तशी ती आणि तिच्यामागे तिच्या सासूबाईही दरवाज्यात आल्या. मोठा गिफ्टचा बॉक्स हातात घेऊन तिच्याच कंपनीतला माणूस उभा होता.
त्या दोघीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघून तो म्हणाला, अहो आपल्या कंपनीच्या मालक साहेबांना ऐन दिवाळीत नात झाली. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ आहे हे. सर्वांना म्हणजे अगदी सर्वांना दिलंय त्यांनी!!
मंजुने बॉक्स घेतला. सासूबाईंनी लगेच कात्री आणून दिली. एखाद्या लहान मुलासारखी त्यांची एक्साईटमेंट बघून मंजुला हसायलाच आलं.
मंजुने बॉक्स उघडला. तर त्यात एक मोठा ड्रायफ्रूटचा बॉक्स आणि छोटीशी चांदीची मूर्ती होती. चांदीची मूर्ती बघून सासूबाईं म्हणाल्या, चांगभलं!! पण तशी छोटीच आहे नाही.
मंजु म्हणाली, अहो हल्ली इतकं तरी कोण देतं? शंभर जणांचा स्टाफ नाहीये, हजारांच्या वरती आहे. एवढा मोठा माणूस पण स्वतःच्या आनंदात सर्वाना सामावून घ्यावं वाटलं त्याला! दिवाळीची दोन दिवस सुट्टी आहे तरी सर्वांचा आनंद वाढवा म्हणून घरी पाठवून दिलं प्रत्येकाच्या. हे नसतं दिलं असतं तरी आम्ही काय कुरकुरणार होतो का?
ते आहे ग. पैसा पण रग्गड आहे त्यांंच्याकडे.
द्यायची दानत पण लागते, सासूबाई. मंजुला मनातून खूप अभिमान वाटत होता आपण काम करतो त्या कंपनीचा.
ते आहे खरं. बघू तो सुका मेवा आण इकडं. मंजुने बॉक्स हातात दिला, तसं सासूबाईंनी लगेच दोन बदाम, चार काजू, चार बेदाणे आणि अंजीर एकेक करून तोंडात टाकून क्वालिटी चेकिंग केलं, आणि म्हणाल्या, वा!! अगदी एक्सपोर्ट क्वालिटी आहे. भुकेला बरं आपलं. घे तू पण खाऊन बघ. त्या पोराला पण घाल जरा खायला. वाळकं झालय अगदी.
आम्ही खाऊच हो. पण तुम्हीही जरा बेतानं घ्या. झेपेल असं बघा. आता छान छान म्हणत खाताय, नंतर प्रत्येक फेरीला शिव्या नकोत हा माझ्या साहेबाला.
तू माझ्या खाण्यावरच का ग टपलेली असतेस जेव्हा तेव्हा?, सासूबाईंनी तिच्याकडे बघून तोंड वाकडं केलं. ते बघून मंजु म्हणाली, सासूबाई, तुम्ही काय पाहिजे ते खावा. मीच आणून देते ना तुमच्या आवडत्या गोष्टी. फक्त जरा दमानं एवढंच सांगणं असत माझं. तुमच्या काळजीनेच बोलते मी. मंजुने रुसलेल्या सासूबाईना आणखी दोन काजू दिले आणि त्यांची कळी खुलवली.
तशा त्या म्हणाल्या, किती आशीर्वाद मिळाले असतील नाही नातीला त्यांच्या? आपण तरी पाहिजे तेव्हा घेऊ शकतो, ज्यांना जमत नसेल त्यांना किती भारी वाटलं असेल बघून.
हो ना. अगदी सगळ्या म्हणजे सगळ्या स्टाफला दिलंय. ते म्हणतात ना, तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला भरभरून मिळेल. म्हणून तर लक्ष्मीचा वरदहस्त आहे त्यांच्यावर.
अगं यावरून आठवलं. तुझं इन्क्रीमेंट झालं ना या महिन्यात. मग आपण काय केलं? सासूबाईंचा प्रश्न ऐकून मंजु पेचात पडली आणि म्हणाली, आपण काय केलं म्हणजे? त्या दिवशी पार्टी नव्हती का दिली मी तुम्हा सर्वांना!!
हो पण ते आपण घरच्यांनीच एन्जॉय केलं.
मग आता बाहेरच कोण आणायचं? सासूबाईंच्या डोक्यात काय चाललंय ते मंजुला कळेचना.
त्यांनी लगेचच मनातलं बोलायला सुरुवात केली. अगं आणायला कशाला पाहिजे? तू लक्ष्मीचं नाव घेतलस ना तर मला आपली लक्ष्मी आठवली बघ.
तुझा पगार वाढला. तुझ्या नवऱ्याचा पण वाढून दोन महिने झाले आता. तितकी पैशाची गरज नव्हती तरी तुम्ही पण आस लावून बसलाच होता की!!
वर्ष झालं पण आपल्या घरी स्वैपाक करणाऱ्या लक्ष्मीचा पगार वाढवलाच नाही आपण. ती बिचारी स्वभावाने गरीब, काम आहे तेच नशीब, म्हणून तोंड दाबून बसलीये. तसं माझ्या आधीही लक्षात आलेलं. पण म्हटलं, बघू पुढे. पण आता तुझ्या साहेबांचं बघून मलाही वाटलं, न मागता आनंद द्यावा आपणही कुणाला!!
ती बोलायची कशाला वाट बघत बसायची आपण?
बघा काय ते मग आता. सांगा तिला काय सांगायचा तो वाढवून. मी नंतर बाजारात जाऊन तिच्यासाठी पण थोडा सुका मेवा घेऊन येईन. तिच्याही पोरांना होईल थोडं पौष्टीक!! काय म्हणता?
नाव काढताच पाणी सुटलं बघ तोंडाला!! पाणीपुरीसाठी पंचपक्वानाचं ताट पण बाजूला सारीन मी, ये सुकामेवा क्या चीज है? झोकात डायलॉग झाडून सासूबाईं तोंडावर हात ठेवून गप्प बसल्या.
मंजुला त्यांचं ते रुपडं बघून हसू आवरेना झालं.
भारी टाईमपास होतो यांच्याबरोबर!!
जन्मोजन्मी हिच सासू मिळु दे देवा, तिच्या तोंडातुन सहज बाहेर पडलं. बायका नवरा मागतात, मी सासू मागतेय. चांगभलं म्हणत
तिने डोक्याला हात लावला, आणि स्वतःच्या वेडेपणावर तिचं तिलाच खळकन् हसू आलं………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.