Ohh my god!!! अरे हे काय, ही कसली पोस्ट टाकलीय ?? चित्रा जवळजवळ ओरडूनच म्हणाली.
रात्री झोपण्यापूर्वी एकदा फेसबुक वर चक्कर मारून यायची, दहा पंधरा मिनिटं सर्वांचे हालहवाल जाणून घ्यायचे हा चित्राचा रोजचा कार्यक्रम……..
आज मात्र फेसबुक उघडल्यावर भलतीच पोस्ट तिच्या समोर आली.
तिच्या फ्रेंडलिस्ट मधल्या एकाने टाकली होती….
मी सोडून जात आहे कायमचं……Goodbye friends
अगदी मोठ्या अक्षरात पोस्ट केलं होतं त्याने….
तिला एकदम धक्काच बसला……
टाकून फक्त एक मिनिटं झालेलं….. तिने हलवून नवऱ्याला उठवलं आणि ती पोस्ट दाखवली.
तो मित्र तसा काही तिचा खूप ओळखीतला नव्हता. कॉलेजमधला होता, म्हणून तिने फेसबुकवर त्याची रिक्वेस्ट स्विकारलेली एवढंच.
तिच्या नवऱ्याला सौरभलाही काळजी वाटली. कारण हल्ली हे फेसबुक वर लाईव्ह प्रदर्शन करून, सर्वांना सांगून मरणारे महाभाग बरेच उपजले होते.
अजून त्या पोस्टवर कोणी आलं नव्हतं. रात्रीचा एक वाजला होता.
चित्राने स्क्रिनशॉट काढून कॉलेजच्या ग्रुपवर पाठवला, कोणाला घर माहिती असेल तर जाण्यासाठी.
पण ग्रुपवर कोणीही जागं नव्हतं.
एवढ्यात त्याच्या पोस्टवर दोन जणं येऊन काळजी दाखवून गेले.
चित्राने त्यांनाही विचारलं, नंबर मागितला, पण सर्व दूरचेच होते, कोणाकडेही काही डिटेल्स नव्हत्या.
मग सौरभ म्हणाला, आपण पोलिसांना फोन लावूया.
चित्रा म्हणाली पोलीस??? आणि त्यांनी प्रकरण आपल्याच अंगावर शेकवलं तर. मी असं ऐकलंय की ते कम्प्लेंट करणाऱ्याच्याच पाठी लागतात.
सौरभ म्हणाला, असे कसे लागतील पाठी?? आपण काय केलय??
पण चित्राला भीती वाटतच होती. पोलिसांशी कधी संबंध आला नव्हता. आणि ऐकलं होतं ते सारं वाईटच होतं.
सौरभ म्हणाला हे बघ, आता आपण पोस्ट पाहिली, काय असेल ते असेल, पण उद्या खरच याचं काही वाईट झालं, तर आपण स्वतःला माफ करू शकू का??
त्यामुळे आपण जमतील ते सारे प्रयत्न करूया. जे व्हायचं ते होऊ दे आता.
असं म्हणत त्याने पोलिसांना फोन लावून सांगितलं सुदधा.
पण त्याच्या घराचा पत्ता नाही, फोन नंबर नाही, पोलीस म्हणाले आम्ही काय करू सांगा??
तरीही सोशल मिडियावरच्या कम्प्लेंट हॅन्डल करणाऱ्या डिपार्टमेंटचा नंबर त्यांनी दिला, आणि त्यावर स्क्रिन शॉट पाठवायला सांगितला.
मग चित्राने त्वरेने तो स्क्रिनशॉट त्या नंबर वर पाठवला.
पण त्याचा प्रोफाईल सिक्युअर्ड असल्याने त्यांना काही दिसत नव्हतं.
आणि असा प्रोफाईल ओपन करण्याचं सर्व काम सायबर क्राईम करतं, आणि ते उद्या सकाळी होईल असच त्यांचं म्हणणं पडलं.
तुम्ही त्याचा ऍड्रेस आणून द्या, आम्ही जातो, किमान फोन नंबर तरी द्या, मग आम्ही बघतो.
अहो माणूस मरेल तोपर्यंत, चित्रा चिडूनच बोलली शेवटी.
तोवर फेसबुकवर त्याच्या पोस्ट वर आणखी दोन जण येऊन काळजी करत बसलेले.
त्यातल्या एकाजवळ त्याचा फोन नंबर होता. पण तो फोन बंद येत होता.
