त्याचं दुकान भर चौकातच होतं. दिवसभर भाविन दुकानातच असायचा. चौकात होतं म्हणून तसं चांगलं चालायचं. हिरा त्याची बायको यायची साडेबारा वाजता घरचं सर्व आटपून, पोरांना शाळेत सोडून त्याच्यासाठी डबा घेऊन दुकानात. ती आली कि तो जेवायचा आणि जेवल्यानंतर तासभर चांगली झोप काढायचा.
आणखी एक पोरगा होता तसा मदतीला.
भाविन झोपल्यावर हिरा त्याच्या जागेवर बसायची.
सहा वर्षे झाली होती लग्नाला, आणि ती लग्नानंतर सहा महिन्यापासूनच दुकानात यायला लागली होती. भाविनला आराम हवा असायचा, आणि घरातलं कोणी असेल तर बिनधास्त झोपता येईल, म्हणून तो तिला यायला सांगायचा.
आणि नंतर मात्र त्याने ते तिचं रोज येणं तिच्या गळ्यातच मारून टाकलं.
अन् तिथे येऊन तिला काम काय असायचं तर, नुसतं मख्खासारखं बसून राहायचं. तिने जरा इंटरेस्ट दाखवला की भाविन तुला काही जमणार नाही, तू फक्त बसून रहायचं काम कर, धंद्यात डोकं घालू नको म्हणायचा.
झोपायला जायचा तेव्हा हिराला हजार सूचना देऊन जायचा.
सहा वर्ष झाली तरी सूचना देतच होता, हिराला सगळं सगळं माहित होतं. सगळं तोंडपाठ होतं. आणि ते दुकानही कसलं होतं, तर सौदर्यप्रसाधनांचं. स्त्रियांना सजण्या-सवरण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी होत्या तिथे. हिरालाही ते सगळं आवडायचं. पण तिचंच दुकान असून तिला प्रत्येक वस्तू हाताळताना दहा वेळा विचार करावा लागायचा.
भाविन झोपला असेल तर सगळे रेट कन्फर्म करण्यासाठी मदतनीस पोराला विचारावं लागायचं. तिला माहीत असूनही ती विचारायचीच. कारण भाविनचा त्याच्यावर जास्त विश्वास होता. त्याच्या चुकीला माफी होती. हिच्या नव्हती. सहा वर्षात हिराची फक्त एकदाच नजरचूक झाली होती. दुपारच्या वेळेला दोन बायका आल्या होत्या, आणि एका वेळेला हे दाखव ते दाखव करत हिराला गुंगवून त्यांनी दोन भारी सेट लंपास केले होते. फक्त एकदाच!! पण भाविनला तेवढं निमित्त पुरे झालं, तिला मठ्ठ ठरवायला.
हिरा मठ्ठ तर तो महामठ्ठ ठरायला पाहिजे होता खरंतर, कारण त्याच्या बाबतीत असं सहा महिन्यातून एकदा तरी व्हायचंच. पण ते हिराला माहीत नव्हतं एवढंच. स्वतःचा मठ्ठपणा लपवून ठेवलेला त्याने, तिच्यापुढे शेखी मारण्यासाठी. तो हाताखालचा पोरगा मात्र ओळखून होता सगळं, त्याच्यासमोरच तर कितीतरीवेळा मठ्ठ ठरलेला भाविन!!
जरा चार पाच पोरींंचा घोळका आला, की भाविनला भिरभिरल्यासारखं व्हायचं. मुली सांगतील ते लगेच समोर दाखवायची घाई व्हायची त्याला. अगोदरचा पसारा उचलायचं पण ध्यानात यायचं नाही. हाताखालच्या पोरालाही कामाला लावायचा, आणि स्वतःही वस्तू काढत बसायचा. कानातली, गळ्यातली, नेलपॉलिशच्या बाटल्या कितीतरी वस्तू जायच्या, बरेचदा याला गेलेलंही कळायचं नाही. दोनशेची गोष्ट कोणी लाडात येत शंभरला मागितली तरी भाविन त्यात अडकून ती देऊन टाकायचा. तो पोरगा सगळं बघत होता. भाविनही त्याला विश्वासातला म्हणून सांभाळत होता. काही चूक झाली, तर दुर्लक्ष करून सोडून देत होता. अपेक्षा एवढीच की हिरापर्यंत माठगिरी जाऊ नये.
