प्राची खूप दिवस झाले, माझ्या मनात एक गोष्ट सारखी येतीये, आज या गोष्टीवर बोलावंच म्हणूनच फोन केलाय तुला.
कल्पिता, खूप दिवस तुझ्या मनात गोष्ट आहे; आणि तू मला सांगितली नाहीस, हे कसं झालं पण?
दिवसातून कमीतकमी एकदा तर आपण बोलतोच, आणि तेही कित्ती वेळ, कारण तुलाही सगळं सांगून रिकामं व्हायचं असत, आणि मलाही!! मग खूप दिवस असं मनात एवढं काय गुपित दडवलस? आता मला तर रागच येतोय तुझा खूप………..
अगं नाही ग प्राची, गोष्टच तशी होती. काय करावं सुचत नव्हतं……
ऐक, बघ तूला कोणी हवं तसं भेटलं नाही, आणि कुणाबरोबरही स्वतःचं मन मारून जगायचं नाही, म्हणून तू लग्नच केलं नाहीस. इतके दिवस आई- वडिलांबरोबर भावाच्या संसाराला हातभार लावत राहत होतीस.
आई वडील गेले, आणि त्यांच्या संसारात तू अगदी एकटी पडलीस. स्वतःच्या पायावर चांगली उभी होतीस, म्हणून स्वकर्तृत्वावर वेगळी झालीस. स्वतःचा एकटीचा संसार उभा केलास. दिवस जातो सगळ्यात निघून, रात्र अंगावर येतेच ना? एकटं वाटतच ना सांग?
हो ना कल्पिता, तुला तर माहितीच आहे सगळं. नातेवाईक त्यांच्या गरजेला येतात, अधून मधून. भाऊ त्याच्या सोयीने विचारतो. माझी गरज काढायला तूच असतेस फक्त.
तेच तर प्राची. तुला मी आणि मला तू. जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून तसंच आहे अगदी. तीस वर्ष झाली आता. सगळे जाऊन येऊन गेले, आपण तशाच राहिलो. एकमेकींच्या!!
मला तर वेगळ्या वाटत नाहीच आपण एकच वाटतो. माझ्यात तू आणि तुझ्यात मी कायम आहोतच. सांग कुठला क्षण तुला आठवतो, ज्यात मी नसते.
मन आनंदाची पहिली बातमी तुला देतं, तू समोर नसली तरी मन तुझ्याशी बोलत असतं, दुःखाच्या वेळी तुलाच सर्व सांगत असतं. तुला फोन नंतर येतो माझा, पण पहिले तुझ्या मनाशी सगळं सगळं बोलून झालं असतं.
अगदी खरं कल्पिता!! मी ही कायम मनात तुझ्याशीच बडबडत असते.
प्राची, तू लग्न नाही केलंस म्हणून एकटी आणि मी लग्न करूनही एकटी. तुला तर माहितीच आहे. नाही जुळत आमचं काही. तरीही काढली इतकी वर्ष, फक्त ऍडजस्ट करून. आणि तुझा मानसिक आधार होता म्हणून. माझा नवरा फक्त त्याचाच आहे, त्याच्यापुढे दुसरं कोणी नाही.
कितीवेळा वाटलं, लाथ मारून निघून जावं. पण पोरीसाठी जीव अडकत होता. तिच्यावर नको काही परिणाम म्हणून ढकलत होते फक्त. पण आता तीही मोठी झाली, उच्चशिक्षणासाठी बाहेर पडली. माझं मन उबगलय, इतकी वर्ष ज्याची कुरघोडी सहन केली तो माणूस डोळ्यासमोरही नको वाटतो आता. राग राग होतो जीवाचा.
मग आता या वयात काय इरादा आहे तुझा कल्पिता?