आता तर आणखीच काळजी वाटायला लागली.
तो नंबर घेवून पोलिसांना दिला. पण तो नंबर बंद असल्याने त्यांना ही काही सुगावा लागत नव्हता.
अर्थात ते दुसरे प्रयत्न करत होते. पण कुठूनच कोणाला ऍड्रेस मिळत नव्हता. फोन नंबर देणाऱ्याला पण माहीत नव्हता.
पोस्टवर काळजी करणारे आता पाचसहा जण होते.
ते ही कोणाकोणाला फोन करून माहिती मिळवू पाहत होते.
इकडे चित्रा आणि सौरभची सतत पोलिसांना फोना फोनी चालूच होती. पोलिसांचे त्यांना फोन येत होते.
जे जागे होते, ज्यांना कळलेलं ते सगळे कामाला लागले होते.
पण ऍड्रेस मिळतच नव्हता. इतकंच काय तर चित्रा आणि सौरभच्या स्थानिक भागातले पोलीस पण या कामाला लागलेले. कारण त्यांनी केलेली कम्प्लेंट तिथे पाठवली गेलेली.
या सगळ्यात चार वाजले. कोणाला काही सुगावा लागला नाहीच.
सौरभ तो असेल का रे, काय हे, असं कसं आपण काहीच करू शकत नाही?? चित्रा अगदी हतबल होऊन म्हणाली.
सौरभ म्हणाला, आपण जमतील तेवढे सगळे प्रयत्न केले, पोलीस जाणार कुठे ऍड्रेस नसल्यावर???
फेसबुकच्या पोस्ट वर पण चिंता करणारे वाढलेले, पण सारे बिनकामाचे होते. दोन हजार मित्र होते त्याच्या लिस्ट मध्ये, पण या अशा वेळी फक्त दहाजण कार्यरत होते, ते सुद्धा काही माहीत नसणारे!!
इकडे चित्राचं ज्या ज्या मित्रांचे मैत्रिणींचे नंबर सापडतील, त्यांना फोन करणं चालूच होतं, पण कोणी फोन उचलत नव्हतं; तर कोणाकडे त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
सहा वाजले, चित्राच्या मुलीची सकाळची शाळा होती, चित्राने तिची तयारी करून तिला शाळेत पाठवलं.
सौरभही आता आडवा पडायला गेला, त्याला आज महत्वाची मिटिंग असल्याने ऑफिसला जाणं भाग होतं.
आठ वाजता चित्रा पुन्हा त्या पोस्टवर गेली, काही कळलं नाही.
नंतर सौरभही कामाला गेला. तोपर्यंत चित्राने ग्रुपवर टाकलेली पोस्ट बऱ्याचजणांकडून वाचली गेली.
हालचाली सुरू झाल्या……..
तिने पुन्हा त्या मित्राची पोस्ट उघडून पहिली……
आता मात्र त्या पोस्टवर सुगावा लागला होता. रात्रभर ज्याच्या काळजीने चित्रा आणि सौरभ झोपले नव्हते, त्या बहाद्दराने त्याची काळजी करणाऱ्या साऱ्या जणांसाठी रिप्लाय लिहिला होता, मी कायमचा फेसबुक सोडून जातोय असं म्हटलेलं……
चित्राने कपाळावर हात मारला…….आता कुठे डोकं आपटून घ्यावं असं झालं तिला🙆
तो बाप्या धडधाकट आहे म्हणून चांगलं वाटून घ्यायचं का भलाई का जमाना नही रहा म्हणून दुःख वाटून घ्यायचं तिचं तिलाच कळेना……..!!!
खेळ मांडणाऱ्याला काही खबरबातच नव्हती, खेळात कोण कसं, किती अडकलं होतं, तो आपला खेळ मांडून पसार झाला आणि इतर गडी मात्र त्याचा खेळ अर्धवट संपू नये म्हणून स्वतःचं भान हरपून खेळत बसले………..
हे जे लिहिलंय ते अगदी तसंच घडलंय, यातला एकही शब्द काल्पनिक नाहीये. दुसऱ्याला येडे बनवणारे काही कमी नाहीत, आणि बनून घेणारे सुद्धा कमी नाहीत.
चालायचंच……..
येडा नही बनेगा तो शाणा कैसे बनेगा😲
©️स्नेहल अखिला अन्वित