तर हि गोष्ट आहे आमच्या घरासमोरच लागलेल्या एका लग्नाची……..
आता घरासमोर कसं??? तर काय आहे आमच्या घरासमोर भलं मोssठं पटांगण आहे. आणि त्याचा उपयोग मुलांना खेळण्यासाठी सोडून, बाकी सर्व कामासाठी मोठ्या मनाने करू दिला जातो.
इतरवेळी ते परिसरातील सर्व गाड्यांसाठी पार्किंग झोन असतं. हळद, लग्न, साखरपुडा, मोठ्या पूजा अर्चा यांचाही घाट तिथे आवर्जून घातला जातो. पण पोरांना खेळायला काही जागा ठेवत नाहीत अजिबातच!!!
जाऊदे, हा काही आजचा विषयच नाहीये आपला😏
तर आता आपण लग्नाकडे वळूया😊
मैदानात कुठलाही समारंभ आहे, असं कानावर आलं की माझी खूप सटकते. समारंभाचा त्रास काही नाही, पण ते आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी ढणाणा गाणी वाजतात; त्याने डोकं अगदी उठतं बाबा.
पहिले फक्त दहा मिनिटं बरं वाटतं, एखाद्या गाण्यावर थिरकून पण घेते मी, पण त्यानंतर मात्र डोक्यात जायला लागतात. ना घरातल्या टिव्हीचा आवाज ऐकू येतो, ना कोण काय बोलतय ते कळतं. नुसते हातवारे करून तरी किती वेळ बोलायचं?? मनातल्या भावना किमान पोरांपर्यंत पोचायला तोंड उघडावच लागतं ना?? नवऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही तो बायकोची कुठलीही भाषा समजतो.
जाऊदे, “नवरा बायको आणि त्यांची पोरं बाळं” हा काही आजचा विषयच नाहीये आपला😏
पुन्हा लग्नाकडेच वळूया😊
तर हे आज डोकं भणभणवून सोडणार हे डोक्यात फिट्ट असताना, या लग्नाने अतिशय सुखद धक्का दिला मला.
मी खरंतर या लग्नाच्या दिवशी कुठंतरी पळून जायचा प्लॅन केला होता, पण टिव्हीवर मॅच असल्याने नवरा काही माझ्याबरोबर पळायला तयार होईना.
लग्न तसं अतिदूरच्या ओळखीतलं होतं. दोन्ही पोरं नाचत नाचत गेली. आणि मी घरी बसून ह्यांचा दणदणाट सहन करण्याची मानसिक तयारी करू लागले.
बट फॉर माय सरप्राईज दणदणाट सुरू न होता, सुरू झाली छान गाजलेली एक सो एक मराठी प्रेमगीतांची मैफिल. ती सुद्धा अगदी कानाला त्रास होणार नाही या आवाजात. असलं रोमँटिक वातावरण करून टाकलं होतं त्यांनी. त्यांच्याच इथे नाही तर माझ्या घरातसुद्धा.
पोरं लग्नातच मिरवत असल्याने घरी फक्त आम्ही दोघे राजा राणी…………
आणि गाणी ……गाणी सुरू होती💕
मधुराणी तुला सांगू का….
प्रितीच्या चांदराती….
हा रुसवा सोड सखे…
प्रितीचं झुळझुळ पाणी….
नाते जुळले मनाशी मनाचे
हसले आधी कुणी
तुला न कळले
फुलं स्वप्नाला आली ग 💕
आणखी ही बरीच, मनाला सुखावणारी ऐकतच राहावी वाटणारी मराठी युगुलगीतं💏
रविवारची संध्याकाळ, कधी नव्हे ते घर शांत निवांत, वातावरणाला साजेसं सुमधुर संगीत!!!
नेमक्या मेणबत्त्या नव्हत्या घरी, नाहीतर एखादी लावून आणखी सुंदर वातावरण निर्मिती केली असती मी. मला तर ती गाणी कोणी आमच्यासाठीच लावलीयेत असं वाटत होतं.
मी आपली चेहऱ्यावर प्रेमभाव घेऊन हळूच चोरून बघत होते नवऱ्याकडे. त्याच गाण्यांमधल्या हिरॉईनींचा आव देखील आणला होता चेहऱ्यावर (सालस, सोशिक, शालीन, कुटुंबवत्सल)!!!
पण नवरा काही माझ्याकडे ढुंकूनही बघेना, त्याचा जीव त्या मॅच मध्ये अडकून बसला होता. तो त्या क्रिकेटर्सवर टवके टाकत बसलेला. सो इन्सलटिंग😞
मला खूप वाटत होतं, नवऱ्याने मांडीवर डोकं ठेवावं, मी हळुवार त्याच्या केसात हात फिरवावा, गुलू गुलू करावं, खुदु खुदु हसावं; पण या दुष्ट नवऱ्यांना मॅचपुढे काsही काsही दिसत नाही.
