“पण आमच्या मुलीला एवढ्या कामांची सवय नाही आहे हो!!”
“तुम्ही काही काळजी करू नका. सवयीचं काय होईल हळूहळू. सुनेला कामं करावी लागणारच ना?? आमची मुलगी पण ढिगभर काम करते की तिच्याघरी.”
“पण तुम्ही तर लग्नाअगोदर म्हणाला होतात, तुमच्या पोरीला सुखात ठेऊ, तिचे दुसरे आईवडीलच बनू आम्ही.
क्षणभर सुद्धा विश्रांती नाही देत तुम्ही तिच्या जीवाला!!
प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिच्याकडून हवीये. तुमच्या तालावर नाचवताय तुम्ही तिला फक्त. आमची मुलगी तर अगदी शिणून गेल्यासारखी वाटतेय. रयाच निघून गेली पार तिची.
हे बरोबर नाही, ही फसवणूक झाली आमची!!”
“अहो, मग सुनेने सारं करायचं ही पद्धतच आहे, आमच्या घरची. मी नाचू का आता या वयात?? काय बोलता हो तुम्ही? आमच्या भानगडीत पडूच नका तुम्ही, आल्यात तशा दोन दिवस रहा, आणि आपल्या मार्गाला लागा.”
लग्न झाल्यापासून जेव्हा कधी शिल्पाची आई तिला भेटायला सासरी जायची, तेव्हा तिच्यात आणि शिल्पाच्या सासूमध्ये हा सवांद व्हायचाच.
शिल्पा आईवडिलांची एकुलती एक, लाडात वाढलेली मुलगी. लाडात वाढलेली होती, पण लाडाने वाया गेलेली नव्हती.
तिला उत्तम स्वैपाक येत होता. रोज छान छान पदार्थ बनवून ती आईवडिलांना खायला घालायची. घर सुद्धा ती अगदी टापटीप ठेवायची. घरातली प्रत्येक गोष्ट तिच्या मर्जीने व्हायची. घरात तिला काम असायचं ते फक्त स्वैपाकाचचं. ते सुद्धा तिची आवड म्हणून तिनेच स्वतःहून अंगावर घेतलेलं. बाकी भांडी घासायला, फरशी पुसायला त्यांच्याकडे बाई होती. कपडे धुवायला मशीन होतं. त्यामुळे ह्या कामांशी तिचा क्वचितच संबंध आला होता.
लग्नाचं वय झालं तसं, तिच्यासाठी स्थळं शोधणं सुरू झालं.
तिच्या आईवडिलांना तिला आपल्या घरातलं वातावरण जसं आहे, तशाच घरातच द्यायची होती.
स्थळं तर खूप येत होती तिच्यासाठी. पण जुळून मात्र कुठेच काही येत नव्हतं. अशातच विक्रमच स्थळ आलं. मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला होता. मुख्य म्हणजे सगळ्यांनाच तो एका नजरेत आवडला. अडचण एकच होती.
स्थळ जरा लांबचं, आणि गावातलं होतं आणि तिच्या आईवडिलांना तिला आपल्या नजरेच्या टप्प्यातच ठेवायची होती.
मुलगा शहरात नोकरीला होता, पण ते राहायला शहराजवळच्या एका गावात होते. मुलगा जाऊन येऊन नोकरी करायचा.
विक्रम सोडून सगळे खेडवळ होते. त्याचं शिक्षण, नोकरी शहरात झाल्याने त्याच्यावर शहरी प्रभाव होता एवढंच.
शिल्पाचं कुटुंब तर पहिल्यापासूनच शहरात राहणार होतं.
गावातल्या माणसांशी कसं जमेल, आपली मुलगी तर शहरात वाढलेली, म्हणून शिल्पाच्या घरच्यांंनी, मुलगा आवडला असूनही त्यांना नकार कळवून टाकला.
पण इकडे विक्रमच्या मनात शिल्पा भरली होती.
त्याने आईवडिलांना सांगितलं मी याच मुलीशी लग्न करणार, मला दुसरी कोणी नको.
त्यावर आईवडील म्हणाले, ते नाही म्हणतात तर जबरदस्ती करायची की काय आपण??
तेव्हा तो म्हणाला, आपण पुन्हा बोलून बघूया.
कदाचित त्यांचं मन पालटेलही.
मग विक्रमसाठी म्हणून त्याचे आईवडिल पुन्हा बोलण्यासाठी शिल्पाच्या घरी गेले.
विक्रमच्या आईने स्वतःच पुढे होऊन त्यांना समजावले, तुम्ही नका हो काळजी करू. माझ्या पोरीसारखी बघीन मी तिला. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा.
