चल अथर्व, आज आपल्याला आपल्या घरी जायचे आहे. आता नविन शाळा, नविन दप्तर, नविन पुस्तकं, चल तू म्हणशील ते नवं घेऊ सारं!! निलिमा मोठ्या उत्साहाने अथर्वला सांगत होती.
पण छोट्या अथर्वला मात्र बरेच प्रश्न पडत होते.
मी तर सुट्टीत येतो ना तुमच्याकडे?? इथे माझी शाळा आहे, नवीन कशाला?? मला हिच शाळा खूप आवडते.
आणि मी तर इथेच राहतो ना पहिल्यापासून, हे माझंच घर आहे…..मी नाही येणार तुमच्याबरोबर!!
अथर्वने असं बोलल्यावर मात्र निलिमाचा पारा चढतो, बघतेच कसा येत नाही ते, असे म्हणत ती चांगलीच खेकसते त्याच्या अंगावर.
सुभाष त्याला समजवायला जवळ घेतो, पण तो त्यालाही हिसका देऊन आपल्या लाडक्या आईच्या, सुजाताच्या कुशीत शिरतो.
सुजाता तर रडून रडून बेहाल झालेली असते. पण आज तिच्या भावाचा, सुभाषचाही नाईलाज असतो.
अथर्व लहानपणापासून तिच्या अंगाखांद्यावर खेळलेला, जीवापाड जपलेला, तिने वाढवलेला तिचा लाडका आज तिला सोडून त्याच्या खऱ्या आई-वडिलांच्या घरी जाणार असतो.
त्याची गोष्ट ही अशी होती. सुजाताचं लग्न होऊन जवळपास पाच वर्ष झाली होती. नवरा दिलीप, अगदी देव माणूस. दोघे कोल्हापूरला राहायचे. दोघेही स्वभावाने अगदी प्रेमळ. पण त्याचं एवढं प्रेम पांघरून घ्यायला बाळ काही येत नव्हतं. एक दोन वर्ष करता करता पाच वर्षे सरली.
दोघेही एकमेकांना सावरून राहत होते. कोणी लहान मूल घरी आलं की मात्र त्यांना त्याचे किती लाड करू अन् किती नको असं व्हायचं.
सुजाताचा लहान भाऊ सुभाष मुंबईत राहायचा. दोघा बहिणी भावंडांचा एकमेकांवर फार जीव. आईवडिलांच्या प्रेमाला लहानपणीच पारखे झालेले ते.
भावाची बायको निलिमाही चांगलीच मिळाली होती. सणासुदीला सुभाष-निलिमा सुजाताकडे कोल्हापूरला जायचे आणि त्यांना नाही जमले तर सुजाता आणि दिलीप मुंबईला यायचे.
अशातच निलिमाकडे गोड बातमी आली…….ती ऐकून सुजाताला तर खूपच आनंद झाला. भावाचं का असेना पण तिच्या हातात तान्हुकलं विसावणार होतं.
तिने निलिमाला सांगून टाकलं, तू माहेरी जायचं नाहीस, तुझं सगळं आईच्या मायेने मीच करणार!!
भावाचा विश्वास होता तिच्यावर,आणि ती बाळाच्या स्पर्शासाठी आसुसलेली आहे हे देखील माहिती होतं. त्यामुळे त्याने निलिमाला समजावलं,तिलाही सुजाताचा लाघवी स्वभाव माहीत असल्याने तिनेही जास्त आढेवेढे घेतले नाहीत.
सातव्या महिन्यापासून सुजाता निलिमाची सर्व परीने काळजी घ्यायला मुंबईला येऊन राहिली. तिचा नवरा दिलीप येऊन जाऊन असायचा.
सुभाष आणि निलिमा दोघे नोकरी करणारे होते. सुजाता सारं घर एकहाती सांभाळायची. निलिमालाही अगदी लागेल ते हातात द्यायची. तिला काय काय पदार्थ करून खायला घालायची. तिच्यावर अगदी आईची माया पांघरत होती. निलिमा बरोबर ती स्वतःही गर्भारपण अनुभवत होती.
बघता बघता दिवस निघूनही गेले, आणि निलिमाने गोंडस मुलाला जन्म दिला. नर्सने बाहेर आल्यावर सुजाताच्याच हातात तान्हुल्याला दिले, आणि बाळाचा इतक्या दिवसांचा आसुसलेला स्पर्श होताच, तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. तो स्पर्श तिला वेडावून गेला अगदी.
