पण काहीही बोल ऋतुजा, एक प्रश्न मला सारखा पडतो तुझ्याकडे बघून, तुझं तुझ्या सासुशी का बरं पटत नसावं?
आपली ओळख तर अशीच कुठेतरी झालेली, आणि आता केवढ्या गप्पा मारतो आपण? मी तर तुझ्या वयाचीही नाही, तरी एवढं छान जमवून घेतलस माझ्याशी, मग मला कळत नाही, तुझं तुझ्या सासुशी का बरं पटत नाही?, इतके दिवस मनात ठेवलेलं बोलता बोलता विचारलंच ऋतुजाला, माटे काकूंनी.
कोणी सांगितलं तुम्हाला माझं पटत नाही, ऋतुजा एकदम आश्चर्याने म्हणाली.
अगं तू वेगळी राहतेस ना?, पटत असत तर एकाच घरात असता ना तुम्ही?, काकू अगदी खात्रीपूर्वक म्हणाल्या.
अच्छा, म्हणजे तुमचं तुमच्या सुनेशी एकदम छान पटत असणार. एकत्र राहता ना तुम्ही?, ऋतुजाने काकूंनाच उलट प्रश्न केला.
तशा काकू म्हणल्या, छे ग बाई. अजिबात नाही पटत. तुझ्यासारखी सून असती तर चांगलं पटलं असतं. माझी सून कसली जमवून घेतीये माझ्याशी.
दुरून डोंगर साजरे वाटतात, काकू. मला ओळखता किती अशा तुम्ही? आपण कधी बाहेर भेटलो तर बोलतो, नाहीतर कधीतरी फोनवर. असा किती सहवास असतो आपला? मला काय जातंय तुमच्याशी न चांगलं वागायला!! ना मला तुमच्याकडून काही हवंय ना तुम्हाला माझ्याकडून. कोणाला कोणाकडून काही अपेक्षा नाही. मग नुसतं गोड बोलायला जातंय काय?
तुम्हाला बरं नसेल तर मी येते का धावत कुठून, सुनबाईच असते ना तुमची. तिलाच बघावं लागतं ना तुमच्याकडे? का मी तुम्हाला दुसरी कुठली मदत करायला येते?
पण तरीही आपल्याला, घरची माणसं सोडून बाहेरची चांगली वाटतात, हेच दुर्दैव आहे.
तसंच काही नाही हं. माणसं ओळखता येतात मला, काकू नाराजीच्या सुरात बोलल्या.
हो काकू माहितीये मला, बाहेरच्यांना दोन-तीन भेटीत लगेच ओळखायला लागतो आपण, आणि घरच्यांना ओळखायचा साधा प्रयत्नही करत नाही. सतत त्यांना चाचपडत असतो फक्त. तेच आपलं सगळं करणारे असतात तरीही, काकूंना पटणार नव्हतं, तरी ऋतुजाने आपलं मत मांडलंच.
आमचं सोड, तुझं सांग. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलस अजून? मला वाटत तर नाही तू छळत असशील सासूला, सासू छळायची का ग तुला?, काकूंची उत्सुकता विनाकारण शिगेला पोचलेली बघून ऋतुजाही झटकन म्हणाली,
वेगळं व्हायला कुणी कुणाला छळायलाच हवं का? सहनशीलतेचा अंत होइपर्यंत वाट बघत बसायला सांगितली आहे कुणी?
हो मी वेगळी राहते, पण कुणी कुणाला छळत होतं म्हणून नाही. थोड्याश्या कुरबुरी होत्या. आणि त्या जास्त वाढू नयेत असं आम्हा दोघींनाही वाटलं. अगदी म्युच्युअल अंडरस्टँडींगने वेगळ्या झालो आम्ही. मलाही माझं स्वातंत्र्य हवं होतं. ते हवं असणं किंवा तसा विचार करणं म्हणजे काही पाप नाही. प्रत्येक माणसाचा हक्कच आहे तो. तरुणपणी सतत ऍडजस्ट करत बसायचं आणि मग जीवन मनासारखं कधी जगायचं, म्हातारपणी? आणि मग स्वतःला हवंतसं जगता आलं नाही म्हणून परत पोरांना, सुनेला टोचत बसायचं, आमच्यावेळी असं होतं, नि तसं होतं. आम्ही नाही बोललो काही. आम्ही ऍडजस्ट केलं.
मला हे नको होतं. मला माझ्या उभारीच्या वयातच पूर्णपणे जगायचं होतं, मला हवं तसं.
हेच झालंय आजकाल, प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीने जगायचंय, काकू मधेच बोलल्या.
का? प्रत्येकजण तर तसंही जगतच. फक्त सुनेने जगायचं म्हटलं की भुवया उंचावल्या जातात. का तिला मन मारून राहायची सक्ती?
वेगळं राहायचं म्हणजे, सर्व संबंध तोडायचे असं थोडंच असतं. आम्हा सासू-सुनेबद्दल बोलायचं झालं तर ते आता जास्त चांगले झाले आहेत.
तसा प्रयत्न केला आम्हीही एकमेकींशी जुळवून घेण्याचा, पण तो नाही सफल झाला. कधी कधी आपलं एखाद्याशी सगळं क्लिक होतं, आणि कधी कधी काही झालं तरी सूर जुळतच नाही. तसं झालं आमचं. म्हणून काय त्या किंवा मी वाईट आहे असा अर्थ होत नाही. बस आमचं नाही जमलं, आणि आम्ही ते एक्सेप्ट केलं. आम्ही वेगळे राहतो फक्त, वेगळे झालो नाहीत. सणासुदीला,अडीअडचणीच्या प्रसंगाला आम्ही अगदी एकत्रच असतो. कधी कधी तर सहजही एकत्र येतो. जवळ असताना जेवढे जवळ नव्हतो, तेवढे लांबून जवळ झालो आहोत आम्ही. प्रत्येकजण त्याच्या अवकाशात सुखी आहे. फ्रिडम सूनेला हवा तसा सासुलाही हवाच असतो की. सूत जुळलं तर एकाच घरी मोकळ्या राहू शकतात, आणि नाही जुळलं तर वेगळं राहून एकमेकींना मोकळं करायला काय हरकत आहे?
आणि मोकळेपणाची गरज प्रत्येकालाच असते, हे सहज स्वीकारायला तरी काय हरकत आहे आता?
वेगळं होणाऱ्यावर वाईटाचा शिक्का मारणं कधी सोडणार आपण?
मला भेटलीस तेवढं पुरे झालं ऋतुजा, माझ्या सुनेला चुकूनही भेटू नकोस. असं नको नको ते तिच्या डोक्यात भरवशील अन् लागेल ती पण तुझ्यासारखीच उडायला, एवढं बोलून माटे काकू ऋतुजाला बाय करून पळाल्या सुद्धा……..
ऋतुजाने कपाळावर हात मारला. एवढं बोललो आपण, त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही काकूंवर. का आपल्या सोयीचा वाटला नाही, म्हणून होऊ दिला नाही देव जाणे, ऋतुजाला काकूंचं वागणं काही कळलच नाही.
तुम्हाला तरी कळलं का हो??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.