा, बकुळाताईंनी आणखी जोराने गळा काढला.
अगं, ताई पण कालपर्यंत होती की तुझ्या गळ्यात माळ. मधली बहीण बोलली तशी त्या म्हणाल्या, हो कालपर्यंत होती, रात्री झोपताना मी काढून कपाटात ठेवली, अन् आता तिथं ती नाहीच. तिथं नाही आणि कुठ्ठं कुठंच नाही. दोन तोळ्यांची होती चांगली, ज्याने कुणी घेतली त्याला पचणार नाही. माझ्या कष्टाची होती ती …..
अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही तुमच्या घरातली माणसं, आम्ही कशाला घेऊ तुमचं काही?, सुनेची आई न राहवून बोललीच.
हो ना, आम्हाला काय कमी आहे, हे नेहमीचंच आहे. पाहुणे आले की कसं काय काहीतरी हरवतं ग ताई तुझं?, पाहुण्यांना बोलवायचं अन् त्यांना कानकोंडं करून टाकायचं, धाकटी बहीण जरा रागानेच बोलली.
अगं पण मी आळ घेतलाय का कुणावर? मी म्हटलं का तुम्ही घेतलं म्हणून?, भरल्या डोळ्यांनी बकुळाताई म्हणाल्या.
प्रत्यक्षपणे बोलली नाहीस तरी अप्रत्यक्षपणे तेच होतं ना!! कोण आहे आमच्याशिवाय बाहेरचं घरात? आळ घेतला नाही तरी आमच्यावरच येतो, मधली बहीण असं म्हणताच, धाकटीही तोंड वाकडं करत म्हणाली, हो ना, आम्ही आपलं आनंदाने यायचं, आणि पदरी भलता आळ घेऊन जायचं!!
पेटलेलं वातावरण पाहून सून धिटाईने म्हणाली, सासूबाई तुम्हाला नक्की आठवतंय ना कपाटातच ठेवलेलं, नाही म्हणजे ठेवायचं एकीकडे आणि शोधायचं दुसरीकडे असं नको व्हायला म्हणून म्हटलं.
अजून एवढी बुद्धी नाही भ्रष्ट झाली तुझ्या सासूची, मला चांगलं आठवतंय मी कपाटातच काढून ठेवली होती, भरलेले डोळे वटारून सुनेला त्यांनी चांगलंच झापलं. तशी नवीनच होती तीही, पहिल्या वर्षातच पाळणा हाललेला, माहेरीच जास्त दिवस काढलेले तिने, सासू अजून पुरती कळलीच नव्हती.
अगं मग लॉकरमध्ये ठेवायचीस ना हातासरशी, म्हणजे ताप झाला नसता डोक्याला, दोन्ही बहिणी एकदमच बोलल्या.
मला काय माहिती, असं काही होईल म्हणून. माझा आपला घरातल्या माणसांंवर विश्वास ना!!
ते ऐकून धाकटी तावातावाने म्हणाली, म्हणजे बघ, तुला असं वाटतच ना, घरच्या माणसांनी घेतली. आळ टाकलासच तू आमच्यावर. मी ना आता कधी येणारच नाही इथं, वाटलं तर चार दिवस एखाद्या देवस्थानात जाऊन राहीन, पण कुणाच्या घरी नकोच. आणि वेंधळ्या माणसांच्या तर नकोच नको.
मोठ्या बहिणीला वेंधळं म्हणायला जीभ हसडत नाही बरी तुझी? तुझं गेलं असतं ना सोनं तर कळलं असतं तुला. तरी मी बिचारी गप्प आहे, कुणाचं नाव काढत नाही. माझी माझी रडत बसलेय एकटी, तर तुम्हाला तेही बघवेना होय!!, बकुळाताई हुंदक्यावर हुंदके देत बोलत होत्या.
बरं थोडा नाष्टा करून घ्या सासूबाई, थोडं डोकं चालेल मग. आठवेल काहीतरी, सून काळजीने म्हणाली, त्यांनी खाल्याशिवाय तिला खाणं बरं दिसत नव्हतं ना!! पोटातले कावळे भुकेने तडफडत होते नुसते.
