देवकीताई पासष्टीच्या, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या. वयाप्रमाणे किंबहुना वयापेक्षा जरा जास्तच थकलेल्या दिसायच्या.
नवऱ्याच्या नोकरीचा धड ठिकाणा नसल्यामुळे स्वतःची नोकरी अगदी तारेवरची कसरत करून सांभाळली त्यांनी आणि मुलांची शिक्षणं अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केली.
एक मुलगा आणि मुलगी, दोघांची लग्न झालेली. मुलगा, सून दोघे उत्तम नोकरीला.
सकाळी थोडीफार वरची मदत करून सून कामाला निघायची. स्वैंपाकाचं मुख्य काम देवकीताईंचंच. नातवंड झाली, तसं त्यांचंही करणं अंगावर आलं. मुलगीही जवळच रहायला होती, आणि तिचे सासू सासरे गावाला, त्यामुळे तिचीही मुलगी अगदी लहानपणापासून देवकीताईंकडेच सांभाळायला असायची.
आणि हे सर्व कमी होतं, म्हणून अगोदर दिराकडे राहणारी हिची सासू जास्त वय झालं, आमच्याकडून हेळसांड नको, म्हणून हिच्याकडेच आणून ठेवली गेली.
म्हणजे मुलाचा दोन वर्षांचा मुलगा, मुलीची चार वर्षांची मुलगी, आणि जख्ख म्हातारी सासू, या सर्वांचं देवकीताईंच करत होत्या.
नवरा होता मदतीला, पण त्याची काय वरवरची मदत. सासुचं देखील सर्व लहान मुलाप्रमाणे करावं लागायचं, अंघोळ घालण्यापासून ते खायला घालेपर्यंत. दोन मुलांचही तसंच, त्यांच्या मागे मागे करा, त्यांच्याशी खेळा, प्ले स्कुलच्या वेळा सांभाळा. अगदी थकून जायला व्हायचं त्यांना!
वयोमानानुसार नोकरीच्या कामापासून निवृत्ती तर मिळाली, पण घरची चार जास्तीची कामं अंगावर पडली.
रिटायर झाल्यावर सुद्धा स्वतःसाठी असा वेळच नाही. उलट अगोदरपेक्षाही जास्त थकवणारं जगणं सुरू झालं.
मुलगा, सून आणि मुलगी देखील खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. तरीही त्यांनी आईवर सारं लादलं होतं. करतेय तर करु द्या.
तिचं थकणं कोणाला दिसत नव्हतं की दिसूनही डोळे फिरवत होते त्यांचं त्यांनाच माहीत!!
पण हे सारं त्यांच्याच बाजूला राहणाऱ्या मयुरीला मात्र खूप टोचत होतं.
मयुरीच्या मुलांशी खेळायला देवकी ताईंची नातवंड येत असत. तेव्हा बरेचदा बोलणं होई त्यांच्यात.
मयुरीला त्यांचं थकणं दिसत होतं. पण यांच्या घरगुती मामल्यात पडावं की नाही हे कळत नव्हतं!
तिला वाटायचं ह्या सर्व एकट्या करतात, पण मुलांना ह्यांच्या मदतीला कोणी ठेवावं का वाटत नाही?
पैशाला तर काही कमी दिसत नाही, आईने या वयात आराम करावा, किंवा स्वतःला आवडेल ते करावं हा विचार का नाही येत यांना?
किती गुंतवून ठेवलंय या सगळ्यात देवकीताईंना? सासू आणि नातवंडांमुळे कुठे जाताही येत नाही त्यांना!!
परवा अगदी मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नालाही दोन दिवस बाहेरगवी जाता नाही आलं, माझ्याकडे बोलताना किती भरून आलेलं त्यांना.
तू गेलीस तर यांची सोय काय म्हणून मन मारलं गेलं त्यांचं. त्यातुन पोरांचं कोणी केलही असतं, रजा काढून, पण तिच्या म्हाताऱ्या सासुकडे बघायला कोणी तयार नव्हतं.
