मी अगदी लहान होते, तेव्हापासून ओळखायचे तिला. महिन्यातून दोनदा तरी ती यायचीच. मंगळवार किंवा शुक्रवार ठरलेलाच असायचा तिचा.
ती आली की डोक्यावरच्या टोपलीत असणाऱ्या देवीला खाली ठेऊन अगदी निवांतपणे ठाण मांडून बसायची, दाराच्या आत येऊन एका कोपऱ्यात. कपाळ जवळपास हळदीने माखलेलंच असायचं. तरी कुंकुवाचा गोल टिळा त्यातून डोकवायचाच. मला ती नेहमी हिरव्या साडीतच आठवतेय.
केव्हाही आली तरी आज्जी तिला म्हणायची, आली का बाई तू आता?
आज्जीच्या मते ती नेमकी कामाधामाच्या वेळेलाच आली असायची.
तरीसुद्धा ती आली की माझी आज्जी हातातलं काम सोडायची, आणि तिला थोडं तेल, थोडे तांदूळ, कधी दुसरं धान्य, मीठ, मोहरी द्यायचीच.
कोणी मुलं समोर असतील, तर ती त्यांना हाक मारून बोलवायचीच. मी असेन तर ये ग बाय, ये देवीला नमस्कार कर, कुंकू लावते तुला ये, आशीर्वाद घे देवीचा, हे सगळं एका मागोमाग बडबडायचीच. घरातल्या अगदी प्रत्येकाशी तिच्या घरचेच असल्यासारखं बोलायची ती. मला तिचा तो बोलण्याचा ढंग खूप आवडायचा. कर्नाटकाकडची नव्हती ती. कोल्हापुरी टच होता थोडा.
आमच्या पूर्ण घरची हिस्ट्री तिला माहीत होती, अर्थातच आज्जीकडून. तिची पूर्ण हिस्ट्री आज्जीला माहीत होती. सांगते काय, ठाण मांडून बसायची म्हटलं ना, सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टीची देवाणघेवाण व्हायची त्यांच्यात. खरचं जुन्या बायकांना मानसोपचाराची कधी गरजच लागली नसेल वाटतं मला, मन मोकळं करायला स्पेशल कोणी लागायचं नाही त्यांना. अगदी कुणाबरोबरही सहज मन मोकळं व्हायचं त्यांंचं.
लहान होते तेव्हा दोघी काय हळू आवाजात बोलत असतील, हे ऐकायची मला फार उत्सुकता असायची. पण त्यांचा आवाज काही केल्या कानावर पडायचाच नाही.
मला आठवतं, मी सारखं आज्जीला विचारत असायचे. कोण ग ही, कुठून येते? तेव्हा आज्जी एवढंच म्हणायची ‘जोगतीण’ आहे ती.
नंतर बोलण्या- बोलण्यातून कळलं, तिला देवाला वाहिलीये, नंतर कळलं देवाशी तिचं लग्न झालंय. हे असं काय कळल्यावर मनात आणखी काय काय प्रश्न यायचे, ते सगळे विचारायचे खरी मी, पण उत्तरं मात्र यायचीच नाहीत.
मी तर अनेकदा तिला आज्जीशी बोलताना रडताना पण पाहिलं होतं. पण कारण कोण सांगणार आम्हाला. मला तर नेहमी काहीतरी गूढच वाटायचं. त्यात तिचे ते केस. त्या जटा बघून तर हजार प्रश्न यायचे डोक्यात.
मी पाचवीपर्यंत होते आज्जीकडे, नंतर ठाण्याला आले. ती येतच होती. तिला बघायला मी नसायचे.
पण प्रत्येक मोठ्या सुट्टीत मात्र मी तिकडेच असायचे. आणि तेव्हा ती मला हमखास भेटायचीच.
पुढे अशीच एकदा मी सुट्टीत गेली असता, ती नेहमीसारखीच आली. मी दिसल्यावर माझी चौकशी केली. मी ही मोठी झाले होते, आणि ती ही वयाने थकली होती. माझी आज्जी तिच्याहून थकली होती.
ती आली तशी आज्जीने उठुन तिला नेहमीचं सगळं दिलं. आणि अचानक ती माझ्या आज्जीचा हात धरून म्हणाली, आता ह्यो माजा शेवटचाच जोगवा ग बाई. म्या न्हाई यायची पुन्हांदा काय बी मागाय तुज्याकडं. आता सोडलं ह्ये सारं. झेपत बी नाय. कुठं वणवण करतीस. देवाच्या दारी पडून राणार बग नुसती……
असं म्हणून मोठ्यांदा रडायलाच लागली. तिला बघून आज्जीही रडायला लागली. सुखदुःखं वाटली होती दोन्ही बायांनी इतकी वर्ष……..
पुढं आज्जीला म्हणाली, तुज्यासारक्या चार पाच बायका हाईत, त्यांस्नी भेटाया आली मी खास. लय जीव लावला तुमी माज्यावर……..
