अवघ्या वर्षभरातच तुटलेल्या संसाराची ही गोष्ट…….
प्रवीण आणि पूनमचा प्रेमविवाह. लग्नाअगोदर वर्षभर एकमेकांसोबत हिंडले फिरले होते. प्रवीण पूनमपेक्षा चांगला आठ वर्षांनी मोठा होता. हिचं नुकतंच कॉलेज संपलं होतं. कुठल्या तरी मैत्रिणीकरवे यांची ओळख झाली अन्
पुनमला पाहताच प्रवीण तिच्या प्रेमात पडला. पूनमही आढेवेढे घेत का होईना पण त्याला हो म्हणाली. प्रवीणच्या लग्नाचं चाललंच होतं. लगेच त्याने घरी पूनमची सर्वाना ओळख करून दिली. तिच्यामधे न आवडण्यासारखं काही नव्हतंच, त्यामुळे त्याच्या घरच्यांना ती लगेच पसंतही पडली.
लवकरच त्यांनी तिच्या आईवडिलांकडे मागणीही घातली. तिच्या आईवडिलांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त मुलाचं वय जरा जास्त वाटत होतं. पण मुलीला मुलगा आवडलाय म्हटल्यावर त्यांनीही संमती देऊन टाकली. पण आत्ता लगेच आम्ही तिच्या लग्नासाठी तयार नाही आहोत. अजून ती लहान आहे. किमान एक वर्ष तरी तुम्हाला थांबावं लागेल, असं मात्र सांगितलं.
मुलाकडच्यांना खरं तर घाई होती. मुलाचं वय वाढत होतं.
पण वर्षभर थांबायला त्यांनी कसाबसा होकार दिला.
प्रवीण आणि पूनम तर एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होते. बरेचदा ती त्याच्या घरीही जायची. त्याच्या घरच्यांमध्ये ती चांगली रुळलीही होती.
त्याला एक मोठा भाऊ होता. त्याचं लग्न झालेलं होतं, आणि त्याला दोन मुलीही होत्या.
घरातले सगळेच तिच्याशी खूप छान वागायचे.
बघता बघता वर्ष निघून सुद्धा गेलं.
दोघांचं अगदी दणक्यात लग्न पार पडलं. नव्या घरी खूप लाड होत होते पूनमचे. लहान असल्याकारणाने तिला सारे समजूनही घेत होते.
मात्र लग्नाला महिना नाही होत, तोवरच प्रवीणच्या आईला असाध्य रोगाचं निदान झालं.
जेमतेम वर्ष, दोन वर्ष काढू शकणार होती ती. सर्वांनाच खूप वाईट वाटलं.
नुकताच आनंद आला होता घरात, आणि आता हे मोठं दुःख उभं ठाकलं होतं.
सर्वजण तिला जेवढं खूष ठेवता येईल, तेवढं ठेऊ पाहत होते.
कोण सांगेल त्या डॉक्टरांकडे इलाजासाठी नेत होते. काही बाकी सोडायचं नव्हतं त्यांना.
पण प्रवीणच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती.
त्यातच तिचा आग्रह सुरू झाला, प्रवीणच्या पोराचं तोंड पाहायला मिळावं म्हणून.
आता लग्न होऊन जेमतेम तीन महिने झाले होते. पूनमला एवढ्यात खरंतर मुलं नको होतं. पण प्रवीणने तिला आपण आईची एवढी इच्छा पूर्ण करूया म्हणून मनवलं.
आणि पुढच्या दोन महिन्यातच त्यांच्याकडे गोड बातमी सुद्धा आली.
सगळं घर खूष झालं. प्रवीणच्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद पसरला.
तिची प्रकृती पण सुधारल्यासारखी वाटायला लागली होती.
अशातच तिने एक दिवस या दोघांना बोलावलं, आणि त्यांना म्हणाली, आता माझी एकच इच्छा आहे. मला नातवाचं तोंड पहायचय. पहिल्या दोन नातीच आहेत. आता तरी नातू होऊ दे.
त्यांच्या अशा बोलण्याचे आश्चर्य वाटून पूनम म्हणाली, ते आपल्या हातात थोडंच आहे.
त्यावर प्रवीणची आई म्हणाली, नाहीये, म्हणूनच काय आहे ते पाहून घ्या. म्हणजे दुसरा प्रयत्न करता येईल लवकरच.
त्या असं कधी बोलतील हे पूनमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं.
तिला तो विचारही सहन झाला नाही, ती तिथून ताडकन उठली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन रडायलाच लागली.
तिला अगदी गुदमरल्यासारखं वाटत होतं.
हे काय नाटक, ह्यांनी सांगितलं की ठेवायचं आणि ह्यांंनी सांगितलं की काढून टाकायचं??
स्वतःच्या नसत्या इच्छेपायी माझ्या पोटातल्या जिवाचा खेळ करतायत ह्या.
प्रवीण तिला समजवायला मागे आला, तशी ती प्रचंड रागाने थरथरत म्हणाली, मला काही ऐकायचं नाहीये. बाळ कोणीही असेल, ते माझ्या पोटात आलं आणि माझा जीव गुंतला त्याच्यात. कोणी का असेना आता माझा जीव आहे ते.
प्रवीण म्हणाला, अगं नुसतं बघायचंय ग.
मुलगा आहे कळलं तर आई तेवढीच आणखी जगेल आनंदाने!
आणि मुलगी आहे कळलं तर, निकाल लावून दुसरा चान्स घ्यायला लावेल हो ना?, पूनम रागाने कापतच म्हणाली.