मला चांगल़ं आठवतंय, का तू माझ्यावर विसरण्याचा ठपका लावतेस उगाच? तेच हवंय का तुला? म्हणजे मग माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला मोकळी तू!!, बकुळाताईंंना राग काढावा तरी कुणावर हेच कळत नव्हतं. सून होती हक्काची, पण आईही होती ना तिची समोर.
तीही आलीच मुलीची कणव घेऊन लगेच, नाही हो, साधी आहे माझी मुलगी. गरीब गाय म्हणतात तिला आमच्याकडे सगळे…..तुम्ही थोडं खाऊन घ्या बरं.
काही नको. जो पर्यंत माळ मिळत नाही, तोपर्यंत अन्नाचा कण घशाखाली उतरणार नाही माझ्या, सोन केवढं महाग झालंय हल्ली!! खायच्या गोष्टी काय करताय?
कितीही महाग झालं तरी जीवापेक्षा नाही, तुझ्याबरोबर आमचेही जीव टांगणीला लागलेत ग ताई!!
आणि उपाशी राहून काय माळेला दया येऊन ती टुणकन् उडी मारून आपल्या समोर येणार आहे का?
उलट उपाशी राहणाऱ्या आपण घेरी येऊन पडण्याचे चान्सेस मात्र नक्की आहेत. नाही म्हटलं तरी साठी उलटलीये आपली, मधल्या बहिणीच्या पोटातले कावळे देखील फडफड करत आतल्या आत छळत होते तिला.
ज्याला खायचंय प्यायचय त्याने खुशाल खावं, माझी ना नाही कोणाला. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुम्हाला कोणाला काय माझ्या माळेचं, बकुळाताईंनी पुन्हा मोठा आवंढा गिळला.
तुझ्या अशा टोमन्यांनी कुणाला खायचं सुचणार, धाकटी बहीण बोललीच.
ह्यांंचं हे सगळं चालू असतानाच घरकाम करणारी यमुना आली. सगळ्या बायकांंची एकजात पडलेली तोंडं बघून तिने विचारलं, काय झालं हो घरात? अशा का बसल्या सर्वजणी?
सून त्यातल्या त्यात बरं तोंड करून म्हणाली, अहो यमुनाताई, सासूबाईंची सोन्याची माळ हरवलीये हो.
अहो, त्यात काय? घरातच असल पडलेली कुठंतरी. माझ्यासाठी नवीन नाही हे. ठेवतात एकीकडे अन् शोधतात दुसरीकडे. आणि स्वतःबरोबर दुसऱ्याचा बीपी वाढवून बसतात.
तोंड संभाळ यमुने तुझं. एवढीही वेंधळी नाही मी. स्वतःच्या हाताने कपाटात ठेवली होती मी काल. कुणीतरी उचलल्याशिवाय हलणार नाहीच तिथून.
हो आम्ही सर्वांनी उचलली आणि विकून खाल्ली. भीक लागली होती ना आम्हाला. बस्!! झालं समाधान? ती माळ एकदाची मिळाली ना की मी बॅग घेणार आणि चालू पडणार इथून, मधलीने तर रागाने डोकंच फिरवून घेतलं होतं.
हो बाई मी पण निघणार तुझ्याबरोबर. इथे रहायचं म्हणजे गळ्याला फास लावून घेण्यासारखं आहे, धाकटीनेही तिला दुजोरा दिला.
सूनेच्या आईला पण तसंच काहीतरी बोलून झाडावसं वाटत होतं, पण मुलीच्या भविष्याची काळजी करून तिने तोंड दाबून धरलं.
मी कचरा काढला ना की मिळेल बरोबर. दमानं घ्या आता सगळ्यांनी, यमुना अगदी कॉन्फिडन्टली म्हणाली.
अरे कचऱ्यात जाईलच कसं कपाटातलं? पाय आहेत की काय त्याला. आल्या एकेक मला शिकवणाऱ्या, बकुळाताईंचा कॉन्फिडन्स त्याहून मोठा होता.