आज्जी पदराला डोळे पुसत म्हणाली, तू जोगवा मागायला नाही आलीस तरी अशीच ये की कधीतरी.
मला सांगायचं तरी होतंस अगोदर, साडी-चोळी केली असती तुला. पुढच्या वेळेला ये भेटायला, आणून ठेवते मी सगळं. असं म्हणत आज्जी उठली, आणि आणखी थोडं धान्य, डाळी तिला दिल्या.
निरोप घेऊन ती उठली, पुन्हा येते भेटायला म्हणाली खरी. पण मला तरी परत काही दिसली नाही.
त्याच दिवशी मी आज्जीला तिच्याविषयी विचारलं, मी आता तशी मोठी होते, म्हणून आज्जीनेही मला सांगितलं. या जोगतीणीच्या आईवडिलांना तीन पोरी होत्या, त्यांना मुलगा हवा होता, तो होण्यासाठी हिला देवाला देऊ, असा नवस त्यांनी बोलला. त्याप्रमाणे मुलगा झाल्यावर, हिला देवाला वाहून टाकलं होतं. अगदी लहान वयातच. पुढे कळायला लागल्यावर ती कुणालातरी नवरा मानून त्याच्याशी एकनिष्ठही होती. पण त्याने तिला पत्नीचं स्थान दिलं नाही. आपला संसार मांडला. आणि तिला झटकूनही टाकलं. तिने त्याच्यावर जीव लावला होता, पण फसवली गेल्याने पुन्हा कुठल्याच पुरुषाच्या कुठल्याही आधारासाठी ती वाटेलाच गेली नाही. त्यांच्याविषयी बरेच समज असतात, पण तिने तिची निष्ठा कायम जपली होती.
ती दुःखी होतीच, कारण तिला कोणी प्रेमाने विचारणारं नव्हतं. एकटेपणाची खंत सारखी टोचायची तिला. तिच्या दोन बहिणींचे, भावाचे संसार होते, पोरं-बाळं होती. तसं अगदीच कुणी टाकलं नव्हतं तिला, विचारपूस करायचे तिची, पण तरीही तिला वाटायचंच, देवाला वाहीलं नसतं, तर आपलंही याच्यासारखं घरकुल असतं. जोगतीण जरी असली, तरी मनातून एक साधी स्त्री होती ती. तिलाही बरंच काही वाटायचं.
पण ती प्रथेत भरडली गेली होती, तीच काय तिच्यासारख्या अनेक होत्या.
स्वतःच्या घरच्यांनीच देवाचं नाव पुढे करून टाकलेल्या……..
गेली दहा वर्ष माझ्याकडेही एक जोगतीण येते. दर महिन्याला नाही पण दोन महिन्यातून एकदा तरी येतेच. खरंतर देवाच्या नावाने पैसे मागणाऱ्या कोणालाही मी कधीही एन्टरटेन करत नाही. मला राग येतो त्यांचा. ही पहिल्यांंदा आली तेव्हा मी असंच दार लावून घेतलं होतं. पण मला अचानक माझी आज्जी आठवली. मी तिला परत बोलवलं. आज्जी जशी करायची तसं सगळं केलं. मला तसं करताना छानही वाटत होतं. माझ्या आज्जीलाच अनुभवत होते मी जणू. तिने माझ्या कपाळावर कुंकू लावलं. तुझं भलं होईल, देवीचा आशिर्वाद राहील असं काहीसं बोलून ती गेली.
मात्र पुढच्यावेळी आली, ती केव्हाची ओळख असल्यासारखंच बोलायला लागली. स्वतःहूनच एकेक सांगायला लागली. माझ्या मुलीशीही अगदी प्रेमाने बोलली. मी मनात विचार करत होते, हिची माझी एवढी दोस्ती झाली कधी??
येत राहिली तशी पुढे पुढे तर अगदी आमची कुठली जुनी ओळख असावी असा अविर्भाव असायचा तिचा. मागच्यावेळी असलेलं कोणी दिसलं नाही, तर ते कुठाय, इथपासून आईला एकदा भेटली तर प्रत्येकवेळी आई बरी आहे का? हे विचारलं नाही असं झालं नाहीच आतापर्यत कधी.
हक्काने घरच्या मुलाबाळांसाठीही काही मागून नेते ती. किंवा पुढच्या वेळेला काढ नक्की, असंही बजावून जाते ती.
आता सहा महिन्यात तिचीही भेट नाही. चुकल्यासारखं वाटतय, तिच्या निमित्ताने माझी आज्जी अनुभवते मी माझ्यातच, ती आठवणीतली जोगतीणही येते डोळ्यासमोर……
जुनी माणसं अशी कोणाच्या रुपात भेटली की फार फार बरं वाटतं……..म्हणून तर सगळं ऐकत असते मी तिचं. ती बोलत असते, तेव्हा तिच्यात मला ती जोगतीण दिसते, आणि माझ्यात माझी आज्जी…….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.