सकाळी सकाळी सोसायटीच्या आवारात भांडणाचा आवाज ऐकून जुई गॅलरीत आली. बघते तर खालच्या मजल्यावरच्या जाधवकाकू आणि बाजूच्या विंगमधल्या पवारकाकू एकमेकींशी मोठमोठ्या आवाजात भांडत होत्या.
वरून काही कळेना, म्हणून जुई खालती गेली, तसं दोघींशीही तिचं बऱ्यापैकी सख्य होतं.
तिने काय झालं म्हणून विचारताच दोघी पुन्हा जोरजोरात ओरडायला लागल्या.
पाच मिनिटं गेली दोघींना शांत करायला तिची. एकेकीला बोलायला लावल्यावर तिला एकदाचा मॅटर कळला.
तर झालं असं होतं, पवार काकूंच्या घरी गणपती म्हणून त्या बिल्डिंगच्या आवारात असलेल्या जास्वंदीच्या आणि अनंताच्या झाडाची फुलं काढायला गेल्या, तर जाधव काकू त्यांना ओरडायला लागल्या. त्यांचं म्हणणं होतं, ती झाडं मी लावलेली आहेत, कुणीही येऊन त्याची फुलं तोडायची नाहीत.
आणि पवार काकूंचं म्हणणं होतं, सोसायटीतली झाडं कुणा एकाच्या हक्काची नाहीत, ती सर्वांची असतात. आम्ही काही तुमच्या कुंडीतल्या झाडांची फुलं तोडत नाही.
पवार काकूंचं म्हणणं अगदी योग्य होतं, पण ते जाधव काकूंना पटतच नव्हतं. त्यांना वाटायचं मी लावलेली झाडं म्हणजे माझीच.
जुईनेही खूप सांगितलं समजावून तरी त्या ऐकायला तयारच नव्हत्या.
जेव्हा ही हाऊसिंग सोसायटी नवी होती, तेव्हा नवीन राहायला येणाऱ्यांनी हौसेने सोसायटीच्या आवारात फळाफुलांची झाडं लावली होती.
पवार काकूंनी देखील बरीच झाडं लावली होती आवारात, काही फुलांची होती काही नुसतीच शोभेची. त्या काही कोणाला फुलं- पानं तोडताना अडवायच्या नाहीत.
जुईनेही लावलेली, तिला तर कौतुकच वाटायचं तिने लावलेलं झाड वाढताना पाहून, त्यावर फुलं डोललेली पाहून आणि ती फुलं कोणी देवासाठी किंवा डोक्यात घालण्यासाठी तोडलेली पाहून…….
तिच्या गावाकडून खास गावठी गुलाब आणून लावलेले तिने तिच्या कुंडीत आणि सोसायटीच्या आवारातही. शिवाय आंब्याचं रोपटं पण लावलेलं, सोसायटीतल्या पोरांना आनंद घेता यावा म्हणून. आता तर चांगलं वाढलेलं ते, पुढच्या दोन-तीन वर्षात फळ धरेल अगदी एवढं झालं होतं ते.
जुईला खूप आवडायचं त्याची स्वप्न रंगवत बसायला, मोहोर आला की त्याचा मस्त वास सुटेल. कैऱ्या लागल्या की पोरं त्या दगडं मारून तोडायचा प्रयत्न करतील. आणि आंबे लागले की आख्खी सोसायटी वाटून खाईल.
पण सगळे थोडेच असा विचार करणारे असतात……
जाधव काकूंना असं मुळीच वाटायचं नाही. आवारातली त्यांनी लावलेली झाडं त्यांना त्यांच्या एकट्याच्या हक्काची वाटायची. सोसायटीत त्यांची दोन नारळाची झाडही होती. त्यांची म्हणजे त्यांनी लावलेली. वरून खाली पडला नारळ आणि कोणी इतर उचलायला आलं, तर त्या लगेच ओरडायच्या. आमच्या झाडाचे नारळ नाही घ्यायचे. इतकंच काय तर नारळ काढायचे झाले की सरळ माणसाला बोलवायच्या, आणि त्यांच्या हक्काचं झाड असल्याप्रमाणे उतरवून घ्यायच्या. बाकीच्यांना राग यायचा पण त्यांच्या नादी कोण लागणार म्हणून सर्व सोडून दयायचे.