पण शिल्पाच्या आईच म्हणणं होतं, आमची मुलगी कधी गावात राहिली नाही. पूर्णपणे शहरातच वाढलेली आहे. तिला नाही जमवून घेता येणार तुमच्याशी. फारशा कामांची सवयही नाही तिला.
त्यावर विक्रमची आई त्यांची समजूत घालत गोड शब्दांत म्हणाली, कामांचं काय हो घेऊन बसलात? सगळं तिच्यावरच सोडणार होय आम्ही?
आम्हाला पण कळतं की हो, आता मी म्हटलं ना पोरीसारखी बघेन, मग आणखी काय हवं बोला?
माझ्या पोराचा जीव बसलाय तुमच्या मुलीवर, म्हणून मागे लागलीये. तेवढं आता आम्हाला नाराज करू नका.
शिल्पाच्या आईने तरीही त्यांच्याकडे विचार करायला वेळ मागितला. विक्रमच्या आईवडिलांना दोन दिवसांंनी कळवतो, असं सांगितलं.
शिल्पाच्या घरच्यांना काय करायचं काही कळत नव्हतं. मुलगा सर्व बाजूने चांगला होता. तशी माणसं वाईट वाटत नव्हती. फक्त गावातली म्हणून विचारांचा फरक असेल असं राहून राहून वाटत होतं.
पण शिल्पालाही तो आवडला म्हटल्यावर त्यांनी होकार कळवून टाकलाच.
ठरल्याप्रमाणे लग्नही झालं, अन् लग्नातच तिकडच्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज आला . छोट्या छोट्या कारणांवरून रुसवे फुगवे झाले. पण शिल्पाच्या घरच्यांंनी जास्त मनाला लावून न घेता पोरीची पाठवणी केली.
पुढे प्रत्येक वेळी तिला भेटायला गेल्यावर तिच्या आईला थोडं थोडं खुपत होतच. पण पोरीच्या संसारात नको ढवळाढवळ करायला म्हणून ती प्रत्येकवेळी गप्प बसली. संसारही तसा नवाच होता.
शिल्पा देखील जमवून घ्यायचा प्रयत्न करत होती. तिच्या घरात कधी लागलं नाही त्याच्या चौपट सासू काम लावत होती.
पहिले पहिले तर शिल्पाचे सारखे डोळेच भरून यायचे.
तिला घरची खूप आठवण यायची.
स्वैपाक ठिक, पण धूणं-भांडी, फरशी पुसणं ही कामंसुद्धा हिच्यावरच टाकली गेली होती, जी तिने तिच्या घरात देखील कधी केली नव्हती. सासू फक्त आरामात बसून ऑर्डरी सोडायची.
बाई लावण्याबद्दल तिने विक्रमला विचारलं तर तो म्हणाला, बाई लावलेली माझ्या आईला चालत नाही. आई तर आतापर्यंत करत होती मग तुला काय होतंय.
शिल्पा म्हणाली, आईंना सवय आहे हो पहिल्यापासून, मी कधी हे केलं नाही.
त्यावर त्याचं उत्तर आलं, ते तू आणि आई बघून घ्या.
तो चांगला होता, तिच्यावर प्रेमही करायचा, पण घरच्यांच्या शब्दाबाहेर नव्हता.
पुढे आणखी चार पाच महिन्यांनी यातून सुटण्यासाठी शिल्पा त्याला म्हणाली, मी नोकरी करते कुठेतरी चांगली.
माझं शिक्षणही आहे.
तर त्याच्याकडून उत्तर आलं, आईवडिलांना आवडणार नाही. आमच्यात मुली बाहेर जाऊन कामं करत नाहीत.
तेव्हा मात्र तिला खूप वाईट वाटलं. ती स्वतःशीच म्हणाली, एवढे कसे मूर्ख ठरलो आम्ही, नोकरीबद्दल आधी विचारायला पाहिजे होतं. पण हल्ली सगळ्याच बायका नोकरी करतात, आडकाठी घेतली जाईल असं वाटलंच नाही कोणाला.
आता मात्र शिल्पाला सगळीकडून अडकल्यासारखं झालं होतं.
मुलाचा चेहरा पाहिला आणि आपण भुललो. नीट विचार करायला पाहिजे होता.
ह्या लोकांच्या आणि आमच्या मानसिकतेत जमीन आसमानाचा फरक आहे.
एक दिवस मात्र शिल्पाने विचार केला. मी या सगळ्याला प्रतिकार केला नाही तर तर माझं जीवन असंच सडेल. काहीतरी करणं गरजेचं आहे आता.
नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सासूने ऑर्डरी सोडायला सुरुवात केल्यावर ती म्हणाली, मी स्वैपाकाच काम तेवढं करेन. बाकी काही करणार नाही. धूणंभांडी करून माझी कंबर कामातून गेलीये. त्याचं काय ते तुम्हीच बघा.