प्राची वय तर पंचेचाळीस आहे फक्त. आणि विचार म्हणशील तर या वयात स्वतःला स्वतःची हरवलेली ओळख मिळवून द्यायचा आहे. मी काय होते, ते लग्न झाल्यावर मीच विसरले, ते पुन्हा आठवण करून द्यायचा आहे. जगाला नंतर आधी मलाच स्वतःला दाखवायचंय मी काय करू शकते, आणी आतापर्यंत काय करून स्वतःला सडवत होते. मलाही तुझ्यासारखं स्वतःचं वेगळं अस्तित्व बनवायचं. स्वतःच्या नजरेत वर यायचंय.
ग्रेट कल्पिता, मला तर खूप आवडेल माझ्या कॉलेजमधल्या मोस्ट ऍक्टिव्ह मैत्रिणीला पुन्हा भेटायला.
पण त्यासाठी मला तू हवीयेस, माझ्या सदैव बरोबर.
मी तर आहेच ना कल्पिता……..
हो पण मी आता जरा दुसरा विचार केलाय. मला या माणसाबरोबर या नेगेटिव्हीत अजिबात राहायचं नाहीये, मी याला सोडलंय. तसं मनातून तर केव्हाच सोडलेलं, पण आता शरीरानेही सोडायचयं. आणि मला तुला हे विचारायचंय की आपण दोघी आपलं राहिलेलं आयुष्य एकमेकींबरोबर घालवू शकतो का? इतक्या वर्षात आपलं एकही भांडण नाही, कसं काय ते देव जाणे. दोघींचा स्वभाव अगदी सारखा आहे, आणि काही पटलं नाही तरी एकमेकींसाठी आपण नक्कीच जराही विचार न करता पटवून घेऊ, हे तर आहेच. कारण मैत्रीच्या मुळाशी निस्पृह प्रेम आहे. काय वाटतं तुला??
हॅलो प्राची, काय झालं, गप्प का? बोल ना?
……….
हॅलो प्राची…….काय झालं ग?
अगं बाई, माझं मन इतकं भरून आलंय की तोंडातून काही शब्दच फुटेनात ग. मी जेव्हाही डोळे मिटते, जेव्हा कधी एकटी असते, त्यावेळी मला फक्त तूच समोर येतेस. माझं या जगात कोण? असं वाटलं तर क्षणाच्या आत तुझं नाव मनात उमटतं. सगळ्या नात्यातून मला हे आपले मैत्रीचे बंध जास्त जवळचे आहेत. तू मनात आली की त्या क्षणाला तुझा फोन येतो, कधी काही खावं वाटलं की ते तू तुला न सांगताही माझ्याकडे पोचलेलं असतं. माझ्या अडचणीत तू, माझ्या आनंदात तू, सगळीकडे पहिल्यांदा तू, मग बाकीचे. तुझ्यावर जेवढा विश्वास तेवढा तर स्वतःवरही नाही…….
काय आहे ग हे नातं, कल्पिता? रक्ताची नाती तरी किती जवळची असतात अशी? त्याहून जवळचं हे आपलं नात.
माझी जीव की प्राण असलेली माझी मैत्रीण, कायम माझ्याबरोबर राहणार!! याहून दुसरं सुख ते काय??
तू ये, लवकर ये. मला तुझी गरज आहे. दोघी मैत्रिणी पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहू. तुला मी आणि मला तू……..निरपेक्ष मैत्रीच्या जगात आनंदाने राहू.
मला वाटलंच होतं, प्राची तू खूषच होणार. मन उगाच कचरत होतं एवढंच.
आजची रात्र काढ फक्त, उद्यापासून मी कायमची सोबत असेन तुझ्या. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकींना सांभाळू आपण, नावापुरती नाती जपण्यापेक्षा जी खरोखर हृदयाच्या अंतरातून उमटली आहे, त्या मैत्रीच्या आधाराने यापुढील जीवनातले प्रत्येक क्षण सुंदर साजरे करू आपण………
दोघी आहोतच अगदी जिवाभावाच्या, तशाच राहू अगदी शेवटपर्यंत एकमेकींना धरून……..!!
चल भेटू आता उद्या……. कायमसाठीच!!
फोटो साभार: गुगल
©️स्नेहल अखिला अन्वित
कथा आवडल्यास माझ्या ‘हल्ला गुल्ला’ या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा……..