तिने निलिमाला अगदी पूर्ण विश्रांती दिली. पाजायलाच काय ती बाळाला घ्यायची, बाकी सर्व वेळ बाळ सुजाताकडेच असायचं.
ती अगदी जीव लावून दोघांचं सारं करायची. बाळ तर अगदी तिच्या स्पर्शानेच शांत व्हायचं. बाळाकडे बघून प्रत्येकवेळी तिचे डोळे भरून यायचे. अमाप माया दाटून यायची.
बाळ आता दोन महिन्यांचं झालं होतं. सुजाताचीही परतायची वेळ झाली होती. निलिमालाही पुढच्या महिन्यात कामावर हजर व्हायचे होते.
बाळाला कुठे ठेवायचं प्रश्न होता. त्याच्यासाठी पाळणाघर शोधायची हालचाल सुरू झाली. सुजाताला कळल्यावर तिला काही सुचनासं झालं. माझ्या काळजाच्या तुकड्याला पाळणाघरात ठेवणार, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात सोपावणार.
नवरा आल्यावर तिने सगळं सांगितलं त्याला. तो म्हणाला, अग ते बाळ आपलं नाही, तू कितीही जीव लावलास तरी.
तू पाहिजे तेव्हा त्याला भेटायला ये, पण तुला सुटता येणार नाही एवढं अडकू नकोस त्यात.
नवऱ्यालाही माहिती होतं, खरंतर ती त्याच्या जन्माची चाहूल लागल्यापासूनच त्याच्यात अडकली होती. तिच्यासाठी भावाचा नव्हताच तो, तिचाच होता.
तिने विषय काढलाच, नाही म्हटलं तरी पाळणाघरात बाळाची अबाळ होणार, तुमच्याबरोबर माझाही जीव कासावीस होतोय, त्याला असं कुठं ठेवायचा विचार केला की.
मी नेऊ का त्याला माझ्याकडे, कोल्हापूर अगदीच काही खेडं नाहीये. मी जिवाच्या पलिकडे सांभाळ करेन त्याचा. भावाचा बहिणीवर पूर्ण विश्वास होता.
तिची माया दोघांनीही पाहिलेली!!!
बाळाच्या आईचं, निलिमाचं मन कचरत होतं, बाळाला नजरेआड करायला. पण नोकरीही महत्वाची होती तिच्यासाठी, ती महत्वाकांक्षी असल्याने डोळ्यापुढे स्वतःचं करियरही होतं. सुजाताच्या हातात बाळ असल्यावर काळजी करण्याचं काही कारण नव्हतं.
विचारांती सुजाता तीन महिन्याचं बाळ घेऊन कोल्हापूरला परतली.
दोघा नवरा बायकोला बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं. सुजाताला समजावणारा तिचा नवरा दिलीपही अथर्वच्या बाललीलांमध्ये स्वतःच हरवू लागला.
त्याच्या रूपाने दोघांनाही नवजीवन मिळालं होतं.
बाळाचे आईबाबा दोन तीन महिन्यात एखादी चक्कर मारायचे.
सुजाताचा बाळ, अथर्व हळूहळू मोठा होऊ लागला. सुजातालाच तो आई म्हणू लागला. प्रत्येकवेळी त्याच्या तोंडुन आपल्यासाठी आई हाक ऐकताना तिचं हृदय अगदी मायेने ओथंबुन यायचं. ती त्याला आपल्या कुशीत ओढायची आणि हृदयाशी धरायची.
पण त्याची खरी आई निलिमा आली की तिला खटकायचं अथर्वने सुजाताला आई म्हटलेलं. ती त्याला सांगायची मी तुझी आई आहे, पण तो सुद्धा पळत जाऊन सुजाताला घट्ट पकडून सांगायचा ही माझी आई!!
पाच वर्षांचा झाल्यावर त्याच्यासाठी सर्वात चांगली शाळा शोधली दोघांनी. तसे सुजाता आणि दिलीप दोघेही कमी शिकलेले, पण त्याचं स्वप्न होतं, अथर्वला खूप खूप शिकवून मोठा साहेब बनवायचं.
ते दोघेही इतके गुंतलेले त्याच्यात की जणू ते विसरूनच गेलेले हे लेकरू आपलं नाही ते!!
