कल्याणी- सॉरी हं, माझ्या आईने यावेळी तुला खूपच त्रास दिला नाही का?
कबीर- काय? कसला त्रास?? ठिक आहेस ना???
कल्याणी- अरे नाही मी पाहिलं ना, आई तुला फारच कामं लावत होती रे. चार दिवस जरा चेंज म्हणून गेलो, तर नुसती हे कर ते कर म्हणून मागे लागलेली तुझ्या.
कबीर- ए, तू काय वेडीबिडी झाली का ग?
तुझी आई मला कधीतरी काही काम सांगते का? उलट स्वतःच जास्त कष्ट घेऊन किती खातिरदारी करते ती माझी!!
कल्याणी- नाही रे नाही, खातिरदारी कसली करतेय, धुसपुसत असते तुझ्यावर नुसती!!
कबीर- काय झालंय तुला? अस का बोलतीयेस?
कल्याणी- त्यातून तुझी आवड निवड पण जपत नाही रे जरा सुदधा. मला फार वाईट वाटतं बघ.
कबीर- अगं काय बोलतेस ?? सगळं जेवण माझ्या आवडीचं असतं, सारखी बघत असते मला काय हवं अन् काय नको ते.
मला तर कधी कधी वाटत ते तुझं घर आहे की माझं? कारण तुझ्या घरात लाड, माझेच चालू असतात!!
कल्याणी- हो ना? मग तुझ्या घरात मला अशी ट्रिटमेंट का नाही मिळत रे? सांग ना?
कबीर- हे काय आता?
कल्याणी- तुझं घर मला माझंच घर असल्यासारखं का नाही वाटत?
तुझी आई माझे लाड का करत नाही, सांग ना?
आपण इथे मुंबईत तुझ्या नोकरीनिमित्त राहतो. सुट्टी मिळेल तसं कधी तुझ्या गावाला, कधी माझ्या गावाला जातो.
कधी बघितलस का रे तुझ्या आईने माझी काही खातिरदारी केलेली?
सांग बरं आठवतंय का तुझ्या आईने कधी माझ्या आवडीचं जेवण केलेलं?
मला काय हवं नको ते बघितलेलं? ते जाऊ दे सगळं, किमान मला प्रेमाने जवळ बोलावून माझं एका तरी बाबतीत कौतुक केलेलं?
कबीर- ????
कल्याणी- उलट मी येणार म्हटलं की चार जास्तीची काम काढून ठेवतात त्या, चला येणारच आहे तर तिच्याकडूनच करून घेऊया. तुझ्या आवडीचे पदार्थ आठवणीने करून घालतात, चांगला ढेकर दिलास तरी तुलाच आणखी खा खा करतात.
सुनेला मात्र काय हवं नको ते ढुंकूनही विचारत नाहीत.
बरं तसं तर काही वैरही नाही रे आमचं!!
वैर व्हायला आम्ही एकत्र राहिलोय तरी कुठे एवढं? पण तरीही आतून काही येतच नसावं का सुनेसाठी?
मग आमच्या आयांना कसं वाटतं जावयासाठी? का आपल्या मुलीचा नवरा म्हणून कोडकौतुकं करत बसतात तुमची?
कबीर- हे कधी लक्षात आलंच नाही ग माझ्या!
कल्याणी- तू बघत होतास तरी तुला काही खटकलं नाही.
माझी अपेक्षा होती रे, कधीतरी तू आईला बोलशील.
आई, हिच्या घरी माझा किती थाट असतो, मग आपल्या घरी तू हिच्याशी का असं वागतेस?
अगदी ओतू जाण्याइतपत नाही तरी थोडा तरी ओलावा दाखवायला काय हरकत आहे रे?
आम्ही कितीही आई आई करून पुढे पुढे केलं तरी त्या सासूबाई बनून आम्हाला मागे खेचणारच, असं का?
कितीही म्हटलं तरी वाईट वाटतंच रे मलाही, विशेष करून माझ्या घरात तुझे होणारे लाड पाहून!
तू नाही बोललास म्हणून तुझ्या खास हे लक्षात आणून द्यावं लागलं.
मुलीच्या घरी जावयाची नेहमीच दिवाळी, मग मुलाच्या घरी सूनेच्या वाट्याला नेहमी शिमगाच कसा??
जमलं तर कधी तरी नक्की विचारून बघ, उत्तर मलाही ऐकायला आवडेल!!
आता कबीर कधी विचारेल आणि कधी कल्याणीला उत्तर मिळेल, देवच जाणे…….
पण तोपर्यंत तुम्हाला कुणाला उत्तर माहीत असेल तर मलाही वाचायला आवडेल बरं का!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Mast
Excellent
😕
Khup mastcha