सासूला हे उत्तर अनपेक्षित होतं.
ती शिल्पावर डाफरून म्हणाली, तुझी ही हिम्मत??
घरातली काम नाही करायची, तर काय तुला देव्हाऱ्यात बसून पुजू का आता??
शिल्पा म्हणाली, माणसासारखी कामं दयाल तर करीन. जनावरांंसारखी कामं लावलीत तर नाही करणार.
कामं नाही करणार, तर मग राहू नकोस इथे, जा आपल्या माहेरी……सासूने पुन्हा ऑर्डर सोडली.
शिल्पा म्हणाली, ठिक आहे, संध्याकाळी येऊ दे यांना मग जाते मी.
तिची सासू म्हणाली, तो काय माझंच ऐकणार, बघ कसा काढेल घराबाहेर तुला.
संध्याकाळपर्यंत शिल्पाने स्वैपाकाशिवाय दुसरं काहीही केलं नाही. विक्रम आल्या आल्या तिच्या सासूने शिल्पाच्या नावाने बोटं मोडायला सुरुवात केली.
नुकताच कामावरून आलेला विक्रमही मग शिल्पावर वैतागला. पण शिल्पाही ऐकायला तयार नव्हती. तिने ठरवलच होतं, आता आर या पार!
ती म्हणाली, मी राहायचं की जायचं ते आता तुम्हीच ठरवा.
सासूबाईंनी तर मला माहेरी जायला सांगितलंय.
विक्रमला शिल्पाही हवी होती. त्याने तिला थोडं थांबायला सांगितलं. शिल्पा म्हणाली, मी थांबेन पण जनावरासारखी कामं नाही करणार.
ते ऐकून विक्रमची आई जोरातच ओरडली, कामं नाही करायचीत चालती होऊ देत तिला.
विक्रमने विचार केला, वातावरण फार गरम आहे. शिल्पा माहेरी गेली तर तिचही डोकं थोडं थंड होईल. आणि आईचा रागही कमी होईल.
त्याने शिल्पाला समजावलं. ती दुसऱ्या दिवशी माहेरी निघून गेली.
तिच्या आईवडिलांना वाटलं, तिला तेवढाच त्रास होत असणार त्याशिवाय ती हे पाऊल उचलणार नाही. आईने तर तिचे हाल बघितलेही होतेच.
आठवड्याभराने विक्रमने ठरल्याप्रमाणे तिला घरी परत येण्यासाठी फोन केला, तेव्हा शिल्पा म्हणाली, कामाचं काय ते ठरवलं का?
आता कुठे जरा आईचा राग निवळलाय. तू ये पहिले, मग ठरवू आपण, विक्रमने सारवायला बघितलं.
पण शिल्पाही अनुभवाने शहाणी झाली होती, ती त्याला अगदी ठासून म्हणाली, पहिले काय ते ठरवा तुम्हीच. मग मला बोलवा. मी आता कामवाली म्हणून येणार नाही. सून म्हणून बोलावणार असाल तर येईन. त्यांना म्हणावं, लेक राहू दे, पहिले सून तरी माना!!
विक्रमने तिला खूप समजावलं, पण आता काही ऐकण्याची तिची तयारीच नव्हती. मला समजवण्याऐवजी तुम्ही घरच्यांना समजवा, हाच होऱ्या पकडला तिने.
पंधरा दिवस झाले, शिल्पा सासरी परतली नाही, म्हणून गावात कुजबुज चालू झाली, कोणी कोणी आडून विचारायला देखील लागले, सून नाही आली अजून तुमची?
विक्रमची आई त्याच्या मागे लागली, जरा समजव आणि बोलव तिला.
विक्रमने सागितलं, ती नाही ऐकत. माझा संसार तुटणार वाटतं असाच.
विक्रमला हिंमत होत नव्हती, आईशी खरं काय ते बोलायची. आणि एकीकडे शिल्पाविना राहणंही कठीण होत होतं.
नंतर त्यालाही विचार केल्यावर हळू हळू पटायला लागलं, तिचंही काहीतरी अस्तित्व आहे. आईने कामं केली म्हणून तिने करायला पाहिजे, हे तिच्यावर लादणं चुकीचं आहे. सगळ्या सोयी असताना एखाद्याला उगाच परंपरेच्या नावाखाली राबवणं, योग्य नाही.
मग काय उपयोग या शिकण्याचा??
त्याने आईशी धैर्याने बोलायचं ठरवलं.
शिल्पालाही फोन करून सांगितलं, तू बरोबर आहेस, आम्ही चुकलो. मी समजवतो आईला. आता तू परत येशील ते सून म्हणूनच!!