ताई, नाही सापडलं ना, तर सरळ पोलिसात कम्प्लेंट कर बाई तू. आम्ही तरी सुटू, दोन्ही बहिणींंनी एकच सुर काढला.
कुठल्या तोंडाने घरच्यांविरुद्ध तक्रार करायची, जाऊ दे विसरून जाईन मी.. ….
काही विसरणार नाहीस तू,जन्मभर आम्हाला ऐकवशील उगाच, त्यापेक्षा पोलिसांनी शोध लावलेला बरा, धाकटीने गळच घातली.
ही बघा, ही का माळ तुमची? तेवढ्यात चाणाक्ष यमुनाने आतून आणलेली माळ समोर धरली.
हो हो हिच!! तू कपाटाला हात लावलास माझ्या?, बकुळाताईंंना वेगळीच काळजी लागली.
मी कशाला लावीन बापडी, माझं काय अडलंय त्याविना?, यमुना कुणाला ऐकणारी नव्हतीच.
कुठं मिळाली तुला मग? कपाटातच ठेवली होती मी, बकुळाताईचा कॉन्फिडन्स अजूनही डगमगला नव्हता.
अहो ताई, ही तर मला तुमच्या बेडच्या मागं मिळाली. सगळ्या वस्तू पुढं मागं करत होती मी, बेडपण एकटीनं हलवला तुमचा. बघितलं तर चकाकत होतं काहीतरी.
अग्गबाई, तिकडे कशी गेली?
सासूबाई तुम्ही रात्री झोपताना उशीखाली काढून ठेवली असणार. तुम्हाला सवय आहे ती. सरकत गेली असेल साईडला, अन् पडली मागे. दुसऱ्या कोणाला नाही पण तिच्या आईला फार कौतुक वाटलं त्या बोलण्याचं, मनातल्या मनात कौतुकाने पाठ थोपटलीच पोरीची तिने.
काय ताई, म्हणे मी कपाटात ठेवली. नसता घोर लावला जीवाला आमच्या!!
बघू दाखव कशी आहे ती? असं म्हणत धाकटीने ती हातात घेऊन पहिली, आणि म्हणली, अगं ताई दोन तोळ्यांची वाटत नाही हलकी आहे वजनाने.
हलकी कसली, घेतानाचं वजन लक्षात आहे ना चागलं माझ्या, दोन तोळ्यांचीच आहे ती, बकुळाताई ठासून म्हणाल्याच तरीही.
हो तुझ्या काय काय अन् किती किती लक्षात असतं ते लक्षात आलयचं आता आमच्या, दोघी बहिणी एकमेकींकडे बघत तिरकस हसत बोलल्या.
बोला बोला. तुम्ही माझ्याएवढ्या झालात ना की तुमचंही असंच होणार आहे, कळलं ना. फुशारक्या नका मारू जास्त!!
ते होईल तेव्हा होईल, आज जी शोभा झाली आमची ती फार झाली. आता आम्ही निघतो इथून, म्हणत दोघी बहिणी बॅग भरायला उठल्या. आणि त्याच्यामागून हळूच सूनेची आईही.
ते बघून बकुळाताई घडली गोष्ट निस्तरून घेत म्हणाल्या, झालं गेलं विसरा आता. मी काही तुमच्यावर आळ टाकला नाही. एका शब्दाने बोलले नाही कुणाला.
तुमचं तुम्हीच लावून घेतलंत स्वतःला.
आता खरं म्हणजे माळेबरोबर कानातल्या हिऱ्याच्या कुड्याही मी ठेवल्या होत्या तिथं, त्यातली एकच दिसली सकाळी, पण मी बोललीये का कुणाला काही?
अरे देवा, करत बकुळाताईंच्या दोन्ही बहिणींनी कपाळावर हात मारला. सूनेच्या आईचं तोंड परत एवढुसं झालं.
हुशार सुनेनं मात्र प्रसंग पाहून सूत्रे हातात घेतली, आणि म्हणाली, यमुनाताईss, जमिनीवर लोळण घेऊन बघा जरा नीट, कुडी पण लखलखत असेल बेडच्या कोपऱ्यात कुठंतरी……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.