एक दिवस माझं अस्सं डोकं फिरलं ना, मोबाईल घेतला आणि लिस्ट मधल्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना एक एक करून डायरेक्ट फोनच लावायला सुरुवात केली.
मला एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच होता.
पहिला फोन लावला. एंगेज….. कधी म्हणजे कधी एखादी सुरुवात धड होईल तर शपथ.😏
दुसरा लावला, हॅलो आलं आणि मी लगेच मुद्द्यालाच हात घातला, ताकाला जाऊन भांडं कशाला लपवा, आणि तसाही मला आज चकाट्या पिटायचा मूडही नव्हता. मी सरळ विचारलं, मला सांग तू तुझ्या नवऱ्याला अडीनिडीला चार गोष्टी आणायला सांगितल्यावर तो बरोब्बर त्या चार गोष्टी आणतो का ग? की काही गोंधळ घालतो?
पण सरळ उत्तर देतील त्या बायका कसल्या?
का ग काय झालं? प्रॉब्लेम झाला का काही?😱
त्यांना रामायण ऐकल्याशिवाय उत्तर द्यायचं नसतंच!
आणि आपलं रामायण ऐकून त्या त्यांचं नॉन स्टॉप महाभारत सुरू करतात. आता समोरून कुणी नवऱ्याच्या वेंधळेपणाबदद्दल विचारतयं म्हटल्यावर काय सांगू नी किती सांगू असं झालं होतं माझ्या मैत्रिणीला! माझा प्रश्न क्षणोक्षणी भरकटत होता, मी हळूच आठवण करून दयायचे प्रश्नाची, तर ती हो हो सांगते करत स्वतःच्या नवऱ्याचे (माझ्या प्रश्नाबाहेरचे) जे एकेक प्रताप ऐकवायला लागली की मला माझाच नवरा बापुडा वाटायला लागला.
शेवटी एकदाचं तिच्या घरी कोणी तरी टपकलं आणि मी सुटले. पण माझा प्रश्न काही सुटला नाही.🤦
मी धीर धरून पुढचीला फोन लावला. तिलाही डायरेक्ट प्रश्नच पुढे केला. पण तिचं नुकतंच सासुबरोबर वाजलेलं बहुदा, तिने नवरा सोडून सासूचीच टेप ऐकवायला सुरुवात केली. मी आपली मध्ये मध्ये नवरा नवरा करतीये तर ती म्हणते गप ग लिंक तोडू नको. तिच्या जीवाला शांती मिळेपर्यंत आणि माझे कान किटेपर्यंत सासुपुराण ऐकवलं. स्वतःच्या लग्नापासून ते दोन पोरं होईपर्यंतच्या सासुरवासाचा कालखंड माझ्यासमोर मांडला. आणि शेवटी मलाच प्रश्न टाकला, सांग आता कोण बरोबर ?
मला खोकल्याची ढास लागली, बोलायला जमेना म्हणून फोन तसाच बंद केला. सासुपूराणापुढे माझ्या प्रश्नाला किंचितही महत्व मिळालं नाही.🤦
मी निराश न होता पुढचीचा फोन वाजवलाच. तिला प्रश्न विचारताच, थांब हा सांगते, असं करून करून माझ्याकडून मधल्यामध्ये अळुवडीची रेसिपी विचारून घेतली. दहा मिनिटे त्यावर गहन चर्चा केल्यावर पोरगं रडायला लागलं म्हणून आता उरलेलं नंतर बोलू म्हणून फोन ठेवून दिला. माझा प्रश्न पुन्हा तसाच माझ्याकडेच उरला.🤦
आतापर्यंत मला जवळच्याच वाटणाऱ्या मैत्रिणींनी केलेल्या मानसिक खच्चीकरणानंतरही माझी खुमखुमी काही कमी झाली नव्हती.
मी चिकाटीने लिस्टमधल्या पुढच्या मैत्रिणीच्या नंबराला टुक केलं.
