आज मुलीने खूप दिवसांनी बिझनेस खेळ काढला. आणि माझ्या डोळ्यासमोर ती आली. जिने मला हा असाच खेळ माझ्या वाढदिवसाला दिला होता. आमच्या वेळचा ”नवा व्यापार”.
आमच्याकडे पोळ्या करायला येणारी साळूबाई. मला तिचं साळू हे नाव फार आवडायचं. लहानपणी मी तिला साळू साळू करून चिडवायचेही. त्याचा उच्चारच मला खूप आवडायचा ‘साळू’. ती आली की मी तिच्या फार मागे मागे असायचे, तिला त्रासही द्यायचे. मला पोळ्या शिकव म्हणून सारखी पाठी लागायचे, मधे मधे करायचे. मग ती शेवटची पोळी माझ्यासाठी ठेऊन मला शिकवायची. पण मला शेवटची नको असायची सगळ्या पोळ्या तिने फक्त सांगाव्यात आणि मी कराव्यात असं मला वाटायचं.
आता वाटतं किती छळायचे मी तिला!!
पण कसं काय माहीत नाही, तिच्याबरोबर लागलेल्या पोळी करायच्या वेडाने मला पूर्ण स्वैपाकात अजूनही पोळया करायलाच जास्त आवडतं. आणि मला वाटतं मी फक्त त्यातच चांगली आहे. तिचीच कृपा!!
या साळूबाईचा मला, तिला सारखं छळून छळून लळा लागला होता. तिचं काम करून झालं तरी मी तिला जाऊच द्यायचे नाही. मी एकटीच होते, त्यामुळे मला सारखं आपल्या सोबत कोणी असावं असं वाटायचं. तिने बांधलेल्या वेण्या मला खूप आवडायच्या. रिबिनीचं फूल तर खूपच सुंदर यायचं तिचं, म्हणून मग तिच हवी असायची मला वेण्या बांधायला.
ह्याच साळूबाईने एकदा माझ्या वाढदिवसाला अगदी आठवणीने ‘नवा व्यापार’ आणून दिला होता मला. खरंतर तिच्याकडून काहीही अपेक्षा नसताना. कित्येक दिवस मी तो सांभाळून ठेवलेला. आणि खेळलेही खूप.
पण या माझ्या आवडत्या साळूबाईचं लाईफ म्हणजे एक ट्रॅजेडी होती. जवळपास घरकाम करणाऱ्या सगळ्या बायकांची असते तशीच.
आमच्याकडे काम करताना उशीर झाला तर बरेचदा तिचा नवरा तिला बोलवायला यायचा. कधी पैसे मागायला यायचा. तोही कसा तर तिचा बाप शोभेल असा! वयात खूपच जास्त अंतर होतं त्यांच्या. जे अगदी लगेच दिसून यायचं.
तो स्वतः काही काम करायचा नाही. ही कमवायची तेही दारूत उडवायचा. तिला यथेच्छ मारहाण करायचा. त्याच्यापायी हिच्या सुट्ट्या व्ह्यायच्या. ती आली नाही की तिला घरी जाऊन बोलवून आणायचं काम माझं असायचं. फारशी काही लांब राहायची नाही ती. आमच्याच बिल्डिंगच्या मागे थोड्या अंतरावर त्यांची घरं होती. त्यातलं तिचं ते मोडक्या पत्र्याचं घर अजूनही आठवतंय. पत्रे सगळीकडून भोकं पडलेले. तिच्याच नशीबासारखे. तिला मुलबाळही नव्हतं.
त्यामुळे बघावं तेव्हा तिला सगळे सल्लेच देत असायचे.
ती हसून सोडून द्यायची. तसंही तिला काय करायला जमणार होतं पैशाअभावी……….
पण ही साळूबाई मला मात्र फार आवडायची. आई आणि मी कुठे बाहेर जायचं ठरलं तर मला वाटायचं तिने यावं. मी तिला विचारायला तिच्या घरी जायचे. एकदा तर मी तिला हट्टाने आमच्या एका ओळखीच्या लग्नालाही नेलं होतं. मी रडतच बसलेले तिच्यासाठी, मग काय गेलो आम्ही तिघीही. पण तिथे मात्र लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या, ते अजूनही आठवतंय मला. कामवालीला कसे घेऊन आले हे? साळूबाई तशी व्यवस्थीत राहायची. गचाळ नव्हती, तरीही.
इतरांच्या दृष्टीने ती कामवाली होती, आणि माझ्यासाठी माझ्या घरातलीच.
त्यावेळी साक्षरता अभियानाचा प्रसार जोरात सुरू होता. शाळेतही सारखे त्याबद्दल सांगत बसायचे, तुम्हीही कोणाला लिहा वाचायला शिकवा, साक्षर करा.
