ऋषी आणि मयंक दोघे छोटे दोस्त…… बरेचदा दिवसभर एकत्रच खेळायचे. जोडी शिशुवर्गातलीच असल्याने शाळा सुटली की, कधी एकदा खेळायला जातोय असं व्हायचं दोघांना. कधी दोघेच तर कधी इतर बाळगोपाळांची फौज असायची त्यांच्याबरोबर. दिवसभर घरी आणि संध्याकाळी बाहेर बिल्डिंगच्या आवारात.
सर्व मुलांना ऋषीच्या घरी खेळायला जास्त आवडायचं. कारण त्याच्या घरी त्यांना हवं ते करायला मिळायचं.
मयंक तर घरी दप्तर टाकून पहिले ऋषिकडे धावायचा.
आता घरात खेळायचं म्हटल्यावर घरातली आहेत नाहीत ती सगळी खेळणी घरभर पसरलेली असायची. सगळंच हवं असायचं त्यांना समोर.
ऋषीची आई पण मुलांना हवं ते सगळं खेळायला द्यायची, पसारा होतो म्हणून कधी वर ठेवली जायचीच नाहीत खेळणी. मुलं अगदी स्वतःच्या हाताने पाहिजे ती खेळणी घेऊन खेळायची. आणि खेळून झाल्यावर आवरायलाही मदत करायची.
ऋषीला लहान लहान रेसिंग कारची खूप आवड होती. त्यालाच काय त्याच्या वडिलांनाही खूप आवडायच्या त्या गाड्या. दोघांनी त्याचा खजिनाच जमवलेला होता.
रोज ऋषी आपल्या जवळ त्या गाड्यांची लाईन लावून झोपायचा. आणि सर्व गाड्या त्याला त्या लाईनीत लागायच्या. एक जरी नसेल तरी शोधाशोध करायला लावायचा.
पण हल्ली जरा रोजच त्याच्या एकेक दोन दोन गाड्या कमी दिसायला लागल्या होत्या. असेल घरातच कोपऱ्यात, बेडखाली कुठेतरी म्हणून लक्ष दिले नाही त्याच्या आईवडिलांनी.
पण एक दिवस ऋषीचा दुसरा मित्र घरी आला तेव्हा तो म्हणाला, अरे तुझ्या तीन चार गाड्या मी मयंकच्या घरी पहिल्या. मी त्याला म्हटलं सुद्धा, या ऋषीच्या आहेत ना?? तर तो म्हणाला नाही मी बाबांबरोबर दुकानात जाऊन आणल्यात.
ऋषीची आई सारं ऐकत होती ती म्हणाली, असतील रे त्याच्याच. तर तो मित्र म्हणाला, नाही त्या ऋषीच्याच आहेत, मी ओळखतो ना, मी पण खेळायचो ना त्याने.
आता आली का पंचाईत!!!
ऋषीच्या आईने सर्वात प्रथम सारं घर धुंडाळलं. घरात कुठेच त्या गाड्या नव्हत्या.
तसं खरंतर तिनेही एकदा मयंकला एक खेळणं डायरेक्ट न विचारता नेताना पाहिलं होतं, तिने त्यावेळी त्याला तसं न करण्याबाबत समजावलंही होतं.
आणि नंतरही तो असं काही करत असेल हे तिला वाटलं देखील नाही. कारण मयंक एक उच्च मध्यमवर्गीय घरातला मुलगा होता. त्याच्या घरी खेळण्यांची रास लागलेली होती. मागेल ते आणि न मागताही बरंच त्याला मिळत होतं.त्यामुळे तो असं काही घरातून नेत असेल याची शंका सुद्धा आली नाही तिला कधी.
शेवटी तिने हा प्रकार मयंकच्या घरच्यांच्या कानावर घालायचा ठरवला. पण त्याच्या घरच्यांनी ते काही ऐकलच नाही. उलट थोडा कांगावाच केला. आमच्या मुलाकडे खूप सारी खेळणी आहेत. तुमचा गैरसमज झालाय. तुम्ही उगाच आळ घेताय त्याच्यावर हाच हेका त्यांनी पकडून ठेवला.
खरंच, त्यांच्याकडे अति प्रमाणात खेळणी असल्याने, मुलगा आपलं खेळतोय का दुसऱ्याचं हे त्यांना कळलंच नाही.
आता काय करावं असा ऋषीच्या आईला प्रश्न पडला. प्रश्न फक्त खेळण्यांचा नव्हता, तर एका लहान मुलाला नीट समज देण्याचाही होता. ज्याला त्याच्या घरच्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आणि विशेष म्हणजे मयंक त्याच्या घरच्यांना सुद्धा माझीच खेळणी आहेत ती असं तोंडावर न घाबरता सांगत होता. सवय वाईट आणि योग्य वेळी आळा बसला नाही तर वाढत जाणारी होती.
