दादा तू आमचं खूप काही केलंस. माझं लग्न, धाकट्याचं शिक्षण, त्याचं लग्न सगळं काही व्यवस्थित पार पाडलस. आमच्या कुठल्याही अडीअडचणीला तू हजर असतोसच. आईवडिलांनतर केवढा आधार बनलास तू आमचा, आज आम्ही आहोत ते तुझ्यामुळे. घरात कुठलं मंगल कार्य असेल किंवा दुसरी कुठली अडचण असेल तू अजूनही पैसे पुढे करतोसच. तू आहेस तर आम्हाला कसलीच काळजी नाही, भावाबहिणीचा व्हिडीओ कॉल चालू होता. कौमुदी तिथेच होती, तिला वाटत होतं, भावाचं एवढं गुणगान करतीये, तर दोन शब्द वहिनीविषयीही बोलेल आपली नणंद. पण कॉल संपला तरी तिच्याविषयी काही कानावर पडलच नाही कौमुदीच्या.
पुन्हा एकदा मन खट्टू झालं तिचं. तशी काही नवी गोष्ट नव्हती तिच्यासाठी. पण नणंद आणि दिर आपल्या भावाला तेवढे सारखे म्हणत असतात, तू आमचं खूप केलं, पण त्याच्याबरोबर वहिनीनेही केलंय हे मात्र लक्षातही येत नाही त्यांच्या. तिलाही दोन शब्द कौतुकाचे ऐकवावे, असं चुकूनही वाटत नाही त्यांना. हे कौमुदीला हल्ली जरा मनाला जास्तच लागायला लागलं होतं.
मी करून दिलं म्हणून केलं भावाने, मी साथ दिली चांगल्या मनाने, मी आडकाठी घेतली असती तर? कौमुदीला नको वाटायचं तो विषय मनात आणणं, तरी असे फोन आले की मनात यायला लागायचंच ते सगळं……..मग तीही तेच तेच आठवत राहायची.
आपण लग्न होऊन आलो तेव्हा, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती ही अपर्णा. आणि अनिकेत तर दहावीला होता. तिचं कॉलेज संपलं आणि सासूबाई गेल्या. मागोमाग दोन वर्षात सासरेही.
नोकरी सांभाळून मी या दोघांचंही केलं. पोरके झाले म्हणून आईची मायाही लावायचा प्रयत्न केला. लहान असते तर लगेच लागलीही असती, पण मोठे होते ना, त्यांनाच नको वाटायचं दुसरं कोणी आई बनण्याचा प्रयत्न केलेलं. आशिषला स्वतःहून म्हणाले होते मी, आता यांची सर्व जवाबदारी आपली.
आशिषनेही ते अगदी जास्तच मनावर घेतलं. अपर्णासाठी चांगलं स्थळ शोधून थाटामाटात लग्न लावून दिलं. तिचं पहिलं बाळंतपणही व्यवस्थित पार पाडलं. आईसारखं सगळं व्हायला पाहिजे म्हणून महिनाभर सुट्टी घेतली होती मी.
अनिकेतलाही त्याच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर केलं. आता अगदी दादाला म्हणतो, तू सगळा भार उचलला म्हणून मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो.
पण भार वहिनेनीही उचलला होता, तो मात्र दिसून आलाच नाही कुणाला.
दादा थाटामाटात लग्न लावू शकला, दादा डॉक्टरकीच्या शिक्षणावर पैसे ओतू शकला कारण, मी होते. मी चांगली कमावती होते. मी घर सांभाळत होते. माझ्या पोराबाळांची शिक्षणं, त्यांची आजारपणं, घरातला इतर खर्च, सगळं मी बघत होते, म्हणून दादा त्याचं सर्व देऊ शकला ना?
दादाच्या एकट्याच्या पगारात थोडंच त्याला स्वतःचं घर आणि तुमचं सगळं करता आलं असतं!!
दादाला मी मुक्त केलं होतं, घरच्या आर्थिक विवंचनेतून, म्हणून तो तुमचे भार उचलू शकला.
मी त्याला पाठिंबा दिला. मानसिक आणि आर्थिकसुद्धा. अगदी अजूनही देतीये.
म्हणूनच तर अजूनपर्यंत दादा धावतो काही झालं की पैसे घेऊन……..
पण तरीही…….तरीही मी आजपर्यंत दिसलेच नाही कुणाला. चुकूनसुद्धा कोणाच्या तोंडी अजूनपर्यंत आलं नाही, वहिनी तुही आमचं खूप केलं.
दादा करतो म्हणून त्याला काही झालं की धावत येतात. आणि मला काही झालं की माझी नुसती फोनवर विचारपूस करतात. मग का वाईट नाही वाटणार कुणाला?
आणि तसं पाहिलं तर यांच्या दादाला तरी कुठे वाटतय असं? तो कुठे करतो मला त्याच्या कौतुकात सामील? तो तरी कुठे बोलला त्यांना कधी, कौमुदी होती म्हणून मी करू शकलो सारं.
त्यांनाही नाही बोलला, आणि मला ही नाही बोलला आशिष. एक कौतुकाचा शब्द नाही आला तोंडातून कधी, भक्कम आधार दिल्याबद्दल.
निदान तो जरी बोलला असता तरी एवढं मनाला लागलं नसतं माझ्या, नवऱ्याला तरी जाणीव आहे ना, म्हणून सोडून दिलं असतं सगळं. पण नाही, ती नाहीये हेच खरंतर सर्वात जास्त टोचतय आपल्याला………
पुन्हा एकदा कौमुदीच्या मनात नुसतं द्वंद्व माजलं होतं, एक मन म्हणत होतं, जा आणि बोल की नवऱ्याला, सांग मी पण केलं सगळं. एकटेच का श्रेय लाटता?
तर दुसरं म्हणत होतं, जाऊ दे सोड. मागून मिळाल्यावर त्याचं काय मोल? ती जाणीव आतून असणं गरजेचं.
नेहमीच जिंकणारं दुसरं मन यावेळीही जिंकलं. कोणाबद्दलही तक्रारीचा एक चकार शब्दही न काढता, कौमुदीने मनाला त्रास देणाऱ्या सगळ्या अपेक्षांना डोळ्यातल्या पाण्यावाटे तेवढ्यापुरतं मोकळं करून टाकलं………..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.