कल्पेश आणि कावेरीचा रीतसर घटस्फोट झाला, आणि कावेरीला मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी फोन करून भंडावून सोडलं अगदी!!
ज्याला त्याला एकच काळजी आता पुढे कसं व्हायचं तुझं? पोटगी घेतलीस की नाही चांगली? मुलाच्या शिक्षणाचा खर्च काढून घे त्याच्याकडून!!
घर ठेवलंय का तुझ्या नावावर? सेविंग्ज आहेत ना तुझ्याकडे? एकटीला सांभाळावं लागणार आता सगळं. खर्च कमी असतात का हल्ली? तो होता तेव्हा ठिक होतं, आता तुझ्या एकटीवर सगळी जवाबदारी आली. पेलली जाईल ना नीट?
कावेरीला या सगळ्याचं खरंतर हसायला येत होतं.
नेमकं कुठल्या शब्दात या साऱ्यांना समजवावं, तिला कळतच नव्हतं.
सगळयांना वाटत होतं, कावेरीचा आधार गेला, कावेरी आता एकटी पडली. कावेरीची आर्थिक बाजू कमकुवत झाली.
पण खरं हे होतं की, एकटी कावेरी नाही तर एकटा कल्पेश पडला होता, आधार कल्पेशचा गेला होता. आर्थिक बाजू ढासळली होती कल्पेशची!!
पण आजही अस्तित्वात असलेली पुरुषसत्ताक मानसिकता हाच विचार करायला लावत होती सर्वांना, की घर पुरुष चालवतो फक्त. बाई फारतर थोडासा हातभार लावते. आणि पुरुष बाजूला झाला की बाई सगळ्या बाजूने अपंगच होते लगेच.
कावेरीला बाहेरच्यांचं काही एवढं वाटत नव्हतं, पण ज्यांना तिच्या घरातली स्थिती माहिती होती, ते आई-वडील देखील आता तो नाही तर तुझं कसं होणार? घराचा आधार काढून टाकलास तू, असं म्हणाले तेव्हा मात्र सगळं समोर दिसत असताना माणसं कशी डोळे मिटून घेतात, याचा चांगलाच प्रत्यय आला तिला.
कावेरी कल्पेशचा संसार दहा वर्ष टिकला. टिकला म्हणजे कावेरीने टिकवून ठेवला होता म्हणून टिकला. कल्पेशची वृत्ती पहिल्यापासूनच धरसोडीची होती. चांगला इंजिनिअर असूनही कुठल्या एका ठिकाणी टिकून राहतच नव्हता तो. प्रत्येक नोकरीत काही ना काही खुपायचंच त्याला. वर्ष सहा महिन्यात सरळ राजीनामा देऊन मोकळा व्हायचा तो. नवीन नवीन कावेरीला वाटलं, जवाबदारीची जाणीव झाली की सुधारेल आपोआप. पण लग्नाला दोन वर्ष झाली, त्यानंतर मुलगा झाला, तरी त्याला कसलीही जाणीव व्हायचा पत्ताच नव्हता. कुठे एके ठिकाणी चांगली नोकरी धरून असता तर चांगलं पद, पगार असता त्याला.
पण दहा वर्षे झाली तरी ना त्याचं पद वाढत होतं, ना फारसा पगार. पुढे तर त्याला नोकरी मिळणं ही कठीण होऊ लागलं.
याउलट कावेरी मात्र लग्नाअगोदर पासून ज्या कंपनीत होती, तिथेच अजूनही टिकून होती. सुरुवातीला शिकाऊ म्हणून असणारी पुढे आपल्या नियमितपणामुळे आणि हुषारीमुळे सिनिअर मॅनेजरच्या पदापर्यंत पोचली. पगारही भरघोस घेऊ लागली.
मध्ये बाळंतपण आलं, छोटीमोठी आजारपणं आली, पण तिने नोकरी सुरक्षित ठेवली.
