तिला मी साधारण पंधरा वर्षांपूर्वी भेटले होते. आम्ही राहायचो, त्याच्या बरोब्बर बाजूच्या बिल्डिंगमध्ये ती राहायला आलेली. सुरुची तिचं नाव. नेहमी अगदी छान टापटीप असायची. दिसायलाही सुंदरच होती. तशी बरेचदा एकटीच दिसायची, क्वचित कधीतरी नवऱ्याबरोबर. वय असेल साधारण सव्वीस, सत्तावीसपर्यंत.
रोज बघण्यातली असल्याने हसण्यापुरती ओळख होती.
त्यावर एकदा ती स्वतःहुन माझ्याकडे येऊन म्हणाली, मी ड्रेस मटेरियल विकते, एकदा बघायला येशील का?
माझी काहीच हरकत नव्हती, मी एकदोन दिवसात गेलेही बघायला.
घर छान टापटीप होतं. रविवार असूनही नवरा काही घरात दिसला नाही.
अशीच हळूहळू ओळख वाढली, दोघीचंही एकमेकिंकडे येणं जाणं वाढलं.
कधी भेटली नाही तर आज सासरची मंडळी आलेली, दिवसभर बिझी होते वगैरे सांगायची.
कधी सांगायची मी मुलाला भेटायला गेलेले, मुलाला आईकडे ठेवलंय ना म्हणून. माझ्या कामात इकडे तिकडे जावं लागतं, नीट लक्ष देता येत नाही, म्हणून आईने स्वतःकडे ठेवून घेतलंय मुलाला.
बरेचदा तर मला ती फोनवर बोलतानाच दिसायची.
जशी ओळख वाढली, तसं आमच्या घरी येणं जाणं ही वाढलं होतं तिचं. मी नसेन तर आईशी गप्पा मारत बसायची.
आठवड्यातून एकदा कधीतरी सुरुचीच्या नवऱ्याचं दर्शन व्हायचं आम्हाला.
आम्हीही जास्त काही खोलात विचार केला नाही, आणि काही खटकवूनही घेतलं नाही.
पण एक दिवस अचानक, आमच्या घरी स्वैपाकाचं काम करणाऱ्या बाईने तिच्याबद्दल वेगळीच माहिती दिली.
तुम्हाला केव्हांचं सांगायचं होतं, पण तुमचं एवढं छान गुळपीठ जमलेलं, काय करावं कळेना.
आणि तिने जी माहिती पुरवली त्याने आम्हाला मोठाच धक्का बसला!!
सुरुचीचं अगदी शाळेपासून प्रेम प्रकरण होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि त्याला व्यवस्थित नोकरी लागल्यावर, दोघांनीही आपापल्या घरात लग्नाबद्दल सांगितलं.
हिच्या घरून फारशी अडचण नव्हती, पण त्याच्या घरच्यांना अजिबातच मान्य नव्हतं. घरच्यांच्या दबावाला बळी पडून, याने त्यांनी ठरवलेल्या मुलीबरोबर लग्न उरकलं.
म्हणजे सुरुचीला कल्पना न देता, गुपचूप पार पाडलं.
हिला कुठूनतरी ते कळलंच. तिने त्याच्या घरी जाऊन चांगलाच तमाशा केला. माझ्या बरोबर फिरलास आणि लग्न दुसरीशी करताना लाज नाही वाटली.
तिचंही खरं होतं, पण केलेलं प्रेम निभावण्याची हिम्मत प्रत्येकाकडे असतेच असे नाही.
पण ही मात्र मोठी हिम्मतवान होती!!
तिने लग्नानंतरही त्याचा पिच्छा सोडलाच नाही.
रोज सतत फोन, आणि भेटायला ये, नाहीतर मी जीव देईनच्या धमक्या देऊन त्याला भेटण्यासाठी भाग पडायची.
कित्ती जणं समजवायचे तिला, सोड आता त्याला, तुझं सुंदर आयुष्य आहे समोर!
पण तिने कोणाचं ऐकलंच नाही कधी,आणि आपला हेकेखोरपणाही सोडला नाही.
ना स्वतः जगत होती, ना त्याला जगून देत होती.
अशातच तिने त्याला लग्नची गळ घातली, लग्न कर नाहीतर मी जीव देईन, जाळून घेईन.
काय अन् काय…..
अट्टाहासाने तिनं कुठल्या मंदिरात त्याच्याशी लग्न करूनही घेतलं. अवैध होतं तरी स्वतःचा अहंकार गोंजारण्यासाठी किंवा अपमान सावरण्यासाठी.
आपला संसार मांडला, दुसऱ्याच्या संसारात विष कालवून.
एवढं सगळं करूनही ती सुखी होती का तर नाही. समाजमान्य लग्न तर तेच होतं, जे त्यानं पहिलं केलेलं.
सारे अधिकार तिच्याकडेच होते. लग्नानंतरचा मान सन्मान तिलाच होता. आणि तोही तिच्याबरोबरच राहत होता.
हिने धमकी दिली की हिच्याकडे यायचा, तिला रडावं लागायचं, ओरडावं लागायचं तेव्हा तो तिला मिळायचा, ते सुद्धा तिच्या भीतीने.
काय मिळालं तिला हे करून. सुख तर नक्कीच नाही!!
स्वतःच खोटं विश्व तयार करून ती दुःखाने नांदत होती. ना तिच्या घरचे विचारत होते, ना त्याच्या घरचे, ना ज्याच्यापायी हे केलं तो धड बघत होता.
एवढ्या ताण तणावात मुलं बाळही झालं नाही तिला.
नसत्या अट्टहासापायी स्वतःच स्वतःची दुष्मन होऊन बसली ती!!
त्यावेळी सर्व कळल्यानंतरही तिच्याशी आमचे संबंध तसेच राहिले. तिने स्वतःहून काहीच सांगितलं नाही, पण तिच्या वागण्यातून जे ऐकलं त्याला दुजोराच मिळत गेला. ती बरेचदा फ्रस्टेशनमधे फोनवरून नवऱ्याला शिव्या द्यायची, कारण मात्र भलंत सलतं सांगायची.
आम्ही आमच्यापरीने समजवायचा प्रयत्न करायचो.
एखाद्या सिनेमासारखं बदल्याच्या आगीत स्वतःच होरपळून जात होती ती, आणि तिला त्याचं काही नव्हतं, सूड महत्वाचा होता, स्वतःच्या सुंदर भविष्याचा बळी देऊन!!
ना मी सुखाने जगेन ना तुला जगून देईन, हाच हेका होता तिचा!!
आज इतकी वर्ष झाली तरी सुरुचीचा विचार मनात येतोच.
आता आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. सगळ्यांचीच राहण्याची ठिकाणं बदलली.
तरी राहून राहून वाटतं, तशी वागली नसती, तर आज तिचंही एक छानसं किलबिलणार घरटं असतं!!
का असावा कोणाकडे एवढा अट्टाहास स्वतःचंच आयुष्य विस्कळीत करणारा??
खरंच इतका गरजेचा आहे का तो?
बरीच लोकं असतात अशी, आपल्या नसत्या अट्टाहासापायी स्वतःचा आणि दुसऱ्याचाही विनाश करणारी, कारणं वेगवेगळी असतील; पण अट्टाहास मात्र तोच असतो!!
हो ना??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा, आणि शेअर करताना नावसकटच करा😊