तिच्या डोक्यात माझा प्रश्न गेलाच नाही. नवरा या शब्दानेच तिचं डोकं आऊट झालं आणि मग रात्रभर तिचा नवरा मोठमोठ्याने घोरून झोपेचे कसे बारा वाजवतो, आणि दिवसभर कसं तिला जरासुद्धा आडवं पडायला मिळत नाही, खेळखंडोबा झालाय नुसता जीवनाचा, असं बरंच काही अनेक आवंढे गिळत गिळत सांगितलं. वरून तुझा काय प्रश्न आहे तो जरा बाजूला ठेव आणि ह्याच्या रेकण्यावर रामबाण उपाय सुचव म्हणून मागे लागली.
इथेही माझा प्रश्न बाजूलाच पडला.🤦
आता मलाच वैताग आला, मी माझं तुणंतुणं घेऊन गेले तर ह्या आपलीच भुणभुण ऐकवत बसल्या.
वेळेला कधी एक कोण उपयोगी पडत असेल तर शप्पथ. 😏
आता हे शेवटचं म्हणून एकीचा फोन लावला आणि तिच्यासमोर माझा प्रश्न टाकला, तर ती पॉझ झाली.
मी म्हटलं, काय ग आहेस ना?
तर म्हणते कशी, अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल नाही करायचं. आपलंच समजून सोडून द्यायचं. पती पत्नी म्हणजे संसाराची दोन चाकं, आता बघ…..
मी हॅलो हॅलो, आवाज येतोय का? करायला लागले.
काय बोलतेस काही ऐकूच येत नाहीये ग, करत चटकन फोन ठेऊन दिला. ताईंना हुक्की आलेली, मी आयती हातात सापडल्यावर डायरेक्ट सुटल्याच.🙃 माझ्या एवढ्याश्या प्रश्नाने इथे तर प्रवचनच सुरू झालं🤦
मी आपलं माझं फ्रस्टेशन काढायला फोन केले, म्हटलं; बघुया एक तरी हमदर्द मिळतोय का?
तर कसलं काय……
एकिला माझं काही पडलेलं नव्हतं.
बरं कुणाकडे जाऊन गळे काढावेत एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही, पण नाही म्हटलं तरी कुठेतरी मनात ठुसठुसत राहतचं ना!
म्हणून म्हटलं जरा चार-चौघीना विचारून बघावं…..
नक्की माझंच ध्यान असं आहे की सगळी ध्यानं अशीच असतात?
बायको काय सांगतीये याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, नुसतं हो हो करून माना डोलवायच्या. आणि मग सांगितलेल्या सगळ्या कामांचा विचका करायचा.🙄
जरा काही अडलं नडलं तर आणायला पाठवायची सोय नाही. चार पाच गोष्टी सांगितल्या की हमखास दोन विसरणारच!!!
कोथिंबीर, कडीपत्ता, मिरची, आलं आणि पाव किलो तोंडली असं सांगितलं तर बाजारात जाईपर्यंत कडीपत्ता आणि आलं डोक्यातून उडालेलं असतं, घरी फक्त कोथिंबीर आणि मिरचीचंच आगमन होतं. आणि तोंडली नेमकी किती किलो सांगितली होती, हे भाजीवाल्याकडे गेल्यावर काही केल्या आठवतच नाही. कधी कधी तर तोंडली होती का भेंडी हा ही प्रश्न भेडसावत असतो ऐनवेळी!
बरं सुटसुटीत असं, हिरवा मसाला आण असं सांगावं तर अगं बरीच दुकानं शोधली हिरवा मसाला नव्हता कुणाकडचं. म्हणून हा काळा आणलाय आजच्या दिवस तो वापर हा फुकटचा सल्ला.
अशा वेळी मी सरळ आरतीचं ताट बाहेर आणते, पोरं सुरू होतातच लगेच, त्यांना पण सवय झाली आता.
सांगा बरं, असं होतं ना कधी कधी……कांदा बटाटा टॉमेटोचा रस्सा करायचा मुड येतो, आणि टॉमेटो नसतात.