पोरांना बोलवायच्या निमित्ताने रोज मयुरीकडे जायच्या त्या, बरं वाटायचं त्यांनाही जरा.
एक दिवस न राहवून मयुरीने विषय काढलाच. काकू, तुम्ही किती करता हो? वय आहे का तुमचं एवढं सगळं करायचं? कामाला जाणारी तुमची मुलं संध्याकाळी विसावतात तरी, तुम्ही आपल्या सारख्या चालूच. तुम्ही मदतनीस का नाही ठेवत एखादी? तुम्ही सुध्दा थोड्या मोकळ्या राहाल.
हो ग, मलाही वाटू लागलंय असं, पण कोणी काही बोलत नाही म्हणून मी सोडून देते.
अहो काकू, नका देऊ हो असं सोडून. इतके वर्ष नोकरी केलीत,आता निवृत्तीनंतर पुन्हा इतकं अडकणं कशाला? बरं सगळे उत्तम कमावतात, तुमचीही पेन्शन आहे. मग कसला विचार करता?
त्यांच्या नसेल लक्षात येत, किंवा त्यांना वाटत असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणून, मग त्यांना सांगा स्वतःहून. काही हरकत नाही बोलायला…….
माझ्या घरी तुमच्या एवढी चांगली परिस्थिती नसूनही आईने मदतनीस ठेवली आहे. थोडी मोकळीक मिळावी, छंद जपावेत, हिंडता फिरता यावं म्हणून.
त्यामुळे माझ्या आईचं शारिरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही चांगलं आहे. जे तुमचं मला ढासळताना दिसतंय. तुम्ही खंगताय, म्हणूनच वेळीच स्वतःला सावरा. किमान सासूबाईंचं करण्यासाठी तरी कोणी असुदेत. किती अवघड पडतं तुम्हाला ते.
वयाच्या या वळणावर तुम्हीही जरा विसावणं गरजेचं आहे!!
देवकीताईंना खूप बरं वाटलं, कुणीतरी त्यांचाही विचार केला.
घरी येऊन त्या लगेच नवऱ्याशी बोलल्या. मुलांना आपला विचार नाही, आपणच करावा आता. मला एकटीला झेपनासं झालंय हे सगळं, कोणी मदतीला ठेवेन म्हणतेय.
नवरा म्हणाला, माझी काही हरकत नाही. मुलांना बघ विचारून.
अहो, त्यांना काही वाटत असतं तर केव्हाच कोणी मदतीला ठेवलं असतं माझ्या. मीही चांगली पेन्शनर आहे, त्यांच्या होकाराची कशाला वाट बघत बसू?
उशिरा का होईना पण आता मला माझी निवृत्ती उपभोगायची आहे, इतकी वर्ष अडकले या संसारात, आता मोकळं होऊ दे जरा मला.
मयुरीलाच सांगते, तिच कोणीतरी चांगली मदतनीस शोधून देईल मला, असं म्हणत देवकीताई मयुरीकडे पटकन गेल्या सुद्धा.
मन फुललं होतं आज त्यांचं, उसंतीच्या क्षणांच्या विचारानेच फक्त!!
आजही मी आजूबाजूला बऱ्याचजणी देवकी ताईंसारख्या बघते, ज्या होत नसतानाही करत राहतात. अगदी घरची चांगली परिस्थिती असूनही कधी हट्टाने किंवा कधी संकोच्यामुळे घरचं सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेतात. कधी दिसतात, तेव्हा धापा टाकतच असतात, मग मनात विचार येतो कोण सांगत याना एवढं करायला? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त नाती जपायला??
बरं ज्या नात्यांसाठी एवढं करतात, त्यांनाही हे तितकेच प्रिय आहे मानलं तर, यांची एवढी दमछाक ते कशी सहन करू शकतात??
तुम्हीच बोला आता.…….
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा. शेअर करायचा झाल्यास मात्र नावसकटच करा😊