ताई नाही नका हो बोलू, याच तुम्ही. काही नाही होणार तुम्हाला.
अगं गुडघेदुखी वाढलीये ग, दोन दिवस झाले त्यात कंबर पण दुखतीये. वय झालं आता, नको वाटतो तो प्रवास.
ताई, एवढा हो कुठे लांबचा प्रवास आहे? अडीच ते तीन तास तर लागतात फार फार तर.
अगं वनिता, तेवढेही जास्त वाटतात आता. झेपत नाही तेवढही.
असं नका बोलू ताई, मी या घरात आल्यापासून गौरी जेवणाला सवाष्ण म्हणून असता तुम्ही. आमच्यासाठी तुम्ही दोघी बहिणीच आमच्या गौरी.
धाकट्या वन्संच्या घरीच गौरी गणपती म्हणून त्या नेहमी गौरी गेल्यानंतरच येतात. पण तुम्ही नाही, असं एकही वर्ष आठवत नाही मला. सासूबाई असतानाही आणि त्या गेल्यावरही तसाच गौरीचा थाट केला. तुम्ही असायचाच जोडीला, गौरीला साड्या नेसवायला, दागिन्यांनी मढवायला. दरवर्षी नवनवीन काही घेऊन यायचा गौरीसाठी.
आणि आता म्हणता नाही येणार, तुम्ही नाही येणार तर मला एकटीला सगळं कसं जमणार? प्रत्येक गोष्ट करताना तुमची आठवण येणार. अगदी त्या सवाष्णीला जेवायला घालतानाही रडू फुटेल हो मला. ताई तुम्ही याच. या घरची एकतरी गौर पाहिजेच. त्याशिवाय सण सणासारखा नाही वाटणार. वय काय तुमचं एकटीचच वाढलं का हो? मी पण झालीच आहे की म्हातारी. तुमच्यापेक्षा सहा- सात वर्षांनी लहान असेन फक्त मी.
हो वनिता, पण तुझ्यात जोर आहे. माझा गेला ग बाई.
मला काही सांगू नका. काही नाही झालंय तुम्हाला, चांगल्या आहात ठणठणीत. वयाप्रमाणे थोडंफार असणारच की.
नसती कारणं काढून एवढ्या वर्षाची आपली जोडी तोडू नका हो ताई. थोडीथोडकी नाही पस्तीस वर्ष झाली तुम्ही गौरीच्या आदल्या दिवशी दारात हजर असता. आणि तुम्हाला पाहूनच जीव शांत होतो माझा. ताई, माझी मुलगी नाही येणार त्याचही काही नाही मला. तिला तिच्या घरच्या गौरी सजवू दे. शेवटी आपल्या हाताखालीच तयार झालीये ती. येईल नंतर सावकाशीने. पण मला तुम्ही मात्र पाहिजेच. मी असेपर्यंत ताई तुम्ही यायचंच.
वनिता, अगं मला नाही वाटत का यावं? माझा जीव सुद्धा तिथंच आहे ग. पण शरीर साथ देईना आता.
ताई मनाची साथ आहे ना, मग शरीर नाचेल बघा त्याच्याबरोबर. तुम्ही मनानं धरा फक्त यायचं.
बघते बाई, जमलं तर येईन.
वनिताने फोन ठेवला, तशा तिच्या डोळ्यातून इतक्यावेळ अडवून धरलेल्या धारा सुटायला लागल्या. ताई गौरीला नसणार, ह्याची कल्पनाही तिला करवत नव्हती. इतकी वर्ष नणंद-भावजय मिळून गौरीला सजवायच्या. साड्या नेसवल्यावर नटून थटून उभ्या केल्यावर बघणाऱ्याला बघतच राहावंसं वाटायचं दोन्ही गौरींकडे. पण या दोघींचा किती वेळ जायचा त्यात त्यांनाच माहिती……..
तरी त्यात एक वेगळच भारावलेपण असायचं.
दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक तर असायचाच, पण ताईंच्या आवडीचा त्या सांगतील तो पदार्थ वनिता अगदी हौसेने बनवायची. आणि ताईंनी तो खाऊन कौतुक केलं की कोण आनंद व्हायचा तिला!!
वनिताच्या माहेरी गणपती असायचे दिड दिवसाचे.
सासरी मात्र दहा दिवसाचे गणपती, आणि गौरीही. पहिले पहिले जरा जड गेलं, पण नंतर मात्र तिच त्यात गुंतली, तिला ते सगळं फारच आवडू लागलं. अगदी हौसेने करू लागली सगळं. सासूबाईंनी जसं आखून दिलेलं तसच सारं करायची ती,आणि तिला तेच आवडायचं. त्या निमित्ताने त्यांचा आपल्या भोवती वावर असल्यासारखं वाटायचं तिला. आणि ताईही होत्याच पहिल्यापासनं. गणपती येण्याच्या दिवसापासूनच डोळे लागायचे दरवाजाकडे सगळ्यांचे. पोरं लहान होती तेव्हा तर नुसती भंडावून सोडायची, आत्या कधी येणार? आत्या कधी येणार म्हणून!!
मोठी झाली तरी तेच, गणपती आला की आता गौरीला आत्या येणार म्हणून मनात उत्साह असायचाच.
अगदी कालसुद्धा वनिताच्या मुलीचा फोन आला होता, तेव्हाही पहिला प्रश्न, आत्या कधी येणार हाच होता.
वनिताला सगळं आठवून पुन्हा पुन्हा रडायला येत होतं. तिच्या सुनेलासुद्धा ते बघून कसंतरी वाटत होतं. ती धीर द्यायला सारखी बोलत होती. येणार हो ताई, नका काळजी करू.
