ईss काहीतरी वेगळीच चव आहे याची!!,धनश्रीची मुलगी तोंड वाकडं करत म्हणाली.
बघू दाखव. मी खाऊन बघते असं म्हणत धनश्रीने ते जेलीसारखं दिसणारं चॉकलेट आपल्या तोंडात टाकलं.
आणि चव लागली तशी ती म्हणाली, अगं हे तर चिंचेसारखं लागतंय आंबट गोड. अगदी तीच टेस्ट आहे. कुठून आणलं तू हे. मला अजून आणून दे ना.
ते ऐकून मुलगी म्हणाली, अगं आई, ठिक आहेस ना, किती एक्साईट झालीयेस?
मग काय? किती दिवसांनी तोंडात चिंच पडली. लहानपणी किती चिंचा खायचे मी!! आता कित्येक वर्षांत नाही खाल्ली. आता यावेळी माझ्या गावाला गेलो ना की, ओढ्याकाठी जाऊया आपण, खूप झाडं आहेत तिथं चिंचेची. दगडं मारून चिंचा पाडूया मस्तपैकी!!
“तूच पाड आणि तूच खा. मला नाही आवडली चव त्याची.”
“अगं तू कधी आत्तापर्यंत खाल्लीच नाहीस ना? मग कशी आवडणार? चिंचा, बोरं, आवळे, कैऱ्या तुम्ही खाता कुठे आत्ताची पोरं? आम्ही तर लहानपणी तुटून पडायचो त्याच्यावर…….”
कित्ती आंंबट तुरट असतं ते, मागच्यावेळी ती बोरं खाल्ली आणि खोकलाच झाला मला. तूच खा बाई ते सगळं, तिची मुलगी अगदी आंबट तोंड करून म्हणाली.
धनश्रीला वाटलं, लहानपणी चिंचा, कैऱ्या, बोरं, आवळे या सगळ्या गोष्टीसाठी किती वेडे होतो आपण. कित्ती वेड्यासारखं खायचो सगळं, तेव्हा कसा खोकला नाही आला कधी आपल्याला. अन् या आताच्या पोरांना एवढं तेवढं आंबट लागलं तोंडाला की कसा खोकला पकडतो?
त्या संपूर्ण दिवसभर धनश्रीच्या तोंडात चिंचेची चव अन् मनात लहानपणीच्या चिंचेच्या आठवणी फिरत होत्या फक्त.
सर्व काम आटपून जरा आडवी पडली अन् डोळे मिटले, तर शाळेजवळचं चिंचेचं झाड सर्रकन डोळ्यासमोर आलं. मधल्या सुट्टीत ती आणि तिच्या मैत्रिणी तिथंच चिंचा वेचत बसायच्या. छोटी छोटी बुटुकं लागायची हाताला, कधी चुकून एखादा आकडा सापडला की केव्हढा आनंद व्हायचा!!
कच्च्या हिरव्या चिंचा आवडायच्या, पण जास्त जीव गाभुळलेल्या चिंचेवर होता तिचा. गाभुळलेल्या चिंचेत आंबटपणाबरोबर गोडवा असायचा ना, तो तिला फार आवडायचा.
तशीच तिला आवडायची तिची आजी. अगदी आईपेक्षा जास्त!!
तिचं आजीकडं झुकणारं माप बघून, तिच्या आईचा मात्र राग राग व्हायचा.
कोणतीही गोष्ट करायला तिला आजीच लागायची. लहानपणी भरवायला आजीला सांगायची, आणि रात्री झोपतानाही आजीच्या कुशीतच झोपायची.
दिवसभर स्वैपाकघरातही तिच्याच मागे मागे असायची.
आजीने ताक करायला घेतलं की मी रवीने घुसळून देते म्हणायची, तिने दाणे भाजले की मी खलबत्त्यातून कुटून देते म्हणायची, कोशिंबीर करायची म्हटली, की मी काकडी चोचून देणार असा हट्ट करत बसायची धनश्री.
ते बघून तिच्या आईची फार चिडचिड व्हायची
ती विचारायचीही धनश्रीला, मी नाही तुला आवडत का?
तर धनश्री म्हणायची, आवडतेस, पण आजी सर्वात जास्त आवडते.
डोळे भरून यायचे आईचे, ती तिच्या परीने खूप प्रयत्न करायची, धनश्रीला ओढ लावायची, पण तिचा कल आजीकडेच झुकायचा.
आजी बरेचदा शाळेत तिला आणायला यायची. शाळा सुटल्यावर समोर दिसली नाही की, धनश्री तिला चिंचेच्या झाडाखाली शोधायला जायची. आपल्या नातीला चिंचा आवडतात, म्हणून आजी तिकडे त्या गोळा करत असायची. आणि धनश्री आली की पिशवीत वेचलेल्या भरपूर चिंचा तिला दाखवायची. धनश्री खूष होऊन जायची. तिच्याबरोबर आजीही एखादं बुटुक तोंडात घालायची, दात आंबून जायचे, अन् मग धनश्रीला ओरडत बसायची. तुझ्या नादाला लागते आणि दात आंबवून घेते मी. आता पुढच्या वेळेला अजिबात चिंचा शोधत बसणार नाही मी तुझ्यासाठी. तोंडाला पाणी सुटतं अन् खावंसं वाटत उगाच.
