बाळाला पहिल्यांदा दूध पाजताना मला ब्रह्मांड आठवलेलं!!
माझ्या दोन्ही पोरांनी पहिल्यांदा दूध पिताना माझी नुसती त्रेधातिरपीट उडवून टाकलेली!!! वात आणलेला वात🙆
माझं कसं आहे, प्रसंग कुठलाही असो, बॅकग्राऊंडला मनात त्या प्रसंगानुरूप गाणं वाजत असतंच.
त्यावेळी दोघांच्या आणिबाणीच्या प्रसंगात मला एका गाण्याने मोलाची साथ दिली.
पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी 😛
मूळ गाण्यात आर्जव सोमरसासाठी असलं तरी इकडे माझ्या दुधाच्या आर्जवासाठी सुद्धा एकदम फिट्ट बसत होतं…..
सांगतेच आता कसं ते…….
माझी पोरगी पोटात येताना आणि पोटातून बाहेर येतानासुद्धा अगदी सहज आली. पण बाहेर आल्यावर मात्र ठणाणा करून करून हॉस्पिटल दणाणून सोडलं. दूध वगैरे प्यायचा मूड तर अजिबातच नव्हता. मग आम्हीही जाऊदे तिच्या कलाने घ्यावं म्हणून थांबायचं ठरवलं.
नंतर सगळ्यांचा न संपणारा कौतुक सोहळा सुरू झाला, आणि या बाईसाहेब आपलं दुःख आवरतं घेऊन टकामका बघत बसल्या. आतल्या आत नक्कीच सुखावून गेल्या असाव्यात असं वाटत होतं निदान चेहऱ्यावरून!!
आणि मग हे सगळं चाललं असताना अचानक नर्स ताई आल्या, आणि त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितलं. चल ग बाळाला पाजायला घे आता, त्यांनी डायरेक्ट हुकूमच सोडला.
मी पहिलटकरीण; जरा भांबावूनच गेले. नवीन अनुभव मिळणार होता. उगाच भीतीही वाटत होती.
नर्स ताईंनी बाळाला मांडीवर दिलं, आणि म्हणाल्या घे पाज तिला. मी तयारी केली, आणि तिला पाजायला घेतलं, तिने जे ठणाणा सुरू केलं, ते काही थांबता थांबेना. तिला अशा प्रकारे दूध मुळीच प्यायचं नव्हतं.
नर्स ताई म्हणतायत, अगं घाबरू नको, रडू दे तिला, घाल तिच्या तोंडात, कोंब.
ऊईsss…एवढुश्या पिल्लाच्या तोंडात कसं कोंबायचं??? मला काही असं करवेना आणि ती काही ठो ठो करायची थांबेना.
मग नर्स ताई म्हणाल्या, थांब मीच बघते कशी पित नाही ते, म्हणून अगदी जोमात कोंबायचा प्रयत्न केला तर माझ्या बहाद्दरणीने ओठच घट्ट आवळून ठेवले. नाही म्हणजे नाही, ही असली पांचटगिरी बंद करा यावर ती ठामच होती. खरंच नुकत्याच जन्मलेल्या बाळाला देखील किती कळतं, ते त्या दिवशी पहिल्यांदा कळलं मला!!!
शेवटी ते कुक्कुल जिंकलं आणि आम्ही दोघी हरलो.
तिचा तो टाहो बघून मलाच रडायलाच येत होतं.
बाळाला पाजायचा पहिला प्रयत्न दणकून अयशस्वी झाला होता.
आणि त्या खिन्न स्थितीत पोरीकडे बघून माझ्या मनात “पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी” गाण्याने एन्ट्री घेतली🤦
गाणी सिच्युएशन बघून झटकन मनात कशी उपटतात, देवच जाणे!!
रडून रडून बाळी झोपली, माझ्या डोक्यात मात्र भुंगा, बाईss पोरगी काही न खाता पिता झोपली. मला आणखीनच रडायला आलं.
