का कोणास ठाऊक पण मला नेहमी वाटतं, त्यांना त्यांच्या घराने टाकलंय……..
नाही म्हणजे ते राहतात त्याच घरात……. त्यांच्या कुटुंबाबरोबर………पण टाकल्यासारखे
कधी मी त्यांना त्यांच्या बायकोबरोबर फिरताना पाहिलं नाही, खरंतर दोघांना कधी एकत्रच पहिलं नाही, ना कधी मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत कुठे जाताना….. हां ते एकटे मात्र सतत फिरत असतात कुठे ना कुठे …….दूर दूर खूप खूप दिवस…….
तसं मी त्यांच्या घरात डोकावले देखील नाही कधी……
पण गेले दहा वर्ष साऱ्या कुटुंबाला रोज बघतेय……
लांबूनच थोडंफार ओळखतेय………
टाकलेला माणूस तसा नेहमी समोरून सर्वांशी बोलणारा…..आवर्जून चौकशी करणारा……..
वय साधारण पासष्टच्या आसपास असावं, पण गेल्या दोन वर्षांपासून मला ते अचानक थकलेले
पंच्याहत्तर-ऐंशी चे वाटायला लागलेत. त्यांना बघितलं की सतत विचार येतो ….का असेल हे असं???
आता हे सर्व बघून मला त्यांच्या कुटुंबाचा राग यायला हवा ना???
पण नाही येत मला ……कारण मी बरेचदा तरुणपणी आपल्या हट्टी , दुराग्रही, हेकेखोर स्वभावामुळे, नको त्या व्यसना़ंमुळे कुटुंबाला त्रास देणारे पाहिलेत………वयामुळे अंगातली मस्ती बायकोवर पोरांवर उतरवणारे पाहिलेत……..काही कुटुंब करतात सहन, नेतात निभावून, काही कुटुंब सोडवून घेतात जाचातून………
आणि काही कुटुंब वाट बघतात योग्य वेळेची……सगळ्याचा हिशोब ठेवतात…….मनात ठसठसतच असतो तो तसाही ………आणि ती वेळ आल्यावर परतफेड करतात…….असं टाकून देऊन……….जेवणखाण, पैसे पाणी सारं पुरवलं जातं, पण त्याचं घरातलं अस्तित्व नाकारलं जातं, दखल घेतच नाही कोणी ………इच्छाच मेलेली असते साऱ्यांची…….तो दिसला की जूनं सारं आठवतं आणि मन उडून जात त्याच्यावरचं पोरांचं पण आणि बायकोचं पण……..कधी कधी सोडू म्हणता सोडता येत नाहीत कित्येक गोष्टी……… बायकोला संसारात न दिलेली साथ, मुलाचं नासवलेलं बालपण कसं कोण विसरेल?????
हे असही असतं बऱ्याचदा……..टाकलेल्या माणसाबरोबर हेच घडलं असावं किंवा काही वेगळं ही कारण असावं……. मुलांबरोबर बायकोही सामील आहे म्हणून माझा अंदाज…….प्रत्येकवेळी म्हाताऱ्या माणसांना वाऱ्यावर सोडलंय म्हटलं की त्यांच्या मुलांनाच शिव्या घालतो आपण……..पण बरेचदा दुसरी बाजूही काही सांगू पाहत असते……..
कित्येकदा अंगात रग असते तेव्हा सुनेला पिळून घेणाऱ्या, आपल्या जाचात ठेऊ पाहणाऱ्या सुद्धा फिरत असतात, मस्ती गेल्यावर, म्हातारपणाने जखडल्यावर टाकल्यासारख्या……..विटलेलं असतं मन सुनेचं, नातवंडांनी सुद्धा पाहिलेलं असतच की……….
टोचत तर असतंच एकटेपण टाकलेल्यांना………पण काही पर्यायही नसतो टाकलेपण स्विकारण्याशिवाय……….
बाकी काही नाही पण येता जाता सहानुभूती बरीच मिळते त्यांना आपल्यासारख्यांकडून आणि त्यांच्या पोरांना भरपूर शिव्या……. कसली ही आजकालची पोरं अप्पलपोटी……. किती सहज म्हणून जातो आपण……
पण हि नक्की कसली परतफेड आहे ते आपल्याला कुठे माहीत असतं…….
वामनराव पैंच्या छोट्याशा पुस्तकात वाचलेलं खूप पूर्वी, तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख देता ते बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं………..
प्रत्येकवेळी चूक मुलाबाळांची असतेच असं नाही, टाकलेलं माणूस दिसलं की आपण आपलं तेच गृहीत धरतो इतकंच……….!!!
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...