पण हे असं नेहमीच चालायचं त्यांच्यात. कितीही नाही म्हटलं तरी आजी तिच्या लाडक्या नातीसाठी तिला आवडायच्या तशाच थोड्याशा ओलसर गाभुळलेल्या चिंचा वेचत बसायचीच.
बघावं तेव्हा ही मुलगी आजीलाच चिकटलेली, आईचं काही नाही पोरीला, म्हणत तिची आई मनात फार खट्टू व्हायची. मी भरवते ग, माझ्या शेजारी झोप ग, माझ्या बरोबर गावात चल ग, माझ्या मांडीवर बस ना ग करत आई मागे लागायची, पण धनश्री ते सगळं सुख तिच्या आजीलाच द्यायची.
अन् आईच्या मनात आजीबद्दल उगाच मत्सर भरून यायचा. ह्यांच्यामुळे माझी पोरगी दूर जातेय माझ्यापासून असं सारखं वाटायचं तिला.
आजीलाही ते कळायचं, ती म्हणायचीही धनश्रीला कितीही झालं तरी तुझी आई आहे ती. तिलाही वाटतं, तू तिच्या कुशीत शिरावं, तिच्यावर माया करावी. पण धनश्रीला ते समजायचंच नाही. तिला गाभुळलेल्या चिंचेचा गोडवाच जास्त सुखवायचा. आजीचा सुरकुत्यांनी भरलेला हात जास्त आश्वासक वाटायचा.
पण सुरकुतलेलाच हात होता तो. आणखी किती वर्ष आधार देणार होता? सहावीत गेली धनश्री अन् तो कायमचा दुरावला. आजी हेच जग असणाऱ्या धनश्रीला तिच्याशिवाय काही सुचेचना. कुणाशी बोलावं वाटेना, ना कुणाकडे बघावं वाटेना. आई प्रेमाने जवळ घ्यायला जायची तर धनश्री तिला झटकून टाकायची. तिला आजीची जागा कोणालाच द्यायची नव्हती. आजीच्या आठवणी काढत एकटी कुढत बसायची, धनश्री.
आईला बघवत नव्हतं, पण काही केल्या तिच्याशी जुळतही नव्हतं.
आजीची सगळी कामं आता आई करत होती. आजीच्या जागी तिला सारखी समोर आई दिसत होती. आईला फार वाटायचं, आपल्याही मागे पोरीने घुटमळावं, हे करू का ते करू करत मागे लागावं. पण धनश्री तसं काही करायचीच नाही.
आजीची सगळी कामं जशी आईवर पडली, तसं धनश्रीला शाळेतून आणायचं कामही लागलं.
रोज शाळा सुटल्यावर धनश्रीला आई तिथल्या पायऱ्यांवर तिची वाट बघत बसलेली दिसायची. मग तिचं मन तुलना करायचं, आजी कशी आपल्यासाठी चिंचा वेचायला जायची, आईला तर काही ते कळतच नाही. दुरावा आणखीनच वाढत होता.
पण एकदा मात्र धनश्री वर्गातून बाहेर आली, आणि समोर नेहमी पायऱ्यांवर दिसणारी आई तिला दिसलीच नाही, एक क्षण आई आपल्याला न्यायला यायचं विसरली की काय असं वाटून तिने आवंढाच गिळला. मग थोडं इकडे तिकडे पाहिलं, आणि अचानक तिची नजर चिंचेच्या झाडाखाली गेली. तिला आजीसारखाच भास झाला एकदम. ती पळत गेली तर तिची आई चिंचा वेचताना तिला दिसली, धनश्री आली तसं तिने पदरातल्या ओंजळीत वेचलेल्या गाभूळलेल्या चिंचा तिच्या पुढे धरल्या. धनश्रीला एकदम आईत आजी जाणवली आणि तिने तिला एकदम घट्ट मिठी मारली. मायलेकीचं सूत जमलं. त्या चिंचेच्या साक्षीनेच आजीची जागा आईला मिळाली. का आजीने स्वतःहून पुढाकार घेऊन देऊ केली कोण जाणे??
धनश्रीला सगळं तस्सच्या तस्सं डोळ्यासमोर आलं……..
आजी, आई आणि गाभुळलेल्या चिंचा सगळं आता सुटलं होतं, सगळी माणसं, सगळ्या सवयी, जूनं सारंकाही काळाच्या ओघात मागे पडलं होतं.
आता जवळ होत्या त्या फक्त आठवणी, असं काही निमित्त मिळालं की त्या आपोआप वर यायच्या आणि जुन्या जिवलग माणसांना पुन्हा एकदा अनुभवायचं सुख द्यायच्या……….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.