जुईलाही आवडायचं नाही ते, सोसायटीच्या आवारातलं सर्वाचं, आपल्या कुंडीतील आपलं. तेच बरोबरही होतं.
तिला वाटलं आताच वेळ आहे जाधव काकूंना चूक दाखवून दयायची.
आज काय ते होऊनच जाऊ दे एकदाचं.
ती म्हणाली, जाधव काकू काय म्हणणं आहे तुमचं, ही फुलांची झाडं, आणि ती दोन नारळाची झाडं यावर सोसायटीचा काही हक्क नाही?
जाधव काकू आवाज चढवून म्हणाल्या, अजिबात नाही, ती मी लावलीयेत माझीच आहेत फक्त.
जुई म्हणाली, नक्की ना?
काकू म्हणाल्या, नक्की म्हणजे काय नक्कीच!!
बरं मग काढा पाच हजार रुपये…….
कसले पाच हजार?
का? तुम्हाला माहीत नाही, परवा तुमच्या झाडाचा नारळ आमच्या गाडीवर पडला, बघा पुढच्या साईडला किती चेपलेली दिसतेय ती. मी येणारच होते तुमच्याकडे, काल जरा बरं वाटत नव्हतं म्हणून थांबले.
चला द्या लवकर नुकसानभरपाई!!
कसली नुकसानभरपाई? आमचा काय संबंध? मागा सोसायटीला. आवार सोसायटीचा आहे, जाधव काकू तावातावाने म्हणाल्या.
आवार सोसायटीचं असलं तरी नारळ तुमच्या झाडाचा आहे ना. म्हणजे बरंय, झाडाची फळं तुम्ही घ्यायची आणि झाडाने केलेलं नुकसान मात्र सोसायटीने भरायचं?
आताच तर म्हणालात ना, झाड तुमचं आहे. म्हणजे नारळही तुमचेच.
काढा लवकर पैसे…….
खरतरं रक्कम कमीच आहे, तुमच्या झाडांंनी बरेच जणांचं नुकसान केलंय. काय हो पवार काकू, मागच्या पावसाळ्यात ती मोठी झावळी
पडली होती ना तुमच्या गाडीवर, किती खर्च आला होता हो?
त्या पाटीलांना पण विचारलं पाहिजे, नारळ पडून काचच फुटलेली त्यांच्या गाडीची……..
घेऊयाच नुकसानभरपाई आपण. चांगुलपणा दाखवून काही फायदा नाही. लोकं अरेरावी करायला लागतात. आपल्या शांत बसण्याला आपला कमकुवतपणा समजतात.
चला पवारकाकू, सगळ्यांना जाऊन विचारू, एकदमच आकडा देऊ यांना, झाड फक्त या़ंचं आहे, निस्तरु दे त्यांनाच…….
जुईचा असा अविर्भाव पाहून जाधव काकू बिथरूनच गेल्या. त्यांना आपली चूक कळली. म्हणजे त्यांना कळवून घ्यावीच लागली. आणखी भानगडी अंगावर नको यायला म्हणून त्यांनी जुईची आणि पवारकाकूंची माफी मागून विषय मिटवून टाकला.
पवार काकूंनी लगेच गणपतीला आवडणारी जास्वंदाची आणि अनंताची दोन दोन फुलं तोडली, आणि जुईच्या डोक्यावरून हात फिरवून त्या समाधानाने घरी निघून गेल्या.
वरून पाटील काकांनी पण तिला ‘व्हेरी गुड’ म्हणत अंगठा दाखवला.
जुईला मात्र केव्हाचा रखडलेला विषय मार्गाला लागल्याने फार बरं वाटलं. पवार काकूंच्या गणपतीच्या निमित्ताने का होईना आवारातील फळं फुलं सर्वांची झाली, आता सर्व त्याचा आनंद घेऊ शकणार होते.
आणि हे सर्व वरून बघून जुईला अनोखं समाधान मिळणार होतं……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.