ती माझी आवडती नव्हतीच कधी. मी तिचा एकही पिक्चर सुद्धा बघितला नाहिये आजवर. माझ्या खिजगणतीतच नव्हती ती म्हटलं तरी चालेल.
पण अचानक मागच्या वर्षीपासून तिच्याबद्दल काय काय ऐकू यायला लागलं. कोणी तिचं कौतुक करत होतं तर कोणी तिला शिव्या घालत होतं. एकदम स्पॉटलाईट मधेच आली ती.
मग साहजिकच अनेकांप्रमाणे ती माझ्याही नजरेत भरली ………
काय केलं होतं तिने एवढं????
असं काय घडलं तिच्या हातून????
तिने निडर होऊन आपल्यावर झालेल्या लैंंगिक अत्याचारविरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत केली अन् त्या आवाजाने प्रत्येक स्त्रीच्या मनात वादळ आणलं, पाहता पाहता त्या वादळाने इतका जोर धरला की ते फोफावलं, सुसाट सुटलं; भल्याभल्यांना या वादळाने तर चांगलाच झटका दिला.
तिने शिंग काय फुंकलं आणि आतापर्यंत तोंड दाबून बसलेल्या साऱ्या पिडिता रणरागिणी बनून या युद्धात सामील झाल्या.
तिने धुमसणाऱ्या निखाऱ्यावर अशी काही फुंकर मारली की त्याचा भडकाच उडाला.
कोणी तिला काहीही बोला पण भारतात #Metoo सारख्या चळवळीने हलचल माजवून असंख्य पिडितांना बोलतं करायचं श्रेय तिलाच द्यायला पाहिजे.
सांगा ना, कोण बोलत होत या गोष्टीवर अगोदर?? किती स्त्रियांनी पुढे येऊन सांगितलं होतं??? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच!!! पण तिच्याकडून उभारी घेऊन मात्र अक्षरशः कैक स्त्रिया पुढे आल्या.
कोण कोण काय काय झेलत होतं, वर्षानुवर्षे मनात कोंडून ठेवलेलं दुःख कितीतरी जणींनी मोकळं केलं.
किती यातना झाल्या असतील त्यांना हे सारं मनात ठेवताना, विसरू म्हणता विसरता न येण्याजोगं आणि आठवलं की फक्त वेदनेने मूक व्हिवळायला लावणारं.
हो ना, सांगणार तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण???
कोणाला घरातच भावाने हात लावलेला, कोणाला वडिलांनी तर कोणाला कुठल्या नातेवाईकाने डंख मारुन बालपण नासवलेलं. आपण बाहेरच्या गोष्टी करतो, बऱ्याचजणींचं घरही सुरक्षित नसतं हो.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाचे किस्से तर अगणितच.
एकही पेशा सुटला नाहीये याच्या तावडीतून, सर्व ठिकाणी हे वासनेने वखवखलेले किडे वळवळत आहेतच.
कित्येकांच्या डोक्यात बाई ही सर्व प्रकारे उपसण्याचीच गोष्ट आहे, हे अजूनही फिट्ट बसलेलं आहे.
‘माल बस्स माल’ म्हणूनच बघतात तिच्याकडे, आणि मग तसच वागवतात तिला. कुठेही रस्त्यावर, गर्दीत, प्रवासात हातात यायला पाहिजे फक्त. ना तिच्या वयाचं भान ना कुठल्या नात्याचं भान, स्त्री आहे ती म्हणजे भोगणं जन्मापासून चिकटलच तिला.
कोणाला सांगणारे ती, काय करणारे ती, जाऊन जाऊन कुठे जाणारे ती.
पण आता त्याच शोषितेला कुणीतरी प्रवृत्त केलं, तिच्यातल्या रणरागिणीला जागं करून मैदानात उतरण्याच आव्हान दिलं.
आता मात्र स्त्रीने मशाल पेटवलीये आणि त्या मशालीतून पुढच्या कित्येक मशाली पेटून उठल्यात, आणि अजूनही उठतील. आता स्त्री आवाज उठवायला लागलीये, तिला कळलंय गप्प बसून नाही तर सणसणीत चपराक हाणल्याशिवाय हे किडे वळवळायचे थांबणार नाहीत. आता यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओरबाडून काढलाच पाहिजे. मी मुखवटा म्हटलं कारण बरेचदा हे दिसायला जेंटलमनच असतात. आणि लोकांना वाटतही नाही ह्याने काही काडी केली असेल.
आजही कित्येक जण अनेकींचे आयुष्य नासवून नामानिराळे फिरत आहेत. आणि आपण काही चुकीचं केलय ही जाणीवही त्याच्या मनाला शिवलेली नसते.
काय वाटत असेल त्या स्त्रीला अशा नराधमाला असं राजरोसपणे वावरताना बघून.
खरंय, सगळेच पुरुष सारखेच नसतात, कित्येक खरोखर चांगले देखील आहेत.
फक्त त्यांनी, कोणी एखादा स्त्रीला हिणवत असेल, शोषत असेल तर बघ्याची भूमिका न घेता, स्त्रियांवरून होणाऱ्या अश्लील विनोदांवर टाळीला टाळी न देता समोरच्याची कानउघडणी करावी….बदलाला सुरुवात करावी, रणरागिणींनी पेटवलेली मशाल तेवती ठेवावी.
मैत्रिणींनो, खरंच खूप चांगलं करताय पुढे येऊन, अश्याच हाकेला साथ देत राहा, आवाज देत रहा, आवाज वाढवत राहा, दबू नका, खचू नका, पेटवलेली मशाल विझू देऊ नका.
जसा प्रसंग तशी रूपं बाहेर काढायचीच वेळ आलीये आता.
प्रेमळ, हळवी, सोशिक, निस्पृह ही तर सदोदित आहेतच, पण प्रसंगी निर्भया, मर्दानी आणि रणरागिणी सुद्धा बनायला हवंच नाही का???
कोणी नामानिराळं सुटायला नकोच आता !!!
©स्नेहल अखिला अन्वित
आवडलं तर मला फॉलो नक्की करा बरं का😊