त्यामुळे घर खरंतर चालवत होती, कावेरीच. कल्पेश वर्षातून सहा महिने घरीच असायचा. आणि कामाला गेला, तरी त्याचे पैसे स्वतःवरच उडवायचा.
कावेरीने मागितले की बायकोने घर चालवलं तर काही बिघडत नाही, पुरुषांनी ठेका नाही घेतलाय असं म्हणून हात वर करायचा. पण सासर माहेरचं किंवा इतर नातेवाईकामधलं कोणी घरी आलं की बायको घर चालवते हे मोकळ्या मनानं कबूल मात्र करायचा नाही. मी सगळं करतो, हे दाखवायचा आटापिटा करायचा.
इतरवेळी ना मुलाकडे लक्ष द्यायचा, ना बायकोकडे, ना घराकडे. तो त्याचा होता फक्त. मनमौजी.
कावेरीला सतत वाटायचं, काय उपयोग याचा? फक्त लोकांना दाखवण्यासाठी. बाकी सगळं तर मीच करतेय. त्याच्याकडून ना मला प्रेमाचा ओलावा मिळतोय ना मुलाला बापाचं प्रेम. आर्थिक संरक्षण तर नावालाही नाही. मानसिक कुचंबणा होतेय फक्त.
उगीच नवरा म्हणून इतरांसमोर हक्क दाखवू पाहणार, स्वतः नवऱ्याचं एकही कर्तव्य बजावत नसताना, माझ्याकडून मात्र सगळ्या अपेक्षा करणार……..
का ठेवू देखाव्यासाठी मी त्याला? फक्त लोकांना दिसावा म्हणून? त्यांच्यासाठी खोटं नातं का जोपासू? दहा वर्ष केली की ऍडजस्टमेंट!!
खूप वाट पाहिली सुधारण्याची, पण नाही. त्याला सगळं आयतं मिळतंय का सुधारेल तो?
‘नवरा’ या लेबलखाली सगळं बिनबोभाट मिळतंय, मग का त्रास घेईल तो?
अखेर एक दिवस पाऊल उचललंच, कावेरीनं. आपल्या आधाराचा हात काढून टाकला त्याच्यावरून, देऊन टाकला घटस्फोट. घर कावेरीचंच होतं, तिनेच हट्टाने घेतलेलं, तिथेही कल्पेश नको नको म्हणून मागे हटत होता, स्वतःची लग्नाअगोदरची सेविंग्ज, सगळे दागिने, भावाकडून पैसे घेऊन, ऍडव्हान्स रक्कम उभी केलेली तिने. स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन एकन् एक हप्तेही तिनेच भरले होते. कल्पेशला कोण देणार होतं कर्ज? नोकरी होती का एक ठिकाणावर?
त्यानंतरही पगार वाढत गेला, तसं एकेका वस्तूंनी घर तिनेच भरलं, पुन्हा नवीन सेव्हिंग्ज सुरू केल्या. सगळं स्वतःच करत होती, घरही स्वतःच चालवून.
उघडयावर कावेरी पडलीच नव्हती. पोटगीची तिला गरजच नव्हती. मुलाचं शिक्षण तसंही तीच बघत होती. पहिल्यापासून तिनेच घरादाराची जवाबदारी उचलली होती.
खरंतर ती पोसत होती नवऱ्याला…….
तरी…..तरीही दुनियेला वाटत होतं, तिचा आधार गेला.
तिने सोडलेलं नवऱ्याला, आणि दुनियेला वाटत होतं, आता नवऱ्याने टाकलेल्या बाईचं काय होणार?
इतके वर्ष तिच घराचा आर्थिक भार सक्षमपणे पेलत होती, तरी दुनियेला वाटत होतं, आता पैशाअभावी तिचे हाल होणार!!
सावित्रीच्या लेकी कितीही शिकल्या-सवरल्या पुढे गेल्या, त्यांनी कितीही मोठा कर्तृत्वाचा झेंडा फडकवला, तरी समाजाला त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व मान्य करायला अजून किती वर्ष लागणार कोण जाणे………..?
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.