निलाक्षी, तिच्या दोन भावांची एकुलती एक लाडकी बहीण. लहानपणापासून दोघांनीही तिला अगदी फुलाप्रमाणे जपलं. तशी ती घरात सगळ्यांचाच जीव होती.
पहिल्या मुलानंतर आई-वडीलांना खूप इच्छा होती मुलगी व्हावी, पण दुसराही मुलगाच झाला. म्हणूनच मग खास मुलीसाठी तिसरा चान्स घेण्यात आला.
त्याच्यामुळे निलाक्षी म्हणजे घरच्यांच्या दिलाचा तुकडाच!!
ती आली आणि त्यांचं घर भरून गेलं. त्यांच्यामते तिच्यामुळेच घराला घरपण आलं.
आई-वडिलांनी तिघांनाही सदैव एकत्र गुंफलं. आपापसात त्यांचं प्रेम वाढेल, यावर लक्ष ठेवलं. तिघांना एकमेकांचा खूप लळा लागला. एकमेकांशिवाय अजिबात चैन पडायची नाही त्यांना!!
असे तिघेजण बघता बघता मोठे झाले. बघणाऱ्या सर्वांना त्यांचा आदर्श समोर ठेवावा वाटे, अशी त्यांची वागणूक होती. आई-वडिलांचा एक शब्द खाली पाडू देतील तर शप्पथ!!
दोन्ही भावांनी लग्न करताना स्वतः मुली निवडल्या तरी, त्यांना आपल्या घरातल्या एकीची पूर्ण कल्पना दिली. आम्ही आई-वडिलांच्या आज्ञेत असणार,आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते देखील तुम्हाला मुली म्हणूनच जपतील.
त्यामुळे सुना आल्या तरी त्यांचं घर अभेदयच राहिलं.
सूनांनीही घरच्या साऱ्यांवर जीव लावला. आणि निलाक्षीच्या तर त्या अगदी जवळच्या मैत्रिणी झाल्या.
आता राहिलं होतं निलाक्षीचं लग्न!!
इतकंच प्रेम देणारं घर पाहिजे होतं त्यांना तिच्यासाठी.
घर श्रीमंतंच असावं, वगैरे काही अपेक्षा नव्हत्या त्यांचा, फक्त आमची लाडकी लेक सुखात राहावी बस्स, हेच वाटत होतं त्यांना.
खूप स्थळं बघितली जात होती, पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही खटकत होतं.
तशी हिलाही मुभा होती, कोणी आवडल्यास घरी घेऊन यायची.
पण हिलाही कुणी छानसा मिळाला नाही, म्हणून शोधमोहीम सुरू करावी लागली.
आणि असंच एके दिवशी गिरीशचं स्थळ आलं.
मुलगा एकुलता एक, दिसायला देखणा होता, शिक्षणाने आणि नोकरीनेही चांगला होता. घरच्यांना भेटल्यावर ते देखील चांगले वाटले.
दोन्ही भावांनी सगळीकडे चौकशी केली, कुठेच काही निघालं नाही, आणि मग हे स्थळ पक्क झालं.
आई-वडिलांनी दोन्ही भावांना आणि त्यांच्या बायकांना बोलावून सांगितलं, तिचं लग्न झालं म्हणजे तुम्ही सुटलात असं नाही. आम्ही असू नसू, तुमची छत्रछाया कायम तिच्यावर हवी.
आमची एवढी एकच इच्छा आहे, तिला सुखी ठेवा. सर्व भावंडांनी एकमेकांना धरून राहा. भावांनी देखील आई- वडिलांना आश्वासन दिले, आम्ही सदैव तिच्या पाठीशी राहू, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
निलाक्षीचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोन्ही भावांनी आणि वहिनींनी काही कमी राहू दिली नाही.
निघतानाही तिला सांगितलं; तू फक्त घरातून जातीयेस, पण आम्ही सदैव तुझ्याबरोबर असणार आहोत, तू हाक दे, आम्ही धावतच येऊ.