आमची साळूबाई अगदी निरक्षर होती, माझ्या मनाने धरलं, आता हिला शिकवूनच सोडायचं. मी स्वतः सातवीत होते, पण तिला दहावी पास करायचं म्हणून मी तिच्या मागे हात धुवून लागले होते. मला लाख शिकवायचं होतं, मात्र तिला अजिबात शिकायचं नव्हतं. पण मीही तिच्या नकाराला न जुमानता, तिच्यासाठी पाटी पेन्सिल आणली आणि काम झाल्यावर तिला पकडून तिला अ, आ गिरवायला भाग पाडलंच. पहिल्यांदा खूप कंटाळायची ती, पण नंतर मी ऐकत नाही बघून गपपणे करायला लागली.
आता वाटतं, कसा काय मी तिच्यावर एवढा अधिकार गाजवायचे? आणि तीही बिचारी ऐकून घ्यायची?
मग हळहळू ती वेळ मिळेल तसं बसू लागली. थोडंफार येऊही लागलं तिला. तसं रडत खडतच चाललेलं सगळं, पण चाललेलं.
इकडे मी भेटेल त्या सगळ्यांना सांगत सुटायचे, मी घरात साक्षरता अभियान राबवतेय म्हणून!! मला खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून……
पण नंतर मात्र काय झालं कुणास ठाऊक, तिचं कामाला येणं बंद झालं, तशीही ती नंतर नंतर जास्तच दांड्या मांडायला लागली होती. आम्ही कितीदा तिला बोलवायचा प्रयत्न केला, मला तर तिच हवी होती, पण तिचं पुन्हा येणं झालंच नाही.
कधी बाजारात भेटायची, प्रेमाने बोलायची, नवरा नाही पाठवत सांगायची. मी मात्र भेटली रे भेटली की साळूबाई कामाला ये ना, ये ना करत तिच्या पाठी लागायचे. आपला अभ्यास पण राहतोय ना, शिकणं गरजेचं आहे तेही सांगायचे. पण नाहीच झालं ते.
काय होतं नक्की तिचं तिलाच माहीत…….
त्यानंतर आम्हीही तो एरिया सोडला, पण साळूबाई माझ्या आठवणीतून माझ्याबरोबर सगळीकडे आली.
मध्ये भरपूर वर्ष गेली. मी लग्न होऊन पुन्हा त्याच एरियात आले. आणि एक दिवस माझ्या मुलीबरोबर बाजारात फिरताना मला हाक आली, अगदी माझ्या लहानपणीच्या त्याच नावाने. मी तर विसरले नव्हतेच क्षणात ओळख पटली. तोच चेहरा तिचा, फक्त वय वाढल्याच्या खुणा.
खूप आनंद झाला दोघींनाही. सगळं विचारून झाल्यावर म्हणाली, माझा मुलगा बारावीत आहे आता. खूप हुशार आहे. दहावीत चांगले पंच्याऐंशी टक्के मार्क होते. तो अभ्यास करायला बसला की सारखी तुझीच आठवण येते मला अजूनही, मला कशी शिकवायची ना ग तू?
मी तसंच याच्या पाठी लागून याला शिकवलं, डॉकटर व्हावं वाटतय त्याला, तिच साईड घेतलीये, बघू आता.
मी म्हटलं, आम्हाला तुला मुलगा आहे हेच माहीत नाही.
कित्ती वर्षांनी भेटलो आपण!!
पण मस्त वाटलं तुला भेटून साळूबाई.
ती म्हणाली, अगं मलाही केव्हाची तुलाच सांगायची आतुरता होती मुलाबद्दल. कुणाला सांगून चैन पडत नव्हती, वाटत होतं तूच भेटावी आणि तुला सांगावं.
कशी येड्यावानी मागे लागायचीस ना तू, मला शिकवण्यासाठी. मी नाही पण पोरगा शिकला माझा. तू ते शिकण्याचं भूत डोक्यात घुसवलस माझ्या म्हणून………
एवढं बोलून माझ्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवून मला घरी येण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण देऊन साळूबाई चालू पडली.
मधे क्वचित एकदोनदा भेटली असेल तेवढीच. पण आठवणीत मात्र कायमची राहिली ती राहिलीच.
रोज पोळ्या करताना आठवतेच. पण पोरांनी बिझनेसच्या खेळाचा पसारा मांडला की तिच्या सगळ्या आठवणी अशा त्या पसाऱ्याबरोबर डोळ्यासमोर मांडल्या जातात……….
हल्ली पुन्हा परत हरवलोय आम्ही एकमेकींंसाठी. पण मुलाने तरी तिचं नशीब बदलवलं असेल अशी आता खात्री वाटतेय मला……..
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझ्या हल्ला गुुुल्ल्ला् पेेजला नक्की लाईक करा.
©️ स्नेहल अखिला अन्वित