डोक्यात काही राहतं की नाही? काम कसं करते ग ऑफिसात? साध्या साध्या गोष्टी विसरतेयस तू!! भाजीत मीठ राहूच कसं शकत कोणाचं? परवा तर आमटीतही राहीलं होतं!! काही कुठाय म्हणून विचारलं की दोन मिनिटं आठवल्याशिवाय सांगता येतच नाही तुला. कधी कधी अर्धातासांतरही आठवत नाही. दुधाची गंगा तर दार दिवसाआड किती वाहत असते ते हिशोबात धरतच नाहीये मी!!, कपिल रंगात येऊन बायकोच्या विसराळूपणावर एकावर एक ताशेरे ओढत होता.
काय त्याच त्याच विषयावर सारखा वाद घालायचा म्हणून मनस्वी संयम बाळगून होती.
त्यांचं छोटं चिरकूट तिथेच टिव्ही बघत बसलं होतं. आई बोलत नाही म्हणून बाबा आपले तिला नावं ठेवतच सुटलेत, हे बघून त्याचं डोकं फिरलं.
तो बाबांसमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा मला सांगा, मी कितवीत आहे?
कपिल म्हणाला, चौथीत. काहीही विचारतो तू.
चिरकूट म्हणालं, ती मी मागच्या वर्षीच पार केली.
बरं आता सांगा, माझ्या वर्गशिक्षिकेचं नाव काय?
कपिल अतिदीर्घ पॉझ घेऊन म्हणाला, आठवत नाही. सांगितलेलं का तू मला?
चिरकूट म्हणालं, हो. अगदी कालच. माझ्या नेहमी बोलण्यात असतं ते.
आता माझ्या किमान चार मित्रांची नावं तरी सांगा बघू.
मयंक, ओम……आणि तो कोण रे कुरळ्या केसांचा? कपिलला नाव आठवता आठवत नव्हतं.
जाऊदे, मला पेस्ट्री आवडते की फ्रॅंकी? हे ही मी सांगितलेलं तुम्हाला!! बोला बोला?
काकाचा वाढदिवस सांगा कधी असतो? नाहीतर माझ्या आजीचा म्हणजे तुमच्या आईचा तरी सांगा?
……????
आपल्या बबलीची किती इंजेक्शन बाकी आहेत ते सांगा? आपली बबली पहिल्यांदा कोणत्या दिवशी उभी राहिली तो दिवस सांगा?
……………………???
तिला उलटी झाली किंवा आम्हाला ताप आला की आई कुठलं औषध देते सांगा?
आई तर डॉक्टरांकडे नेते तुम्हाला. कपिल फटाकदिशी बोलला.
हो पण कधी रात्रीत हे सगळं घडलं, तर दम काढायला औषध देते आई. सांगा नाव त्याचं?
कित्येकदा तुमच्यासमोरच बाटल्या काढते ती. नसलं तरी आणायलाही सांगते तुम्हाला. आहे लक्षात? चिरकूटच्या चेहऱ्यावर बाबांना कात्रीत पकडल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
त्याच्या बाबांचं तोंड मात्र पडलं होतं. त्याच तोंडाने तो म्हणाला, नाही मला नाही आठवत असलं काही!!
त्यावर चिरकूट आईकडे पाहून अभिमानाने म्हणाला, हे सगळं माझ्या आईला झोपेतून जरी कुणी उठवून विचारलं तरी खडाखडा सांगेल ती.
बाबा मी रोज बघतो, आई आणि तुम्ही रोज साधारण एकाच वेळी घरी येता. पण तुम्ही आलात की पेपर वाचत बसता, नाहीतर मोबाईलमध्ये घुसता. आईच्या मागे चिक्कार काम असतात. आई लागते कामाला. कित्ती गोष्टी करायच्या असतात तिला. काय काय डोक्यात ठेवेल ती?
त्यातून तिला विश्रांती मिळते ते डायरेक्ट बेडवर पडल्यावर. त्यातसुद्धा आपली बबली वळवळून सारखी झोपमोड करते तिची. बाईंनी सांगितलंय आमच्या, शांत झोप मिळाली की मेंदूला आराम मिळतो, चांगला तरतरीत होतो तो.
तिला कधीच शांतता मिळत नाही. तुम्ही तर एकदा झोपला की डायरेक्ट सकाळीच उठता. आई अर्धवट झोपेत आमच्यावर लक्ष ठेवून असते. मला रात्री शू लागली की तुम्हाला उठवलं तरी तुम्ही जराही हालत नाही, आई मात्र एका झटक्यात उठते.
आम्ही तर तिला बरेचदा ऑफिसमध्येही फोन करतो. काही अडलं की विचारायला. काही सापडत नसेल की शोधून द्यायला. तिला आमच्या सगळ्या गोष्टी कुठे असतात ते बरोब्बर माहीत असतं. बरेचदा ती ऑफिसमधून घर आणि घरून ऑफिस पण सांभाळते. तुमच्या सारखं नाही काही एक ते एकच !!
आपलं चिरकूट एवढं मोठ्या माणसासारखं बोलतय हे बघून मनस्वीला पण हुरूप चढला. आणि ती म्हणाली, स्वैपाकघरात शिरते, पण तिथेही स्वैपाक म्हणजे स्वैपाक एवढंच नसतं काही. मधेच चिरकूट त्याचं अडलेलं गणित घेऊन येतो, तर कधी बबली इथे येऊन ड्रॉव्हर ओढत बसते. कधी भाजीत मीठ घालायच्या वेळीच ती ‘शू’ आली सांगते.. तर कधी दूध गॅसवर ठेवलं की तिला ‘शी’ आलेली असते. कधी दरवाज्यावर बेल वाजते, तर कधी फोनची रिंग वाजते. सतत डिस्टर्बन्स मध्ये मी काम करते. किती गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुला साधा एखादा व्हिडीओ बघताना पण कुणी मध्ये डिस्टर्ब केलेलं चालत नाही. खेकसतोस तू लगेच.
मात्र मला डिस्टर्ब केलं नाही तर कुणाचं पानच हलत नाही. मी सगळं त्यातच मॅनेज करते. शंभर गोष्टी असतात डोक्यात, त्यातल्या पाच दहा उडाल्या तर उहापोह कशाला एवढा?
एक ऑफिस सोडून आणखी किती गोष्टी तू डोक्यात ठेवतोस सांग बघू?
बाकीचं सगळं सगळं माझ्या आईच्या डोक्यात असतं कळलं!! चिरकूट आईचा विजय असो, अशा अविर्भावात ओरडलं.
आई आणि पोरगं त्वेषात आलेलं पाहून कपिलच्या तोंडचं पाणी पळालं. आता बायकोवर ओरडताना, तिला काहीही बोलताना दहावेळा विचार करावा लागेल, नाहीतर सगळ्यावर बारीक नजर ठेवून असणारं आपलं चिरकूट फणा काढून फुत्कारेल, हे त्याला चांगलंच कळून चुकलं………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.