अर्धा तास व्हायला आला तरी मुलगा आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय, हे बघून वैभवी वैतागून त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, मी ओरडून बोलत नाही म्हणजे माझ्या शब्दाला व्हॅल्यू नाही का?
आतापर्यंत चार वेळा म्हटलं, मोबाईल सोड. पण तुझी पाच मिनिटं संपतच नाहीयेत.
मी खेचू शकते हातातून मोबाईल, मी जोरात ओरडू शकते तुझ्या अंगावर, मी सणकन् ठेऊनही देऊ शकते तुला, माझं न ऐकल्याबद्दल. But I choose patience.
आई थांब ग जरा पाच मिनिटं, सपंतच आलाय गेम, अजूनही तिचा मुलगा ध्रुव तिचं बोलणं मनावर घ्यायला तयारच नव्हता.
ते पाहून वैभवी त्याच्यासमोरून तणतणत निघून गेली, बेडरूममध्ये जाऊन दिर्घ श्वसन करत बसली. खूप त्रास होत होता तिला या सगळ्याचा. असं वाटत होतं, दण् दण् करत सगळ्या वस्तू फेकून द्याव्यात, मोठमोठ्यांनी ओरडावं, त्याहून मोठ्यांनी रडावं, सगळ्या सगळ्यांशी भांडावं, अन् आपल्या मनासारखं प्रत्येकाकडून वागवून घ्यावं.
मात्र मनाला तसं करणं पटतच नव्हतं.
तिचं हे सगळं चाललं असताना बेल वाजली. ती उठलीच नाही, ध्रुवने दार उघडलं. तिची मुलगी दिव्या ‘दुपारी जा’ म्हटलं तरी न ऐकताच मनाला आलं तसं मैत्रिणीच्या घरी जाऊन बसली होती.
ती आल्यावर घरातलं शांत वातावरण पाहून आईचं चांगलंच बिनसलय हे तिच्या लक्षात आलं. हातपाय धुऊन ती पटकन तिच्याजवळ गेली, आणि तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, आई सॉरी. तिकडून ध्रुवही आला, त्यानेही तिच्या मांडीवर डोकं ठेवलं, आणि सॉरी म्हणून मोकळा झाला.
मग वैभवीनेही जवळ आलेल्या दोघांनाही जोर लावून बाजूला ढकलून दिलं. ध्रुव तर जमिनीवर तर गळ्यात हात टाकलेली दिव्या मागच्या मागे बेडवर कलंडली.
दोघही आपल्या आईच्या आवेशाने गडबडून गेले. मात्र वैभवीने दोघांना हात दिला, आणि हसून म्हणाली, सॉरी.
दिव्या म्हणाली, हे काय आई. केवढया जोरात ढकललंस. आता काय सॉरी म्हणतेस?
तुम्ही कसं मनमर्जीने पाहिजे तसं वागता, आणि मग काय नावाला सॉरी म्हणता? वैभवीनेही लगेच प्रतिउत्तर दिलं.
दोन्ही पोरांच्या माना क्षणभर खाली गेल्या. दिव्या पुन्हा लाडाने तिच्या जवळ जात म्हणाली, आई तू तरी अशी वागू नकोस ना ग…….
मग तुम्ही असे का वागता ग? मला किती त्रास होतो. माझं मुळीच काही ऐकत नाही. पण बाबांचं मात्र एका झटक्यात सगळं ऐकता.
त्यांच्याएवढया मोठ्या आवाजात मी देखील दटावू शकते तुम्हाला. ठरवलं तर जरब मीही दाखवू शकते. मलाही धाकात ठेवता येईल तुम्हाला. ऐकलं नाही की बाबा जसे मागचा पुढचा विचार न करता दोन लगावून देतात, ते केलं तर माझ्यासाठी सोप्पंच आहे सारं!!
पण मी तुमच्या कलाने घेऊ पाहते. तुमचं मन जपायला जाते, आणि त्यात माझं मन मात्र अनेकदा त्रासून जातं फक्त. बाबा मोठ्याने ओरडतात, मारतात म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट झेलता तुम्ही. सगळं सगळं गपगुमान ऐकता. आणि आर्जवाचे माझे शब्द तुमच्या कानावरुन उडून जातात. नाहीतर मग वाद घालत बसता तुम्ही माझ्याशी.
ठिक आहे तुम्हाला तेच आवडतं, तेच योग्य आहे तर मीही तशीच वागणार आजपासून. वैभवी ठामपणे म्हणाली.
आई नकोss. तू आम्हाला आमच्या मैत्रिणीसारखी वाटतेस. म्हणून आम्ही अगदी मोकळं राहतो तुझ्याबरोबर. तू बोलायला चान्स देतेस, आमचं मत मांडायला देतेस, म्हणून वाद घालतो तुझ्याशी. आम्ही जेवढे तुझ्या जवळ आहोत, तेवढे बाबांच्या नाही.
दोन्ही पोरं बोलत बोलतच वैभवीच्या कुशीत शिरली.
आणि तरी तुम्ही मला त्रास होईल असं वागता…….
माझ्या मनाचा जराही विचार करत नाही. प्रत्येक गोष्टीत मागे लागावं लागतं मला तुमच्या. एका हाकेत साधं ‘ओ’ सुद्धा म्हणत नाही तुम्ही. तुमचे बाबा तू लाडावून ठेवलयस दोघांना म्हणून मला सतत नाव ठेवत असतात. तुम्ही पण ऐकता ना?
मला खरंच त्रास होतोय सगळ्याचा. अगदी माझ्या शांत राहण्याचा सुद्धा!!
बदलावं वाटतय आता मला……..
आई तू नको बदलू ग. आमचं चुकलं. तू काय आमचीच म्हणून आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तुला काय सर्व चालतं, असं आमचं आम्हीच ठरवलं. आपलं मन आईने जपावं ही अपेक्षा कायम ठेवली, पण तिलाही मन आहे हे विसरूनच गेलो. दिव्याने रडतच तिला घट्ट मिठी मारली.
ध्रुवही तिचा हात घट्ट पकडून म्हणाला, आई खरंच सॉरी. मनापासून सॉरी. तू खरंच बदलू नको. तू आईच रहा, बाबा नको बनू…….
वैभवीने आवंढा गिळतच तिच्या दोन्ही मोठ्या बाळांना मायेने जवळ ओढलं, तसं एकमेकांना सांभाळून घ्यायचं मूक आश्वासन त्यांची मिठी आणखी उबदार करून गेलं……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा