आता थंडी आलीये तर भांडी जरा जास्त पडतील हा, मला पाण्यात हात घालवत नाही, थंडी खूपच वाजते बाई, घरकाम करणाऱ्या मावशींना मनाली हे बोलली तसं कधी नव्हे त्या मावशीही पटकन बोलून गेल्या,
पण थंडी मलाही वाजते ग ताई…….
मनालीला एकदम आपल्या चुकीची जाणीव झाली. आपण आपलाच विचार करतो फक्त. बरोबर आहे की त्यांचही, त्याही माणूसच आहेत. थंडी त्यांनाही वाजत असेलच की. बघितलं तर आपल्या आईच्या वयाच्या आहेत जवळपास. पण आपण जशी कामं टाळण्यासाठी कारणं देतो, त्यांच्याकडे ती नाहीत एवढंच!!
कितीही थंडी वाजली, सर्दी झाली, खोकला झाला, तरी त्यांची कामातून सुटका नाहीच.
मावशी तेवढं बोलून गप्प बसल्या. कधी नव्हे ते त्या असं बोलल्या होत्या. मनालीला एकदम लागलं ते. तिने त्यांची भांडी घासून झाल्यावर त्यांच्या हातात गरमागरम चहाचा कप ठेवला आणि म्हणाली, सॉरी मावशी, चुकले मी. माझ्या मनात माझाच विचार फक्त.
मावशींनाही स्वतःच्या बोलण्याचं कसतरी वाटलं होतच, त्याही म्हणाल्या, तोंडातून निघून गेलं पटकन. मी घासीन जास्तीची भांडी, त्यात एवढं काही नाही. माझं तर कामच आहे ते.
पण झेपेल एवढंच काम करा मावशी, आता बोललात ते चांगलच केलंत तुम्ही. नाहीतर मला जाणीवच नसती झाली कधी, त्रास तुम्हालाही होत असेल त्याची. कधी कधी लक्षात नाही येत माणसांच्या, स्वतःचीच आत्मकेंद्री वृत्ती.
नाही पाडणार मी तुमच्या अंगावर जास्तीची भांडी. तुम्ही रोज न चुकता येता तेच खूप आहे माझ्यासाठी.
मी माझ्यासाठी येते ताई. काम करीन तर खाईन ना? जरा चूक झाली तर फट्कन काढून टाकतात बायका. विचार पण करत नाहीत आमचा. त्यात माझं वय झालेलं, तरीपण मला तुमच्यासारख्यांनी धरून ठेवलंय ते नशीबच म्हणायचं माझं. शरीर साथ देत नाही म्हणावं तसं, मग तोंडातून निघतो एखादा शब्द. तसा पोरगा बघतो मला. पण त्याच्या तुटपुंज्या पगारात आपला कशाला भार आणखी. पोरगा असला तरी कधी बोलून दाखवलं तर घाव जिव्हारी लागायचा माझ्या, त्यापेक्षा आपण हात- पाय हलवत राहिलेल बरं नाही का?
एवढं बोलून मावशी चहा संपला म्हणून उठल्या. कपबशी विसळली आणि जाऊ लागल्या, तेवढ्यात परत मनाली म्हणाली, मावशी कधी काय लागलं तर हक्काने सांगा. सगळीच माणसं वाईट नसतात, इतर व्यापात काही गोष्टी क्लिक होत नाहीत एवढंच.
मावशी मान डोलावून निघून गेल्या. तसं मनालीला काहीतरी सुचलं. तिने स्टुलावर चढून कपाटावरची पेटी काढली.
त्यात सर्वात खालती तिच्या आईचा स्वेटर होता. तिने तो बाहेर काढून स्वच्छ धुतला.
दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे मावशी आल्या. समोर रोजच्यापेक्षाही कमी भांडी बघून त्यांना वाईट वाटलं आणि त्या म्हणाल्या, ताई खूप मनावर घेतलं तू. तुझ्या पोरांसाठी ठणठणीत रहायला पाहिजे की नको? बारकी आहेत अजून ती.
काही होत नाही, ती फक्त कारणं होती मनाची. तुम्ही करणाऱ्या समोर दिसत होता म्हणून, आता मनाला बजावलं मी, एवढं बोलून मनालीने आतल्या खोलीत ठेवलेला स्वेटर आणून मावशीच्या हातात दिला आणि म्हणाली, माझ्या आईचा स्वेटर आहे हा. शेवटची आली तेव्हा विसरून गेली होती. मग अगदी जपून पेटीत ठेवला होता दोन वर्ष. पण काल का कोण जाणे एकदम तुम्हाला द्यावासा वाटला. पेटीत पडून पडून असाच जीर्ण होण्यापेक्षा कुणाच्या अंगाला लागला तर त्याचंही सार्थक होईल नाही का?
पण ताई……. मावशींना बोलायचं होतं तरी गहिवरून काही बोलताच आलं नाही.
मनालीच पुढे म्हणाली, बघा, ही इतकी साधी गोष्टही मला दोन वर्षांनी क्लिक झाली. मी काल म्हटलं नाही का तुम्हाला, सगळीच माणसं वाईट नसतात, काहींना वेळच्या वेळी काही क्लिक होत नाही इतकंच.
मावशी काही बोलल्या नाहीत, पण या वयात आपली कोणीतरी काळजी करतंय, ही गोष्ट त्यांची जगायची उर्मी वाढवून गेली एवढं नक्की…….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
Hi
I visited your blog you have shared amazing information, i really like the information provided by you, You have done a great work. I hope you will share some more information regarding full movies online. I appreciate your work.
Thanks
Have a Great Day
Watch punjabi Movies Online