माझ्या लहानपणी साताऱ्याला असताना 26 जानेवारी , 15 ऑगस्ट हे दिवस सणांसारखेच वाटायचे. आदल्या दिवशी उद्या सण आहे हिच फिलिंग असायची. शाळेत खास सांगितलं जायचं, उद्या स्वच्छ गणवेश घालून, इस्त्री करून या. आमच्या शाळेचा गणवेश पांढरा फ्रॉक होता. मग त्याला स्वच्छतेची झाक देण्यासाठी निळीमध्ये बुडऊन निळसर शुभ्र केलं जायचं आणि मग गॅसवर गरम केलेल्या तांब्याची इस्त्री मारून आम्ही शाळेत जायचोच. बुडवून सुट्टी एन्जॉय करायची हा ऑप्शन कुणाच्या डोक्यातच यायचा नाही.
शाळेत जाताना नाक्यांनाक्यावर मोठमोठ्याने इतकी देशभक्तीपर गीत ऐकायला मिळायची की पोचेपर्यंत एकप्रकारचं स्फुरण चढलेल असायचं. आणि मग शाळेतला झेंडा फडकला की सॅल्युट मारताना तर आम्हाला छोटे सैनिकच झाल्यासारखं वाटायचं.
गाणी म्हणताना तर प्रत्येक शब्दात अभिमान आणि जणू काही आम्हीच सच्चे देशभक्त हाच अविर्भाव असायचा……
विजयीविश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा
असो किंवा
बहू असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा……
किंवा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
सगळं अगदी तल्लीनतेने, एकतारीत………!!!
मग घरी येताना उगाचच जोशात घोषणबाजी
जय हिंद जय महाराष्ट्र!!
जय जवान जय किसान!!
भारत माता की जय!!
या दिवशीचा खास पदार्थ म्हणजे जिलबी……प्रत्येक हलवाईच्या दुकानासमोर मंडप घालून जिलब्या तळल्या जायच्या…….या जिलब्यांनीच प्रत्येक घरातला स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिवस साजरा व्हायचा.
घरचं वातावरण पण सणासुदीसारखचं; म्हणजे या दिवशी कोणी आम्हाला ओरडायचं नाही. गोडाधोडाचं साग्रसंगीत जेवण. संध्याकाळी फिरायला जाताना ठेवणीतला ड्रेस घालायला मिळायचा.
घरी साधारण आठवडाभर अगोदर पासूनच सकाळची सुरुवात टेपरेकॉर्ड वर वाजणाऱ्या देशभक्तीपर गीतांनी व्हायची.
मेरे देश की धरतीsssssss, नन्हा मुन्ना राही हुँ….,
जहाँ डाल डाल पे, ऐ मेरे वतन के लोंगों अशा गाण्यांनी चांगलीच भारावलेली वातावरण निर्मिती झालेली असायची. आतुरतेने कधी झेंडावंदनाचा दिवस येणार याची वाट पाहायचो आम्ही…..
घरी आजी आजोबा सतत या दिवसांची, शूरवीरांची माहिती देत असायचे आणि माहीत असलं, खूप वेळा ऐकलेलं असलं तरी आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मज्जा वाटायची.
टिव्हीवर दाखवले जाणारे झेंडावंदन, समूहगीते, मनोज कुमारचा चित्रपट घरच्या साऱ्या माणसांबरोबर बघणं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच .
काय पकाऊ चाललंय असं कधी वाटलंच नाही कोणाला कधी……..खरंतर पकाऊ हा शब्दच माहीत नव्हता आम्हाला.
किती मनापासून कौतुक होतं या दिवसांचं त्यावेळी!!!
आताही माझी मुलगी आवर्जून झेंडावंदनाला जातेच.
पण तो माहौल काही नसतो………
झेंडावंदन तर होतं, पण स्फुरण काही चढलेलं नसतं…..
आणि सण म्हणून साजरा करण्याजोगं तितकं कौतुकही राहिलेलं नसतं !!!
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...