मग महाराज अवेलेबल असतील तर त्यांना विनंती केली जाते. (खरंतर हुकूमच सोडला जातो म्हणायचं होतं मला, पण आवरलं स्वतःला)
आता एवीतेवी टॉमेटो आणायला माणूस बाहेर निघतोच आहे, म्हटल्यावर आणखी चार गोष्टी स्वाभाविकपणे चिपकवल्या जाणारच ना?
आणणाऱ्याला पण वाटलं पाहिजे आपण घरचं थोडफार काम करतो. आपल्या माणसांचा उत्साह आपणच वाढवणार नाहीतर कोण?
महाराजांना पुरतं ओळखून असल्यामुळे त्या चार गोष्टी लिहून दिल्या जातात, घरातून निघेपर्यंत चार वेळा सांगितल्या जातात, महाराज आता काम फत्तेचं या अविर्भावात जातात आणि त्यांच्या दृष्टीनें काम फत्ते करून येतातही.
चार गोष्टी बरोब्बर आणल्या जातात , रस्स्याचे टॉमेटो मात्र अदृश्यावस्थेत असतात.
महाराजांना पाचारण केलं जातं…..
अगं तूच तर म्हटतेस ना, टॉमेटो नेहमी लहान आणायचे, भाजीवाल्याकडे मोठेच होते, तुझी ती स्टँडिंग इन्स्ट्रक्शन झटकन आठवली मला…..कांदा, बटाटे, टोमॅटो वाली. नेहमी लहान किंवा मिडीयमच आणायचे. मोठे मोठे आणायचे नाsssहीत.
नको तेव्हा बरी रे तुला ती इन्स्ट्रक्शन आठवते??
आता रस्सा भाजी खायची म्हटल्यावर, मिळतील त्या अवस्थेतले टॉमेटो आणणं गरजेचं नव्हतं का???
फोन मिरवत नेला होतास ना? मग शंका उपस्थित झाल्यास विचारावं असं नाही वाटलं का तुला? आपण गेलो कशासाठी होतो?
आता रोज काय आरतीच करत बसायची का, बाकी कामंधामं सोडून?
बस्स झालं, इथून पुढे मी तुझं एकही काम करणार नाही, तुझं तू बघ माझं मी बघतो. महाराजांचा लग्गेच पारा चढतो.😡
सांगा आता, ऐनवेळी गरजेला बायको नवऱ्याला नाही पळवणार तर कोणाला? मोठ्या विश्वासाने सोपवलेल्या अगदी मोजक्या चुटूर पुटूर कामांचे पण बारा वाजवले तर कुठली बायको कर्कशा नाही होणार? उगाच नवऱ्याच्या नावाने ओरडायला काय वेडं लागलीयेत का आम्हा बायकांना?
यांची अशी एकेक वागणी आम्हाला आमचा मूळचा सालस, मधुर आणि शांत स्वभाव सोडायला प्रवृत्त करतात.
म्हणून म्हटलं, सगळीच ध्यानं अशीच असतात का बघावी!
अंदाज घायला मैत्रिणींना फोन केला, तर त्यांच्यासमोर माझ्या फुटकळ प्रश्नापेक्षा अनेक ज्वलंत प्रश्न उभे होते, त्यावर चर्चा करण्यातच त्यांनी जास्त रस दाखवला.
म्हणूनच माझं गाऱ्हाणं मी तुमच्यासमोर मांडलंय आता…..
बोला, सगळीच ध्यानं अशीच असतात का हो? चला सांगा पाहू, तुमचं ध्यान कसं आहे ते😜
आणि हो, ध्यानांनाही स्पष्टीकरण द्यायची मुभा आहे बरं का!!😅
(इथे ‘ध्यान’ हे प्रेमापोटीच म्हटलं आहे, उगाच कोणी भलतंच सिरीयस होऊ नये😉)
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेन्ट, फॉलो नक्की करा. आणि शेअर करायचा झाल्यास नावाला अजिबात मागे सोडायचं नाही. लेख कॉपीराईट आहे म्हणून जरा सांभाळून😀
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Ho almost asech hote Kahi kaam sangitale ki…