आणि लेकरासाठी तर आई बाबा हेच होते. ते वेळ मिळेल त्याप्रमाणे भेटायला येणारे खरे आई बाबा त्याला पाहुण्यासारखे वाटायचे.
त्याला याच दोघांचा अमाप लळा होता.
सुजाता प्रेमाबरोबर चांगले संस्कारही होतील याचीही दक्षता घेत होती.
आई वडील आल्यावर सुट्टीत त्याला मुंबईला घेऊन जायला मागे लागायचे, पण तो सुजाता येणार असेल तरच मी येणार म्हणून हट्टून बसायचा.
एकटा कधीच कुठेच जायचा नाही तो तिला सोडून.
हे सारं अथर्वच्या खऱ्या आईला निलिमाला आता कुठेतरी टोचयला लागलं होतं.
ती बोलायची सुभाषला, आपण आणूया का अथर्वला इकडे? पण अथर्व तिकडे मजेत आहे, इकडे त्याचे हाल होतील असं म्हणत तो तिला समजवायचा.
तिलाही तेव्हा पटायचं ते. पण सुजाता आणि अथर्व एकत्र समोर आले की तिच्यातला मत्सर जागृत व्हायचाच.
कारण अथर्वला जन्म हिने दिला असला तरी तो सर्व परीने सुजाताचच झाला होता.
तो निलिमाशी खुलत नव्हताच……..।
जसजसा मोठा होऊ लागला, तसतशी निलिमाच्या मनातली त्याला आपल्या जवळच ठेवण्याची भावना तीव्र होऊ लागली.
ती आता सुभाषशी वाद घालू लागली, सुजाता आणि अथर्वच प्रेम तिला त्रास देऊ लागलं होतं. पुढे जाऊन अथर्व आपल्याला आई मानणारच नाही, तो आपल्याला काही विचारणारच नाही असंच तिला वाटू लागलं.
आणि आता तिने हट्टच सुरू केला. काही झालं तरी आपण त्याला मुंबईला आणायचंच.
आता अथर्व मोठाही झाला होता. पाचवीत जाणार होता तो.
त्याला सांभाळायचं फारसं काही टेन्शन राहील नव्हतं.
बायकोच्या हट्टापायी सुजाताच्या भावाचा अगदी नाईलाज झाला. तिने वदवूनच घेतलं त्याच्याकडून की यावेळी अथर्वला मुंबईला आणायचंच.
पण कोल्हापूरला गेल्यावर सुजाताकडे विषय काढायला सुभाषचं मन कचरत होतं. कारण दोन जीवांची ताटातूट होणार होती. इकडे सुजाताच्या मनातंही नव्हतं असं काही यांच चाललं असेल म्हणून.
शेवटी एका संध्याकाळी धीर करून सुभाषने विषय काढलाच.
ताई, अथर्व आता मोठा झालाय.
सुजाता म्हणाली, हो ना, बघता बघता केवढा झाला तो. पण माझं तर बाळचं आहे अजूनही ते.
तुला त्रास देत असेल नाही खूप आता, सुभाष पुढे म्हणाला.
काहीतरीच काय बोलतोस रे, त्याचा कधी त्रास होईल का मला?
ताई, ……….
काय रे??
ताई, आम्ही त्याला आता मुंबईला न्यायचं म्हणतोय आमच्याकडे, कायमचं.
काय बोलतेयस तू?? तिकडे कोणी आहे का त्याच्याकडे बघणारं.
शिवाय इथली त्याला सवयही झाली आहे सगळी.
राहील का तो तिथे??? आणि मी, मीही कशी राहणार इथे???
ताई समजतंय ग सगळं, पण निलिमाला देखील अथर्वची खूप आठवण येते ग हल्ली. तळमळत असते ती खूप त्याच्यासाठी.
सुजाताला कोणी तरी आपला जीव काढून घेतंय असं वाटलं आणि क्षणार्धात भोवळ येऊन ती कोसळली सुद्धा.
तिचा भाऊ सुभाष पेचात सापडला होता. एकीकडे बायको आणि एकीकडे लाडकी बहीण.
खरं तर हे एक दिवस होणारच होतं, जे आपलं नाही त्यात सुजाता जीव गुंतवून बसली होती.