मग आई -वडीलांनाही म्हणाला, आज इतके दिवस झाले शिल्पा माहेरी गेलीये. चांगलं वाटतय का तुम्हाला? चुकी आपलीच आहे ना? आपण खरं तर गावातली मुलगीच लग्न करून आणायला पाहिजे होती, जिला अशा सर्व कामांची सवय आहे. त्यांनी तर सांगितलं होतं, हिला जास्त कामं जमणार नाही म्हणून. तेव्हा तूच म्हणालीस ना आई, कामाचं काही नाही, पोरीसारखं बघेन म्हणून.
स्वतःच्या पोरीला कामं नको म्हणून, दोन वर्षांपूर्वी दिवाळीत वॉशिंग मशीन दिली ना आपण?
तिला तर सवयही होती कामांची. तरी तुझा जीव तुटत होता ना तिला काम करताना बघून.
मग यांचं कुठं चुकलं? शिल्पा नव्हती तेव्हाही मी तुला म्हणायचो, कामात नको अडकू. एवढं नको काम करू.
पण तू तुझा हट्ट सोडायला तयारच नव्हतीस.
तुझ्या वाढदिवसाला खास मशीन घेऊन दिली मी. लाईटबिल वाढेल, म्हणून तू तिचा वापरही केला नाहीस.
मी तर म्हणतो, दोघीही काम करू नका. लाईटबिल भरायला आहे मी खंबीर, तेव्हा ही तुला मी म्हटलेलं.
वरच्या कामांना आपण बाई लावू. दोघीही मोकळ्या राहा. आवडतं ते काम करा. आणि आनंदात रहा. तिनेही चांगलं शिक्षण घेतलंय आई. तिलाही काही करावंसं वाटत असेल तर करू दे. माझ्या ऑफिसमधल्या बाया घरी आल्या की किती कौतुक करतेस त्यांचं? मग सुनेला का आडकाठी?
आपण बदलूया, जे करत आलो तेच कायम करत राहिलच पाहिजे असं नाही.
तू बदलशील, तर तुला बघून ताईच्या घरचे बदलतील. गावातली आणखी दहा माणसं बदलतील.
या वयात तुझ्या पदरी पुण्य पडेल.
आणि मग हे पटत नसेल, तर पोराचा संसार कायमचा तुटला समज.
ते ऐकून विक्रमचे वडील म्हणाले, पोरगा चुकीचं बोलत नाहीये.
दुसऱ्याच्या पोरीला सुखी ठेवलं, तर आपली पोरगी पण आपोआप सुखी होईल. बरोबर आहे त्याचं.
त्याच्या आईलाही चूक समजली. ती म्हणाली, आम्ही आपले सतत तोटका विचार करत राहिलो. पण पोरांनी डोळे उघडले आज.
उद्याच जाते पोरीकडे आणि तिला समजावून आणते परत.
दुसऱ्या दिवशी लगेचच विक्रमचे आईवडील शिल्पाच्या घरी गेले, आणि तिची आणि तिच्या घरच्यांची झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि म्हणाले, आम्ही चुकीचा विचार करत होतो, तुमच्या पोरीने आणि आमच्या पोराने आम्हाला शहाणं केलं.
सासू शिल्पाला म्हणाली, तू कामवाली म्हणून नाही तर माझी लेक म्हणूनच राहणार बघ. तुला काय करायचंय ते कर. आम्ही नाही अडवणार. पण पोराचा संसार मोडून जाऊ नको. ते पाप आमच्या पदरी नको.
शिल्पानेही मग जास्त आढेवेढे न घेता त्यांच्या शब्दाचा मान राखून सासरी परत यायचं ठरवलं.
पुढे मात्र दोघींंनीही घरकामाचा जास्त लोड न घेता, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासल्या.
शिल्पाने आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी सुरू केली. तिच्या सासूबाईंंनीही आपल्या
जुन्या आवडी निवडी, जुने छंद जोपासत स्वतःला अगदी प्रयत्नपूर्वक घरातल्या कामाच्या रामरगाड्यातून बाहेर काढलं.
खरंतर, हे मोकळेपण त्यांनीही कित्येक वर्षांनंतर अनुभवलं होतं, त्याची सवय झाल्यावर मात्र त्यांना मनापासून ते आवडायलाही लागलं………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Real life madhe aase honar ka?
Mi Orthodox family madhe aahe same maza sobat hot aahe
मला वाटत हे तुमच्यावरच आहे. कुठेतरी प्रत्येकाने स्टँड घेतला पाहिजे. बरेचदा आपण परिणामाला घाबरून बोलून बघतच नाही.तुमच्याच हातात आज मार्ग काढणं….