भाविन जरी समजत असला, तरी हिरा मख्ख नव्हती आणि मठ्ठही नव्हती. भाविनला ती वाटायची तशी, कारण त्याच्या नजरेला तसंच पहायची सवय होती. त्याला तसच पाहायचं होतं. बारावीपर्यंत शिकली असली तरी हिराकडे व्यवहार चातुर्य होतं, बोलायला सुरुवात केली की कोणाला ऐकायची नाही. तिला फार वाटायचं मनोमन हे दुकान आपल्या मर्जीने चालवायला मिळालं तर काय मज्जा येईल!! मी गिऱ्हाईकाशी असं बोलीन, दोन गोष्टी घ्यायला आले तर चार गोष्टी घेऊनच पाठवीन, बसल्या बसल्या खूप मांडे रचायची ती.
तिच्यातल्या खुबी भाविनला माहीतच नव्हत्या कारण त्याने तिला कधी वावच दिला नव्हता.
त्या महिती होत्या फक्त तिच्या आईला. ती नेहमी आईबरोवर बसायची त्यांच्या कापडाच्या दुकानात आणि सगळीकडे लक्ष ठेऊन असायची. बरेचदा गिऱ्हाईकाशी तिच बोलायची, त्यांना पटवायची. तिच्या वडिलांना हे कळायचं पण ते त्यांना मान्य करायला आवडायचं नाही. हिराच्या आईला कुठल्या दुकानवाल्याशी हिराचं लग्न लावायचच नव्हतं. तिच्या वाटेला जसं नुसतं बसून राहणं आलं होतं, तसं तिला हिराच्या वाटेला नको होतं. पण नवऱ्याने नेहमीसारखा लादलेला निर्णय तिला मानावा लागला, आणि हिरा भाविनबरोबर त्याच्या दुकानही अडकली.
हिराला सुरुवातीला काही वाटलं नाही त्याचं. पण भाविनचा स्वभाव आपल्या वडीलांसारखाच आहे हे कळल्यावर मात्र फार वाईट वाटलं. तिला वाटायचं वडिलांनी नाही दिलं तर माझा नवरा नक्की देईल दुकान चालवायला मला. मी त्याला सांगेन मला खूप आवडतं, गिऱ्हाईकाशी बोलायला. मला आतूनच आवड आहे या सगळ्याची. माझं मन खूप रमतं यात.
भाविनही पक्क्या पुरुषी मेंटेलीटीचा निघाला आणि जे काही सांगायचं होतं ते हिराच्या मनातच राहिलं.
पण तुमची खरोखर तीव्र इच्छा असेल, तर ती गोष्ट मिळतेच तुम्हाला, म्हणतात ना अगदी तसच झालं, हिराच्या बाबतीत.
भाविनला अगोदरपासूनच थोडा थोडा मायग्रेनचा त्रास होता. पण आताशा तो जरा जास्तच वाढायला लागला होता. पहिले महिन्यातून दोन तीनदा व्हायचा ते आठवड्यावर येता येता रोजच सुरू झाला. एकदा डोकं दुखायला लागलं की त्याला काही सुचायचंच नाही. खूप चिडचिड व्हायची त्याची. संध्याकाळची गर्दीची वेळ तर त्याला संभाळायला जमेनाच झाली. खूप तारांबळ उडायला लागली त्याची. हाताखालचा पोरगा होता, तो किती बघणार?
औषधं चालू होती, पण आराम मिळतच नव्हता.
डॉक्टरांनी त्याला महिनाभर तरी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्याने बरं वाटलं तर ठिक, नाहीतर त्रास कमी होईपर्यंत घरीच बसायचं. तशी भाविनला पण दुकानात जाऊन बसायची भीतीचं बसली मनात. तिथे गेलं की डोकं दुखणार हे त्याच्या मनानं धरलं. पण दुकान द्यायचं कोणाच्या हातात हा भाविनसमोर प्रश्न होता. हिरा तर त्याच्या दृष्टीने मठ्ठ होती. हाताखालचा पोरगा चलाख होता, हे त्यानं हेरलं होतं. दुसऱ्या कुणाला सांभाळायला द्यायचं म्हणजे पण मुश्किलच!!
भाविनला दुसरा कोणताही पर्याय योग्य न वाटल्याने, त्याने हिराला बोलावून सांगितलं, मी बरा होईपर्यंत जरा दुकानात लक्ष घाल. लक्ष घालायचं, नुसतं मख्खासारखं बसायचं नाही हे बोलायलाही तो विसरला नाही. मला सगळा हिशोब चोख द्यायचा. घरचं टेन्शन घ्यायचं नाही, ते मी बघतो, हे ही सांगितलं.
ऐकल्यावरच हिराला मनातून खूप आनंद झाला, पण तिने तो चेहऱ्यावर अजिबात दाखवला नाही. दाखवला असता तर भाविनने याचीच वाट पाहत होती वाटतं, म्हणून बोलायलाही मागेपुढे बघितलं नसतं.
हिराला सर्व मनाप्रमाणे करता येणार होतं, नजर ठेवायला भाविन नव्हता येणार तिथे.
पहिल्या दिवशीपासूनच हिराने सगळं आपल्या हातात घेतलं. तशी ती बसून सारं शिकलीच होती. फक्त आता प्रॅक्टिकली करायचं होतं.
येणारं गिऱ्हाईक बायकाच होत्या जास्त, त्यांना बरोबर गोडीत घेऊन, त्याची नस ओळखून एकाबरोबर दोन गोष्टी घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात हिरा अगदी पटकन वाकबगार झाली. इतकी की तिला तर गिऱ्हाईकचं कॉम्लिमेंट देऊ लागली, कोणी म्हणायचं; भाभी आप तो भाईसाबसे भी बढकर हो, कोणी म्हणायचं; अहो तुम्ही नेहमी असायचात त्यावेळी वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या बोलक्या असाल म्हणून, मस्त पटवता हं गिऱ्हाईकाला. किती काय काय बोलायच्या बायका-पोरी तिला!!
भाविनचं तोंडही तिने रोजचा रोज चोख हिशेब देऊन बंद करून टाकलं होतं. तो पोऱ्याला विचारायचा अधून मधून फोन करून, तोही एकदा भाभीजी आपसे अच्छा हँडल करती है शॉप बोलला, तेव्हापासून तर परत फोन केलाच नाही भाविनने त्याला.
त्यालाही दिसत होतं, प्रॉफिट त्याच्याहून जास्त मिळत होतं. हिरा सगळं त्याच्याहून चतुराईने हँडल करत होती.
दोन महिने झाल्यावर भाविनला जरा बरं वाटू लागलं, म्हणून त्याने हिराला घरी बसायचा सल्ला देऊन चुटकीसरशी बाजूला केलं. हिरा खरंतर रुळली होती चांगली, पण तिला वाटलं चला दोन महिने का होईना आपली इच्छा तर पूर्ण झाली!!
भाविन जाऊ तर लागला, पण दुकानात गेल्यावर पुन्हा त्याच्या मनाचा खेळ सुरू झाला. त्याला तिथे डोकं सारखं दुखल्यासारखच वाटायला लागायचं.
वरून नेहमीची गिऱ्हाईकं त्याला भाभीजीबद्दल विचारून हैराण करू लागली. दोन तीन बायांनी तर सल्लेही दिले, आप दुकानका काम भाभीजी को ही दे दो म्हणून…….
कसेबसे दोन तीन आठवडे भाविन गेला असेल दुकानात, त्यालाही वाटलं, हिरालाच हे सोपवावं, आपलं तर दुकानात जायचं म्हटलं की डोकच दुखल्यासारखं होतं. आणि रात्रीपर्यंत तर सहन होण्यापलीकडे जातं.
हिरा बघेल, आपण जाऊन बसू थोड्या वेळ हवतर वाटेल तेव्हा.
त्याने हिराला सांगितलं, माझं डोकं दुखतं तिथं गेलं की काही महिने तूच बघ.
डोकं दुखतं हे मानसिक, पण त्याच्या दृष्टीने खरं कारण असलं तरी हिरामुळे दुकानाचं प्रॉफिट वाढलेलं हे ही एक कारण होतंच. आणि गिऱ्हाईकं बायकोच्या हुषारीपुढे त्याला वेड्यात काढत होती हे ही एक कारण होतं. पण ते सर्व त्याला हिराला सांगायचं नव्हतं.
हिराला तर काय लॉटरी लागल्यासारखच झालं होतं.
तिला पुन्हा दुकान चालवायला मिळालं, अगदी मनाप्रमाणे. काही महिन्यांनी भाविनही यायला लागला, तिच्यासारखाच बारा साडेबाराला पोरांना शाळेत पोचवून, घरचं उरलं सुरलं आवरून.
आणि येऊन काय करायचा तर नुसता मख्खासारखा बसायचा फक्त, गिऱ्हाईकांवर लक्ष ठेवत. तेवढंच, त्याहून जास्त काही केलं तर त्याला लगेच डोकं दुखल्यासारखं वाटायचं…….
हिराच्या हातात दुकान आलं, आणि नंतर भाविनही!!
एक संधी काय मिळाली, हिराने स्वतःचं आयुष्यच लखलखून टाकलं…….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.