सुजाता आणि दिलीप पुन्हा एकदा एकटे पडणार होते.
सुजाताच्या नवऱ्याने पण सुभाषला आणि निलिमाला समजवायचा खूप प्रयत्न केला. सुजाताच्या मनाची तयारी व्हायला थोडा वेळ द्या. असं हिसकावून नेऊ नका त्याला तिच्यापासून. पण निलिमाला आता नाही ऐकायचेच नव्हते. सुजाताचं आणि अथर्वच प्रेम तिच्या डोळ्यांत सलत होतं.
तिला सुजाता आणि अथर्वला वेगळं करायचंच होतं.
पण या सगळ्यात अथर्वला कुठे रहायचयं हे कोणी विचारतच नव्हतं.
न विचारताही त्याचं उत्तर सर्वांनाच माहित होतंच.
आणि म्हणूनच निलिमा आज त्याला वेगवेगळी अमिषं दाखवत, त्यांच्याबरोबर मुंबईला यायला तयार करत होती.
पण अशी हजार अमिषं एकीकडे आणि सुजाताची माया एकीकडे!!
गोड बोलून ऐकेना, म्हणून दटावून पण निलिमा आज इरेलाच पेटली होती.
सुजाता तिला हजार विनवण्या करत होती, पण निलिमाला आणखी डोईजड होऊ द्यायचे नव्हते आता काही.
अथर्व हात पाय आपटून रडत होता, मला नाही यायचं म्हणून ओरडत होता, पण निलिमाने हट्टाने त्याला मुंबईला नेलेच.
आता सुजाताला सारं घर ओकंबोकं वाटत होतं……
वेड्यासारखी अवस्था झालेली तिची. तिचं सर्वस्व होता अथर्व…….इतके वर्ष डोळेझाक केलेली सत्याकडे तरी ते सामोरं आलंच.
खेळणी, पुस्तकं, कपडे, इतकंच काय तर सुजाताची आभाळा एवढी मायाही मागे टाकून गेला होता तिचा अथर्व. नव्हे त्याला ईर्षेनेच नेलं गेलं होतं.
त्याच्या आठवणीतून तिला बाहेर पडायचंच नव्हतं. ती तिच्या विश्वातच गुंगत होती, स्वतःला खरोखरच हरवत चालली होती.
अशातच त्यांच्या कोणी हितचिंतकानी दिलिपला मुल दत्तक घायचा सल्ला दिला. ते मूल तुमच्याकडून कोणी हिसकावून घेणार नाही, तुमचं स्वतःच असेल ते.
खूप प्रयत्नाने त्या दोघांचं मन वळविण्यात तो हितचिंतक यशस्वी झाला. आणि त्याच्याच प्रयत्नानंतर काही महिन्यांतच सुजाता आणि दिलीपच्या एकाकी जीवनात पुन्हा आनंदाचा बहर आला, त्यांचा हक्काचा!!!
तिकडे अथर्व थोड्या काळानंतर मुंबईत रुळला, पण त्याने निलीमाला आई म्हणून कधीही हाक मारली नाही. त्याच्या मनाने निलिमा आणि सुभाषला आई वडील म्हणून कधी स्विकारलंच नाही.
त्याच्या मनात दोघांबद्दल जन्मभर अढीच राहिली………
साधारण पंचवीस वर्षांपूर्वी माझ्यासमोर घडलेली ही खरी गोष्ट आहे. मुलांसाठी ओसंडून वाहणारं त्या दाम्पत्याचं प्रेम मीही अनुभवलं आहे. त्याच प्रेमाने मला आज त्यांची गोष्ट सांगायला लिहीतं केलं.
त्यावेळी दत्तक मुल घेणं फार रूळलेलं नव्हतं. पटकन पचनी नाही पडायचं कोणाच्या. लोक कुढत बसायचे; आत्ता सारखे अनेकानेक पर्याय सुद्धा नव्हते समोर…..
मग नात्यातल्याच एखाद्या पोरावर जीव लावला जायचा. ह्या ना त्या कारणाने त्यांचे आई वडीलही पोरांना अशांकडे ठेवायचे आणि नंतर मात्र सोयीस्करपणे त्यांना पुन्हा एकटं पाडायचे……..
आणि मग ही अशी ताटातूट त्यांच्या जीवनातला रामच घेऊन जायची………!!!
©️स्नेहल अखिला अन्वित