बेकदर…..बेखबर……बेवफाssss बालमा😡😠
आहिस्ता आहिस्ता त्याला ठोसे मारत बसले मग, तेवढीच जीवाला शांती मिळाली.
जाऊदे, तसाही “आमचा राहून गेलेला रोमान्स” हा काही आजचा विषयच नाहीये आपला😏
लग्नाकडेच वळलेलं बरं😊
तर या लग्नात जसजशी रात्र होत होती, तसतसा गाण्यांचा आवाजही कमी होत होता. अगदी दृष्ट काढावी वाटत होती मला त्यांची. ही ज्या कोणाची आयडिया असेल त्या अज्ञातावर कित्ती कित्ती स्तुतीसुमने उधळली मी रिकामटेकडी बसून.
एवढं समाजभान कुठं असतं का हल्ली???
एवढी लग्न लागली आमच्या घरासमोर, स्पिकर फाटायचा बाकी ठेवलेला लोकांनी. आमच्या इथे तर मी पहिल्यांदाच बघत होते असं काही धुंद वातावरणात चाललेलं.
अहो, एकदा सत्यनारायणाची पूजा होती, कोपऱ्यावरच्या बिल्डिंगमध्ये तर आख्ख्या चौकात ऐकू नाही गेलं तर सत्यनारायण कोपेल, अशा आवाजात पूजा तर म्हटलीच आणि त्यानंतर प्रसाद म्हणून रात्री एक वाजेपर्यंत धिंssचाक गाणी ऐकवली सगळ्यांना.
लग्नांच्या वरातींच कौतुक तर काय विचारायलाच नको.वरात किती वाजता का येईना, आपल्या एरियात आल्यावर वाजत गाजतच आणली पाहिजे हे कोणी डोक्यावर बंदूक ठेऊन कम्पलसरी केल्यासारखं करतात बरीच मंडळी.
खोटं वाटेल तुम्हाला कदाचित, पण मागे आमच्या इथल्या बड्या राजकीय प्रस्थाच्या लेकाची वरात रात्री तीन वाजता तितक्याच मोठ्या आवाजात, धडाड् धूम्म् फटाक्याच्या माळा लावत अतिउत्साहात वाजवत आणली होती. तासभर धिंगाणा चालला होता.
माझा मुलगा सहा महिन्यांचा होता, दचकून जागा झाला ते पुढे झोपायचं काही नाव घेईना.
ते सोडा पण आजारी वृद्ध माणसांचं काय???
तुमच्या अतिआनंदाचा त्रास बाकीच्यांनी का सहन करायचा???
अशावेळी यांना साष्टांग नमस्कार घालून सांगावसं वाटतं, मंडळी तुमचं कौतुक तुमच्यापाशीच ठेवा हो!!!
पण कोणीही (अगदी माझ्यासकट) ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावर…..आणि त्यांनी पोलिसांना खरोखरचं चहा पाणी देऊन त्यात गुंगीचं औषध घातलं असावं याची मला खात्रीच आहे.
नाहीतर नॉर्मल बापडा कोणी असता आणि चुकून असं काही करायला गेला असता तर त्याची मानगूट पिरगळून टाकायला असतील तिथून धावत आले असते हे बहाद्दर.
राजकारणीयोंका सब चलता है……..त्यांना आमच्यासारख्या मुखदुर्बळ जनतेच माफ केलंय सारं!!!
जाऊदे, “राजकारण्यांची मुजोरी” हा काही आजचा विषयच नाहीये आपला😏
लग्नाचं चाललेलं आपलं😊
तर या सगळ्या अनुभवावरनं हे लग्न मात्र वेगळं वाटलं, आवडलं म्हणूनच त्याच्या कौतुकाप्रित्यर्थ एवढं सारं लिहायचा घाट घातला. त्यांना तर मी मुद्दाम जाऊन सांगितलं सुद्धा……तुम्हा मंडळींना, आपल्या वधु- वरांचे दोनाचे चार हात करताना झालेला आनंद आम्हालाही सुखावून गेला हो!!
या नवदाम्पत्याची वैवाहिक जीवनाची वाटचाल सुख-समाधानाने आणि अशीच सामाजिक भान जोपासत बहरू दे. त्या युगुलगीतांसारखाच गोडवा यांच्यात कायम राहूदे.💑
एव्हाना विषय लक्षात आला असेलच नाही मंडळी तुमच्या, तेवढे सुज्ञ नक्कीच असणार तुम्ही!!!
भान राखण्याची अपेक्षा तुमच्याकडून सुद्धा आहे बरं का…….जमतंयच मग आपलं!!!
©स्नेहल अखिला अन्वित
फोटोतलं धम्माल जोडपं गुगलने शोधून दिलंय बरं का😍
खुप सुंदर