उठल्यावर नर्स ताई पुन्हा आल्या, म्हटल्या चल घेऊन बस. मला तर तिला घेऊन बसायची धडकीच भरली.
त्यांनी मांडीवर ठेवलं आणि पुन्हा प्रयत्न केला, पोरीने पुन्हा जिवाच्या आकांताने ठणाणा सुरू केलं.
माझा जीव पुन्हा खालीवर, जाऊ दे, आज नको.
आता नर्स ताई माझ्यावरच ओरडल्या, जाऊदे काय, मी पकडते तू घुसव तिच्या तोंडात.
अहो घुसवायला तोंड तर उघडावं ना, बोंबलायला उघडते, आणि तोंडात घुसवायच्या वेळी बघा ना कसं करतीये. मला भीती वाटते. नको राहू द्या.
पुन्हा आणखी एक अयशस्वी प्रयत्न.
नर्सताई तिला घेऊन गेल्या, आणि तिला बाहेरचं पावडर वालं दूध पाजलं.
मी आपली मनातल्या “पिले पिले” सह आसवं गाळत बसले.
तो पूर्ण दिवस, दुसरा दिवस तिने घेतलं नाही म्हणजे नाहीच. तोंडांत घुसवलं तरी दूध ओढायची नाहीच.
तिला हा सगळा प्रकार अघोरी वाटत असावा बहुतेक😱
मी तिला किती समजवायचे, अगं बाळे, काय आहे ते तर बघ, जरा चव तर बघ. तुझं भलच होणारे, चाखून तर बघ ग माते.
पिले पिले होतंच, ते ही लाडिक आवाजात ऐकवलं…..
माता कसली ऐकतीये, ती तर चंडिकेचा अवतार धारण करून बसली होती.
माझं दुःख ही कळेना, तिला जवळ घेताच सगळा पान्हा फुटायचा, सगळे कपडे ओले व्हायचे दुधाने, पण पोरगी काय प्यायला तयारच होईना.
मला इकडे हा प्रकार बघून नुसतं रडायला येत होतं, मला वाटायचं सहज सोपा असेल हा कार्यक्रम, पण कसला, नंतर तर तो कार्यक्रम करायचा म्हटल्यावर मला धडकी भरायला लागली होती.
दोन दिवस तर असेच घालवले पोरीने, तिसऱ्या दिवशी त्या नर्स ताईंनी दुसरी जास्त खमकी नर्स पाठवली.
तिने पोरीला माझ्याकडे दिलं, पोरीने ठो ठो चा कार्यक्रम सुरू केला, मला धडकायला लागलं.
नर्स ओरडायला लागली, घाल घाल तोंडात घाल तिच्या, मी तोंडात घालतीये, तर ही तोंड बंद करायला लागली.
दुघ सोड दूध……
हो हो सोडते, सोडते……..
दूध सोडलं तर पोरीच्या तोंडावर, डोळ्यात उडालं, मग आणखीनच दंगा. मी म्हटलं जाऊदे, तर नर्स म्हणाली, नाही आज हिला पाजायचचं.
पुन्हा सोड दूध तोंडात……
पण ती चोखत नाहीये हो……..
न चोखू दे तू सोडत रहा…….
पण ती रडतीये खूप, मला नाही बघवत…..
गप बस, आणि तोंडात कोंबत रहा.….
तिने तोंड घट्ट मिटलय, जाऊदे राहूदे……नको आता
थांब बघतेच, म्हणून तिने पोरीच्या पायाला बऱ्यापैकी जोरात टिचकी मारली, आणि हिने बोंबलायला तोंड उघडलं, नर्सने तिच्या तोंडात कोंबलं आणि ती रडत होती, ठणाणा करत होती तरी तसच ठेवलं, ती दूध सोडतच राहिली.
आणि शेवटी बाळीने स्वतःचा हट्ट सोडून माझ्या दुधाला तोंड लावलं आणि एवढा जीव चाललाय यांचा तर काय आहे बघूया म्हणून चोखूनही पाहिलं.
