कधी येऊ हो ताई कामाला?
गिरीजाच्या घरी काम करणाऱ्या रेणूने खिडकीतूनच आवाज देऊन विचारलं.
तिला पाहून गिरीजा एकदम चकित झाली, तू कशी काय ग आलीस अचानक?
रेणू म्हणाली, या साईडला जरा काम होतं; म्हटलं फोनवर काय सारखं विचारायचं, डायरेक्टच जाऊन विचारू…….
गिरीजा म्हणाली, परिस्थिती माहीत आहे ना ग तुला??
कसं बोलावू सांग??
ताई काय करू सांगा? किती दिवस घरात राहू आणि खाऊ तरी काय मग??
गिरीजाने सुस्कारा सोडला, आणि म्हणाली, तेच झालंय ग सगळ्यांचच. मला खूप वाटतं बघ, पण काय करू, माझ्याही मिस्टरांचं काम गेलं. शिवाय पगारही नाही मिळाला, दोन महिन्यांपासून. तरी मी तुला मागच्या महिन्यापर्यंत पगार दिला. पण आता खरंच शक्य नाही ग. ते जात असते ना तर नक्की तुला पगार देत राहिले असते मी, आपल्याला मिळतोय तर समोर द्यायला काय??
पण आता आम्हीच थोडं साठवलंय त्यात पुरवून राहतोय. खूप वाईट वाटतय, पण माफ कर ग…….
यांना कुठे लागली ना नोकरी तर तुझा पगार नक्की म्हणजे नक्की चालू करेन…….
बोलता बोलताच गिरीजाचे डोळे भरून आले, ते बघून रेणू म्हणाली, ताई तुम्ही नका जीवाला लावून घेऊ एवढं, मी तुम्हाला ओळखते ना चांगली. पाच वर्षे झाली मी काम करतेय तुमच्याकडे, अडीअडचणीला खूप मदत झाली तुमची.
मला तुम्हाला भेटावंस पण वाटलं, म्हणून खरंतर आले मी.
असु दे, माझं होईल सुरु कुठंतरी. दोन- तीन बाया बोलल्यात मला, त्यांना होत नाहीये, तुझी तू काळजी घेऊन ये, आम्ही आमची घेतो.
सगळ्यांना विचारत असते मी. त्या गावडे काकूंना तुम्ही ओळखता ना, त्यांनाही विचारलं. पण त्यांचाही मुलगा, सून
घरात आहेत ना, त्याही म्हणाल्या ते जायला लागले की बोलावते तुला. सध्या पैशाची टंचाई आहे.
अगं पण ते तर……बोलता बोलता गिरीजाने आपलं तोंड आवरत घेतलं.
रेणू थोडंफार इकडंच तिकडंच बोलून निघून गेली.
आणि इकडे गिरीजाच्या डोक्यात किडा वळवळायला लागला.
असं कसं? काल तर फोनवर बोलणं झालं काकूंशी. आम्ही बोलतानाच तर मुलगा आला होता कामावरून. त्यांनीच सांगितलं मुद्दाम तो आल्याचं. अगदी म्हणाल्याही, तो जातो बाई कामाला, घरी बसून कसं चालेल? मला कळला टोमणा.
त्याला वर्क फ्रॉम होम करू देत नाही म्हणून त्याच्या कंपनीच्या नावाने ओरडतही होत्या. शिवाय सुनेच्या कंपनीने तिला वर्क फ्रॉम होम करायला दिलंय म्हणून कित्ती बरं, अशाही म्हणाल्या.
घरी इन्कम चालू आहे व्यवस्थित, तरी असं बोलावं वाटलं??
तिचा पगार टाळण्यासाठी?? पूर्ण नाही तर अर्धा दिला असता तरी चाललं असतं…… तेवढाच तिला आधार मिळाला असता.
काय रे देवा, इथे माझं मन हळहळतय, इच्छा असूनही तिला मदत करता येत नाहीये म्हणून आणि जे करू शकतात, त्यांना इच्छाच होत नाही, कुणासाठी थोडंफार तरी काही करायची??
जाऊ दे, ज्याची त्याची मर्जी, काय बोलणार आपण??
पुढे दोन दिवसानंतर गरजेचं सामान आणायला म्हणून गिरीजा बाहेर पडली, तर दुकानातून बाहेर निघताना चार पोरं मागे लागली. ताई खायला द्या, नाहीतर रेशन तरी भरून द्या ना म्हणून. आपल्याच पोरांएवढी पोरं काकुळतीने हात पसरताना पाहून, काटा आला अंगावर तिच्या.
त्यातल्या त्यात तिने त्यांना बिस्किटाचे पुडे हातात दिले.
गिरीजाला वाटलं, आपली परिस्थिती चांगली असती तर दिलं असतं थोडंफार तरी रेशन भरून यांना.
घरी आल्यावर तिने नवऱ्याला सांगितलं, तर तो म्हणाला हो ग. माझ्याही मागे लागतात. मी पण घेऊन देतो असच काहीतरी.
पण हे बघ, आत्ताच मला मेसेज आलाय, माझ्या कंपनीने राहिलेल्या महिन्यातला, एका महिन्याचा अर्धा पगार जमा केलाय. खूप मोठी अमाऊंट नाहीये, पण चल; तुझ्या बाईला याही महिन्याचा पगार देऊ आपण आणि त्या पोरांना थोडंतरी रेशनही भरून देऊया. मलाही सारखं कसतरी वाटतं त्यांच्याकडे बघून……..
गिरीजाचं मन आनंदाने भरून आलं. कुणालातरी फुल ना फुलाची पाकळी का होईना; देता येतीये, याहून मोठं मानसिक समाधान ते काय असावं??
पटकन जाऊन तिने देवासमोर साखर ठेवली आणि अगदी मनापासून हसून डोळे मिचकावून त्याला “Love you” म्हणाली.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
लेख आवडल्यास माझ्या ‘हल्ला गुल्ला’ या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा………
मस्तच.
रब बंदेकी नियत देखता है
khuf chan
मस्त….नेहमीप्रमाणे..