सकाळी रोजच्या सवयीने स्वस्तिकाने मोबाईल हातात घेतला, व्हॉट्सप चेक करायला. सुंदर सकाळच्या शुभेच्छा देणारे मेसेज वाचायला खूपच आवडायचं तिला. प्रसन्न व्हायची रोजच्या सकाळची सुरुवात, म्हणून ती उठली की पहिले तेच बघायची.
आजही तेच वाचता वाचता त्यातला एक मेसेज तिला खूपच आवडला, वाचता वाचताच तो तिच्या मनातच रुतून बसला. तो होता:
Train your mind to see good in everything!!
तिला वाटलं, खरंच असं करता आलं तर किती बरं होईल? मेली त्या मनाला सवय प्रत्येक गोष्टीत वाईट बघायचीच लागलीये. चांगलं यायच्या आधी मनात वाईटच येतं. एवढं तेवढुसं काही झालं की आपण केवढ्यावर जातो लगेच!!काही नाही आता see good in everything!! फॉलो करायचं म्हणजे करायचंच. मनाला प्रशिक्षित करायचं, सगळ्याssत चांगलं पाहायचंच.
स्वस्तिकाला असा विचार करूनच खूप पॉझिटिव्ह वाटलं.
ती नेहमी तशी लवकरच उठायची. तिला तिचा वेळ हवा असायचा, जो मुलगी उठली की तिला अजिबात मिळायचा नाही.
चला कामं सुरू करावी आता, म्हणत तिने घडयाळात बघितलं, सात वाजले होते. पटकन तिने नवऱ्याच्या डब्याची तयारी सुरू केली. तो साधारण सव्वा आठ पर्यंत बाहेर पडायचा. मग ती आणि तिचा वेळ दोघच असायचे, किमान तासभर तरी.
पटकन चहाचं आधण ठेवण्यासाठी तिनं गॅस पेटवायला घेतला, तर तो सुरूच होईना. दोनदा प्रयत्न करूनही तो पेटेना. स्वस्तिकाचं डोकं फिरलं, त्या निर्जीव गॅसबद्दल नाही नाही ते तोंडात येऊ लागलं. ह्याच्या तर…… आत्ताच जायचं होतं का? कळत नाही माणसांची घाईची वेळ असते, कधीही जातो नुसता……किती बोलू अन किती नको असं झालेलं त्या गॅसला. पण तेवढ्यात तिला सकाळी वाचलेला मेसेज डोळ्यासमोर आला, Train your mind to see good in everything!!
अग्गबाई!! ह्याच्यात काय चांगलं शोधू आता?
किती त्रासदायक आहे हे घाईच्या वेळी गॅस जाणं!!
असा विचार करतानाच तिच्या डोक्यात चमकलं, अय्यो, बरं झालं बाई सकाळी गेला तो, नवरा तरी आहे बदलून द्यायला. तो ऑफिसला गेल्यावर काय केलं असतं मी? तो सिलेंडर बदलायची तर फारच भीती वाटते बाई मला!
स्वस्तिकाला आपण कसं चुटकीत मनाला चांगल्याकडे वळवलं याचं फार कौतुक वाटलं.
आता ह्या बयेनी सकाळ सकाळ धक्क्याला लावलं असं वाटून, नवऱ्याने आपल्यावर व्हसकू नये म्हणून मधाळ शब्दाची पाखरण करत स्वस्तिकाने त्याला दुसरा गॅस लावून द्यायला सांगितलं. नवऱ्याने त्या शब्दांच्या जाळ्यात अडकून हूं की चूं न करता तडकाफडकी उठून तिला गॅस बदलून दिला.
स्वस्तिकाने मग फास्ट मोशन मध्ये जाऊन फटाफट पोळया केल्या, भाजी बनवली. डबा भरला, आणि नवऱ्याला फ्लाईंग किस देत टाटाही करून टाकला.
आता मी तासभर मोकळीss असं म्हणत स्वस्तिका मस्त गिरकी घ्यायला वळली, तोच तिला मागे आपली चार वर्षाची मुलगी डोळे चोळत उभी असलेली दिसली.
तेवढंच नाही तर ती गोड हसून म्हणाली, मी उठले. आता मी झोपणार नाssही.
स्वस्तिकाच्या तोंडावर सकाळच्या साडेआठ वाजता बारा वाजले. क्या सोचा था, क्या पाया करत तिने डोक्यावर हात मारला.
मागोमाग मनात सुरू झालं, एवढुसा वेळ मिळतो माझा मला, हिला काय घाई उठायची एवढी कुणास ठाऊक? झोपायला मिळतं तर झोपतही नाहीत हल्लीची पोरं. शी बाबा, आता मला काही मनासारखं नाही करता येणार, असे एकामागोमाग एक विचार मनात उड्या मारायला लागले, तेवढ्यात तिला आपण see good in everything!! फॉलो करायचं ठरवलेलं लकक्खन् आठवलं.
हट काय बघू गुड ह्याच्यात, माझ्या ‘मी टाइमाचे’ तीन तेरा वाजले इथे, मनात गुड आलं तरी त्याला ढकलून बाहेर काढावं वाटतय यावेळी. असं म्हणत तिने मुलीकडे बघितलं, तर ती स्वस्तिकाकडे बघून खट्याळ हसत होती.
स्वस्तिकाने मुलीला तसच उचललं, आणि म्हणाली आता एवढ्या लवकर उठून तू काय करणार? चल मी पण येते तुझ्याबरोबर, आपण झोपुया.
पण बहाद्दर मुलीने त्याला साफ नकार दिला आणि म्हणाली, एकदा उठलं की उठलं, परत झोपायचं नाssही.
स्वस्तिकाला जोरात ओरडून स्वतःलाच विचारावं वाटत होतं, आता यात काssssय आणि कसं गुड बघायचंsssss????
पण तरी आता ठरवलंय तर करायचंच, म्हणून तिने मनाला कसबसं समजावलं, पोरगी उठलीये तर आता पटापट सगळं आवरेल, मग खेळता खेळता कंटाळून कोण सांगावं दुपारी पोरगी झोपेलही!! एकदा उठली की थेट रात्रीच झोपणारी पोरगी दुपारी झोपेल, या विचारावर एवढी काही कन्विन्स् नव्हती स्वस्तिका, पण see good in everything!! एक दिवस तरी नेटाने जमवावं म्हणून तिने त्या विचाराला जबरदस्ती मनात कोंडून अडकवलं.
पोरीचं आवरायला घेतलं, तेवढ्यात फोन वाजला. सासूबाईंचं नाव दिसलं तशा कपाळावर आठ्या पडल्या तिच्या, पण ते see good आठवलं तसं, त्या आठ्यांना प्रयत्नपूर्वक खाली आणत चांगला विचार करून तिने फोन उचलला.
इकडचं तिकडचं बोलून सासूबाई खोचक सुरात म्हणाल्या, तो आमच्या बाजूचा दिन्या येतोय ना चार दिवसांनी तिकडं मुंबईला, त्याच्याबरोबर माझ्या हातचा मसाला पाठवतीये, म्हणजे जरा चव येईल हो स्वैपाकाला.
हे ऐकलं आणि स्वस्तिकाच्या डोक्यात तिडीक गेली, बोला ना सरळ मी बेचव बनवते म्हणून, अडून कशाला बोलता, आणखीनही वेडं वाकडं काय काय मनात येऊ लागलं, अन् त्याबरोबर तो see good वाला मेसेजही डोळ्यासमोर फ्लॅश झाला, तसं तीने ते वाईट साईट मनातलं मनातच ठेवलं आणि सासूबाईंना म्हणाली, पाठवा हो पाठवा. पण नुसताच मसाला नका हं पाठवू. तुम्ही बेसनाचे लाडू छान करता ते ही पाठवा. कालच तुमचा मुलगा आठवण काढत होता. आणि खाऱ्या शंकरपाळ्या पण पाठवा, तुमच्या नातीला ना खूप आवडतात तुमच्या हातच्या. जमलं तर एखाद किलोच्या चकल्या पाठवाल का? फार मन करताय हो माझं, तुमचा हात तो तुमचाच हात!! तुमच्या हाताची सर कितीही झालं तरी मला नाहीच येणार. बघा जमलं तर हा; बळजबरी नाही, दिनू भाऊजी एवीतेवी येणारच आहेत म्हणून म्हटलं हो…….
स्वस्तिकाची लिस्ट ऐकून सासुबाई पुढे काय बोलायचं तेच विसरल्या आणि बघते जमलं तर म्हणून त्यांनी फोन ठेऊन दिला.
तशी स्वस्तिकाने आनंदाने उडीच मारली, तिला वाटलं, तो see good वाला मेसेज काय डोळयासमोर फ्लॅश झाला अन् कसलं बोलायला सुचलं मला. नाहीतर इतर वेळी त्या असं काही बोलल्या की त्यांना मनातल्या मनात कोसण्यातच एनर्जी जाते माझी सगळी. दिवसभर वैताग वैताग होतो नुसता. पण आज कसलं भारी वाटतय मला.
ते सक्काळ सक्काळ गॅस जाणं, ते पोरीने माझे निवांत क्षण सुखाने घालवण्याच्या वेळेचा बट्ट्याबोळ करणं, आणखी भले काहीsही होणं, सगळं सगळं एकीकडे, आणि ही अशी सासूबाईंंची बोलती बंद करायला मिळणं एकीकडे.
मनाला see good in everything म्हणत ट्रेन करण्याचा असाही काही परिणाम होईल, हे तर स्वप्नातही वाटलं नव्हतं मला.
अशा परिणामांसाठी एक दिवस काय, कायमचं ट्रेन करून टाकेन मी मनाला, सगळयात चांगलं म्हणजे चांगलंच बघायला!!
स्वस्तिका तो एकच नाही तर पुढचे चार दिवस हवेतच होती……राहून राहून भारीच फुदकायला येत होतं तिला!!
ही तर आता कायम जमवून घेणारच बघा सगळ्यात चांगलं बघायला, तुमचं काय??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.