इकडे निलाक्षी सासरी देखील खूप सुखात होती. तिच्या सासरच्यांनी तिच्या घरातलं वातावरण पाहून ठरवलंच होतं, इथेही तिला सुखातच ठेवायचं, कसलीही कमतरता भासू द्यायची नाही.
निलाक्षीदेखील सासू-सासऱ्यांचा मान राखून होती. चांगल्याला प्रत्येक वेळी चांगलं मिळतंच असं नाही, पण इकडे मिळालं होतं!!
गिरीश आणि निलाक्षीची जोडीही चांगलीच जमली होती.
तिकडे निलाक्षीच्या भावांचाही संसार बहरला. इकडे हिच्याही घरात फुल उमललं.
दोन्ही घरी सगळं सुरळीत चालू होतं. पाच वर्षे झटकन सरली.
आणि एके दिवशी अचानक कामाच्या प्रेशरने म्हणा किंवा हेक्टिक शेड्यूलमुळे किंवा आणखी कशाने गिरीशला कुणाच्या ध्यानीमनी नसताना हार्ट अटॅक आला. सगळं घर हललं. त्वरित हॉस्पीटलमध्ये नेल्याने, वेळेवर इलाज होऊन जीवाचा धोका टाळला.
बहिणीने भावांना फोन केला, दोन्ही भाऊ वाऱ्याच्या वेगाने धावून आले.
आपलं बस्तान त्यांनी गिरीशबरोबर हॉस्पिटलमध्येच बसवलं. त्याला काय हवं नको ते बघणं, डॉक्टरांकडे वेळोवेळी त्याच्या तब्बेतीची चौकशी करणं, सर्व काही करत होते ते गिरीशसाठी.
निलाक्षीच्या दोन्ही वहिन्याही मागून आल्या. त्यांनीही तिच्या घराचा ताबा घेऊन, तिला आणि तिच्या सासूला थोडं मोकळं केलं.
निलाक्षीदेखील घरची काळजी मिटल्याने गिरीशजवळ बसून राहत होती.
सगळ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे, तो लवकरच बरा होऊन घरी आला.
निलाक्षीचे भाऊ देखील निघून गेले, मात्र दोन्ही वहिन्या निलाक्षीच्या मदतीसाठी आठवडाभर राहूनच त्यांच्या घरी परतल्या.
निलाक्षीच्या सासरकडच्यांना खूप कौतुक वाटले, तिच्या घरच्यांचे. ते तिला म्हणाले, निलाक्षी तू तर खूप भाग्यवान आहेस, पण तुझ्यामुळे आम्हीही भाग्यवान ठरलो, एवढी चांगली माणसं आम्हाला मिळाली.
गिरीशचं असं झाल्यावर निलाक्षीचे भाऊ तिच्या बाबतीत आणखीनच हळवे झाले.
ते तिच्या घराकडे आणखीन लक्ष देऊ लागले.
तिच्या घरात जरा काही खट्ट व्हायची खोटी, की हे हजर होत.
अगदी तिच्या सासू-सासऱ्यांच्या आजारपणात देखील यांनी धावाधाव केली.
पाहणारे सगळे गिरीशला म्हणत, तुझ्या सासुरवाडीसारखा आधार आम्ही कुठेही पहिला नाही!!
पुढे वयपरत्वे निलाक्षीचे आई-वडील गेले. पण दोन्ही भाऊ मात्र निलाक्षीवर वचनबद्ध असल्यासारखे छत्रछाया धरून होते.
तिच्या घरचं चांगलं-वाईट कुठलंही कार्य असो, ते सुखरूप पार पडायची जबाबदारी जणू काही ह्यांचीच असल्यासारखे ते वागत असत.
निलाक्षी सदैव सुखी राहावी, एवढाच काय तो त्यांना ध्यास!!
असे पाठीराखे असल्यावर कुठल्याही बहिणीला कशाची कमतरता भासेल का कधी??
आजच्या काळात देखील अशी माणसं आहेत, यावर खरंतर विश्वास बसणं कठीण आहे, पण मी ती पाहिली आहेत, म्हणून मला त्यांच्या चांगुलपणाबद्दल लिहावंस वाटलं!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझ्या हल्ला गुुुल्ल्ला् पेेजला नक्की लाईक करा.