दोन्ही पोरांचं खेळणं अजूनही सुरू होतं. पण ऋषीच्या आईला असं गप्प बसणं खटकत होतं. श्रीमंत घरचा पोर म्हणू तोंड दाबून बसणं तिला अयोग्य वाटत होतं आणि मुलालाही समज देणं गरजेचं होतं. कारण हे प्रकरण गप्प बसून मिटवलं असतं तर मयंकलाही आपण करतोय ते काही गैर नाही असच वाटलं असतं आणि प्रकरण पुढे हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
शेवटी तिने ऋषीच्या बाबांबरोबर चर्चा केली. त्यांनाही मयंकला असच सोडणं बरोबर वाटलं नाही. काय करायचं मग?? ऋषींच्या बाबांना एक उपाय सुचला. ऋषी आणि मयंक तसे जानी दोस्त. त्यांनी ऋषीच्या आईला, मयंक घरी खेळायला आला की त्याला घरी न घेता गाड्या आणून दिल्यास तर ऋषी तुझ्याशी खेळणार असं सांगायला सांगितलं. याचा परिणाम नक्की होईल असं त्यांना वाटत होतं.
पण हे करणं वाटतं तेवढं सोप्प नव्हतं. दिवसभर एकत्र खेळणाऱ्या मुलांना वेगळं कसं करायचं??
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मयंक दप्तर घरी टाकून खेळायला आला, आणि ऋषीच्या आईने त्याला तू नेलेली खेळणी घेऊन ये मग ऋषी तुझ्याशी खेळणार अस सांगितलं. मयंक पुन्हा ती माझी आहेत, मी नाही कोणाची घेतली असंच म्हणू लागला.
इकडे ऋषीही मयंकला घरी घेण्यासाठी ओरडू लागला.पण मनाने ऋषीच्या आईने मयंकला घरी पाठवलं.त्याच दिवशी तो पुन्हा चार वेळा आला, पुन्हा तिने तेच सांगितलं.
असे तीन दिवस निघून गेले. मयंक रोज दिवसातून बरेचदा यायचा, ऋषीही रडायचा, तो हवाय म्हणून. ऋषीच्या आईला तर नकोसं वाटायचं हे सारं.
आणि मग चौथ्या दिवशी तो येऊन स्वतःहूनच म्हणाला, खेळणी घरी सापडत नाहीयेत. शोधून आणून देतो.
ऋषींच्या आईला मनातून खूप बरं वाटलं. मुलगा समजायला लागला होता तर…..
मग पाचव्या दिवशी एक नेलेली गाडी आली. त्याचं कौतुक करून ऋषीच्या आईने मयंकला त्याही दिवशी घरात नाही घेतलं.
मग सहाव्या दिवशी दुसरी गाडी आली. आता त्याला कळत होतं, आपण सर्व गाड्या आणून दिल्यावरच ऋषीबरोबर खेळायला मिळणार.
त्याच्या घरच्यांनाही चूक लक्षात आली आणि घरातल्या कानाकोपऱ्यात पडलेल्या गाड्या त्यांनी शोधून आणून देऊन टाकल्या आणि झाल्या प्रकाराबदद्दल ऋषीच्या घरच्यांची माफीही मागितली. आणि पुन्हा असे दुर्लक्ष होणार नाही याची हमीही दिली.
सर्व गाड्या आणून दिल्याबद्दल मयंकला ऋषीच्या आई बाबांनी छानसं बक्षीस दिलं. आता योग्य अयोग्य त्याला कृतीद्वारेच समजलं होतं.
उद्देश गाड्या मिळवण्याचा नव्हताच मुळी. छोट्या मुलाला समज देण्याचा होता. जे त्याच्या स्वतःच्या पालकांनी नाकारलं होतं. ओरडून रागवून किंवा नको ते बोलून तो साध्य होणार नव्हता. त्याचं वागणं आपल्या दृष्टीने चुकीचं असलं तरी त्याच्या दृष्टीने फक्त मला पाहिजे होतं ते मी मिळवलं. एवढं साधं होत. त्याच्या घरातही मनात आलेलं सारं त्याला विनासायास मिळत होतं. त्याला कमी होतं म्हणून नाही तर त्याला आवडलं होतं म्हणून त्याने ते घेतलेलं, पण चुकीच्या मार्गाने. आपल्याला आवडणारी वस्तू मिळवणं एवढंच त्याच्या मनात, त्याला योग्य अयोग्य काय माहित असणार पालकांनी समजावल्याशिवाय किंवा त्याने स्वतः अनुभवल्याशिवाय!!!
आता दोन्ही मुलं पाहिल्यासारखीच छान खेळू लागली. आणि रात्री झोपताना ऋषीलाही त्याच्या सर्व गाड्या लाईनीत हजर दिसू लागल्या.
मयंक अजूनही आवडलेली गोष्ट घेत होता पण विचारून. आणि नंतर स्वतःहून परत आणूनही द्यायला लागला.
मयंक चुकला पण शिकलाही, अगदी योग्य प्रकारे!!!
कठीण आहे खरं, पालकत्व निभावणं. प्रत्येक टप्प्यावर काही न काही चॅलेंज उभं ठाकलेल असतचं. ते कुठल्या मार्गाने सोडवायच हे बाकी आपल्याच हातात असतं. कधी मुल आपलं असतं कधी दुसऱ्याचं. पण पालकत्व मात्र दोघांसाठी सारखंच असायला हवं नाही का??
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा असं समजणारं तर नक्कीच नसावं पालकत्व……..!!!
काय वाटतं तुम्हाला???
©स्नेहल अखिला अन्वित
लेख आवडल्यास मला फॉलो करायला विसरू नका हं!!!