वनिता म्हणाली, एव्हाना असतात ग आलेल्या नेहमी. उद्या येणार गौरी. आणि घरच्या हक्काच्या गौरीचा पत्ताच नाही. मला नाही उत्साह वाटत कसलाही.
त्या दिवशी तिने बळेबळेनेच सुनेसाठी म्हणून गौरीची थोडीफार तयारी केली. ठेवणीतल्या एकेक गोष्ट काढताना तिला हुंदका येत होता. नेहमी ताई करतात हे सगळं. त्याच काढतात गौरीच्या साड्या,दागिने……. अगबाई, ताईंची एक साडीही असते गौरीला. नेहमी नवीन साडी घेऊन येतात त्या घडी मोडायला, आणि एक माझी असते. आता आपल्याच नेसवायच्या होय? आणि कौतुकाला कोण? ताई या ना हो, पुन्हा डोळे भरलेच वनिताचे.
रात्रीही वनिताला झोप नीट लागली नाहीच, डोळा लागला तरी ताई बरोबर गौरी सजवतानाचं चित्र दिसत होतं तिला.
तशीच अर्धवट झोपूनच सकाळी उठली, आणि सुनेबरोबर कामाला सुरुवात केली तिने. गौरी येणार त्याची लगबग होती, पण मनात उत्साह नव्हता तिच्या. वाटत होतं, आपणच जावं आणि ताईंना घेऊन यावं. उगीच वयाचं कौतुक करत बसल्यात.
मधेच तिला वाटलं, काल मुलालाच पाठवलं पाहीजे होतं, चुकलंच माझं. बरोब्बर घेऊन आला असता तो.
वनिता या सगळ्या तिच्याच विचारात होती अन् तेवढ्यात मोठ्याने हॉर्न वाजवत एक गाडी घराच्या आवारात शिरली. तशी वनिताची सून बघायला धावली, तिला वाटलेलंच, ती आनंदाने ओरडली, तुमच्या ताई आल्या हो!!
वनिता हरखली, काय ताई आल्या? दारातच थांबव त्यांना. तुकडा ओवाळून पाणी टाकते ग पायावर. असं म्हणत आतून ते घेऊन सुद्धा आली. दोघींनाही एकमेकींना बघून बोलायला सुचतच नव्हतं. डोळ्यातलं पाणी खरंतर बोलयला देतच नव्हतं. ताई आत आल्या तशी वनिता त्यांचा हात घट्ट पकडून म्हणाली, आता माझी खरी गौर आली. आता सण सणासारखा वाटतोय.
ताई म्हणाल्या, मग काय. मला ही नाही राहवलं बाई. एवढ्या वर्षांची सवय. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. तू म्हटलस तसं झालं बघ, मनाने उभार धरला, आणि शरीराने आपोआप साथ दिली.
आले बघ मी गौरींना साड्या नेसवायला, त्यांना नटवायला आणि सवाष्ण बनून तुझ्या हातचं जेवायला.
चला तयारीला लागा, तुझ्या सुनेला शिकायला सांग आता सगळं, पुढच्या वर्षी मला झेपेलच की नाही काही सांगता येत नाही.
मी आहे तोपर्यंत तुम्हाला झेपवावं लागेलच हा ताई. नसती कारणं देऊच नका. मी दमेन ना तेव्हाच तुम्हीही दमा, एकत्रच जोड तोडू. वनिता हे बोलली तशी तिची सून मधेच तिला अडवून म्हणाली, एवढ्यात अजिबात दमायचं नाही दोघींनी. तुम्ही दोघी गौरी उभ्या करतानाचा सोहळा मला साठवू दे आणखी काही वर्ष डोळ्यांत, तुमचं कसब एवढ्या लवकर थोडंच माझ्या अंगात येणार? खूप वर्ष लागतील मला शिकायला………
आणि सांगते तुम्हाला, आजही माझं मन म्हणत होतं तेच झालं, मला वाटलेलंच काही झालं तरी ताई येणारच. आणि त्या आल्याच.
तसंच माझं मन हेही म्हणतंय, तुमचा जोडा काही इतक्या लवकर तुटायचा नाही; ज्यांना अगदी देहभान हरपून उभं करता, सजवता ना त्याच गौराईंचा हात आहे तुमच्या डोक्यावर……..तुम्हाला नसेल कदाचित पण मला जाणवलय ते चांगलंच!!
तेव्हा जोड तुटायच्या गोष्टी तर आता सोडूनच द्या. तुमच्या जोडीसारखी दुसरी जोडी जेव्हा तयार होईल ना तेव्हाच या गौरी तुम्हाला मोकळं करणार बघा!!
सुनेचं बोलणं ऐकून दोघी नणंद-भावजय एकमेकींकडे बघून आश्वासक हसल्या. मनात मात्र दोघीही म्हणाल्या, आता त्या गौराईंवरच सोडलंय आम्ही सगळं..……..
(ही संपूर्ण कथा मी माझ्या आईला आणि मामीला डोळयासमोर ठेऊन लिहिली आहे. प्रत्येकवर्षी मामीकडे गौरीला जाणारी माझी आई मागच्या वर्षीपासून तब्बेतीच्या कारणाने जाऊ शकत नाहीये. मामी सहज बोलताना मला म्हणाली, दरवर्षीची माझी गौरीची सवाष्ण, गौरीला त्या लागायच्याच आम्हाला. खरंच, किती गोष्टींनी आपण बांधले गेलो असतो ना आपल्या माणसांशी? इतरवेळी कदाचित लक्षात येत नाही, पण त्याच्या नेहमीच्या वेळी तो माणूस तिथे नसला की जीव कासावीस होतो आपला……. )
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.