आणि तो क्षण, तो स्पर्श माझ्या मनात कायमचा कोरला गेला. ते सुख कशातच नाही. आपलं तान्हुलं आपल्याला बिलगून दूध चोखू लागतं. तो क्षण अपार वात्सल्याचा, तो क्षण स्त्रीच्या पूर्णत्वाला!!
त्या क्षणाला आणि पुढच्या प्रत्येक वेळी जेव्हा माझं बाळ माझ्या छातीला लागायचं, माझे डोळे भरलेलेच असायचे. आपोआपच ते प्रेम डोळ्यातून ओसंडायचंच.
आता “पिले पिलेच्या” जागी मनात माहेरच्या साडी मधलं “माझं सोनूलं सोनूलं माझं छकुलं छकुलं” वाजायला लागलं.
गाणी रेडीच असतात नाही का??
पोरीच्या दणक्यानंतर पोराच्या वेळेस पाजायच्या विचाराने घामच फुटला होता. हा बिलंदर ही तसाच निघाला. यानेही तब्बल चार दिवस तोंड नाही लावलं. नर्सचे सारे प्रयत्न हाणून पाडले. मला रड रड रडवलं.
पिले पिले प्रसंग पाहून पुन्हा धावून आलं………
शेवटी पाचव्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या मदतीने आम्ही त्याची नाकेबंदी केली.
पिले पिले ला कायमचा टाटा बाय बाय करून टाकला…….. पोरांनी धरता धरलं नाही आणि मग चटक लागल्यावर सोडता सोडलं नाही.
दोन्ही पोरांना तब्बल दोन वर्ष मी पाजलच. कारण आईच्या दुधाविषयी मी खूप काही ऐकलं होतं, आणि मला त्यांना हे अमृत पाजून त्यांचा पाया मजबूत करायचाच होता.
पण माझी कितीही इच्छा असली, तरी टोमणे मारणाऱ्यांनीही मला नाकेनऊ आणलं होतं. कुणाला अजिबात कौतूक नव्हतं, उलट वाटायचं, काय एवढी दोन दोन वर्षे थोडीच दूधं पाजतात पोरांना!!
पण माझा इरादा पक्का होता. मॅनेज होत असेल तर का नाही?? नवऱ्यानेही साथ दिली.
सर्वात नवल मला तेव्हा वाटलं, जेव्हा माझा मुलगा सांभाळणारी एक बाई मला म्हणाली, सात आठ महिन्यानंतर बंद करायचं, आपली तब्बेत खराब होऊन जाते मग. आणि तिचाही मुलगा लहानच, पण तिने त्याला स्वतःच्या तब्बेतीसाठी पाजायचं बंद केलेलं. चांगली टुणटुणीत होती तरीही.
खरंच अजूनही हा अवेअरनेस नाहीच. मी तर सगळ्यांना सांगते शक्य असेल तर नक्की बाळाला किमान दोन वर्ष हे अमृत द्यावच.
तुमच्या बाळाची प्रत्येक टप्प्यावरची वाढ तुम्हाला त्या अमृताची किमया दाखवते, ते अमृत आजारांना लांब ठेवतं, ते अमृत बाळाला तीव्र बुद्धी देतं, ते अमृत देवदूतासारखं तुमच्या बाळावर छत्रछाया धरून असतं…….!!!!
म्हणूनच “पिले पिले ओ मोरे राजा , पिले पिले ओ मोरे जानी” करत का होईना बाळांना हे अमृत पाजलच पाहिजे😊
©️ स्नेहल अखिला अन्वित
लेख आवडला तर लाईक करा, कमेन्ट करा आणि नावासकट पाहिजे तिथे शेअर करा.
(फोटोतला गोडुला गुगलने पाठवून दिलाय बरं😍)
[वरील लेख हा मॉमस्प्रेसोने घेतलेल्या आठवड्याच्या स्पर्धेतील माझा विजेता लेख आहे. विषय होता – बाळाला पहिल्यांदा दूध पाजताना !!]