सारिका आमच्या दूरच्या नात्यातली. अगदी काही घनिष्ठ संबंध नाहीत, पण राहायला एकाच शहरात असल्याने एकमेकांकडे बऱ्यापैकी येणं जाणं असतं आमचं.
ही सारिका, अगदी बोलघेवडी. त्यातून स्वतःबद्दल बोलायला तर खूपच आवडतं तिला. प्रत्येकवेळा आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा तिच्याकडे नवीन लिस्ट असते, तिने कोणासाठी काय काय केलं याची. आणि त्याबरोबर जुने विषयही असतातच सारखे तोंडी लावायला. जे माझे ऐकून अगदी तोंडपाठ झालेत.
जसं की हिने वडिलानंतर घर स्वतःच्या बळावर चालवलं. मागच्या भावंडांची शिक्षणं पूर्ण केली, म्हणून त्यांना आता चांगल्या नोकऱ्या लागल्या. आईची सगळी आजारपणं काढली. नवऱ्याला धंद्यासाठी कर्ज काढून दिलं.
नंणंदेचं चांगल्या घरात लग्न लावून दिलं. दिराच्या घरासाठी अनेक खटपटी करून पैशाची सोय केली.
पण कोणाला काही नाही. साधं कोणी बोलून पण दाखवत नाही.
हे सगळं मला ती प्रत्येकवेळेला ऐकवते, मलाच काय भेटणाऱ्या प्रत्येकालाच.
शेवटी एकदा यावेळी मी धीर करून तिला म्हटलंच, बाई तू कोणासाठी केलं ग हे सारं? बाहेरचे होते का ते कोणी? तुझे घरचे, तुझे आपलेच होते ना सारे? आपल्या माणसांसाठीच केलंस ना?
मग कशाला अपेक्षा करतेस? खरं सांग, कर्तव्य म्हणून केलंस की उपकार म्हणून?
कर्तव्य म्हणून केलं असशील तर विसरून जा सगळं, असं सारखं सारखं बोलून त्याच्यावर पाणी फिरवू नकोस.
काय अपेक्षा आहे तुझी, त्यांनी सारखं तुझं मिंधं असावं का? खूप केलंस बाई आमच्यासाठी अशी सारखी उठता बसता टेप वाजवावी का त्यांनी, म्हणजे तुला भरून पावेल??
बोलत नसले तरी कृतीतून दाखवतात की ग सारे!!
पाहिलंय मी, तुझी बहिणी भावंडं अजूनही तुझा मान राखून आहेत, त्यांच्या नजरेत ते दिसतं. तुला काही झालं की लगेच धावत येतात तुला बघायला.
नवऱ्याचा धंदा जोमाने वाढल्यावर तुझ्या अंगावरचे नवनवीन डिझाइन्सचे दागिनेच काय ते सांगतात बरोबर!! तुला बोलत नसला तरी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना सांगतो, घरच्या लक्ष्मीची कृपा आहे माझ्यावर, आणखीन काय पाहिजे??
नणंद, दिर कुठलीही महत्वाची गोष्ट करताना तुझा सल्ला घेतात, हे तूच सांगितलंस ना मागच्या वेळी मला? मग का या साऱ्यांच्या नावाने सदानकदा बोटं मोडत असतेस? तू त्यांचं किती केलंस याची सारखी आरती ओवाळत नाहीत म्हणून?
मागे कुठल्या फंक्शनला भेटलो होतो आपण सर्व, तेव्हा छोट्याश्या कारणावरून काय रागवलीस आणि सगळ्यांसमोर तू कोणासाठी काय काय केलं याचे पाढे वाचत बसलीस. कसं वाटलं असेल सांग त्यांना?
तू केलेलं त्यांच्या लक्षात होतं म्हणूनच कोणी काही बोललं नाही तुला.
अगं मी लहानपणीच कुठेतरी वाचलेलं, करावं आणि विसरून जावं. लक्षात ठेवलं, बोललं की ते सारं धुळीस मिळतं.
बघ विचार करून, खूप छान सवय आहे तुला सगळ्यांचं करण्याची, ती बोलण्याची घाण सवय मात्र सोडून टाक हो, प्रेमाच्या नात्यांना दुरावतेय ती तुझ्यापासून!!
मी आपलं डोस दयायचं काम केलं, पण सारिकाने मात्र ते अगदी मनावर घेऊन स्वतःत सुधारणा केली. पुढच्या दरवेळी येणाऱ्या सारिकात मला कमालीचा बदल दिसून आला. तिने स्वतःविषयी बोलणं जवळ जवळ सोडल्यातच जमा होतं, खुजी दृष्टी निघून गेल्यामुळे, आता तिला आपल्याच माणसांचे बरेच चांगले गुण दिसत होते, आणि ती त्या साऱ्यांविषयी अगदी भरभरून बोलत होती. तिचे सगळे आपले आता तिला खरंच आपलेच वाटू लागले होते!!
तुम्ही नाही ना असे, सगळ्यांचं सगळं करून बोलून घालवणारे, स्वतःच्या सत्कर्मांची तोंड दुःखेपर्यंत ऍड करणारे??
कुणासाठी काही केलं तर या कानाचं त्या कानाला काहीsएक कळता कामा नये, हे देखील मी लहानपणीच वाचलं होतं बरं का, बघा तुम्हाला पटलं तर!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक,कमेंट आणि फॉलो नक्की करा आणि शेअर करताना नावसाकटच करा😊