किती दिवस राहिलेत तिचे? मलाही योग्य नाही वाटत आहे, पण तिचा विचार करूनच बोलतोय मी, प्रवीणला आईच्या काळजीपुढे चूक-बरोबर दिसतच नव्हतं.
जाणाऱ्या माणसापेक्षा जगात येणाऱ्याचा विचार करणं जास्त योग्य आहे या क्षणी, जाणाऱ्या माणसासाठी पोटातल्या जीवाला पणाला लावणार नाही मी.
कोणत्या शतकात राहतोय आपण??, पूनमचा नुसता त्रागा होत होता.
पुढचे दोन दिवस प्रवीणने काही पूनमकडे हा विषय काढला नाही. पण त्याची आई मात्र त्याच्यामागे भुणभुण करतच होती, काय ते लवकर ठरवा म्हणून.
प्रवीण तिला म्हणालाही, पुनमची अजिबात इच्छा नाही म्हणून.
तर ती म्हणाली, तुला पूनम जवळची झाली माझ्यापेक्षा? तिच्या इच्छेसाठी माझ्या शेवटच्या दिवसात माझी इच्छा डावलणार का तू?
असं काय मागितलं मी?
प्रवीण आईला खूप समजावू पहात होता, पण ती देखील हट्टालाच पेटली होती. सतत डोळ्यात पाणी काढत बसायची,
अन् मग प्रवीणचा कल तिच्याकडेच झुकला जायचा.
त्याच्या आईने भावाच्या वेळी असं काही केलं नव्हतं. तशी दुसऱ्या वेळी आस लावून बसलेली मुलाची, पण मुलगी आल्यावर थोड्याश्या नाराजीत का होईना, तिचं सर्व केलं होतं.
प्रवीणला वाटायचं, आता हे काय मनात आणलं माझ्याच वेळी?
काही दिवसानंतर पूनमचा मूड बघून मात्र प्रवीणने पुन्हा तोच विषय काढला. पूनमने तेव्हाही निक्षूनच सांगितलं, काहीही झालं तरी मी तुमचं ऐकणार नाही.
सारखं सारखं विचारून मला मला त्रास देऊ नका.
त्याचदिवशी संध्याकाळी प्रवीणच्या आईनेही दोघांना बोलावलं, आणि काय ते ठरलं ते विचारलं.
पूनमने तिथल्या तिथे त्यांना सांगून टाकलं, मला हे जमणार नाही. मी निष्पाप जीवाशी खेळणार नाही.
प्रवीणची आई मोठमोठ्याने रडू लागली. प्रवीणलाही पुनमचा राग आला आणि तो तिला म्हणाला, माझ्या आईची इच्छा पूर्ण नाही करायची तर निघून जा घरातून.
पुनमलाही वीट आला होता, तिथे राहायचा.
तिने बॅग भरली आणि घरातून निघायची तयारी केली.
मोठा भाऊ , त्याची बायको यांनी तिला अडवलही, काही दिवसात नीट होईल सांगितलं, पण पूनमला आता तिथे राहवसच वाटत नव्हतं.
प्रवीणला वाटलं, जाईल चार दिवस आणि येईल परत.
इकडे घरी आल्यावर पूनमने तिच्या घरच्यांना सर्वकाही सांगितलं आणि म्हणाली, मी आता परत त्या घरात पाऊल ठेवणार नाही.
अशा विचारांच्या माणसात मला राहायचं नाही, त्यापेक्षा मी एकटी राहीन. माझ्या मनातून ते घर कायमचं उतरलं.
चार दिवसाचे पंधरा दिवस झाल्यावर मात्र पूनम येत नाही म्हटल्यावर प्रवीण तिच्या माहेरी गेला खरा, पण पूनमने मला आता तुमच्यासारख्या माणसात राहायची इच्छाच नाही, असे त्याला खडसावून सांगितलं.
त्याला वाटलं, राग गेल्यावर काही दिवसांनी होईल शांत. जाता जाता तिच्या आईवडिलांनाही त्याने, माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचे मन वळवा असं सांगितलं.
पण तिच्या घरच्यांंनीही स्पष्ट नकार दिला. संबंध तुटले तरी चालतील पण हे होणं शक्य नाही, असे बोलून ते आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे राहिले.
आता पूनमचं तर देवाकडे एकच मागणं होतं, मला मुलगीच होऊ दे.
पूनमने मनापासून मागितलेलं खरं ठरलं, आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिला मुलगीच झाली. पूनमला अगदी भरून पावलं
तिने देवाचे अगदी शतशः आभार मागितले.
मधल्या काळात प्रवीणची आई गेली आणि तिच्या लवकर जाण्याचं खापर त्याने पूनमवरच फोडलं.
त्यामुळे आपल्या आईच्या लवकर जाण्याला जबाबदार असणाऱ्या मुलीबरोबर संसार करण्यातला त्याचा रस निघून गेला. मुलगी झाल्यावर तिला भेटायलाही तो गेलाच नाही.
तशी पूनमनेही त्याची पर्वा सोडूनच दिली होती. आता तिचं सर्वस्व फक्त तिची मुलगीच होतं. स्वतःच्या हिंमतीवर तिचा विश्वास होता.
त्याच विश्वासाच्या जोरावर ती नोकरी मिळवली, आर्थिक सक्षम झाली आणि आईवडिलांच्या मदतीने आपल्या मुलीला उत्तमरीत्या वाढवलं.
आज त्याच पूनमची मुलगी पंचवीस वर्षांची आहे, आणि मोठ्या अभिमानाने तिने आपल्या आईचं नाव लावलं आहे!!
आज पूनम कृतार्थ आहे…..!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल